Posts

Showing posts from March, 2020

चंद्र..चाफा..

३९पिचकाऱ्या उडवा भिजवा एकामेका.. रंगात रंगुनी रंग सातही फेका.. ती निळे नेसली निळाच पडला डाग.. मातीची भिडली आभाळाला आग..!  ४० *कधी फेडायाला,नेसायाला मागे बाहुली दिठीचे स्वप्न ठेविते जागे आकाश दिगंबर अविरत होते आहे अन् धरती खाली रंग बदलते आहे  ४१ *राहिली नदीवर तशीच घागर माझी.. ना भरली सरली व्यथा चालली माझी.. हे फिरते आहे किती युगे ऋतुचक्र शेपूट राहिले तसेच माझे वक्र..! ४२ *दारात उभी तिनसान गुलाबी हसली.. हसताच क्षणातच सांग कुणावर रुसली? स्वर्गीय तिचा आनंद हिरावुन नेला अंधार तसा घरट्यात समेवर आला! ४३  *निष्पर्ण उभा हा वृक्ष पहा अंधारी शोधात काजवा फिरत जाय रंगारी आकाश पालवी फुटत जाय धरतीला.. माणूस पारखा सत्य कळुन सत्याला..! ४४ *पक्ष्याने होता उष्टा तुकडा आणला.. चोचीतुन पडला बकरीने तो गिळला.. प्रारब्ध हेच? की सर्व बदलता येते?.. आंधळ्या हातांना डोळस श्रध्दा फुटते..! ४५ *सौंदर्य फुलू दे असेच अंतर्बाह्य स्वाभाविक ते ते असते दुसरे काय?.. ती अवसही नव्हती आणि पौर्णिमा नव्हती.. कां बांधित बसशी उगा भ्रमाच्या भिंती..! ४६ *कोसळण्याआधी कुठून कुठे ते ठरते.. कोस...

चंद्र..चाफा..मनोगत,शिरिष पै यांची प्रस्तावना,आणि या संग्रहातील रुबाया

"पूर" या संग्रहा नंतर तब्बल १७ वर्षा नंतर म्हणजे २००३ साली माझ्या " चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..!! " या रुबायांचा संग्रह प्रकाशित करण्याचा योग आला. मधल्या १७ वर्षाच्या काळात पिंपरी-चिंचवड परिसरातल्या लघु दैनिके,साप्ताहिके यांचेसाठी काम केलं.मला पैसे फार मिळत नसत पण अगदी अग्रलेख,स्तंभलेखन,शब्दकोडी,हास्य-विनोद,या भागातील सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मुलाखती,प्रासंगिक लेख,असे विपुल लेखन केलं.शब्दगंध साहित्य कला सहयोग या संस्थेच्या माध्यमातून काव्य-साहित्य विषयक अभिनव उपक्रम राबविले.नुसतीच कवी संमेलने आयोजित करण्या ऐवजी आपला साहित्या विषयीचा अभ्यासही होईल असे त्या उपक्रमांचे डीझाईन असे." क्षण कवितांचे" "कविता ध्यास :एक अभ्यास " हे कार्यक्रम विशेष संस्मरणीय ठरले.याच काळात " छान्दसी " हे वाङमयीन त्रैनियतकालिक सुरु केले.ते '८३-'९३ पर्यंत चालवले.ही सर्व धडपड करत असताना जे अनुभव गाठीशी आले ते महत्वाचे होते.विशेष म्हणजे अशा उद्योगांमुळे माझ्या प्रतिभेला बळ मिळत गेले.हात सतत लिहीता राहिला.याच काळात ज्येष्ठ कवी व रमेश ग...

बेड्या

बेड्या सारे विश्व- एखाद्या छोट्या भांड्यात ठेवू पहाल तर ते कसे जमेल? असं करा या विश्वाबिश्वाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. सरळ आपलं भांडं उचला न् उभे रहा दुधाच्या रांगेत- आणि हो..! कार्ड? नाहीतर परत यावं लागायचं.. "भगवंताऽ कधी रे सुटका व्हायची?" हा "भगवंत" कोणाचा? - आय मीन शेजारचे हरीभाऊ 'सुटलेले' नाहीत तोवर- "भगवंत" असणारच आहे. मग तो कुणाचाही आणि कसाही कां असेना.. ते जाऊ दे- दुध केंद्रावरची एखादी पटवली की नाही?- भाऊंच्या वेळची गोष्ट वेगळी होती दारात "दुभती" बांधलेलीच असायची.. काय त्यावेळचे ते भाऊ आणि काय त्यांची ती भांडी- व्वा..! अगदी काठोकाठ..! निसर्गाचा एक नियम आहे जगणारं जगत राहणार मरणारं मरत राहणार (च्यायलाऽ म्हणजे दैववाद-) मग एवढं घाबरायला काय झालं? काहीही झालं तरी "हरीभाऊंची" सुटका भांड्याशी भांडं आलं आणि वाजलं म्हणून होणार आहे कां?- साधी दुध केंद्रावरची पोरगी पटवता नाही आली तुम्हाला आणि विश्वाच्या गोष्टी करता- काय राव?- उचललं भांड न् काढला आवाज..!! दुधाचं एक ठिक आहे पण अख्ख्या पृथ्वीचीच...

