मी रविंद्रनाथांची पत्नी ७
मी रविंद्रनाथांची पत्नी
------------------------------
७.
नोतुन बोऊठान आणि माझ्या नवऱ्याने गच्चीवर जे नंदनकानन फुलवलंय त्याचं एक गूढतर स्वरुप आहे.
ती केवळ एक बाग नाही.त्या दोघांच्या प्रेम-संबंधाची ती स्मृती आहे.त्याच फुलबागेत त्यांनी आपल्या सुप्त प्रेमाची कबूली दिली होती.प्रेम कां कधी लपून राहतं?- नाही लपवता येत.हे माझ्या नवऱ्याचंच म्हणणं आहे.गोड गुपितांची मनभाषा डोळ्यातून व्यक्त होते..! एक दिवस तेच मला म्हणाले -
" आपल्या अनेक कवितातून आणि गीतातून मी माझी मूक प्रेमकहाणी सांगितलीय.प्रेमाच्या गूजगोष्टी लपवून ठेवताच येत नाहीत छोट्या सूनबाई.."
- तर मी सांगत होते गच्चीवर फुलवलेल्या नंदनकाननात दोघांचे संबंध अधिकाधिक प्रगाढ झाले.संध्याकाळ होताच नोतुन बोऊठान न्हाऊन केस बांधून आपल्या प्रिय ठाकुरपो बरोबर गच्चीवर जायची.नोतुन बोऊठान चांदीच्या तबकात ओल्या रुमालात मोगऱ्याच्या फुलांची माळ ठेवायची.आपल्या अधरांना रंगवण्यासाठी सुगंधित पान ठेवायची.माझ्या नवऱ्यानेच सांगितलं होतं-
" केवळ नोतुन बोऊठानला ऐकवण्यासाठी मी नवी नवी गाणी लिहायचो.माझ्या हृदयात जणू प्रेमाचा पूर आला होता.नंदनकाननात तीव्र वेगाने दक्षिणेचे वारे वहायचे.नोतुन बोऊठान आपला पदर सावरण्यात आणि वाऱ्यावर उडणारे केस बांधण्यात व्यग्र व्हायची.पण दक्षिणेच्या वाऱ्यापुढे शरणागती पत्करताना येणारं तिचं हसू मला आजही आठवतं..किती सुंदर दिसायची अशावेळी ती..!! तिचं हास्य जणू आकाशातील ताऱ्यांसारखं चमकत राह्यचं.ती म्हणायची-
" काय ठाकुरपो आज मला नवीन गाणं ऐकवणार की नाही? "
-मी लगेचंच माझं नवीन गीत तिला ऐकवायचो..विहागचे सूर धरुन गाऊ लागायचो.."
"मधुर मधुर मीलन
फुटे हसू माझ्या ओठी
हसू माझ्या ओठी
त्याची लाली तुझ्या गाली.. ध्रु
किती मृदू बोल तुझ्या
खोल डोळा पाणी..
स्वप्नं त्यात तुझी
नवी सारी माझी झाली..१
लुकलुकती तारे नभी
झाडावरी फुले
सोसवेना भार
झुके फांदी फांदी खाली..२
गुंफुनिया माळा करी
घेऊन सख्या आल्या
तुझ्या द्वारी बाग हसत
बहर नवा ल्याली...३
-आठवणींना उजाळा देतादेता तुमच्या रवि ठाकुरांनी पूर्णच गीत गायलं. मी तर अवाकच झाले. किती वर्षापूर्वीचं गीत कसं लक्षात राह्यलं यांच्या. हे गाणं कधी दुसऱ्या कुणी गायलेलं मी कधीच ऐकलेलं नाही.- काही क्षण गेल्यानंतर ते म्हणाले-
" कळलं छोट्या सूनबाई,त्यावेळी गीत म्हणताच गीत स्फुरत होतं..तेही सूरांच्या साथीनं..मग हसून स्वत:शीच उपहासाने म्हणाले-
'वा रे वा कवीवर्य रविंद्रनाथ ठाकुर..!! -एकवीसबावीस वर्षाचा होतो तेंव्हा केलेलं गीत.खूपच अपरिपक्व.पण या गीताला नंदनकानन आणि नोतुन बोऊठानचे हास्य व्यापुन राहिलंय.आणि हांऽ तिचे जादुई डोळे..सलज्ज मधुर हास्य..!! - अगदी कॅमेऱ्याने टिपून ठेवल्या सारखे..बघ.. फोटोत मी सुद्धा आहे..डोळ्यात डोळे मिसळले..हास्यात हसू.."
माझ्या हृदयात दाटून आलेल्या साऱ्या भावनांचा गळा दाबून मी विचारलं-
" इतकं सुंदर गीत ऐकून नोतुन बोऊठान काय म्हणाली? "
" ती जास्त काही बोललीच नाही.एक वेडेपणा मात्र करुन बसली.."
" वेडेपणा?.."
