मी रविंद्रनाथांची पत्नी ५
मी रविंद्रनाथांची पत्नी
५.
माझे रवि ठाकुर शरद ऋतुतल्या आकाशासारखे आहेत.कधी भरुन आलेल्या मेघासारखे.तर कधी उन्हाप्रमाणे शुभ्र.कधी अल्लड चंट मूल.कधी प्रौढ, धीर..गंभीर..!
त्यावेळी आम्ही जोडासांकोच्या ठाकुरवाडीतच होतो.ते दक्षिणेच्या व्हरांड्यात एका आरामखुर्चीत बसले होते.मी खाली फर्शीवर बसले होते,त्यांच्या पायाशी. मी त्यावेळी काही महिन्यांची पोटुशी होते.ते खूपच मौज-मजेच्या मूड मध्ये होते.त्यांचा पूर्ण दिवस लेखनकामाठीत गेला होता.संध्याकाळी काय झालं कोण जाणे एकदम व्हरांड्यात येऊन बसले,म्हणाले-
" तू ती मैद्याची खूप पदर असलेली मिठाई बनवली होतीस मला खूप आवडते ती.तिचं नांव काय? "
" ऐलोझोलो ! " कधी खायचीय सांगा बनवते.."
" ऐलो झोलो?" इतक्या सुंदर मिठाईचं इतकं वाईट नांव? "
" तुम्ही सुचवा दुसरं एखादं नांव..तेच नांव कायम करु.."
" क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले " परिबंध "
" परिबंध?-काय म्हणायचा याचा अर्थ? "
किंचित हसून ते म्हणाले, केस बांधून जेंव्हा नोतुन बोऊठान समोर येऊन उभी राहिली तेंव्हा तिला एकदा म्हटलं होतं-
" किती प्रकारच्या परिबंधनांचा अंबाडा बांधलायस..परिबंधन म्हणजे विचित्र चालीरितींची बंधनं..तुझ्या ऐलोझोलो सारखी..किती प्रकारची पीठं मिसळून करता तो अनेक पदरांचा पदार्थ.."
मला हे नवीन नांव अजिबातच आवडलं नाही.पण रवि ठाकुरांनी नामकरण केलंय, गुपचुप मान्य केलं.केवळ अशा पदार्थांचीच नाही तर स्वयंपाकात सुद्धा वेगवेगळे प्रयोग करणं माझ्या नवऱ्याला आवडतं.
-
मी जस्सोरची मुलगी आहे.जस्सोर शाकाहारी भोजनासाठी खूप प्रसिद्ध आहे.मला खूप वेगवेगळे शाकाहारी पदार्थ करता येतात.मला ढाक्यातले प्रसिद्ध पदार्थ शिकायची खूप आवड आहे.कुणी मला ढाक्याचे पदार्थ शिकवले की मी त्याला जस्सोरचे विशेष पदार्थ शिकवते.माझे पती माझ्या शाकाहारी पदार्थांची खूप प्रशंसा करतात.या एका गोष्टीत मी अद्वितीय आहे असं त्यांचं म्हणणं.विशेष म्हणजे माझ्या हातची मिठाई ते अगदी ताव मारुन खातात.या बाबतीत मी श्रेष्ठ ठरले.नोतुन बोऊठान छान बनवते पण तिच्यापेक्षा तू खूपच सरस बनवतेस असंही ते म्हणाले.
- शांतिनिकेतन मधे आमच्यासाठी वेगळी निवासाची सोय नव्हती.आम्ही आश्रमातल्या अतिथीगृहाच्या दुसऱ्या मजल्यावर रहात होतो.मुदपाकखाना दूर होता.रवि ठाकुर म्हणाले वेगळं स्वयंपाक घर नाहीय. बाहेच्या व्हरांड्यात तू तुझी चूल मांडून स्वयंपाक कर.मी तसंच करत होते.सुट्टीच्या दिवशी मी विविध प्रकारच्या मिठाया बनवायची आणि त्या एका जाळीदार कपाटात ठेवायची.रथी हळूच कपाट उघडून मिठाई खायचा.ते लपून पाहताना मला वेगळाच आनंद मिळायचा.