कवळायाला

कवळायाला कवळायाला विश्व निघालो आणि मिळाली फक्त कोठडी अंधाराच्या सीमेवरती एक अहल्या टाहो फोडी सगे सोयरे होतो आम्ही असा न केला कोणी दावा जो आला तो निघून गेला एक एकटा आपुल्या गावा या दु:खाच्या विश्वखसावर शब्द पडावा अर्था आधी पोकळीत मग त्या अर्थाचे घुबड घुमावे होऊन व्याधी आयुष्याचे दान हवे तर- माग म्हणावे मरणासाठी स्मशान नाही.जन्म मिळाला तुला जगी या मुक्तीसाठी कवळायाला विश्व मिळाली तिची वेदना.प्रीत परंतू मीच करंटा कवळुन बसलो हाय! इथे ही फक्त कोठडी. ©रमेश यशवंत वाकनीस©

हे झाड

हे झाड गुदमरुन तू मरणार नाहीस आणि धड जगणार नाहीस लाख यत्न केलेस तरी सावली खालून सुटणार नाहीस.. हे झाड केवढे मोठे..!! याची पाने,याची फळे- हसतील तुला, हसणार नाहीस? तुझे डोळे याचे झाले तुझे अश्रू याचे झाले कुढत रहा अंधारात... प्रकाश तुला दिसणार नाही.. हे वाडे,हे फ्लॅट्स,या भिंती- माणसे कोती-खरी,खोटी ही नीती..ही भिती..ही कोसळेल? नाही,नाही झाडांगेच ही अविभाज्य- ज्याची विटी त्याचे राज्य नागडा तू सत्या सारखा- उघडा कधी पडणार नाहीस..!! शिकवूनही शिकला नाहीस कां रे आत्मा विकला नाहीस? हां जी हां जी केल्याशिवाय नोकरीतही टिकणार नाहीस.. संसार म्हणजे काय पोरा?- नवरा- नवरी रेसची घोडी पोरेसोरे काढतात थोडी म्हणून तर त्यात गोडी..!! आहे ते पुरवून खायचे सगळेच नाही संपवायचे एक बचत खाते- सुखाशी जोडते नाते..! थेंबे थेंबे तळे साचे- 'चे' ला 'चे' 'ते' ला 'ते' सगळे कसे कवी मनाचे. ऐकावे जनाचे करावे मनाचे फुलात फुल जाईचे- जगात प्रेम आईचे..!!! असे धडे, असे पाठ, शिकायचे न् सोडून द्यायचे.. टिळक..आगरकर?.. स्वप्नातही नाही आणायचे जेवताना तोंडी लावायच...

गर्भार १ ते १०

गर्भार १ दिन पहिले गोजिरवाणे दिन फुलवा गोजिरवाणे.. हिरव्यात गुलाबी जगले आकाश कोरता फुलले डोळ्यात वेद मी जपले कंठात बहरचि आले.. दिन पहिले गोजिरवाणे ओंकार अनंता उठले मी सचैल त्याते न्हाले देहातुन त्यांचे झेले फुलवून जगाला दिधले हे नितळ सुखाचे लेणे.. दिन दु:खी कां हे आले? हे हीनदीन कां आले?.. दिन फुलवा गोजिरवाणे दिन पहिले गोजिरवाणे..!! गर्भार २ गर्व नाही गर्भ माझा हासतो ओठावरी मी पृथा रे जन्म देते ऐक पौरुष-पावरी.. मानवाची मीच आई नांदते आभाळ डोई चांदणे पाण्यातले त्या सागराला देत जाई.. हा रवी येतो सकाळी तेज ज्वाला घेऊनी नाहते कायेत त्याच्या वेदना मी साहूनी.. पाहते माझीच छाया सावळ्या मेघातली वाहते पाऊस माया कोवळ्या पानातली.. गर्भार ३ भरभरा चालली कुठे कशाची घाई सांभाळ सानुला पोटात तुझ्या ग बाई अवघड या वाटा वळणेही नाही थोडी मृदु हासुन ऐशी ओठात ठेव ग गोडी ती रात जरी ग उन्हात सावळ झाली पाऊले टाक तू दवा परी गऽ ओली वाटेत असे कां चंद्र कोवळे यावे? आयुष्य वेचुनी आयुष्य देऊनी जावे.. गर्भार ४ रविचंद्राचे तेज घेऊनी तुझे सानुले फुलत रहावे‌ हात मिळावे पाय मिळा...