" वेडेपणा नाहीतर काय..चांदीच्या तबकातली ओल्या रुमाला खाली ठेवलेली मोगऱ्याच्या फुलांची माळ माझ्या गळ्यात घातली तिनं आणि म्हणते कशी आज मान्य करते मी ठाकुरपो, बिहारीलाल पेक्षा किती तरी मोठे कवी आहात तुम्ही "
" म्हणजे जिंकलातच की तुम्ही- नोतुन बोऊठानला अखेर मान्य करावच लागलं की तुम्ही बिहारीलाल चक्रवर्तींपेक्षाही श्रेष्ठ कवी आहात..आनंद विभोर होऊन काहीतरी बक्षीस देणारच ना तुमची नोतुन बोऊठान.."
- ते किती तरी वेळ गप्प बसून राहीले.खूप गंभीर झाले.विचारात मग्न झाले. मी खोलीच्या बाहेर जात होते पण हट्टानं मला थांबवत म्हटले,मी ती मोगऱ्याची माळ खूप दिवस जपून ठेवली होती.सगळी फुलं सुकून काळी पडली होती पण माझ्या जवळच होती.जरा सुद्धा काही होऊ दिलं नव्हतं मी तिला..!!! - किती वसंत ऋतू..किती वर्षाकाल..किती शरद ऋतूत..मी नोतुन बोऊठान जवळ असायचो..सकाळ..दुपार.. संध्याकाळ...तिने किती तरी रुपात मला पाहिलंय..सतरा वर्षात किती वेळा तरी तिनं माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय..आठवत नाही किती वेळा सुख-दु:खात आम्ही एकत्र जगलो..सतरा वर्षात माझं सगळं जीवन तिच्या प्रत्येक हांकेवर कंठायला सिद्ध होते...आमच्या भेटीगाठी..न कळत वाढत जाणारं प्रेम...आपलं सर्वस्व एका फुलांच्या माळेत गुंफून तिनं माझ्या गळ्यात घातलं.."
मी दरवाजात गप्प उभी होते.ते सुद्धा बोलणं थांबवून नि:शब्द उभे होते.केवळ घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती.मी विचारलं-
" ती माळ अजून आहे?"
" नाही,छोट्या सूनबाई, ती माळ आता नाही.ती नोतुन बोऊठानच्या चितेबरोबर भस्मसात झाली.."
- त्यावेळ पर्यंत मी रविंद्रनाथांची पत्नी झाले नव्हते.दोन वर्ष बाकी होती.माझं वय त्यावेळेला सात वर्षाचे असेल.मी त्यावेळेला जस्सोर जिल्ह्यातल्या फुलतुली गावातल्या एका गरीब कुटुंबातली मुलगी- भवतारीणी होते.आमच्या गावाच्या आसपास एकही चांगली शाळा नव्हती.घरा जवळच्या एका शाळेत पहिली पर्यंत शिकले मी.त्यानंतर लोकनिंदेच्या भितीने शिक्षण बंदच झालं. त्यावेळी म्हणजे १८८१ मधे रवि ठाकुर वीस वर्षाचे होते.नोतुन बोऊठान होती बावीस वर्षाची.
रवि ठाकुरांचे नवीन पुस्तक प्रकाशित झाले नांव होतं- ' भग्न हृदय ' हे पुस्तक मी लग्नानंतर कितीतरी वर्षानंतर पाहिले.अर्पण-पत्रिकेवर लिहीले होते- ' श्रीमती हे ' कोण श्रीमती हे?-अजब रहस्यमय वास येत होता त्या शब्दांना.कुतुहल म्हणून विचारुन बसले. त्यांची मुद्रा जरा त्रासिक दिसली,म्हणाले-
" सर्वकाही सर्वांना सांगायलाच पाहिजे असं नसतं.."
" मला पण नाही सांगायचं? "
" सांगितलं तरी तुला समजणार नाही.पण आता जाणून घ्यायचंच आहे तुला तर ऐक, ' हे ' म्हणजे हेमांगिनी.."
" हेमांगिनी..! ही कोण? "
" हेकेटी आणि हेमांगिनी एकच झाल्यात.."
" समजत नाहीय काहीच.नीट समजावून सांगा ना..! "
" हेकेटी एक रहस्यमयी देवी आहे.आणि हेमांगिनी आहे नोतुन दादाने लिहीलेल्या ' अलिक बाबू ' या नाटकातली नायिका.या दोन पात्रांची मिळून झालीय नोतुन बोऊठान "
- यापेक्षा जास्त काही त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं नाही.उर्वरीत कथा मी थोड्या फार माहितीचा आधार घेऊन पूर्ण करु पाहतीय.ही गोष्ट सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलीय.आज पर्यंत जे सांगितलंच नाही तेच आता सांगणार आहे.लिहायला खरंच खूप वाईट वाटतंय.तरी पण लिहीतीय.कां लिहीतीय? - माहीत नाही.मी जिवंत असे पर्यंत हे लिहीलेलं कुणालाही कळणार नाही.माझ्या मृत्यूनंतर कुणीतरी हे शोधून प्रकाशित करेल अशी आशाही मला वाटत नाही.ठाकुरवाडीच्या रिवाजा प्रमाणे हे लेखन, हे अप्रिय सत्य जळून राख होणार आहे.
