चंद्र..चाफा..

३९पिचकाऱ्या उडवा भिजवा एकामेका..
रंगात रंगुनी रंग सातही फेका..
ती निळे नेसली निळाच पडला डाग..
मातीची भिडली आभाळाला आग..! 

४०
*कधी फेडायाला,नेसायाला मागे
बाहुली दिठीचे स्वप्न ठेविते जागे
आकाश दिगंबर अविरत होते आहे
अन् धरती खाली रंग बदलते आहे 

४१
*राहिली नदीवर तशीच घागर माझी..
ना भरली सरली व्यथा चालली माझी..
हे फिरते आहे किती युगे ऋतुचक्र
शेपूट राहिले तसेच माझे वक्र..!

४२
*दारात उभी तिनसान गुलाबी हसली..
हसताच क्षणातच सांग कुणावर रुसली?
स्वर्गीय तिचा आनंद हिरावुन नेला
अंधार तसा घरट्यात समेवर आला!

४३ 
*निष्पर्ण उभा हा वृक्ष पहा अंधारी
शोधात काजवा फिरत जाय रंगारी
आकाश पालवी फुटत जाय धरतीला..
माणूस पारखा सत्य कळुन सत्याला..!

४४
*पक्ष्याने होता उष्टा तुकडा आणला..
चोचीतुन पडला बकरीने तो गिळला..
प्रारब्ध हेच? की सर्व बदलता येते?..
आंधळ्या हातांना डोळस श्रध्दा फुटते..!

४५
*सौंदर्य फुलू दे असेच अंतर्बाह्य
स्वाभाविक ते ते असते दुसरे काय?..
ती अवसही नव्हती आणि पौर्णिमा नव्हती..
कां बांधित बसशी उगा भ्रमाच्या भिंती..!

४६
*कोसळण्याआधी कुठून कुठे ते ठरते..
कोसळण्यावाचुन गत्यंतरही नसते
आभाळ जणू अपवाद म्हणोनी वरती..
कोसळणे घेवून गर् गर् फिरते धरती..!

४७
*पिकलेली पाने,फळे खालती पडली.‌.
झाडाची माया हिरव्या पानी बसली..
नियतीच अशी की उंचच हो कोसळणे..
कां कंठशोष हा..विफल तुझे हे रडणे..!

४८
*आनंद?कुठे आनंद?कुणा आनंद मनाला सांगा..
वारुळी नव्हे तर कुठे जायच्या रांगा?..
तो "राम"म्हणाला मरा-मरा म्हणताना..
अन् मुंग्या रडल्या साखर की आणताना..!

४९
*लयलूट सुखाची सागर करतो आहे..
आत्म्यात तुष्ट मी घागर भरतो आहे..
हे भरणे-सरणे आनंदाचे उरणे..
हे नश्वर जीवन सरले हसणे रडणे..!

५०
*अपरात्र अचानक जळता जळता विझली..
पाण्यातुन वल्ही तुझी दिनकरा फिरली..
छनछनते पैंजण न्यास सृष्टीचा चाले..
सर्वत्र दर्वळे..प्रीत हिरवळे काळे..! 

५१
*मातीला आहे आभाळाची ओढ
आभाळा आहे अजून मातीची ओढ..
देहात विदेही येते‌ कधीही गाते
संपूर्ण सुखाची तृष्णा भगवी होते..!

५२
*ही निळी उदासी निळ्या नभाची छाया..
मातीतुन हिरव्या भगवंताची माया
हा सर्वदूर बघ नित्याचा संहार..
संहार:युगांच्या निर्माणाचे द्वारा..!

५३
*ही नव्हेच राधा नव्हेच कृष्ण-कन्हैया..
सावळ्या धरेची निळ्या आभाळी छाया..
सर्वत्र निरामय खोल शांतीचे सूर..
हे सूर नव्हे हा कैवल्याचा पूर..!

५४
*पानातुन हिरव्या रुप सावळे झरते..
पाऊस प्रीतीचा अंगांगावर घेते..
तो देईल तेथे आता पूर्णविराम..
मधुबनात हरली राधा शोधित शाम..!

५५
*अंधाराआधी मीच अरे होतो ना..
अंधारानंतर मीच पुन्हा आहे ना?
प्रारब्ध म्हणोनी रडत कशाला बसता..
अंधार पाहूणा एका रात्री पुरता..!

