पूर
पूर
झाला दिनान्त पूर आज सखये आला स्मृतींचा इथे..
व्हावे नितांत सुख पाहुनी मना ऐशी स्मृती ना कुठे..
फुलली कशास बाग नसता माळ्यास तिळही दया..
पडते धुळीत रोज हसते निर्माल्य आपुल्या जया..
होती अशीच भ्रांतचित्त भुलली
आभाळ गे पाखरे..
पक्षी अजून वृध्द एक बघतो
तारुण्य कोठे खरे..
चाले विलास मौज निशिदिनी
उत्तुंग इमल्यातुनी..
फिरती सुखास शोधित कुणी
सुनसान रस्त्यातुनी..
घाली थैमान एक भूत इथल्या
प्रत्येक घरट्यातुनी..
मी कां उध्वत होत फिरतो तो घरटी
उगा बांधुनी..
द्यावा कशास जन्म?..जगती
उंबरात जैसे किडे..
ह्रदयी असून विश्वनाथ उघडा
संकोच चोहीकडे..
उठला कुठून क्रूर हात विधवा
सांगू किती जाहल्या..
झाल्या उदास मेघला दशदिशा
पाहून पाणावल्या..
मेली अशीच एक प्रेम जगण्या
निष्पाप पाहू किती?..
त्यांना स्मरुन तूच सांग सखये
मी 'ताज' बांधू किती?..
मिरवे खुशाल चांद तेज गगनी
आपुलेच असल्यापरी..
हसतो प्रकाश खिन्न ढळूनिया अंधारभोगावरी..
होते भयाण युध्द वीर उरतो खोटा पडोनी खरा..
साहे अजून दु:खभार, फिरते शोणात न्हाती धरा..
घडतो ईतिहास जे घडविती त्यांचा न कोठे ठसा..
त्यांना विसरुन सांग सखये प्रीतीत न्हाऊ कसा?..
दु:खे उरात खोल खोल जपली मी लाख बेवारशी..
भ्यालो सुखास झेलण्यास सखये
भ्यालीस तूही कशी?..
ज्यांनी उपसून शून्य आपुल्या स्वप्नावरी मारले..
त्यांना धरुन व्यर्थ ह्रदयी मी आयुष्य कां वाहिले?..
नाही तुझाच फक्त सखये मी तो
जगाचा सखा..
बांधू कशास "ताज" मिळवू आनंद हा थोटका..
नाही पहाट काळरात्र मजला घेरुन ही हासली..
आता बुडून खोल नाव प्रलयी शोधात ही चालली..
मागू कशास भीक सांग मरणा मेलोच होतो सदा..
आलो तुझाच देह नटुनिया स्विकार ही संपदा..
माळा गळ्यात घाल हसऱ्या अग्नीफुलांच्या तुझ्या..
जळू दे अखंड आज कळू दे जळण्यातली रे मजा..
विकले शवास रोज भरले मी पोट हसली व्यथा..
ये रे मिठीत भास सर्व सरु दे..हो शांत तूही अता..
उडवू तुषार मस्त थेंब बुडवू चल थेंब सिंधूमधे..
राहू तळात शांत पहडुनी चल काळ नाही मधे..
आहे पहाट..शोध बदलतो रे रंग सरड्यापरी..
मरुनी पहाच तूच आज मरणा या धुंद स्वप्नावरी..
कांचा गिळून टाक सखये फुटला तुझा आरसा..
ज्यांनी सांडून रक्त प्रेम जगविले त्यांचा जपू वारसा..
उकले तमास गाठ..शकले उठतील ज्वालातुनी..
ठिणगी पडून एक.. दशदिशा हसतील ज्वालातुनी..
मातीवरील बेचिराख गगने धरतील छाया अशी..
सारे फिरुन स्वप्न आपुले जगतील श्वासांनिशी..
भोगू वियोग..योग साधित सखे या देवशब्दातिल..
उधळू सुगंध सर्वदूर आपुल्या नि:स्पर्श प्रेमातिल..!!
.
Comments
Post a Comment