-
माझे पती परदेशातून परत आल्या नंतर नोतुन बोऊठानला जीवनासक्तीच्या वादळाने घेरुन टाकलं.माझे पती आणि नोतुन बोऊठानच्या भेटीगाठी वाढल्या. दोघातल्या प्रेमानं आता गंभीर वळण घेतलं.तो कुजबूज आणि चर्चेचा विषय झाला.खास करुन ज्ञानदानंदिनीच्या डोळ्यांना ते खटकलं.त्या किंवा माझे मधले दीर कुणीतरी ही गोष्ट बाबा मोशायांच्या कानावर घातली असावी असा माझा कयास आहे. बाबा मोशाय अनावर होऊन कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत.त्यांनी तात्काळ निर्णय घेतला की रविला परत शिक्षणासाठी परदेशात पाठवायचं.त्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी झाली.ही गोष्ट नोतुन बोऊठानच्या कानावर आली. रवि परत आपल्याला सोडून जाणार?- परत तेच एकाकी नीरस अपमानित जगणं.ठाकुरवाडीतल्या बायकांचे जिव्हारी लागणारे टोमणे,वांझोटी,वांझोटी म्हणून छळ...एवढ्या मोठ्या परिवारात एक लाडका दीरच होता त्यांचं दु:ख समजून घेणारा.लहानणापासून मनातलं सगळं सांगता येईल असा दुसरा कुणीही नव्हता.दिड वर्षानंतर परतलेला रवी हाच एकमेव आधार होता.त्याला सोडून एकाकी जीवन जगणं तिच्यासाठी अशक्य होतं. नोतुन बोऊठाननी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पण त्यांचा तो प्रयत्न फसला.अयशस्वी आत्महत्येची कथा तिखटमीठ लावून पसरायला सुरुवात झाली.विशेष करुन ठाकुरवाडीतल्या बायकांसाठी तो करमणूकीचा विषय झाला. बाबा मोशाय हे सगळं नक्कीच जाणत होते. मी निश्चिंत होते.नोतुन बोऊठानच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तिला फार दिवस ठाकुरवाडीत राहता येणार नव्हतं. कुठे गेली असती ती? - तिला वडीलांचं छत्रही नव्हत.स्वाभाविकपणे ज्ञानदानंदिनीचं ऐकण्याशिवाय ज्योतिंद्रनाथां पुढे दुसरा मार्ग नव्हता.ज्ञानदानी फर्मानच काढलं.पत्नीला घेऊन चार दिवस कुठेतरी फिरायला जा. या घरात काही दिवस तरी तुमचं राहणं योग्य नाही.प्रकरण निवळलं की मग परत या. मला तर वाटतं पडद्याआडून ही सूत्र बाबा मोशायनीच हलवली.त्यांना नोतुन बोऊठान आणि ज्योतिंद्रनाथांचं नातं घट्ट व्हावं असंच वाटत होतं. आपल्याला पुन्हा परदेशात जावं लागणार हे माझ्या नवऱ्यालाही कळून चुकलं होतं.नोतुन बोऊठान चे व आपले संबंध आज नाही तर उद्या तोडले जाणार हे त्यांनाही समजलं होतं.
- बॅरीस्टर व्हायलाच पाहिजे.परदेशात जाऊन कायद्याचा अभ्यास काही इथे गीत,कविता लिहून होणार नाही.रवि ठाकुरांना जवळ जवळ आज्ञाच झाली होती.आज्ञा केली त्यांच्या मधल्या भावानी आणि भावजयीनी.नोतुन बोऊठानला सोडून परदेशात जावं लागणार याचा त्यांनाही काही कमी त्रास नाही झाला.कुठेही गेलो तरी आपली बायको रविला सोडून राहू शकत नाही ही गोष्ट ज्योतिंद्रनाथांनाही जाणवली होती.आणि हीच गोष्ट ह्यांनी आपल्या ' भग्न हृदय ' अर्पण पत्रिकेत अगदी निष्कपटपणे लिहीलेली दिसते.त्यांनी लिहीलेल्या त्या ओळी मी किती वेळा तरी वाचल्या ती वेदना अनुभवायला आवडत होतं मला कदाचित.म्हणून वाचत होते-
-
आज सागर किनाऱ्यावर
उभा आहे,तुझ्या जवळ
पैल किनाऱ्यावर
मेघाच्छादित अंधारमय देश
दिवस उलटल्यानंतर
त्या देशात जावेच लागेल..
या किनाऱ्यावर सोडून जाईन
माझ्या तप्त चंद्रिकेला-
बाकी असतील गीते
प्रियतमेच्या विरहात गायलेली..
सुख शांतीचा अंत पहात
रडेन बसून अंधारात..!!
-
मी समजून घेण्याचा प्रयत्न करतीय. त्यावेळी माझ्या नवऱ्याची मन:स्थिती खरोखर कशी होती?- ज्याने नोतुन बोऊठानवर जिवापाड प्रेम केलं.ती नोतुन बोऊठानही त्याच्यावर तितकंच प्रेम करत होती.पहिलं प्रेम,पहिलं प्रेम म्हणतात ते हेच.त्यात जबरदस्ती वीष कालवलं जातंय.त्याशिवाय दुसरा उपाय तरी काय होता?- हा समाजबाह्य संबंध दोघांना सर्वनाशाकडे घेऊन चालला होता.संपूर्ण ठाकुर परिवारही यातून वाचला नसता..!!