५६
*मद्यात बुडावे असे दु:ख हे नाही..
मद्याने द्यावे असे सुखही नाही..
अन्नाची आहे गरज जशी पोटाला 

कवितेची आहे तशी तुझ्या आत्म्याला ! 

५७



*शब्दांना नाही चाड तुझ्या प्रीतीची
शब्दांना नाही भीड तुझ्या नीतीची
शब्दांना नाही शब्दपणाची ग्वाही
पण शब्दावाचुन मनुष्यपणही नाही..!

५८
*हे व्यर्थ चालणे व्यर्थ बोलणे आहे
वाचेच्या दारी व्यर्थ डोलणे आहे..
शब्दांची काढून साल पहा तू आत
मग कळेल तुजला या जन्माचा अर्थ..!

५९
*हे जीवन वेड्या अर्थशून्य जर नसते..
शब्दात कवींनी काय मांडले असते?
एकाच दिशेने ओढित गाडा गेलो..
ना भिंती,वाडा चौसोपी बांधित बसलो..!

६०
*हे गाणे म्हणजे नाही घर आत्म्याचे..
हे गाणे म्हणजे नाही स्वरगंगेचे..
हे गाणे आहे परमधाम सृजनाचे..
सृजनातुन गळते दु:ख नव्या जन्माचे..!

६१
*हा चुकला ताळा गणितही माझे चुकले..
मी शिकलो तरीही मन हे त्याला मुकले..
राहिलो अडाणी इतुके झाले ज्ञान
हे लिहावयाला उरले कोरे पान..!

६२
*पोशाख चढवुनी शरीराचा मी येतो..
नावाने कुठल्या तरी इथे मी जगतो..
मी कल्पनेत अन् प्रत्यक्षातही रमतो..
अग्नीत टाकुनी सत्य पारखुन घेतो..!

६३
*मी धागे धागे तोडुन टाकित आलो..
झाकून व्यथांना अनाथ उघडा पडलो..
जन्माला माझ्या अमरत्वाचा शाप
ऐकाल कधीही दारावरती थाप..! 

६४

गुंतून कुठेही कधी गुंतलो नाही

धाग्यांना लटिक्या अर्थही नसतो काही 

दु:खात माझिया पहा बुडोनी खोल 

विसरुन जरा हा आभासांचा खेळ! 

६५

या मनात आहे फक्त स्वत:चा कप्पा 

सामोरा बसुनु मारीत बसतो गप्पा 

वचनास बांधलो साथ सखे ये राहू 

एकाकीपण मी कसे कुणाला देऊ! 

६६ 

घटघटा प्यायलो अमृत मी ह्रदयीचे 

ओठावर गाणे उरले हे सवयीचे 

मी एक विसावा श्रमलेल्या पथिकांचा 

कां हिशोब ठेवू गळणाऱ्या पानांचा? 

६७ 

मी आज सांगतो एक उद्याला एक 

बोलात बोल ना याच्या म्हणती लोक 

अदृश्य हात या स्तब्ध सोंगट्या कैक 

वाटते घडावे एक, घडे भलतेच..! 

६८ 

मी स्वये भिकारी झालो भरुनी थाळी 

या दिठीत आता स्वप्न तुझ्याविण नाही 

ही निळी फाटकी झोळी उलटी झाली 

ही नियती माझी माझ्या हाती नाही..! 

६९ 

सळसळतो पिंपळ पानात लकाके सोने 

या इथेच झाले कूळ कवींचे मोने 

कोणाला ठाऊक व्हायचे आहे? 

सोडून अवेळी मला जायचे आहे..! 

७०

या मृत्यूवरती प्रेम करु दे मजला 

या प्रेमासाठी रोज मरु दे मजला 

मी मेल्या नंतर तू लिहीलेले गीत 

रे असेल माझ्या जन्माचा अपघात..! 

७१ 

हे जन्मजन्मीच्या माझ्या दावेदारा 

हा कुणामुळे रे तुटून पडला तारा? 

दाढेच्याखाली कसा मला घेशील? 

मी देईन जीवन काय मला देशील? 