एक दिवस गमतीने ते म्हणाले-
" हे जाळीचं कपाट म्हणजे तू बनवलेल्या नाना प्रकारच्या मिष्टान्नांचं अक्षय भांडार आहे.तोंडाला पाणी सुटेल अशा पदार्थांनी भरलेलं.मी रोज बघतो रथी आपल्या मित्रांबरोबर या मिष्टान्नावर सतत ताव मारत असतो "
या मिष्टान्न भांडारा मागे माझ्या पतीच्या विविध आवडी-निवडींचं योगदान आहे.त्यांना सतत नवनवीन पदार्थ हवे असतात आणि मला ते करुन खायला घालावे लागतात.एक दिवस अचानक हट्ट धरुन बसले मानकचूर च्या जिलब्या बनव.चांगल्या केल्यास तर बंगाली माणसाच्या घराघरात तुझं कौतुक होत राहिल.
" मानकचूरा ची जिलबी?- हा असला वेडा हट्ट मी नाही पुरवू शकणार.."
" हट्ट नाही, छोटी बहू,फरमाइश म्हण..तुला बनवावीच लागेल मानकचुराची जिलबी "
रवि ठाकुरांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं.त्यामुळे मला उत्साह आला आणि खरंच अख्खी दुपारभर खपून मी मानकचूर जिलबी बनवली.रथीला म्हटलं," बघ रे कशी झालीय जिलबी "
"रथी म्हणाला," आई तू नेहमी बनवतेस ना त्याहीपेक्षा सुंदर झालीय.."
-संध्याकाळी पुन्हा ते लेखनात बुडून गेले.अशा वेळी मी त्यांना अजिबात त्रास देत नाही.लिहायला बसले जेवणखाण विसरुनच जातात ते.सुरुवातीला मी खूप नाराज व्हायची.पण त्यांच्यावर कशाचाही परिणाम नाही झाला.आता नाही नाराज होत.या विषयी एक गोष्ट सांगायला पाहिजे." भारती " पत्रिकेत पुढच्या महिन्यापासून रवि ठाकुरांच्या रचना नियमित प्रकाशित होणार अशी जाहिरात छापून आली होती.याची कोणतीच पूर्व कल्पना ह्यांना दिली नव्हती.जाहिरात छापून आल्यावर कळलं.मग काय?- बसले रवि ठाकुर लिहायला.जेवणखाण सोडून एकटाकी लिहीत राहिले.माझी पंचाईत झाली.या माणसाला खायला कशी घालू?- आधीच सांगितल़य लिहायला बसतोय जेवायला वगैरे बोलवायचं नाही.खाण्यात निष्कारण वेळ खर्च होतो.शिवाय जेवल्यानंतर काम करायची ताकद कमी होते.आळस भरुन झोपायची इच्छा होते.लेखकांनी उपाशीच रहावं असंच रवि ठाकुरांचं म्हणणं असावं.किती दिवस झाले जेवणखाण सोडून लिहीत बसलेत रवि ठाकुर.मला समजत होतं की ते अस्वस्थ होत चाललेत.ते असे एकटाकी अथकपणे लिहीत राहिले की वेगळेच विक्षिप्त दिसू लागतात.असं वाटतं की ते आमचे कुणीही नाहीत.त्यांना आम्ही बोललेलं काहीही कळणार नाही.मी त्यांच्या लेखनाच्या टेबलवर एखाद्या फळाचा रस किंवा सरबताचा ग्लास ठेवते गुपचूप आणि तशीच गुपचूप निघून येते.लेखनकामाठीत ते असताना त्यांच्या बरोबर दिवसचे दिवस बोलणं होत नाही.असं सलग बैठक मारुन त्यांनी ' भारती' प्रकाशनासाठी. एक नाटक पूर्ण केलं.नाटकाचं शीर्षक होतं, " चिरकुमार सभा " किती मजेदार नाटक होतं पण उपाशी पोटी लिहीलेलं.