-नोतुन बोऊठानला सोडून जायला ते तयार झाले तेंव्हा त्यांची मनोवस्था कशी होती?- पण माझ्या पतीने काहीही लपवलं नाही.त्यांना एवढीच भिती होती की नोतुन बोऊठान पुन्हा कधीही आपल्याला भेटणार नाही.त्यांना सोडून त्यांची ' प्रिय बोऊठान ' जगूच शकणार नाही याची त्यांना खात्री होती.या नंतर कदाचित ते परत काही लिहीणार नाहीत.लिहीलं तरी त्या लेखनाला बोऊठानच्या हृदयाची पाखर लाभली नसती.तिच्या प्रेमाचा आधार नसता मिळाला.त्यांना हवे होते बोऊठानच्या डोळ्यातल्या गहिऱ्या वेदनेचे अश्रू.ही कविता प्रसिद्ध झाली तेंव्हा सगळे समजून चुकले होते.याचं जराही भय माझ्या पतीला वाटलं नसेल?- माझ्या पतीनी खरंच जीवतोडून प्रेम केलं होतं बोऊठानवर..! - सगळे वाचतील,पाहतील,हे माहीत असून सुद्धा सजगपणे असूनही ते कसं लिहू शकले असं-
" स्नेहाच्या प्रकाशात
उघडून हृदय-प्राण
या तीरावर उभी आहे ती देवी
गातो आहे शेष गान
तुझ्याच मनाची ही छाया
ते गीत शोधते आहे आश्रय
चार थेंब तुझ्या,
डोळ्यातिल अश्रूंचे देऊन दान
आज निरोप दे
परत नाही डोळाभेट
प्रेमाच्या प्रकाशात
हृदय गायिल कां गीत?
*
वरवर पाहिलं तर एक पातळ आवरण आहे. निर्मळ प्रेमाचे आवरण.पण हे तर अनैतिक संबंधाला नैतिकतेच्या कोंदणात बसवून सजवण्यासारखं आहे. पण सगळे जे समजायचं ते समजून गेले होतेच.पण रवि ठाकुर परदेशात गेलेच नाहीत.म्हणजे जाऊच शकले नाहीत.नोतुन बोऊठानची मन:स्थिती त्यांना सहन होत नव्हती.त्यांना भिती होती, त्यांच्याशिवाय नोतुन बोऊठान जिवंत राहू शकणार नाही.परत आत्महत्येचा प्रयत्न करेल.त्यामुळे जहाज मद्रासला पोहोचल्यावर तिथून ते पळून गेले असंच लोक म्हणतील.पण ते मद्रासहून थेट चंदननगरला गेले.कारण नोतुन बोऊठान सोबत ज्योतिंद्रनाथ तिथेच रहात होते.
- नोतुन बोऊठानला वाटलं नव्हतं की रवि ठाकुर जहाज सोडून आपल्याला भेटायला येतील. त्या पुनर्भेटीची कथा एकदा त्यांच्याच शब्दात मला ऐकायला मिळाली होती.जशी आठवेल तशी लिहीतीय-
" मी मद्रासहून परत आलो ते बरं झालं.नोतुन बोऊठान त्यावेळेला ज्योतिदादा सोबत तेलनीपाडातील बॅनर्जींच्या बागानवाडीत होती. तिथे पाहतो तर ज्योतिदा आपल्याच जगात बुडून गेलेले.नोतुन बोऊठान अत्यंत एकाकी.मला पाहून तिला किती आनंद झाला होता..! - पुन्हा गीतांनी आणि कवितांनी तिचं हृदय भरुन गेलं. तुला माहीताय कां छोटी, त्यावेळेला गंगा नदीतून पोहत पलिकडच्या तीरावर मी जायचो..ते पाहून नोतुन बोऊठान घाबरायची. माझ्या करता तिचा जीव इतका खालीवर होतोय ते पाहून मला खूप बरं वाटायचं. पोहत पोहत मी इतका दूर निघून जायचो की तिला दिसायचोच नाही मग मी बुडून मेलो की काय या भितीने रडायला लागायची.आता वाटतं उगाच छळलं आपण तिला..आधीच किती यातना भोगत होती ती..!!