७२ 

अपघात व्हायचा होता झाला नाही 

मृत्यूच व्हायचा होता झाला नाही 

जन्मास घातले जेंव्हा मी मृत्यूला 

सौंदर्य मिळाले अवघ्या जड विश्वाला ! 

७३ 

मी पाय टाकला तिथे फुलेही फुलली 

मी येण्याआधी माती ही दरवळली 

शिशिरात घालतो वसंत तुजला साद 

रे साध जरासा त्याच्याशी संवाद..! 

७४ 

साऱ्याच सुखांची तिने उजळणी केली 

दु:खाची बाकी उरली घेऊन गेली 

कुणी सुखात कोणी दु:खामध्ये रडते 

साऱ्यांना माझे जीवनगाणे हसते..! 

७५ 

मी कोण प्रश्न हा तसाच राहून गेला 

जो आला याचे उत्तर देऊन गेला 

उत्तरे लाख पण लाखात असे हे एक 

मी माणूस आहे भला,बुरा पण नेक..! 

७६ 

या सौंदर्याने मोठी गंमत केली 

मन फसले त्याने भलती संगत केली 

देहाचे गाणे देह भोगुनी सरले 

मज रमणी वाचुन करमेनासे झाले..! 

७७ 

घेतले तेवढे फक्त मला द्यायाचे 

निर्व्याज प्रेम हे फक्त इथे गायाचे 

मी सत्य शिवाच्या मंदिरातला चोर 

जिव्हेवर माझ्या शब्दशारदा थोर..! 

७८ 

तुकड्याला तुकडे जोडित बसलो आहे 

आभाळ केवढे सांधत बसलो आहे 

मागाया येता दु:ख कशाला सांगा 

जा दह्या दुधाच्यासाठी लावा रांगा..! 

७९ 

तो फतरी पाने पुन्हा देऊनी गेला 

अन् पुन्हा सजविला मी स्वप्नांचा झेला 

समरसून जगलो रमलो या खेळात 

होतेच काय त्या हुकूमाच्या पानात..! 

८० 

संस्कार खरे तर कोण कुणावर करते 

जगताना त्यांचे काय अखेरी होते? 

पोटास घोट घोटास नोट हा मागे 

बाहेर बायको धंद्यासाठी जागे..! 

८१ 

ती मारुन आली अर्भक दो हातांनी 

ऐकूनही टाहो रडली ना ह्रदयानी 

मरणाहून जगणे असे भयानक असते 

मुल्यांची परवा अरे भुकेला नसते..! 

८३ 

या कातर वेळी तुझी आठवण येते 

निर्घृण तमाला मध्येच भरते 

मी दीप लावता कुणी फुंकतो तेथे 

अस्तित्व उजळता  असे पुन्हा काजळते..! 

८५ 

मालिन्य मनाचे शब्दात कितीही झाका 

ते उघडे पाडित सत्य उचलते काखा 

सत्याच्या फिरशी वणवण कां शोधात? 

रे जाण सत्य तू सत्य तुझ्या शोधात..! 

८७ 

तिमिरात तळपते वीज तसे तळपावे 

जगण्यात नसावे ढोंग सरळ धडकावे 

या चला कालची मरगळ झटकुन टाका 

ते स्वप्न उद्याचे तुम्हा मारते हाका..! 

८८ 

तू सूर छेडिता दूर चूर मी व्हावे 

शब्दातीत प्रेमा शब्दातुन कवळावे 

ना जाणे येणे आत्मसुखातच न्हावे 

मी अनंत जीवन अनंतात विहरावे..! 

८९ 

कां असून डोळे विनाश दिसला नाही? 

गांधारी म्हणते मीच बघितला नाही 

देव्हारी कुठला देव कुणी बसवावा 

हा प्रश्न नव्हे पण धर्म खरा जगवावा..! 

९० 

ती देता देता काळीज घेवून गेली 

शेजेला नवरा हवा कशाला वदली 

तुटलेल्या गाठी जुळलेल्या असतात 

संपते गीत पण सूर सात उरतात..! 

९१ 

या इथेच गाणे अर्धे राहून गेले 

अर्धेच स्वप्न मग जगावयाला उरले 

कोवळा गर्भ हा उदरी माझ्या वाढे 

अंधार शोधती प्रकाशातली झाडे..! 

