पुनर्लेखन १७

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : लिहीते व्हा..
साहित्यप्रकार : कादंबरी 
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..! 
लेखक : रमेश यशवंत वाकनीस 
प्रसारण दिवस : रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२७ 
भाग१७
-------------------------------------------
आदि मंगल...मध्य मंगल..! 
--------------------------------------------
*
-आता तू म्हणशील कोण हा मार?-कळेल तुला, जरा डोळे मिटून तर घेशील?- खूप वेगवेगळ्या रुपात भेटतो हा मार..! 
-मित्रा, ब्राह्मोमुहूर्तावर नेहमी सारखीच जाग आली उठून कुटी बाहेरच्या तलावातील जलाचे दोनतीन हपके चेहऱ्यावर मारले. चेहरा पुसून कुटी बाहेरच्या कातळावर पद्मासन घालून बसलो. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोमविलोम, भ्रामरी, असे विविध प्राणायाम केले आणि डोळे मिटून स्वस्थ बसलो पण काल पहाटे पडलेले स्वप्न, त्यात भेटलेला तो मार काही केल्या मनातून जाईना..एक सारखे ते स्वप्नदृश्य..तोच मार..तेच माझे संतापजनक उद्गार..प्राणायामामुळे त्याची तीव्रता कमी झाली होती पण मनाला एकच प्रश्न छळत होता की कालच्या स्वप्नाचा अर्थ काय समजायचा?- या आधीही मार मला दिसला होता पण अत्यंत देखणा..मदनाचा पुतळाच जणू.. त्याच्या अवतीभवती  लावण्यवतींचा घोळका होता..त्यातल्या दोघीतिघी तर माझ्या समोर येऊन नृत्य करु लागल्या होत्या..ते पाहून मार हसत होता..ते स्वप्न होतं की भास होता सांगता नाही येणार पण हा अनुभव माझ्या विवाहापूर्वीचा..माझ्या प्रासादा समोरच्या वाटिकेत अशाच एका पहाटे ध्यानाला बसलो असतानाचा..दोन अगदी वेगळी रुपे..आणखीही विविध रुपे असतीलच त्याची पण मला दिसणाऱ्या या विविध स्वप्नाभासांचा अर्थ काय?- बरं, हे स्वप्नाभास मलाच कां होतात?- या मागे काही सुचवायचे असेल कां त्या अज्ञात शक्तीला?- सद्धर्माच्या शोधार्थ मी गृहत्याग केला..देशत्याग केला..काषाय वस्त्रे धारण केली..हातात भिक्षेचा कटोरा घेतला पण..
 -पण..या 'पण' चा अर्थ समजून घे मित्रा..! शाक्य आणि कोलियांच्या युद्धाचा कुठे तरी शेवट नक्की असेल.. पण माझं माझ्याशीच सुरु झालेलं युद्ध?- ते तर लढावंच लागेल..चल घे डोळे मिटून..पहा जरा डोकावून अंतरात तुझ्या..! कधीपासून सुरू झालं हे युद्ध?
*
वप्रमंगल
------------- 
पुत्र जन्माचा नामकरण समारोह म्हणजे चिरंतन स्मरणात राहील असा भव्य-दिव्य न भूतो न भविष्यती असा आनंद सोहळा व्हावा उत्तरभरतभूमीवरील सर्व राज परिवार आमंत्रित करावेत. जन्म दिवसापासून नामकरण दिनापर्यंत महाभोजनाचे पुण्य पदरात पाडून घ्यावे. आपल्या पुत्रासाठी ऋषी-मुनींचे, ब्राह्मणांचे आशीर्वाद मागावेत व धन्य धन्य व्हावे असे स्वप्न पाहिले होते पण, पण ते स्वप्नच राहिले..! राज्ञी मायावतीने बाळाला जन्म देऊन एका सप्ताहातच या जगताचा निरोप घेतला. मायावतीची शेवटची इच्छा म्हणून महाराजांनी तिच्या बहिणीशी गौतमीशी विवाह केला. बाळालाही आई हवीच होती. त्यामुळे नामकरण समारोह पारिवारीक सदस्य व कपिलवस्तूतील मान्यवर नगरश्रेष्ठींच्या समक्ष साधेपणाने झाला. सिद्धार्थ असे नामाभिधान त्याला मिळाले खरे, पण सांभाळ गौतमी करते आहे म्हणून गौतम ही म्हणू लागले..
  त्याच्या बाललीला पहात बोबडे बोल ऐकत सिद्ध सात वर्षाचा कधी झाला कळलेच नाही. याचवेळी महाराजांचे धाकटे बंधू शुक्लोदन यांनाही पुत्र झाला. त्याचे नांव देवदत्त ठेवण्यात आले. माता-पित्यांचा सहवास लाभावा, त्याच्या निरागस लीलांनी प्रासाद नित्य गजबजलेला..हसता खेळता रहावा म्हणूनच की काय शाक्य व कोलियांमध्ये कोणतेही नवे मोठे संघर्ष उभे राहिले नव्हते. किरकोळ कुरापती वगळता बाकी सर्व आलबेल होते. त्यातच आता वप्रमंगल जवळ येऊन ठेपला होता. धनधान्याच्या समृद्धी करीता वर्षाकालापूर्वी हा उत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा होती. एक मास आधीच अवघ्या नगरजनांना या उत्सवाचे वेध लागत..
*
क्रमश: 
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या : ९०९६८००६५३


Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७