नाटक पूर्ण करुन ते घेऊन ते कलकत्त्याला गेले.दुसऱ्या दिवशी कळलं जोडासांकोच्या वाडीच्या तिसऱ्या मजल्यावर जाताना चक्कर येऊन ते जिन्यावर पडले.अनेक दिवस उपाशी पोटी लिहील्यामुळे ते खूप अशक्त झाले होते.मग काय मला सगळ्या नातेवाईकांची पत्र यायला सुरुवात झाली.मी त्यांची काळजी नीट घेत नाही अशीच सगळ्यांची तक्रार.मी पण स्पष्ट सांगून टाकलं की तुम्हाला त्यांचा स्वभाव माहित नाही.लिहीत असले आणि जेवायखायचा विषय काढला की ते ऐकणार नाहीत.उलट हट्टाने तसेच उपाशी पोटी लिहीत बसतील.अशक्तपणा मुळे चक्कर येऊन पडलेत.आता कळेल त्यांना.ते सहजासहजी कुणाचं ऐकणार नाहीत.मीही अशी अभागी आहे की कोणत्याही बाबतीत पतीवर हक्क सांगू शकत नाही.पण हां..कधी कधी ते मला भितात सुद्धा.
- आम्ही शांतिनिकेतन मध्येच होतो तेंव्हा बातमी आली की आमच्या जोडिसांकोच्या ठाकुरवाडीतील दोन सफाई सेवकांना प्लेग झाला आहे.त्याचवेळी त्यांचे एक मित्र प्रियनाथ सेन यांनी त्यांना कलकत्त्याला जायला सांगितलं होतं.काही महत्वाचं काम होतं म्हणे.मी म्हटलं-
" कलकत्त्यात आत्ता प्लेग ची साथ आहे.आपल्या दोन कर्मचाऱ्यांना प्लेग झालाय.तुम्ही आत्ता तिकडे जाऊ नका "
तर म्हणाले-
" महत्वाचं काम आहे जावं लागेल."
" जा- कसे जाताय बघतेच मी "
-ते चकित होऊन माझ्याकडे पहातच राहिले.मग त्यांनी मित्राला पत्रात लिहीलं-
" तू मला कलकत्त्याला बोलावलंयस खरं मी सुद्धा तिकडे यायचं ठरवलं होतं पण प्लेगच्या भितीने बायको मला सोडत नाहीय.अशा परिस्थितीत अत्यंत तातडीचं काम काढलं तरी माझी सुटका होईल याची मला किंचितही आशा नाही.खूप प्रयत्न करुन शेवटी शरणागती पत्करली आहे.बराच उशीर झालाय आता जेवायला जावं लागेल..नाही तर तुझा काहीच दोष नसताना तू तिच्या रागाला बळी पडशील."
-कोण म्हणतं रवि ठाकुर आपल्या बायकोला घाबरत नाही?- असंही असेल की ते स्वत:च प्लेगच्या भितीने कलकत्त्याला गेले नसतील.
एका गोष्टीत त्यांचे नि माझे रोज वाद होतात.मग विषय कितीही किरकोळ असूदे पण माझ्या दृष्टीनं त्याचं महत्व असतंच.कधी काळी माझं हे आत्मकथन खरोखरच एखाद्या प्रकाशकाच्या हातात पडलं आणि हे प्रकाशित झालं तर कमीत कमी स्त्रिया तरी माझं दुःख समजून घेतील आणि एवढ्या बाबतीत तरी रविंद्रनाथांना दोषी धरतील.