९२ 

तो प्राण भराया मुडदे शोधित फिरतो 

तो मरे तोवरी मरण्यासाठी जगतो 

तृप्तीचे त्याच्या गणित असे उफराटे 

उधळण्या फुले अन् गिळावयाला काटे..! 

९३ 

म्हातारा करुनी कलप हसे गालात 

म्हातारी चाले पहा कशी झोकात 

गंभीर चेहरे करुन हे फिरतात 

पंचविशीत गध्दे म्हातारे होतात..! 

९५ 

मोडला टाक अन् उठला न्यायाधीश 

लटकली मान..चुकचुकला न्यायाधीश 

ही काय म्हणावी नियती म्हणतो माझी 

गाढवी वाहते अज्ञाताची ओझी..! 

९६ 

काळाचे औषध दु:ख विसरण्यासाठी 

दु:खाचे औषध काळ विसरण्यासाठी 

पाहिजे कोणते ठरव लाव तू ओठी 

सागरास नुरली भरती वा ओहोटी..! 

९८ 

मी विस्तवात या उडी घेतली केंव्हा? 

या ओठावर ते गाणे फुलले केंव्हा? 

ती जुनी आठवण जरा जाहली ताजी 

बायको म्हणाली,"जा आणा हो भाजी..!" 

९९ 

मी लिप्त असोनी अलिप्त झालो आहे 

मी अमुक्त असूनी मुक्त जाहलो आहे 

हे असून नसणे नसून असण्यासाठी 

हे ज्ञान भल्यांचे पाय घसरण्यासाठी..! 

१०० 

मरणाला सांगा उघडे आहे दार 

त्यालाही कळू दे या जन्माचे सार 

मी उत्सुक नव्हतो कधीच जगण्यासाठी 

ना मरण तोवरी आलो मरण्यासाठी..! 

१०१ 

हा बाळ तान्हुला नाव तुम्ही द्या काळ 

हा कुठून आला कुठे शोधण्या जाल? 

हा पुढे चालला पहा मागुती तोच 

दृष्टीस लागली अदृष्टाची ठेच..! 

१०२ 

देहात विदेही येते आणिक जाते 

सुखदु:खे भोगित हसते आणिक रडते 

मी प्रेम अनादी अनंत नाही काय? 

आत्म्याला माझ्या परमात्म्याचे पाय..! 

१०३ 

हे खरेच यौवन सरल्यावरती उरते 

त्याहून खरे,मरणातही शैशव जगते 

जग बघून हसू दे तुझ्या निरागस लीला 

एकदा किनारा मिळतो या जन्माला..! 

१०५ 

जाता लावुन घ्या हो मागिल दार 

हा पश्चिम वारा मला झोंबतो फार 

मी असा दूर ते घरकुल सोडून आलो 

या अखिल बिळांची निळी सावली झालो..! 

१०६

जे पिंडी होते ते ब्रह्मांडी रमले 

या भूमीवरती पुन्हा पुन्हा अवतरले 

क्षण कुठे थांबला?आहे-नाही सरले? 

बघ दिक्कालाला स्वप्न युगांचे पडले..! 

१०७ 

हा जन्म असा गाण्यात तुझ्या बुडवावा 

दे शब्द असा की प्रकाश त्याचा व्हावा 

मोडला टाक मी ठेवून कोरे पान 

अन् पुन्हा अचानक गाऊ लागले प्राण..! 

१०८ 

ही कसली मदिरा कसली धुंदी चढते? 

शब्दांना माझ्या खरे नि खोटे कळते 

मोठ्याने बोलू नकोस हे गुत्त्यात- 

मी कविता केली काल चक्क शुध्दीत..! 

१०९ 

अवघडले गाणे अवघड शब्दा जागी 

झोपेत पिण्याची सवय राहिली जागी 

घे भरुन पेला दिवस बुडाला मित्रा 

दारात भुंकू दे अंधाराचा कुत्रा..! 

११० 

हा उजेड घेऊन किती दूर जायाचे? 

नागडेपणा हा झाकित(?) हासायाचे 

राहिले केवढे जगावयाचे बाकी 

हे खोड सरेना रोज उगाळुन साकी..! 