-" त्यानंतर एक दिवस बॅनर्जींच्या वाडीतून चंदननगर मधील रोमांचक ठिकाणी आम्ही दोघे गेलो. मोरान साहेबांची बागानवाडी....हे स्थान अतिशय सुंदर होते.अगदी गंगा किनाऱ्यावरच वसवले होते.त्यात पावसाचे दिवस.एकदा भरदुपारी भयानक पाऊस झाला ज्याला ' म्हणतात ' वृष्टीपात मुखरित जलधाराच्छन्न मध्यान्ह ' अर्थात धुंवाधार पावसाच्या तांडवाने काळवंडून गेलेली मध्यान्ह.तो दुपारचा काळ नोतुन बोऊठान सोबत वेड्यासारखा घालवला.दोघातही ते वेड संचारले होते.विद्यापतींचे ' भरा बादर माह भादर ' हे गीत आम्ही मनाला वाटेल त्या सुरात गात गात पावसात मनसोक्त भिजत होतो.कशाचं म्हणून भानच नव्हतं आम्हाला. कधी कधी आम्ही दोघं होडीत बसून निघायचो..पश्चिमेच्या आकाशात अस्ताला निघालेला सूर्य लालसोनेरी रंगांची उधळण करायचा..ते विविध रंग नोतुन बोऊठानच्या डोळ्यांवर..केसांवर चमकत होते..किती सुंदर दिसत होती बोऊठान त्यावेळेला..!! ही सौंदर्याची जादू डोळ्यात साठवून घेतोय न घेतोय तोच बोऊठानचे एक नवेच रुप समोर दिसायचे..सूर्यास्तानंतर पूर्व क्षितिजावर चंद्र आपले चांदणे उधळत हसायचा..मग आम्ही दोघेही बागानच्या घाटावर परतून नदी किनाऱ्यावरील छतावर आमचा बिछाना अंथरायचो..किनाऱ्यावरील वनरेखा घनदाट अंधारात गडप होवुन जायची..ते आमच्या दोघांचं मिळून कल्पनेच्या राज्यात विहरणे..कधी कोमल कधी गंभीर..स्वरातील चर्चा..ती मनांची देवाण-घेवाण..सांध्यकालीन छाया..श्रावणसरी झेलत विद्यापतिंची गाणी..गाणं..छोट्या सूनबाई, यातलं काहीच राहिलं नाही..तरी पण सगळं सगळं आहे..!! माझ्या गीतातून..कवितातून..तो इतिहास..जिवंत आहे..!! - आठवतं, एकदा नोतुन बोऊठानला म्हटलो होतो, माझ्या कवितांमध्ये आणखी एक कविता लपलीय.एक कविता जी सगळे वाचतील..आणि दुसरी कविता जी फक्त तू आणि मी वाचू शकणार..!!
" पण असं कधी होईल कां?- सगळे काय इतके मूर्ख आहेत कां?- तुमच्या कवितातील लपलेली कविता सगळे समजून चुकलेत.तुमच्या लपवलेल्या कवितांनीच तर सर्वनाशाला आमंत्रण दिलं..! - आपल्या लग्ना आधी सात महिन्या पूर्वीच्या ' भारती ' पत्रिकेत तुमची एक कविता प्रकाशित झाली होती.त्या कविते विषयी ऐकल्यानंतर मी ती कविता वाचली. तुम्ही कां लिहीली ही कविता?- भावना अनावर झाल्या म्हणून?-तुम्हाला वाटत होतं कुणाला काही समजणार नाही..किंवा समजलं तरी ते गप्प बसतील.तुम्ही अगदी असंच सगळं लिहीलं होतं-
" तो खिडकीतून दिसणारा किनारा आठवतो..त्या बागानवाडीतली झाडे-झुडपे आठवतात..ती अश्रूंनी भिजलेली माझ्या प्राणांची भावस्पंदने आठवतात..आणि माझ्या निकट उभी असतात...त्यांची आठवण येते...ते ज्यांनी माझ्या कवितेच्या
एका बाजूला खाडाखोड केली होती..ते पाहून माझ्या डोळ्यात अश्रू येतात...तेच ते खरं लिहीत होते..त्यांची ती अर्थपूर्ण खाडाखोड छापली नाही गेली..आणि मी लिहीलेली अत्यंत अर्थहीन खाडाखोड मात्र छापली गेली.."
ही कविता प्रकाशित होताच बाबा मोशाय स्वस्थ बसू शकले नाहीत.त्यांनी तुमच्या रवि ठाकुरांना पत्र लिहून ताबडतोब ये अशी आज्ञा केली..याचा अर्थ इतकाच होता की लवकरात लवकर लग्न करा..! या पत्रानंतरच सगळ्या वहिनीसाहेबां मध्ये रवि च्या विवाहाचा विषय ऐरणीवर आला.विशेष करुन मधल्या वहिनीने जितक्या लवकर करता येईल तितका लवकर रवि चा विवाह निश्चित करण्याचा चंगच बांधला.
- आता त्याच प्रश्नाच्या उत्तरा जवळ मी येतीय, रवि ठाकुरांनी माझ्या बरोबर लग्न कां केलं?- कां रवि ठाकुर, कां?- या ' कां ' चं उत्तर मी जीवनभर शोधत राहिलेय.आता कदाचित उत्तराच्या जवळ मी पोहोचेन.
*
जस्सोर म्हणजे ठाकुरवाडीतल्या सुनांची खाण होती जणू. सगळ्या ठाकुर घराण्यातल्या सुनांनी रविची बायको शोधायला जस्सोरकडेच धाव घेतली. याचा अर्थ इतकाच की ज्ञानदानंदिनी आणि आणि कादंबरीदेवी दोघी मुलगी पाहायला जस्सोर मध्ये दाखल झाल्या.बरोबर मधल्या जाऊबाईंची मुलगी इंदिरा पण होती.आणि कोण होतं माहिताय?- स्वत: रवि ठाकुर. 'नव्हतो आलो' असं जरी ते म्हटले तरी आले होतेच ते.कारण त्यांना राहववंलच नाही...त्यांची नोतुन बोऊठान आली होती ना..! - पण कां आली होती नोतुन बोऊठान?
