चंद्र..चाफा..मनोगत,शिरिष पै यांची प्रस्तावना,आणि या संग्रहातील रुबाया

"पूर" या संग्रहा नंतर तब्बल १७ वर्षा नंतर म्हणजे २००३ साली माझ्या " चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..!! " या रुबायांचा संग्रह प्रकाशित करण्याचा योग आला. मधल्या १७ वर्षाच्या काळात पिंपरी-चिंचवड परिसरातल्या लघु दैनिके,साप्ताहिके यांचेसाठी काम केलं.मला पैसे फार मिळत नसत पण अगदी अग्रलेख,स्तंभलेखन,शब्दकोडी,हास्य-विनोद,या भागातील सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मुलाखती,प्रासंगिक लेख,असे विपुल लेखन केलं.शब्दगंध साहित्य कला सहयोग या संस्थेच्या माध्यमातून काव्य-साहित्य विषयक अभिनव उपक्रम राबविले.नुसतीच कवी संमेलने आयोजित करण्या ऐवजी आपला साहित्या विषयीचा अभ्यासही होईल असे त्या उपक्रमांचे डीझाईन असे." क्षण कवितांचे" "कविता ध्यास :एक अभ्यास " हे कार्यक्रम विशेष संस्मरणीय ठरले.याच काळात " छान्दसी " हे वाङमयीन त्रैनियतकालिक सुरु केले.ते '८३-'९३ पर्यंत चालवले.ही सर्व धडपड करत असताना जे अनुभव गाठीशी आले ते महत्वाचे होते.विशेष म्हणजे अशा उद्योगांमुळे माझ्या प्रतिभेला बळ मिळत गेले.हात सतत लिहीता राहिला.याच काळात ज्येष्ठ कवी व रमेश गोविंद वैद्य यांची ओळख झाली.माझ्या रुबाया ऐकून त्यांनी याचे स्वतंत्रपणे कार्यक्रम करा असे सुचवले.नुसते सुचवले नाही तर दोन रात्र तीन दिवस माझ्याकडे मुक्काम करुन एकूण ३००-३५० रुबाया ऐकून त्यातल्या कार्यक्रमासाठी योग्य अशा १००-१५० रुबाया निवडून दिल्या.निवेदनासाठी माझ्या इतर मुक्तछंदातल्या कविता निवडल्या.कार्यक्रमाचे शीर्षकही त्यांनीच सुचवले- " चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..! " या कार्यक्रमाला अंजली कुलकर्णी,मनोहर सोनावणे,सुरेश कोकीळ,असे काव्य क्षेत्रातले जाणकार उपस्थित होते.अंजली कुलकर्णी कार्यक्रम झाल्यावर म्हणाल्या याचे आपण पुस्तक करु .मी पण तयार झालो आणि माझी " रुबाईकार " म्हणून माझी ओळख निर्माण झाली.याचे श्रेय माझ्या मित्रांना तर जातेच पण रविंद्र पिंगे आणि शिरिष पै यांना अथिक जाते.पिंगे सरांनी शिरिषताईंना माझे हस्तलिखित दिले नसते आणि त्यांनी प्रस्तावना लिहीली नसती तर हे शक्य नव्हते.मित्रांनो," चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..! " मधील रुबाया या ब्लाॅगवर तुम्हाला वाचायला तर मिळतीलच पण संग्रहात समाविष्ट नसलेल्याही रुबायांचा आस्वाद घेता येणार आहे.तर आता शिरिषताईंच्या प्रस्तावना आधी वाचा आणि मग रुबाया..!!!