१११ 

कविता केली पूर्ण युगे माझ्यात 

मी अपूर्ण उरलो तिला पूर्ण करण्यास 

धुंदीत तिच्या मी ती माझ्या धुंदीत 

हरवलो भेटलो शिवलो ना पेल्यास..! 

११२

येताना गाणे घेऊन ये ती म्हणते 

जाताना गाणे ठेवून ओठी हसते 

गाण्याविण गाणे मध्ये जळे एकाकी 

दे भरुन पेला मृग तृष्णेचा साकी..! 

११३ 

किती दिवस लोटले प्यालो नाही त्याला 

कां हीशोब करशी? भरला संपव पेला 

मद्याला कसली स्मृती कशाचा मोह? 

बघ तळा पलिकडे शांत पसरला डोह..! 

११४ 

विश्वास वाढला विश्वासाने माझा 

माणूस मिळाला अहं गळाला माझा 

देवत्व फेकुनी खूप प्यायलो मदिरा 

हळूहळू जाहला सुखदु:खाचा निचरा..! 

११५ 

ही साधी भोळी खरी माणसे सारी 

गुत्त्यात तशी या भेटतील संसारी 

ही भांडतील पण सांडतील रे गाणी 

देवाची वसती यांच्या अंत:करणी..! 

११६ 

तो बिचकत दचकत गुत्यामध्ये शिरला 

ओठाशी नेता पेला कोणी म्हटला- 

"भिऊ नकोस मित्रा इथे सर्व घेतात 

गुत्त्यात कुणीही अब्रूदार नसतात..! 

११७ 

प्रार्थना कशाच्या गाणी झाली त्यांची 

कालच्या आजच्या साऱ्या त्या कवितांची 

एखादी येते स्मरणा मधली ओळ 

अन् सांगून जाते विस्मरणाचे मोल..! 

११८ 

पाहून आरसा गर्दी नाक मुरडते 

मज झाका झाका राखा लाज विनवते 

शब्दांचे टाकुन वस्त्र नागवा झाला 

अन् गर्दी म्हटली,"टाळ्या घे कवितेला..! 

११८ 

आंधळाच होता प्रवास त्याचा सगळा 

तो प्रपंचातही नव्हता केंव्हा रमला 

फाटक्या वहाणा शोधा त्यातिल पाय 

शब्दातुन त्याच्या अजून जळते काय? 

११९ 

विस्मृती कशाची? माझी?या काळाची? 

कालातीत साऱ्या शब्दातिल दु:खाची? 

नेईल कुठे ही कविता आता मजला 

नाहीच कां कुठे घर माझ्या आत्म्याला? 

१२० 

हे अवघड नाही कवाड उघडे ठेव 

जो आला तो तो जिवलग ध्यानी ठेव 

हे शब्द शब्द दे उधळुन त्यांच्यासाठी 

हो आज मोकळा तुझ्याच कवितेसाठी..! 

१२१ 

गर्दीचे याला पूर्ण वावडे आहे 

हा प्रसिध्दी विन्मुख अशी प्रसिद्धी आहे 

कवितेत धुराची वलये सोडित म्हणतो 

"मोडल्या प्रार्थना थोड्या जोडुन बघतो..! 

१२२ 

तो दूर चमकला पहा चिमुकला तारा 

होईल कवी विजनाचा खाईल वारा 

हा किती युगे अंधार पोसला आहे 

मी त्याच्या पुढती हात जोडला आहे..! 

१२३ 

मरणारा मरतो स्वस्तात तरी ना लाजा 

हालती पाळणे करकरताती बाजा 

घरट्यातुन साऱ्या "घरपण"निघुनी गेले 

डोळ्यात कवीच्या स्वप्न एक अवघडले..! 

१२४ 

ही प्रतिभा माझ्या ऐश्वर्याचे भान 

बेभान नाचते हसते घेते तान 

मी हीलाच माझी सर्व अर्पितो गाणी 

ही नेईल तेथे चल जाऊ अनवाणी..! 

१२५ 

तो जिवंत जळला कुणास कळले नाही 

मेल्यावर त्याची भरली शोकसभा ही 

ते बघून आत्मा हसला फक्त स्वत:शी 

घुटमळतो आहे अजून कवितेपाशी.‌.! 

©रमेश यशवंत वाकनीस© 







Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७