हे झाड

हे झाड
गुदमरुन तू मरणार नाहीस
आणि धड जगणार नाहीस
लाख यत्न केलेस तरी
सावली खालून सुटणार नाहीस..
हे झाड केवढे मोठे..!!
याची पाने,याची फळे-
हसतील तुला, हसणार नाहीस?
तुझे डोळे याचे झाले
तुझे अश्रू याचे झाले
कुढत रहा अंधारात...
प्रकाश तुला दिसणार नाही..
हे वाडे,हे फ्लॅट्स,या भिंती-
माणसे कोती-खरी,खोटी
ही नीती..ही भिती..ही कोसळेल?
नाही,नाही झाडांगेच ही अविभाज्य-
ज्याची विटी त्याचे राज्य
नागडा तू सत्या सारखा-
उघडा कधी पडणार नाहीस..!!
शिकवूनही शिकला नाहीस
कां रे आत्मा विकला नाहीस?
हां जी हां जी केल्याशिवाय
नोकरीतही टिकणार नाहीस..
संसार म्हणजे काय पोरा?-
नवरा- नवरी रेसची घोडी
पोरेसोरे काढतात थोडी
म्हणून तर त्यात गोडी..!!
आहे ते पुरवून खायचे
सगळेच नाही संपवायचे
एक बचत खाते-
सुखाशी जोडते नाते..!
थेंबे थेंबे तळे साचे-
'चे' ला 'चे' 'ते' ला 'ते'
सगळे कसे कवी मनाचे.
ऐकावे जनाचे करावे मनाचे
फुलात फुल जाईचे-
जगात प्रेम आईचे..!!!
असे धडे, असे पाठ,
शिकायचे न् सोडून द्यायचे..
टिळक..आगरकर?..
स्वप्नातही नाही आणायचे
जेवताना तोंडी लावायचे
हवे तर पुजायचे..
करावेसे वाटेल बंड?
झाल्यावरती असे षंढ?
देह- मन बधीर थंड-
त्याचा अर्थ योनी-लंड .
बाकी धार मूताची-!
पगारवाढ वर्षाची-!
नाही तर गाठ संपाची-
दे रेऽ वाण्याऽ खा रेऽ प्राण्या
चालू गिरण सूतांची..
चैतन्याच्या पूतांची-
मार्क्सवादी षठांची
आंबेडकरी भटांची
ही वाट सर्वांची..
सर्वांशी काय नाते? -
आपण पाहू आपल्या पुरते-
हा संसार...हे जगणं...
पैसा बंगला टिव्ही गाडी
वाढवू तितकी वाढते दाढी
भीत भीत दु:खाला मग
एक दिवस बंद नाडी..!!!
याला जीवन ऐसे नांव-
कुठे जाशील सोडून गाव?
हे झाड केवढे मोठ्ठे-
त्या खाली ही केवढी झाडी..!!!!
भोग बाबा आपले मढेऽऽ
या प्रचंड सावली खाली
सावली तू धरणार नाहीस
जगणार नाहीस की मरणार नाहीस..

©रमेश यशवंत वाकनीस© 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७