-
ते संसार करतात संन्याशा सारखा.बाकी विषयात मात्र ते बैरागी नाहीत पण प्रपंच म्हटला की काडीचाही रस घेत नाहीत.संसार म्हटलं की किती तरी गोष्टी लागतात,मी काही फार चैनीच्या किंवा ऐषोरामाच्या गोष्टीं बद्दल नाही म्हणतंय.गरजेच्या गोष्टीं बद्दल सांगतीय.पण या सगळ्याला नसती कटकट समजतात.त्यात माझा संसार म्हणजे भटक्या मंडळींसारखा.आज शांतिनिकेतन तर उद्या कलकत्त्याला.गाझीपुरातच काय तो प्रपंच स्थैर्याचा झाला.त्यानंतर ते मला घेऊन पुन्हा शिलाईदह च्या कोठीवाडीत राहिले.नंतर शांतिनिकतनच्या अतिथीगृहात.बाहेरच्या व्हरांड्यातच किती दिवस झाले स्वयंपाकपाणी करतीय.माझ्या जवळ एका मोड्यावर बसून ते नवनव्या पदार्थांची फरमाइश करतच असतात.स्वयंपाक करुन झाला की म्हणतात कसे-
" बघ अशी तुमची कामं तुम्हालाच शिकवावी लागतात मला "
हे सगळं मी हसून स्विकारते फक्त एकच बाब मला खटकत आलीय.तुमचे रवि ठाकुर प्रापंचिक गरजा ऐकून जेंव्हा आकाश पाताळ एक करतात ना तेंव्हा मला खूप राग येतो त्यांचा.वाटतं या माणसाबरोबर संसार अशक्य आहे.एक जागा सोडून दुसऱ्या जागेवर संसार थाटायचा म्हणजे काय कमी गोष्टी लागतात कां?- मान्य आहे,कधी कधी थोडे जास्त सामान घेते मी.पण हे तर सगळ्याच स्त्रियांच्या स्वभावात असतं.ते कुठेही घेऊन जावोत.पै-पाहुणे तर येणारच ना?- त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तर मलाच बघावी लागणार.मालपुआ आण,मिठाई आण,चिवडा कर,कचोरी कर,पापड-कुरडया कर,फरमाइश चालूच असते.तीही भरपूर पाहिजे कमी पडायला नको असंही म्हणता तर त्याला भांडीकुंडी नकोत?- ती नसतील तर बनवणार कशात?- पण भांडीकुंडी बघितली की झाला थयथयाट सुरु...कोण समजवणार यांना..!! - जेवणखाण,पाहुणचारा विषयीची एक घटना सांगते.त्यावरुन ठाकुरवाडीतली अगदी आतल्या गोष्टी समजतील तुम्हाला.थोडं माझंही कौतुक होईल तुमच्याकडून.
