बेड्या
बेड्या
सारे विश्व-
एखाद्या छोट्या भांड्यात
ठेवू पहाल तर ते कसे जमेल?
असं करा या विश्वाबिश्वाच्या भानगडीत तुम्ही पडू नका.
सरळ आपलं भांडं उचला न्
उभे रहा दुधाच्या रांगेत-
आणि हो..! कार्ड?
नाहीतर परत यावं लागायचं..
"भगवंताऽ कधी रे सुटका व्हायची?"
हा "भगवंत" कोणाचा? -
आय मीन शेजारचे हरीभाऊ
'सुटलेले' नाहीत तोवर-
"भगवंत" असणारच आहे.
मग तो कुणाचाही आणि कसाही कां असेना..
ते जाऊ दे-
दुध केंद्रावरची एखादी पटवली
की नाही?-
भाऊंच्या वेळची गोष्ट वेगळी होती
दारात "दुभती" बांधलेलीच असायची..
काय त्यावेळचे ते भाऊ आणि
काय त्यांची ती भांडी-
व्वा..! अगदी काठोकाठ..!
निसर्गाचा एक नियम आहे
जगणारं जगत राहणार
मरणारं मरत राहणार
(च्यायलाऽ म्हणजे दैववाद-)
मग एवढं घाबरायला काय झालं?
काहीही झालं तरी
"हरीभाऊंची" सुटका भांड्याशी
भांडं आलं आणि वाजलं म्हणून
होणार आहे कां?-
साधी दुध केंद्रावरची पोरगी
पटवता नाही आली तुम्हाला
आणि विश्वाच्या गोष्टी करता-
काय राव?- उचललं भांड न्
काढला आवाज..!!
दुधाचं एक ठिक आहे पण अख्ख्या पृथ्वीचीच आवराआवर
म्हणजे फारच.
बघताय काय असे?
हा 'आ 'पसरलाय ना?- तो मिटा
पालथ्या भांड्यावर
तुम्हीच तुमच्या खांद्यावर उभे आहात हे लक्षात ठेवा-
बुडबुड घागरी? आठवते की नाही?-
आस्स..
शेण खाल्लं तर खाल्लं म्हणावं..
त्यात लाज कसली?
उगाच आपलं भांडं लपवण्यात काय अर्थ आहे?..
जन्मापासून मरणा पर्यंत-
ही तहान : ही दुभती.
हीलाच बांधलेली सारी रांग..
भांड्या भांड्यात एक वेडसर
आठवण-
अमूक दिवशी अमूक साली
तमूक मायभू तमक्याच्या बेड्यातून मुक्त झाली..!!!
©रमेश यशवंत वाकनीस©
Comments
Post a Comment