- ही गोष्ट मला त्यांच्या आत्महत्येनंतर,खूप नंतर समजली.मी थोडी मोठी झाले तेंव्हा समजलं की आपल्या प्राणप्रिय रविसाठी मुलगी बघायला नोतुन बोऊठानला मुद्दाम जबरदस्ती नेण्यात आलं होतं.ही एक प्रकारे मानसिक शिक्षाच ठोठावली गेली होती. अशी आहे ठाकुरवाडीच्या बायकांची वागण्याची निष्ठूर पद्धत.नंतर जेंव्हा ही गोष्ट समजली तेंव्हा नोतुन बोऊठान विषयी मला अपार दु:ख झालं. ही मानसिक शिक्षा तिला एकटीला भोगायला लागू नाही, ज्ञानदानंदिनीचे टोमणे,बोलणी तिला एकटीला सहन करावी लागू नाही म्हणून नोतुन बोऊठानचे प्रियतम रवि सुद्धा आले होते. मला पाहून पसंत करायला म्हणून नाही तर नोतुन बोऊठानला आधार द्यायला,तिचं संरक्षण करायला होते.- आता प्रश्न असा पडतो की जस्सोर मध्ये एवढ्या मुली असताना मलाच कां पसंत केलं गेलं?
- जस्सोर मध्ये खूपशा मुली असल्या तरी त्या सगळ्या पिराली ब्राह्मणांच्या ठाकुरवाडीत दिल्या जाणार नाहीत.पिराली म्हणजे मुस्लीमांकडे खाणारे-पिणारे ब्राह्मण.त्यात पुन्हा ब्राह्मो, म्हणजे देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करणार नाहीत.आणखी विशेष असं की त्या वर्षी जस्सोर मध्ये सुंदर मुलींची वानवाच होती.मला पसंत करण्याचं एकमेव एकच कारण म्हणजे लाख प्रयत्न करुन सुद्धा रवि ठाकुरांच्या पसंतीची मुलगी त्यांना मिळालीच नव्हती.नुसतं एवढंच नाही आणखी एक कारण होतं.जरा खाजगी आणि आवश्यक असं. माझे वडील बेनीमाधव ठाकुरवाडीचे सामान्य कर्मचारी होते.त्यामुळे येणारी सून निश्चितच आज्ञाधारी असणार, हूं की चूं सुद्धा करणार नाही.माझ्यात तशी हिम्मत अजिबात नसणार याची त्यांना खात्री होती. नोतुन बोऊठान सुद्धा माझ्यखसारखीच बाजारहाट करणाऱ्या कर्मचाऱ्याची मुलगी- ज्योतिंद्रनाथांची पत्नी म्हणून या घरात आली होती.मी पण ठाकुरवाडीच्या कर्मचाऱ्याची मुलगी- रवि ठाकुरांची पत्नी म्हणून आलेली.ज्ञानदानंदिनी,माझी मधली जाऊ ? - तिचे वडील अभयचरण त्यांची तर एक वेगळीच कथा आहे.ही कथा मी ह्या़ंच्या तोंडूनच ऐकलीय.त्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं आणि एका पिराली ब्राहृमणाच्या घरी रहात होते.त्यांच्याच मुलीशी- निस्तारिणीशी लग्न करुन घरजावयी झाले होते.ज्ञानदानंदिनी आपले दुधाचे दात पडण्या आधीच ठाकुरवाडीत सून म्हणून आली होती.
एकदा तीच सांगत होती की दुधाचे दात पडले की ते उंदराचं बीळ शोधून त्यात टाकायचे आणि त्याला सांगायचे की माझे दुधाचे दात घेऊन तुझे चांगले दात मला दे. आता कलकत्त्याच्या वीट-चुन्याच्या पक्क्या घरात उंदराचं बीळ ती कुठे शोधणार होती?-हीच नंदिनी पुढे शिकून-सवरुन परदेशात जाऊन आली होती.तिच्या पुढे माझी काय पात्रता..! मला तर वाटतं की या मधल्या जावेचीच अशी इच्छा होती की ज्योतिंद्रनाथ आणि रविंद्रनाथांची पत्नी आमच्या सारख्या सामाजिक दृष्ट्या तुच्छ गणल्या जाणाऱ्या मुलीच व्हाव्यात. इथे एक गोष्ट मात्र मी मान्य करते आणि मला त्याचा आनंदही आहे, कारण ह्यांची नोतुन बोऊठान, कादंबरीदेवी अचानक ठाकुरवाडीत आली आणि ज्ञानदानंदिनी एकदम पडद्याआडच गेली..तिची हुकूमशाही बंद झाली..!! - या गोष्टीचं मला खूप कौतुकही वाटलं. नोतुन बोऊठानला जीवनभर ठाकुरवाडीतल्या महिलांनी खूप त्रास दिला आहे.कधी कधी वाटतं लहान वयातच तुमच्या रवि ठाकुरांनी आपल्या नोतुन बोऊठानच्या होणाऱ्या छळा विरुद्ध आवाज उठवला असेल म्हणूनच माझ्या आत धुमसणाऱ्या आगीत..वेदनेच्या ज्वालेत अभिमानाची एक ज्योत तेवते आहे.माझे पती मला कुणीही जीवापाड प्रेम करावं इतके योग्य वाटतात. त्यांच्या कविता,गीते मला समजत नाहीत पण इतकं समजतं की नोतुन बोऊठान या घरात एकटी पडलीय, तिला समजून घेणारं कुणी नाही म्हणून तिच्यावर प्रेम करतात,तिच्या बाजूने उभे राहतात. तिला माहेरचा आधार नाही म्हणून तर एवढा छळ सहन करावा लागला तिला. माझी तशीच परिस्थिती आहे. माझ्या बरोबर रवि ठाकुरांचे लग्न लागले आणि जस्सोर मधेच नोतुन बोऊठान आजारी पडली.
