गर्भार १ ते १०
गर्भार १
दिन पहिले गोजिरवाणे
दिन फुलवा गोजिरवाणे..
हिरव्यात गुलाबी जगले
आकाश कोरता फुलले
डोळ्यात वेद मी जपले
कंठात बहरचि आले..
दिन पहिले गोजिरवाणे
ओंकार अनंता उठले
मी सचैल त्याते न्हाले
देहातुन त्यांचे झेले
फुलवून जगाला दिधले
हे नितळ सुखाचे लेणे..
दिन दु:खी कां हे आले?
हे हीनदीन कां आले?..
दिन फुलवा गोजिरवाणे
दिन पहिले गोजिरवाणे..!!
गर्भार २
गर्व नाही गर्भ माझा
हासतो ओठावरी
मी पृथा रे जन्म देते
ऐक पौरुष-पावरी..
मानवाची मीच आई
नांदते आभाळ डोई
चांदणे पाण्यातले त्या
सागराला देत जाई..
हा रवी येतो सकाळी
तेज ज्वाला घेऊनी
नाहते कायेत त्याच्या
वेदना मी साहूनी..
पाहते माझीच छाया
सावळ्या मेघातली
वाहते पाऊस माया
कोवळ्या पानातली..
गर्भार ३
भरभरा चालली कुठे कशाची घाई
सांभाळ सानुला पोटात तुझ्या ग बाई
अवघड या वाटा वळणेही नाही थोडी मृदु हासुन ऐशी ओठात ठेव ग गोडी
ती रात जरी ग उन्हात सावळ झाली
पाऊले टाक तू दवा परी गऽ ओली
वाटेत असे कां चंद्र कोवळे यावे?
आयुष्य वेचुनी आयुष्य देऊनी जावे..
गर्भार ४
रविचंद्राचे तेज घेऊनी
तुझे सानुले फुलत रहावे
हात मिळावे पाय मिळावे
तुझे आभाळी ह्रदय मिळावे
तुझेच टाहो फोडीत यावे
तुझ्याच ज्ञानासाठी गावे
जगात येऊन मरता मरता
तुझे गाणे फक्त उरावे.
गर्भार ५
हातात एक पोटात नांदतो एक
दारात कोणही उभी लाडकी लेक
ह्रदयास बिलगुनी पुसतो आई आई
येणार कधी ग घरात आपुल्या ताई ती लाडे वदते,इतक्यात कोठले ऐक
नुकताच बहरला श्रावण पाऊसमेघ
तो गोड गोड-सा पापा देऊन वदला-
सांग ना कसा हा पाऊस मजवर झाला?
क्षणभरी बघोनी कवटाळुन त्या हसली..
अन् भरा भरा हो 'पापे'च घेत की सुटली..
तो कुणी अनामिक पाप करोनी गेला
माणूस म्हणोनी ईश्वर जगती आला
गर्भार ६
येतेस वरतुनी बाई
हिरव्यात घेऊनी गोरे
अंगात कळे ना अंग
कोण कुणाचे चोरे
उतरता पायरी एक
मज तुझी कळावी मेख
उचलून वक्रशी रेघ
डोळ्यात भरावे मेघ
झेलून सारखे ऊन
श्वासात चांदणे व्हावे
होऊन सुखाचे मेघ
आनंदे वर्षत यावे
सोडून निळाई सारी
भिजवोन भिजोनी जाते
चोरुन पाहता चोरी
लपणारी नाही कळते
वाहून भार हे हसणे
आधार देऊनी हसणे
दुर्वास मुनीचे लेणे
वेडावित वेडे करणे
गर्भार ७
किती कोवळा फुलासारखा
हाती गोळा येतो
चाकावरती फिरता फिरता
आकाराला येतो
आभाळाचे पाताळाचे गूढ
उकलण्या झुरतो
ज्ञानासाठी विज्ञानाचे प्रयोग
काही करतो
शून्यातुन ही कधी?कशी?कां?
विश्व निर्मिती झाली
माझ्या मधल्या निर्मात्याला
अजून नाही कळली
आनंदाची आस ज्या मनी
त्याला मुक्ती नाही
हा ज्ञानाचा मार्ग असा की
त्याला सीमा नाही.
गर्भार ८
हे गुलाबातुनी कसे अचानक आले
विसरले भान मी रानफुलांची झाले
ती नको विलासी खतनिगराणी मजला
या 'नको'पणाचा छंदच आता जडला
तो गंध कशाला निगंधतेला माझ्या
हा बाग बरा की रानफुलांचा ताजा
ते पहा पांढरे..मधेच पिवळे मेघ निघाले काळे
मी आज पाहिले जिवाशिवाचे डोळे-
आंधळे नसावे, लुळे-पांगळे व्हावे
पण ज्याला त्याला ज्ञान आपुले व्हावे.
गर्भार ९
गोल घुमट हा घेऊन कोणी
मंद चालते
तीच पाऊले टाकित कोणी
वाट काढते
पाण्या मधले पुसून कोणी
थेंब पाहते
देखावा तो पाहुन कोणी
चित्र काढते
या चित्राशी त्या चित्राचे
जमते नाते
मातीवरची माती काही मनी
बोलते
जन्म घेऊनी 'आई आई' करती
बाळे
अजून नाही त्या आईचे गूढ
उकलले..!!
गर्भार १०
दिठीदिठीतुन काळोखाच्या
सूर्य उगवला
मिठीमिठीतुन या मातीच्या
फिरु लागला
श्वासाश्वासातून नागवा सुगंध
सुटला
स्पर्शास्पर्शातून जिवाचा शिव चमकला
चंद्र कुणाचा मंद्र हवेतुन पळू
लागला
आभाळाचा आभाळाला थांग
लागला
लवथवलेला खेळ केशरी असा
रंगला
सरणावरती ओला कातर देह
जळाला
सर्वदूर मग धुंद तृप्तीचे दिवे
लागले
सारे आपुल्या अंधाराला बघू
लागले
आज अंगणी तारा नाही बागडणारा
पहात आहे प्रवाह पतिता नदी
किनारा..
Comments
Post a Comment