सोबत
हा जन्मा पासून माझा
अंधार सोबती आहे..
मी प्रकाश कुठला पाहू?
तो विनाश बघतो आहे..||ध्रु||
कोठून लकेरी आल्या
रानात हरवल्या गायी..
गोठ्यात वासरे सारी
हंबरती ' आई आई ..'
ममतेचा पाझर पोटी
कां थिजून गेला आहे?..||१||
घुसळुनी साय पाण्याची
कधि मिळते कां ग लोणी?..
डोहातुन खोल तळाला
ठसठसतो दु:खे कोणी..
ह्रदयातुन साऱ्या त्याचा
आनंद उपाशी आहे..||२||
विजनाच्या वाटेवरती
सृजनाचे बाग फुलावे..
आंधळ्या त्वचेला माझ्या
हे डोळे लाख फुटावे..
झोपेत असो की जागा
तो घेरुन मजला आहे..||३||
प्राशून विषाचे प्याले
मी अमृत देता त्याला..
तो अज्ञाताचा पक्षी
राखेला माझ्या व्याला..
मागीत जोगवा त्याचा
मी विनाश बघतो आहे..||४||
मज जीवन मृत्यू नाही
मी सृष्टी ही नटलेला..
सोहळा सुखाचा माझ्या
सर्वत्र असा भरलेला..
अंधार प्रकाशाच्या या
आभासा हसतो आहे..||५||
©रमेश यशवंत वाकनीस©
७/३/१९७७
Comments
Post a Comment