जातिवंत रुबाया
( प्रस्तावना )
--------------------
श्री.रमेश यशवंत वाकनीस ह्यांच्या रुबाया मी वाचल्या आणि मन कित्येक वर्षे मागे धावले- जेंव्हा रुबाई या काव्यप्रकाराचा मला प्रथम परिचय झाला.उमर खय्यामने रुबाया हा काव्यप्रकार प्रचलित केला आणि सुप्रसिद्ध ‌कवी माधव ज्युलियन यांनी तो मराठीतून अनुवादित केला-
" या इथे तरुतळी सुरई एक सुरेची
भाकरी एक न् एक वही कवितेची
आणखी एक तू जवळ गात ह्या विजनी
ते रान न मग ते नंदनवंदन ते हेची "
ही त्यांची रुबाई प्रसिध्दच आहे.
माधव ज्युलियनांनी उमर खय्यामच्या रुबाया मराठीत आणून मराठी वाचकाला रुबाई या काव्यप्रकाराची गोडी लावली.आणि मराठी कवींच्या मनावरही या काव.याप्रकाराने मोहिनी घातली.रुबायांपासून कणिका या अल्पाक्षरी काव्याचा जन्म झाला.राॅय किणीकर ह्या प्रसिध्द कवीने स्वतंत्रपणे रुबाया केल्या.इतर अनेक कवींनी हा काव्यप्रकार यशस्वीपणे हाताळला.
रुबाई हा काव्यप्रकारच असा आहे की त्याचे आकर्षण कवितेच्या रसिकाला नेहमीच पडावे.उमर खय्यामची ती फकिरी कलंदर वृत्ती..! मद्य आणि प्रेयसी ह्यांच्या संगतीत विजनवास हेच स्वर्गसुख मानणाऱ्या उमर खय्यामला या नाशिवंत जीवनाचा कधीच विसर पडला नाही.यश,संपत्ती,किर्ती,सत्ता ह्यापेक्षा त्याला बहुमोल वाटली कवितेची वही..!
मला रमेश वाकनीस यांची रुबाई वाचताना ह्या गोष्टीचा प्रथम आनंद झाला की,उमर खय्यामची तत्वचिंतनाची वृत्ती त्यांच्या काव्याच्या मुळाशी आहे.त्यांच्या कविता म्हणजे नुसत्याच कल्पनेच्या वावड्या नाहीत किंवा भावनांचे उद्रेक नाहीत.तर रोजचे जीवन जगताना त्यांचे कुतुहल त्यांना घटनांच्या मुळापर्यंत घेऊन गेले आहे. जगण्याचा अर्थ लावताना त्यांच्या हाती जे सत्य आले,त्याचे परिवर्तन त्यांनी रुबायांमधे केले.त्यांची प्रत्येक कविता म्हणजे विचारांचे एक स्फुल्लिंग आहे.त्यांच्या कवितांतले त्यांचे जगणे हे कवीचे जगणे आहे.सर्वसामान्यांचे जगणे आणि कवीचे जगणे ह्यात फरक आहे.कवी जीवनाचे आव्हान स्विकारतो आणि जीवन संघर्षाला सामोरा जातो, जरी त्यात त्याच्या हाती काही लागत नाही.लौकिक यशापेक्षा जीवनश्रेयाचा शोध घेताना पदरी आलेला पराभव त्याला अधिक मौल्यवान वाटतो.
अशीच रमेश वाकनीस यांची वृत्ती आहे असे जाणवते.बाह्यात्कारी ते जरी इतर सर्व व्यक्ती जगतात तसेच जगत असले तरी त्यांचा अंतरात्मा,त्यांचे कवीचे मन त्यांना सतत एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते आणि त्या उंच पातळीवरुन आयुष्याकडे बघताना त्यांची काव्यप्रतिभा स्फुरण पावू लागते.मग भोवतालच्या समाजाबद्दल, त्यातल्या विसंगती बद्दल,मानवी जीवनाबद्दल,प्रेमातील सौंदर्याबद्दल आणि वेदनेबद्दल,कवितेच्या शक्तीबद्दल,आणि मानवाच्या अंताबद्दल त्यांची कविता स्वत:च्या वेगळ्याच शैलीतून भाष्य करु लागते.त्यांच्या प्रत्येक रुबाईत माणसाच्या जगण्याचे असे मार्मिक भाष्य भरलेले आहेस्वत:च्या कवितेबद्दल ते म्हणतात-
हे गाणे म्हणजे नाही घर आत्म्याचे
हे गाणे म्हणजे नाही स्वर गंगेचे
हे गाणे आहे परमधाम सृजनाचे
सृजनातून गळते दु:ख नव्या जन्माचे..!
ही माझी कविता बहुमोल नसेल पण ती मलाच घडवते, मलाच जन्म देते, नव्याने जन्म घेतानाची वेदना ही तुम्हाला ह्या कवितेच्या शब्दातून जाणवते.
कवीची प्रत्येक कविता म्हणजे त्याचे नव्याने जन्माला येणे आहे हे कवीने किती समर्पकपणे सांगितले आहे.कवितेबद्दलच्या त्यांच्या सर्वच रुबाया अर्थपूर्ण आहेत-
" ही प्रतिभा माझ्या ऐश्वर्याचे भान
बेभान नाचते हसते घेते तान
मी हीलाच माझी सर्व अर्पितो गाणी
ही नेईल तेथे चल जाऊ अनवाणी