सोबत

हा जन्मा पासून माझा अंधार सोबती आहे.. मी प्रकाश कुठला पाहू? तो विनाश बघतो आहे..||ध्रु|| कोठून लकेरी आल्या रानात हरवल्या गायी.. गोठ्यात वासरे सारी हंबरती ' आई आई ..' ममतेचा पाझर पोटी कां थिजून गेला आहे?..||१|| घुसळुनी साय पाण्याची कधि मिळते कां ग लोणी?.. डोहातुन खोल तळाला ठसठसतो दु:खे कोणी.. ह्रदयातुन साऱ्या त्याचा आनंद उपाशी आहे..||२|| विजनाच्या वाटेवरती सृजनाचे बाग फुलावे.. आंधळ्या त्वचेला माझ्या हे डोळे लाख फुटावे.. झोपेत असो की जागा तो घेरुन मजला आहे..||३|| प्राशून विषाचे प्याले मी अमृत देता त्याला.. तो अज्ञाताचा पक्षी राखेला माझ्या व्याला.. मागीत जोगवा त्याचा मी विनाश बघतो आहे..||४|| मज जीवन मृत्यू नाही मी सृष्टी ही नटलेला.. सोहळा सुखाचा माझ्या सर्वत्र असा भरलेला.. अंधार प्रकाशाच्या या आभासा हसतो आहे..||५|| ©रमेश यशवंत वाकनीस© ७/३/१९७७ 

आठवते

आठवते अजून पहिली रात साजणी आठवते कसे पेटलो होतो सारे..‌ आठवते.. हात दिला मी हाती तेंव्हा कशी अबोली थरथरली.. विजा कडाडून उन्मळलो ते आठवते... अंबर झुंबर हसले होते चंद्रकळा ही पाझरते- कसे चांदणे फुलले होते आठवते.. अंधाराच्या नग्न शिरावर नाचत ज्या भिडल्या ज्वाला त्या ज्वालांची सुमने लेऊन पहाट झाली- आठवते.. आठवते गऽ आठवते.. उदयास्ताला आठवते आठवते ग आठवते मीलन पहिले आठवते.. 

पूर

पूर झाला दिनान्त पूर आज सखये आला स्मृतींचा इथे.. व्हावे नितांत सुख पाहुनी मना ऐशी स्मृती ना कुठे.. फुलली कशास बाग नसता माळ्यास तिळही दया.. पडते धुळीत रोज हसते निर्माल्य आपुल्या जया.. होती अशीच भ्रांतचित्त भुलली आभाळ गे पाखरे.. पक्षी अजून वृध्द एक बघतो तारुण्य कोठे खरे.. चाले विलास मौज निशिदिनी उत्तुंग इमल्यातुनी.. फिरती सुखास शोधित कुणी सुनसान रस्त्यातुनी.. घाली थैमान एक भूत इथल्या प्रत्येक घरट्यातुनी.. मी कां उध्वत होत फिरतो तो घरटी उगा बांधुनी.. द्यावा कशास जन्म?..जगती उंबरात जैसे किडे.. ह्रदयी असून विश्वनाथ उघडा संकोच चोहीकडे.. उठला कुठून क्रूर हात विधवा सांगू किती जाहल्या.. झाल्या उदास मेघला दशदिशा पाहून पाणावल्या.. मेली अशीच एक प्रेम जगण्या निष्पाप पाहू किती?.. त्यांना स्मरुन तूच सांग सखये मी 'ताज' बांधू किती?.. मिरवे खुशाल चांद तेज गगनी आपुलेच असल्यापरी.. हसतो प्रकाश खिन्न ढळूनिया अंधारभोगावरी.. होते भयाण युध्द वीर उरतो खोटा पडोनी खरा.. साहे अजून दु:खभार, फिरते शोणात न्हाती धरा.. घडतो ईतिहास जे घडविती त्यांचा न कोठे ठसा.. त्यांना विसरुन ...