- यांची एक काकू आहे.छोटी काकू.नगेंद्रनाथांची पत्नी, त्रिपुरासुंदरी.ही जोडासांको ठाकुरवाडीचं पाणी सुद्धा पीत नाही.आमच्या घरचं काही खातही नव्हती,असं कां?- कारण त्यांचा असा समज होता की या घरातले लोक तिच्या अन्नात वीष कालवून तिची हत्या करतील. कां करेल कुणी त्यांची हत्या?- बाबा मोशाय त्यांना दरमहा हातखर्च म्हणून हजार रुपये देत होते.छोट्या काकूला भिती अशी कि हे हजार रुपये द्यावे लागू नाही म्हणून बाबा मोशाय त्यांच्या अन्नात वीष घालतील.ते काहीही असो.या छोट्या काकूचं माझ्यावर मात्र प्रेम होतं.एक दिवस माझ्या हाताने मिठाई बनवून त्यांना खायला दिली.छोटी काकू खाणार नाही माहीतच होतं पण मी ठरवलंच होतं कसंही करुन यांना खायला घालायचंच.खूप आढेवेढे घेवून शेवटी खाल्लीच त्यांनी मिठाई.पाणीही प्यायली आणि जिवंत पण राहिली. या नंतर काकूचा माझ्यावरचा विश्वास वाढू लागला.फक्त मी केलेली मिठाईच ती अधूनमधून खाऊ लागली.आता पर्यंत प्रत्येक बाबतीत मी हारलेली आहे, पण इथे मात्र जिंकले मी.हो माझ्या हातचा चिवडा,पुलाव, आंब्याची बर्फी,दह्याचा मालपुआ, खाऊन निटोरचे महाराज जगदींद्रनाथ राय यांनी सुद्धा इतकी स्तुती केली की काही विचारु नका.स्वयंपाक, वेगवेगळे पदार्थ करायचे म्हणजे वाणसामान, भांडीकुंडी लागणारच.त्यामुळे खर्चही वाढणारच.खर्चाच्या बाबती माझे पती कधी-कधी फार कटकट करतात.एक दिवस म्हणाले-
" लिहायला बसलो खाली की रोज तुझं असतंच काहीतरी.तूप पाहिजे,रवा पाहिजे,साखर लागेल,चिवड्याचे पोहे,मैदा पाहिजे, तेंव्हा मिठाई बनणार..व्वा आनंद आहे..! तुझ्यासारखी बायको असल्यावर काय दोन दिवसात सगळं सामान संपणारच. "
मी म्हटलं-
" तुम्हाला प्रपंचातलं काही कळत नाही तर लक्ष कशाला घालता? "
झाऽलं.लगेच गंभीर झाले.दिवसभर बोललेच नाहीत.फार लागलं मनाला.पण हे दु:ख सांगू तरी कुणाला?
-
एक आणखी खंत आहे मनात.मी दिसायला चांगली नाही.पण देवानं जसं दिलंय तसंच असणार न रुप.ते कसं बदलता येईल.माझा राग माझ्या दैवावर आहे.माझे पती इतके देखणे कसे झाले?- त्यांच्या पुढे तर फारच वाईट दिसते मी.नवी नवरी म्हणून आले तेंव्हा ठरवलं होतं की मी छान नटून-थटून राहणार तरच आपल्या नवऱ्या शेजारी उभी राहण्याला पात्र ठरेन मी.एक दिवस अशीच थोडी नटले,रंगरंगोटी करुन खोलीत बसले होते. दोन झुब्बे घातले होते कानात मी. खोलीत आणखीही मुली होत्या.अचानक तुमचे रवि ठाकुर आले.सगळे पहात राहिले.एक लाल शाल पांघरली होती त्यांनी. उफ..! किती सुंदर दिसत होते..!
तुमच्या रवि ठाकुरांनी एकदा माझ्याकडे बघितलं.मी पटकन दोन्ही हातांनी कान झाकले.ते म्हणाले-
" असभ्य देशातले लोक अशी रंगरंगोटी करतात.तू चेहरा रंगवून त्या असभ्य देशातल्या लोकांसारखी काय वागतीयस? "
- त्यानंतर पुन्हा साज-शृंगार नाही केला.नितांत साध्यासुध्या पद्धतीनंच जीवनाची अठ्ठावीस वर्ष काढली.ठिकच आहे म्हणायचं.इच्छा झाली तरी अलंकार घालून मिरवू तरी कसं?-माझा आता एकही अलंकार नाही.
-
माझ्या विख्यात पतीने शांतिनिकेतन विद्यालयाची स्थापना केलीय.मी त्यांची फक्त सहधर्मचारीणी होण्याचा प्रयत्न करते.विद्यार्थ्यांचं जेवणखाण,कपडेलत्ते सगळी जबाबदारी माझी.सगळे आईला,बहिणींना सोडून इथे राह्यला आलेत.त्यांना आईची उणीव भासू नाही.आजारी पडली तर त्यांची सेवाशुश्रूषा करावी.दु:खा-कष्टात आधार द्यावा.एवढेच मी पहात आले.जोडासांकोचा परिवार सोडून शांतिनिकेतन मध्ये येऊन राहणं माझ्यासाठी फार काही सुखाचं नव्हतं.
- विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात,त्यांची सेवा करण्यात मात्र खूप आनंद लाभत होता.मी तुमच्या रवि ठाकुरांच्या विद्यालयाच्या कामात रममाण झाले होते.जेंव्हा जेंव्हा विद्यालयाला पैशाची कमतरता पडली तेंव्हा त्यांनी शब्द काढताच मी माझे दागिने काढून देत राहिले.अलंकार काही कमी नव्हते माझ्या जवळ.सासूबाईंचे अगदी प्राचीन काळातले भारी-भारी दागिने होते.लग्नात हुंड्याच्या रुपानं पण बरेच दागिने मिळाले होते.एकेक करत सगळे विकावे लागले.शांतिनिकेतनचा खर्च चालवायला आता राहिली गळ्यातली चेन आणि बांगड्या.माझे दागिने मी अशा पद्धतीने विकायला तयार झाले म्हणून मला जवळच्या नातेवाईकांची खूप बोलणी खावी लागली.माझ्या नवऱ्याला तर सगळे बेजबाबदार समजत होते.शांतिनिकेतनसाठी आम्हाला दोघांना खूपच खस्ता खाव्या लागल्या.उपहास सहन करावा लागला.खरं म्हणजे अलंकार नाहीत याचं दुःख मला कधीच झालं नाही.माझ्या दागिन्यांचा त्यांच्या कार्यासाठी उपयोग झाला याचा मला खूप आनंद आहे.
- तुमच्या रवि ठाकुरांनी स्थापना केलेले विद्यालय म्हणजे त्यांच्या चैनीची किंवा हौसेची गोष्ट नव्हती.फारा दिवसापासून त्यांच्या मनात शिक्षणाचं एक आदर्श स्वप्न होतं.ते त्यांचं स्वप्न या विद्यालयाच्या स्थापनेमुळे साकारायला सुरुवात झाली होती.त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदासाठी त्यांची पत्नी म्हणून मी हा छोटासा त्याग केला आहे.मला एकच दु:ख आहे की त्यांच्यासाठी मी फार काही करु शकले नाही.त्यांची जीवन-प्रेरणा मी होऊ शकले नाही.
-
बघा..कुठून कुठे पोहोचले.एवढ्या मोठ्या लेखकाची पत्नी आहे पण माझंच मनोगत थोडक्यात लिहीता येत नाहीय मला.काही सूत्र नाही की शिस्तच नाही.- हां..तर मानकचूर जिलबी बनवल्यावर मी रथीला म्हटलं-
" जरा बघ बेटा कशी झालीयष?..
तो म्हणाला -
" खूप मस्त झालीय, एरवी करतेस त्याहूनही छान झालीय.."
- मग धाडस करुन त्यांच्या लेखनाच्या खोलीत पाय टाकला.यांना पुसटशी चाहूल सुद्धा नाही लागली,इतके ध्यानयग्न होऊन लिहीत होते.मी हळूच मानकचूर जिलबीची प्लेट त्यांच्या टेबलवर ठेवली.त्यांनी क्षणभर माझ्या डोळ्यात पाहिलं.मग प्लेटकडे पाहून जिलबी उचलून तोंडात टाकली.त्यांचा चेहराच सांगत होता की त्यांना खूप आवडलीय.मग म्हणाले-
" शेवटी मानकचूर जिलबी जमवलीसच तू "
बस्स..जास्त काही नाही.फक्त एवढंच...मला किती आनंद झाला कुणाला कसं सांगू..!!!
(प्रकरण ५ वे समाप्त)
Comments
Post a Comment