- ही कुठची अद्भूत शक्ती माझी संपत्ती बनून राहिली आहे, माझ्या संपूर्ण निर्माणशक्तीचे ती बीज आहे.नाचताना, गाताना,हसताना ती किती अमर्याद होते.माझी सर्व कविता जिच्यामुळे, तिलाच ती मी अर्पण करतो, आणि ती जिथे मला ओढून नेईल तिथे- म्हणजे त्या अनुभवाकडे मी अनवाणी-मूक्तपणे जातो.
कवीने कविता लिहीताना नि:शंक मनाने अनुभवाला सामोरे जावयास हवे याचे हे अतिशय बोलके चित्र आहे.कवितेबद्दलच्या, काव्यनिर्मितीबद्दलच्या अशाच काही ओळी-
" नेईल कुठे ही कविता आता मजला
नाहीच कां कुठे घर माझ्या आत्म्याला?.. "
----
हे अवघड नाही कवाड उघडे ठेव
जो आला तो तो जिवलग ध्यानी ठेव..
हे शब्द शब्द दे उधळुन त्यांच्यासाठी..
हो आज मोकळा तुझ्याच कवितेसाठी..!!
कविता करायची तर मुक्त व्हायलाच हवे,कविता ही संपूर्ण स्वातंत्र्यातच फुलते,ही कविची भावना इथे दिसते.कविता हेच माध्यम कवीने आपल्या आत्माविष्कारासाठी निवडले आहे आणि त्या माध्यमाचे सामर्थ्य अचूक ओळखले आहे.असाच विश्वास त्यांच्या प्रेमाच्या शक्तीवरही आहे.प्रेमा करिता त्यांनी मृत्यूचे भयही सोडून दिले आहे-
" चल क्षणाक्षणांचा स्वर्ग धुंद कवटाळू..
मारील कधीही मरण मिठी कनवाळू..!
-----
" हे असेच तुजला अविरत चालायाचे..
" सावली धरोनी उन्हात तापायाचे..! "
प्रेम म्हणजे एका वेदनेचा प्रवास.तो एकदा सुरु झाला की त्याला शेवट असा नसतोच.स्वत:चे समर्पण केल्याशिवाय प्रेमाची कविता घडत नाही.प्रेमात स्वत:ला झोकून देणारी व्यक्ती फक्त स्वत:साठीच जगत राहते कां?- पण या कवीच्या रुबायात भोवतालच्या समाजाचेही करुण चित्र प्रतिबिंबित झाले आहे-
" कां असून डोळे विनाश दिसला नाही?..
गांधारी म्हणते मीच बघितला नाही
देव्हारी कुठला देव कुणी बसवावा
हा प्रश्न नव्हे पण धर्म खरा जगवावा.. "
या अर्थपूर्ण रुबाईत कवीने समाजातल्या आंधळ्या वृत्तीचा उपरोधिक उल्लेख करुन मोठा मार्मिक प्रश्न विचारला आहे.
" म्हातारा करुनी कलप हसे गालात..
म्हातारी चाले पहा कशी झोकात
गंभीर चेहरे करुन हे फिरतात
पंचविशीत गध्दे म्हातारे होतात..! "
ह्या रुबाईत समाजात हरघडी दिसणारी एक विसंगती दर्शवून दिली आहे. ज्याला जे शोभते त्यापासून तो दूर जातो आणि न शोभणाऱ्यांना ओढून ताणून स्वत:ला शोभिवंत करण्याची हौस पुरवावीशी वाटते.त्यामुळे एकाची करुणा तर दुसऱ्याचे हसू येते.ह्या विसंगतीने समाज ग्रासलेला आहे.
प्रेम,जीवन,मरण,कविता,समाज असा कुठलाही विषय कवी कवितेसाठी निवडतो.त्यात त्याची विचार व्यक्त करण्याची वेगळी अभिनव शैली प्रकट झालेली आहे. हे कवीचे जे निराळेपण, त्यामुळे त्याच्या रुबाया एकदम ताज्यातवान्या झाल्या आहेत.असे काही पूर्वी कुठल्याही रुबायात भेटलेले नाही.कवीच्या रुबायांचे नाविन्य मनावर ठसवून जाते आणि मग शेवटी मनावर छाप उमटते ती त्या त्याच्या बेधडक, निर्भय वृत्तीची-
" तिमिरात तळपते वीज तसे तळपावे..
जगण्यात नसावे ढोंग सरळ धडकावे..
या चला कालची मरगळ झटकुन टाका..
ते स्वप्न उद्याचे तुम्हा मारते हांका..! "
जीवनाला पुन्हा उजळून टाकणाऱ्या कवीच्या या प्रवृत्तीला केशवसुतांची हाक जणू ऐकू येते-
" सडत न एका जागी ठाका
विक्रम काही करा चला.. "
कवीच्या कवितेतून त्याच्या व्यक्तित्वाची छाया सारखी पसरलेली असली आणि ते व्यक्तित्व जर प्रगल्भ असले, तर त्याच्या कवितेतूनही ती प्रगल्भता स्पष्ट जाणवते आणि त्यामुळे त्याच्या कवितेला भरीवपणा प्राप्त होतो. तिचा अस्सलपणा जाणवतो.हा आनंद मला वाकनीस यांची प्रत्येक रुबाई वाचताना लाभला. असाच आनंद त्यांच्या रुबाया जे कौतुकाने वाचतील त्यांना लाभो,अशी शुभेच्छा मी व्यक्त करते-तसा आशिर्वाद मी कवीला देते.
- शिरिष पै
-----------------------------------------

*चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..!-------------------१----------------
ही कुठे चालली घागर घेऊन नार
हलताना कंबर मंथर वाजे तार
ही पुढे चालली गाणे मागे मागे
प्रीतीचे जुळती कुठे कुठे हे धागे..! 

२
*मोकळे केस मोकळी तुझीही काया..
मोकळी मिळाली घडी मोकळे व्हाया..
सोसले आजवर पुढे सोसुया सारे
तुजसाठी आणिन आकाशातिल तारे..! 

३
*हे हिरवे वैभव सांग सखे कोणाचे?
डोळ्यात उभे हे रुप सखे कोणाचे?
प्रतिबिंब तुझे मी तू माझे प्रतिबिंब
प्रतिबिंबच जग हे कुठाय त्याचे बिंब?.. 

४
*मलमली गुलाबी धुंदफुंद सर्वांग
अंगात विजेचा एक नशीला डंख
भरभरुन झरते पूर्ण सुखाचे पात्र
संपली युगे पण सरली ना मधुरात्र 

५
*मन मागे मागे आठवणींच्या धावे
एकदा तरी हे उलटे चक्र फिरावे
ती ओळख व्हावी पुन्हा जुळावे बंध..
ते पुन्हा घडावे मीलन पहिले धुंद..! 

६
*हे भावसुधेचे नाजुक निर्मळ पात्र
वाटेवर पडली पाषाणाशी गाठ
आवाज "खळ्ळ" पण काचा रुतल्या नाही..
स्पर्शातिल तुझिया जादू कळली नाही..! 

७ 

*स्वप्नात भेटता सर्वस्व देऊनी जाते
प्रत्यक्ष भेटता दूरच राहू म्हणते-
तोडून कधी कां तुटते हिरवे नाते?
डोळ्यांचे लख्लख् शोधित फिरतो पाते..! 

