पुनर्लेखन १५

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : लिहीते व्हा..
साहित्यप्रकार : कादंबरी 
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..! 
लेखक : रमेश यशवंत वाकनीस 
प्रसारण दिवस : रविवार १४ फेब्रुवारी २०२७ 
भाग १५
--------------------------------------------
आदि मंगल...मध्य मंगल..!
--------------------------------------------
" प्रयत्न शून्य आणि फुशारक्या मात्र खंडीभर.." 
*
   खोल विहीरीतून घुमत वर यावेत तसे हे शब्द माझ्या कानावर कुठून आदळताहेत?- पुन्हा पुन्हा घुमताहेत..प्रयत्न शून्य आणि फुशारक्या मात्र खंडीभर.." ं मित्रा, माझ्या शिवायही कुणी आहे कां इथे?- दचकून, सावध होऊन पाहतो मी..पण कुणीच दिसत नाहीय..मग बोलले तरी कोण?- हा भास की सत्य?- काहीही असले तरी या विधानात तथ्य आहेच. " यंव करीन न् त्यंव करीन अशा फुशारक्या मारण्यात लाभ तो काय?- सत्य शोधाच्या दिशेने आपण असा कितीसा प्रयत्न केलाय?- पण मग भृगूऋषींचा निरोप घेताना जेंव्हा आपण त्यांना म्हणालो की तुमच्या उग्र तपश्चर्येमुळे ऐहिक दु:ख मुक्तीचा उपाय सापडेल असे वाटत नाही. तेंव्हा ते असे कसे म्हणाले की तुझे ध्येय शूराचे आहे. तू विंध्यकोष्ठास आलारकालामांच्या आश्रमात जा. ते तुला मार्ग दाखवतील. म्हणजे मी अध्यात्मिक उन्नती निश्चितच प्राप्त करु शकेन अशी त्यांची खात्री पटली..अन्यथा ते असे विधान करणार नाहीत..! 
" शकेन..! असेल..! होईल..! छान मनोराज्ये चाललीयत.." 
    पुन्हा तोच तसाच आवाज आणि हास्याचा गडगडाट..!! गेला सूर्य अस्ताचली बुडाला..आकाश काळवंडून गेले. चांदण्या एकेक करीत उमलून हसू लागल्या डोळे मिचकावीत समस्त वस्तूजाताला..अरे..! हा चंद्रही आला..! शांत जळात त्याचे प्रसन्न रुप पाहून कमलिनींचा जीव हर्षोत्फुल्ल झाला..! आता रात्र कितीही दीर्घ असू देत. चंद्र सोबत आहे. जीवाचा जिवलग. तो कोटीभास्कर..तोही जीवलगच. मित्रच साऱ्या जगताचा..पण चंद्र अधिक प्रिय..मलाच नव्हे साऱ्या मनुष्यांना. साऱ्यांच्या मनात चंद्राप्रती ऐशी प्रीती, ऐशी प्रीती अगदी ओसंडून वाहणारी..!! 
    पोट पाठीला बांधून दिवसभर श्रमावे, गात्रे थकून आंबून जावीत, अंगणात, सौधावर, बाजेवर पहूडावे आणि एका चंद्राशी गोष्टी कराव्यात..सारी सुख-दु:खे, मनोगते, कथा-व्यथा फक्त चंद्राला निवेदाव्या..मने खुशाल उघडी मोकळी करावीत. अगदी कुणीही..आहाहा..! जलाशयाच्या काठावर बसून चंद्रबिंब निरखता निरखता रात्र कशी सरुन जाईल कळणारही नाही. देव असो वा दानव, धनवान असो वा बलवान, निर्बुद्ध असो की मेधावान याला सारे समान. संपूर्ण ब्रह्मांडाचेच होईल चिमूटभर  भस्म असा अग्नी दाह पचवून, रिचवून हा साऱ्या जगताला शीतल चांदण्यात न्हाऊ घालतो..यातच त्याचे खरे सुख...! 