- तिच्या प्राणप्रिय व्यक्तीचा विवाह होतोय, तो थांबविण्याचा कोणताही मार्ग दिसत नाहीय..रवि ठाकुर आता आपले राहिले नाहीत हे दु:ख नोतुन बोऊठान सहन करु शकली नाही.ती आजारी पडली आणि आमच्या लग्नानंतर तिची तब्येत जास्तच ढासळत राहिली. मी जेंव्हा जेंव्हा तिच्याकडे बघायची तेंव्हा ती एखाद्या सावलीसारखी भासायची.तिचं वय त्यावेळेला पंचवीसचं असेल किंवा कमी सुद्धा असेल. इतकी उंच सडपातळ पण बांधेसूद होती की त्यामुळेच तिचं वय कमी वाटायचं.गव्हाळी रंगाच्या नोतुन बोऊठानचे डोळे इतके वेगळे होते की तसे डोळे कुठे कुणीच पाहिले नसतील.. त्या काळ्याकंच हसऱ्या डोळ्यात एक आश्चर्यकारक आकर्षण शक्ती होती.
एक दिवस तुमच्या रवि ठाकुरांना मी अचानक विचारलं-
" तुम्ही अण्णा तडखडेंच्या मराठी मुली बद्दल बरंच काही सांगितलं होतंत.परदेशातल्या मुलीं विषयी सुद्धा किती तरी भरभरुन बोलला माझ्या जवळ त्या सगळ्यांना सोडून तुम्ही मलाच कसं पसंत केलंत?.."
क्षणाचाही वेळ न दवडता ते म्हणाले-
" माझ्या लग्नाबाबत विशेष असं काही नाही.तसंही माझ्या पसंती- नापसंतीचा काही विषयच नव्हता.सगळ्या वहिनींचा फारच आग्रह होता म्हणून म्हणालो, तुमची इच्छा असेल तसं करा.या विषयात माझं कोणतंही मत नाही.."
" तुम्ही मुली बघायला गेला होतात. मग मला कसं काय पसंत केलंत? "
यावर त्यांनी काय म्हणावं?- उलट प्रश्न केला, " बघायला गेलो होतो म्हणजे काय? "
- कधी कधी वाटतं आपलं लग्न या गोष्टीचा स्विकार त्यांचं मन करु शकत नव्हतं.त्यांनी माझ्या बरोबर लग्न करुन चेष्टाच केली होती लग्नाची. असं नसतं तर आपल्या लग्नाची निमंत्रण पत्रिका तशी लिहीली नसती.त्यांनी मायकेल मधुसुदनची
" आशेच्या भुरळजालात गुंतून काय लाभ होणार.." ही ओळ
उद्धृत करुन पुढे लिहीलं होतं-
पुढील रविवार दिनांक २४ मार्गशीर्ष शुभ दिनी माझ्या परम आत्मीय श्रीमान रविंद्रनाथ ठाकुर यांचा शुभ विवाह होणार आहे. या निमित्ताने संध्याकाळी जोडासांको येथील देवेंद्रनाथ ठाकुर भवनात आपण लग्न- विधी सोहळ्यात उपस्थित रहावे व माझ्या सर्व आत्मिय जनांना कृतार्थ करावे.इति.
- अनुगत श्री रविंद्रनाथ ठाकुर.
*
अनेक लोक यात रवि ठाकुरांच्या या निमंत्रण पत्राचं कौतुक करतात.मी हे पत्र खूप नंतर पाहिलं आणि फार वाईट वाटलं.
आणि भितीही वाटली.खरंच.लग्नानंतर पहिल्या रात्री आमच्या शयनगृहात खूप रडले.लग्न आणि लग्नानंतरचे सगळे विधी जोडासांकोच्या ठाकुरवाडीतच झाले. ते देवेंद्रनाथ ठाकुरांचे पुत्र आणि प्रिंस द्वारकानाथ ठाकुरांचे नातू.एवढ्या मोठ्या जमीनदाराचे पुत्र आपल्या सामान्य नोकराच्या घरी कशाला येतील?- आणि कसे होतील लग्नानंतरचे संस्कार समारंभ माझ्या माहेरी?- तुमच्या रवि ठाकुरांनी स्पष्टच सांगितलं होतं, लग्न करायला मी कुठेही येणार नाही.जे काही लग्न- विधी करायचे ते सगळे ठाकुरवाडीत करा. बरोबरच आहे.एवढे मोठे जमीनदार..! अशा घराण्याचा पुत्र कसा तयार होणार एका सामान्य नोकरमाणसाच्या दारात लग्नगाठ बांधायला?-
कन्येला जोडासांकोच्या वाडीत घेऊन या.. जे काही व्हायचं ते इथेच होईल अशी नवऱ्या मुलाचीच इच्छा आहे म्हटल्यावर सर्वस्वी अपरिचित असलेल्या ठाकुरवाडीत विवाह झाला.एवढं मोठं घर मी या पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं.अशा घरंदाज माणसांनाही आधी कधीही पाहिले नव्हते.