८ 

*पट आयुष्याचा उधळून गेला कोण?
बट झुलते गाली तरी हासते कोण?
ही नव्या सुखाच्या गाठींची शुभवेळ..
हा पुन्हा मांडला डाव रंगला खेळ...! 

९
*मी काचा गिळल्या मूक व्यथांच्या साऱ्या..
मी रात्री जपल्या ओल्या धुंद क्षणांच्या..
ये ऐकुन ये रे हाका आर्त युगांच्या
मी प्रीत चालते वाटा अज्ञाताच्या..! 

१०
*ओठात येऊनी ओठ तिचे गातात
रंगुया होवुया रिते एकमेकात
चल क्षणाक्षणांचा स्वर्ग धुंद कवटाळू..
मारील कधीही मरण मिठी कनवाळू..! 

११ 
*ह्रदयाशी धरुनी प्रीत तुझी मी गातो..
कां सांग तुझ्याविण तुझ्यापास मी असतो?..
तू विचार वेडे प्रिय तुझ्या शब्दाला
नि:शब्दा रजनी कां उरली चंद्राला..! 

१२
*हे असेच तुजला अविरत चालायाचे..
सावली धरोनी उन्हात तापायाचे..
माणूस संपतो वाट कधी कां सरते?
प्रेमाची कविता घडवायाची असते..! 

१३
*पाऊले थांबली थांब म्हणालीस तेंव्हा..
सोडेन पथारी वदशील मजला तेंव्हा..
जन्माची चाहूल बघ मृत्यूने भिजते
प्रीती हे जीवन मृगजळ अवघे ठरते..! 

१४
*चाफ्याची आता साक्ष कशाला काढू?
कां सांग गताशी नाते आता जोडू?
मी मलाच शोधत हलवून गेले राजा
तू फुलव बाग ती विस्मरणातच माझ्या..! 

१५
*दर्वळतो चाफा कळ्याकळ्यांच्यासाठी..
त्या शपथा स्मरतो झुरतो भेटींसाठी..!
ते दिवस प्रीतीच्या स्पर्शाचे हर्षाचे
सारेच जाहले डोळ्यातिल अश्रूंचे 

१६
*मी विडा घेतला दिला तुलाही तेंव्हा..
तो प्रणय सांग ना तसा रंगला केंव्हा?
सुख आता केवळ आठवताना होते
दु:खाला अवघ्या त्यातच भोवळ येते..! 

१७
*येताना आलिस फुलवित बागा साऱ्या..
जाताना म्हणशी सोबतीस ये वाऱ्या..
ही उडून जाईल कथा खंत ना याची..
पण व्यथा ठेवू मी कुठे अंत ना  त्याची..! 

१८
*हा बघता बघता नदीस आला पूर
तो गाव सानसा वाहुन गेला दूर..
ते आठव उरले लाघव त्या भेटींचे
ऋण वाहत जाऊ मरणाप्रत प्रीतीचे..! 

१९ 
*विश्वात प्रीतीच्या अश्रूंचे साम्राज्य
अश्रूत प्रीतीच्या आनंदाचे राज्य
ना शोध बोध ना मोद शांतता फक्त
शून्यातुन जाते शून्य महाशून्यात..! 

२० 

*घेशील किती?देशील किती? तू बोल..
प्रेमाला माझ्या प्रेमच दे अनमोल..!
मी कधी विनटलो प्रेमाची परिभाषा?
घट निळा..खालती हिरवीकंच निराशा..! 

२१
*दारास बांधुनी तोरण म्हणता,'आला..'
दारात बांधुनी तिरडी म्हणता,'गेला'
मृत्यू न कुणाच्या दारी आला-गेला
मृत्यूच उघडुनी दार स्वागता बसला..! 

२२
*हा जन्म असा अन् ही मळलेली वाट..
वाहत्या नदीचा रोज बदलतो घाट
पालथी घातली गावा मागून गावे
माणूस तोच, द्या असंख्य त्याला नावे..! 