" पाल्हाळ बरेच झाले. मुद्याचं बोल. " 
" कोण? "
माझाच शब्द माझ्या कानावर आदळला. दचकलो. अंगावरील रोमरोम उभे राहिले. भयचकित नजरेने सर्वत्र पाहू लागलो. त्या सरशी एका छद्मी हास्याने सारे वातावरण ढवळून निघाले. अगदी तळापासून. डोळे- स्लत:चेच अगदी टक्क उघडे.. पण विश्वास बसेना..सर्वत्र पहात मी त्या काळोखाला चिरत चाललेल्या हास्याच्या दिशेने साद घातली..
" कोण आहात कोण आपण?- असे समोर तर याल.." 
    रातकिड्यांची किरकिर कर्णकर्कश भासू लागली. काजव्यांच्या झुंडीच्या झुंडी गर्द झाडीतून चमकू लागल्या. पाठोपाठ बैलाच्या गळ्यातील  घुंगरांचे ध्वनी अंधाराला भेदत जाऊ लागले...खळदंग..खदळंग..खळदंग..खदळंग..व्यापार उदीमास निघालेले बैलगाडे संथपणे एका लयीत चालले आहेत..कुठे जात असतील?..कपिलवस्तूत की‌ कोशल नगरीत?..
" कपिलवस्तूकडेच निघालेत. जायचंय कां तुला? - फार आठवण होते ना मायतातांची?- लहानग्या राहुलची?- गोपाची? " 
" अरे..! कोण आहात कोण आपण?- असे अंधारातून तीर कां मारता आहात?- समोर येऊन उभे ठाका कसे..! " 
" आश्चर्य वाटले ना?- तुला काय वाटले तुला ऐकणारेज्ञकुणीच नाही या निर्जन वनात?- वनात ऐस वा जनात..तुझ्यासवेच आहे मी..अगदी जन्मापासून.." 
" काय?- जन्मापासून?.." 
  पुन्हा तेच तसेच छद्मी हास्य..अंधार अधिकच गडद झाला. त्यात कितीही डोळे खुपसले तरी काहीही दिसत नव्हते. हा आहे तरी कोण?- आणि हा आपला चेहरा कां दडवतो आहे?- जमिनीत खोलवर पसरलेल्या अश्वत्थाच्या पारंब्यांचा आश्रय करुन हा उभा आहेसे भासतेय. दोन पावले पुढे आला तर याला नीट पाहता तरी येईल. तो येत नाही तर आपण जाऊ असे म्हणून मी चालू लागलो तर वाऱ्याच्या प्रचंड झोता बरोबर पायाखालचा पाचोळा सर्वदूर उडू लागला. एक ताडमाड उंच सावली चांदण्यात चमकून वृक्षराजीत लुप्त झाली. भयातिशयाने सर्वांगावर काटा उभा राहिला. तोंड कोरडे पडले. माझी अशी अवस्था बघून कुत्सित हास्याच्या लहरी वातावरणात घुमू लागल्या. सावज गिळायला हजारो सर्प पायाखलून सळसळत वेगाने जावेत तसे झाले. प्रयत्नपुर्वक सारे बळ एकवटून मी उच्चरवात ओरडलो-
" लक्षावधी गेंड्यांच्या कातडीसारख्या टणक अंधारात तोंड लपवून नुसता हसू नकोस. असा समोर येऊन उभा रहा..! " 
  पुनश्च एक हास्य मला खिजवत घनदाट अरण्यात विरुन    गेले.पान न् पान थरारले..वटवाघळांची एक झुंड माझ्या डोक्यावरुन चीऽ चीऽ करत उडत निघून गेली. इतका वेळ ढगाआड झालेला चंद्र चांदण्यांसवे आला. ज्याचा केवळ आवाज  ऐकत होतो त्याचे भेसूर रुप समोर आले..
*
क्रमश: 
©रमेश यशवंत वाकनीस 
भटकबोल्या : ९०९६८००६५३ 



Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७