*
या लोकांची आपापसात बोलण्याची रीत,वागण्याचे र रिवाज खूपच वेगळे होते. विशेष म्हणजे मुलींची वेषभूषा,बोलणं,पुरुषमाणसात मिळूनमिसळून वागणं या आधी कधी पाहिलं नव्हतं. लाजेनी आणि भितीने माझी घाबरगुंडी उडाली होती. कुठे गेली सगळी माझी माणसं?- आई, वडील, माझे सगळे सख्खे नातेवाईक?- कुठेही कुणीही दिसत नव्हते.इतकंच आठवतं की माझ्या लग्नात नेहमी पाहायला मिळते तशी धामधूम अजिबात नव्हती. घरात नावालाही प्रसन्नता दिसत नव्हती.जणू काही अचानक ज्योत विझलीय...हो कारण माझे सख्खे मेहूणे शारदाप्रसाद यांचे माझ्या लग्ना दिवशीच निधन झाले होते.
-आणखी एक कारणही होतंच.नवऱ्या मुलाला स्वत:लाच लग्न होतंय याचा आनंद नव्हता. सगळ्यांच्या मनात, आपल्या लाडक्या रविचं लग्न एका गरीब नोकराच्या मुली बरोबर जबरदस्तीने केला जातोय, हा अन्याय होतोय, याचं दुःख होतं.ते सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतही होतं.
या अपराधाला क्षमा नाही ही भावना सगळ्यांच्या मनाला त्रास देत होती.
वासरघरात माझ्या नवऱ्याने पहिल्या रात्रीच्या सोहळ्यात रागात आणि निराशेत जो प्रकार केला त्याने माझ्या छातीत धडकीच भरली.माझ्या जवळ माझ्या माहेरचं कुणीही नव्हतं.त्यामुळे जास्तच घाबरले होते.नवरदेव आपल्याच घराच्या पश्चिमेचच्या व्हरांड्यात फिरुन लग्न मंडपातल्या पाटावर येऊन उभा राहिले.त्यानंतर आठवते वासरघरातली गोष्ट.भाॅंडा खेला खेळण्याची वेळ झाली.भाॅंडा खेला म्हणजे भांड्यात तांदूळ भरायचे आणि भांडे पाडायचा एक खेळ आहे.मी डोईवरच्या पदराआडून पहात होते हे कसे हा खेळ खेळतात.त्यांनी काय केलं सगळी भांडी एकेक करत उलटी करुन ठेवली.
- त्यांची छोटी काकू त्रिपुरासुंदरी एकदम ओरडली-
" हे काय करतोयस रवी?- असा खेळतात कां भांडा खेला?-सगळी भांडी उलटी-पालटी काय करतोयस?- "
याच वेळेला एक स्त्री त्या ठिकाणी येऊन उभी राहिली.नंतर कळलं की हीच नोतुन बोऊठान..! - खूप आजारी दिसत होती. सगळे तिच्याकडे बघत होते.तिच्या चेहऱ्यावर स्मित होतं पण डोळे आग ओकताहेत असं वाटत होतं.माझ्या पतीने त्रिपुरासुंदरी काकूला म्हटलं-
" माहित नाही कां काकू आज माझ्या जीवनात सगळंच उलटंपालटं झालंय.म्हणूनच भांडी पण उलटीपालटी करतोय.माझे पती काकूशीच बोलत होते पण बघत होते नोतुनबोऊठानच्या डोळ्यात.त्यांचे ते शब्द आजही आठवतात.माझ्या पतीचे हे शब्द ऐकून नोतुन बोऊठान पदरात तोंड झाकून पळतच बाहेर निघून गेली.मग काकू वातावरण निवळावं म्हणून म्हणाली-
" रवि तू एखादं गाणं म्हण..तुझ्यासारखा गायक असताना दुसरं कोण गाणार? "
हे ऐकताच माझ्या पतीनी गायला सुरुवात केली खरी पण मला वाटलं माझी चेष्टा करण्यासाठीच गाताहेत...
*
ये प्रिये तू ये प्रिये
स्थिर दामिनी तू चांदणी
पोर्णिमा जणू अंगणी..
पाहतो टक लावुनी..
अप्सरा..विद्यादायिनी
कोण तू?..गे कोण तू?
ये प्रिये तू ये प्रिये..
-पहिल्या रात्रीच तुमच्या रवि ठाकुरांनी मला जाणवून दिलं की ते मला कोणत्या दृष्टीने पाहतात..पुढे जीवनभर कोणत्या दृष्टीने पाहणार आहेत. एकंदरीत त्यांनी माझं नाक कापूनच हातात ठेवलं..!
(क्रमश:)
Comments
Post a Comment