२३
*ना तसा न काही हेतू माझा होता
तो अनंत यात्रिक पाऊल चुकला होता..
जन्माला आला शुध्द निखळ माणूस..
हातात राहिली रिक्त कोरडी मूस..! 

२४
*बाहुली मिळाली म्हणून कोणी हसते..
बाहुले जाहलो म्हणून कोणी रडते
हे हसणे रडणे खेळात चालते सारे
चमकले किती बघ कितीक तुटले तारे..! 

२५
* पानात करकरे सांज पुढे हे काय?
साऱ्यांस प्रश्न की मृत्यू नंतर काय?
जर असेल जीवन प्रश्न पुन्हा हा पडतो-
रे सांग जीवना जन्म कसा तुज मिळतो?.. 

२६
*ही झुरळे झुरळे ही पंखाची साधी
जगणार किती मरणार किती ना गणती..
मी अमूक आहे,तमूक होईन म्हणती..
क्षुद्रता उबवते महानतेची अंडी..! 

२७
*ही सुट्टी झाली पहा उधळल्या पोरी..
बघ पाटी आहे अजून तुझीही कोरी
मी नांव घातले मातीच्या शाळेत
धुंडाळित फिरलो व्योम किती अज्ञात..! 

२८
*ती उंबरठ्याशी बसून असते आता..
ती दिवा जळावा तशीच जळते आता..
येणारा येतो पिवून जातो पाणी
आयुष्य संपते देता देता गाणी..! 

२९
*बाजारी इथल्या काय विकावू नाही?
तू मांड प्रदर्शन काय दिखावू नाही?
हे नटवे डोळे,फसवे शब्द तुला घे
जन्माला माझ्या अश्रू एक खरा दे ! 

३०
*पोरक्या जगाचा पहा पोरका बाप
हे कुठल्या नक्षत्रावरी जन्मले पाप
तो निघून गेला उरली त्याची वाट
ही तुझी नि माझी साऱ्यांची वहिवाट.! 

३१ 
* झाले ते झाले स्मरण नको रे त्याचे
चल उचल पाय हे ब्रीद न संपायाचे
जाहला अपेक्षाभंग न हा शोकान्त
प्रेमाला शोधित वणवणतो भगवंत 

३२
*परिणाम ध्वनीचा ध्वनीवाचुन शब्दांचा..
तू कसा घालशिल मेळ सर्व घटनांचा..
अज्ञाती बसुनी लिहीतो तो विधीलेख..
त्याच्याही हाती नाही त्याचा टाक..! 

३३
*हा ओठ दुधाचे उष्टे घेवुन आला
रडतेस कशाला दूध नसू दे त्याला
देणारा देतो लक्ष लक्ष हाताने..
घेताच म्हणे की काय दिले मज त्याने..! 

३४
*हा प्रश्न तुझ्या ना माझ्या अस्तित्वाचा..
हा प्रश्न जगाच्या नाही अस्तित्वाचा 
आहे अन् नाही अशा जगाच्यासाठी..
कां व्यर्थ लढावे शून्य घेवूनी हाती? 

३५
*ती सखी बायको,बहीण माता होते
ती अनेक रुपातून सदा अवतरते
ती म्हणजे वेड्या कुणीच आपुली नसते..
निर्वात पोकळी घुमते आणिक विरते..! 

३६
*प्रारंभच झाला शेवट याला नाही
या इथे कुणाची कुणास संगत नाही
हे प्रकाश-पाऊल पडते आहे तेथे-
ना खूण पुसटशी पुढे शून्य हे मोठे..! 

३७
*ही आज कालची व्यथा घेऊनी आली..
आलो नि गेलो मध्ये भ्रमंती झाली
ती कथा कशाला पूर्ण करु मी आता..
भरलेली शून्ये किती भरु मी आता?...

३८
*तो अकाल व्यापक सर्वेश्वर भगवंत..
त्यालाही चुकला नाही त्याचा अंत
व्याधाचा रुतला बाण काढितो कृष्ण..
"मी कोण?"म्हणाला पहा ठिबकतो प्रश्न..!
* चंद्र..चाफा..पुढे चालू..





Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७