पुनर्लेखन १४

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : लिहीते व्हा..
साहित्यप्रकार : कादंबरी 
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..! 
लेखक : रमेश यशवंत वाकनीस
प्रसारण दिवस : रविवार दि.७ फेब्रुवारी २०२७ 
भाग १४ 
--------------------------------------------
आदि मंगल..मध्य मंगल..! 
--------------------------------------------
- नव्या युगाच्या निर्माणाची द्वारे उघडीत..क्षणाक्षणाचे मौन मुखरीत वर्तमान सर्वदूर वाहू लागला..!
*
आदि मंगल..
रात्री शवासनात ध्यान लावा असं म्हटलं आणि गुहेतील कातळावर पाठ टेकवली. अशी गडद गाढ झोप लागली की विचारु नकोस. सुर्याचे पहिले किरण अंगावर पडले, पाखरांचे कूजन कानी पडले आणि जाग आली. गुहेच्या माथ्यावरुन कोसळणाऱ्या प्रपाताखाली उभा राहिलो. यथेच्छ स्नान केले. ओले चिवर पिळून कोरडे अंगावर घातले. रात्रभर ज्या अग्नीने माझे हिंस्त्र श्वापदांपासून रक्षण केले तो अग्नी आता राख पांघरुन अजूनही आतल्या आत जळत होता. त्याकडे एक खिन्न कटाक्ष टाकला. वाटलं की प्रत्येक माणूस असाच आतल्या आत धगधगतो आहे. जळतो आहे.रागानं, संतापानं, द्वेषानं मत्सरानं तडफडतो आहे. संपूर्ण मानव जातीचा इतिहास म्हणजे सूडाने पेटलेले अग्नीकुंडच आहे की काय?- हा इतिहास सौजन्याचा, प्रेमाचा, सौहार्दाचा होईल असे काहीच करु शकणार नाही कां माणूस?- तुला काय वाटते?- एकमेकांशी वैर धरा, युद्ध करा, आणि मिळवा काय तर एखाद्या जमीनचा तुकडा..नदीचं पाणी..!! 
   एक नदी, जी आपले शिवालिक पहाडातले उगमस्थान सोडून कपिलवस्तूतून  वाहत राहते अप्रतिहतपणे..या टापूतून..त्या टापूत..या प्रदेशातून..त्या प्रदेशात..तिला माहीत नसते आपले वाहणे कुठेच थांबणार नाही..कुणीच थांबवू शकणार नाही ..माहीत नसते तिला आपल्या दोन्ही तीरावर माणूस नावाचा प्राणी वस्ती करुन राहू लागलाय.
आपल्याला नांवे दिलीत या माणसाने रोहिणी..घाघरा..राप्ती.. गंगा..भागीरथी, गोदावरी..कृष्ण..कावेरी..नैरंजना...कोणत्या पर्वतावरुन उडी घेत ,फुफांडत..उसळत..खळखळत..वाहत आली माहीत नाही.. माहीत नाही तिला..तिच्या नदी असण्याचे प्रयोजन..कळलंच नाही आमच्या रोहिणीला की आपल्या दोन्ही तीरावर माणूस नांवाच्या निसर्गपुत्रांनी आपापली राज्ये वसवलीयत..एकाच मातीची लेकरं..पण कुणी स्वत:ला शाक्य समजतात तर कुणी कोलिय असण्याचा अभिमान बाळगतात. मुक्तपणे स्वत:च्या मस्तीत वाहणाऱ्या आपल्या तीरावर घाट बांधतात..पाट‌ काढतात.. मनाप्रमाणे वळवतात आपला प्रवाह..आणि मग हक्क सांगतात पाण्यावर..वाटणी करतात आपली..आणखी,आणखी वाटण्या करण्यासाठी बाह्या सरसावतात, तंटे-बखेडे करतात. त्यांना कंटाळून मग जल वापराचे नियम ठरवतात..मैत्रीच्या शपथा घेतात. नीती-नियम ठरवतात.. पुन्हा आपणच ते मोडतात..एकमेकांचे गळे घोटायलाही तयार होतात..काय म्हणावं या माणसाला?- शाहणा की वेडा?-हा आपल्यासारख्याच दुसऱ्या माणसाला वचन देतो.शपथ घेतो आणि सहज विसरुनही जातो..इतके फसवे..इतके तकलादू..असतात कां स्वत:च्याच हृदयातून आलेले शब्द?-- हा माणूस म्हणजे नक्की आहे तरी कोण?- कसा लावायचा याच्या हरघडी बदलणाऱ्या रुपांचा अर्थ?-- कसा घडतो..बिघडतो माणूस?- आणि मित्रा कां पडतात मलाच असले प्रश्न?- कां मलाच शोधावीशी वाटतात त्यांची उत्तरं?- माहीत नाही. पण जाणून घ्यायचंय सगळं..
   नदीत स्नान करुन कंबरभर पाण्यात मी उभा आहे.तीरावर जाऊन पुढच्या यात्रेला निघण्यापूर्वी पोटभर पाणी प्यावं म्हणून दोन्ही हातांची ओंजळ प्रवाहात बुडवून मुखापाशी नेणार तोच एक छोटीशी मासोळी ओंजळीतल्या पाण्यात सुळसुळताना दिसली. बोटांच्या फटीतून पाणी जसं जसं गळू लागलं तसतशी पिटुकली मासोळी तडफडू लागली..काही क्षण तिच्याकडे नुसताच पहात राहिलो..सुळसुळत..तडफडत तिने टुणदिशी उडी मारली..मी हसलो..थोडा कौतुकाने थोडा खिन्नतेने. ओंजळीतच राहिली असती तर तिचं मरण निश्चित होतं. नदीच्या प्रवाहात पडून ती काही अमर होणार होती असं नाही..पण जगण्याची शक्यता होती..चल मित्रा, या नदीला वाहू दे अशीच अप्रतिहतपणे..मला निघायला पाहिजे..जेवढ्या लवकर शाक्य राज्याची सीमा ओलांडता येईल तेवढ्या लवकर मला ओलांडायचीय..!! 
  यात्रेला प्रारंभ केला त्याला आता सहा मास उलटून गेले असतील. परिव्रज्या घेतली.हातात भिक्षेचा कटोरा घेतला खरा पण मित्रा, शाक्य राज्यची सीमा ओलांडे पर्यंत "ॐ भवती भिक्षान्न देही " अशी याचना करायची वेळच आली नाही. ठिकठिकाणी माझ्या स्वागताची जय्यत तयारी करुन नगरबांधव प्रतिक्षा करीत उभेच असायचे. मला प्रेमाने सहानुभूतीने मिष्टान्न खाऊ घालायचे. इतके संकोचल्या सारखे व्हायचे..वैताग यायचा. कुठून राजकुळात जन्म झाला असं वाटायचं. रोहिणी जल वाटपाचा प्रश्न परस्पर सामंजस्याने सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे सांगत तरुणांचे गट पुढे येत होते. मला कपिलवस्तूत परत या असा आग्रह धरत होते. शाक्य संघाच्या कोलियांशी युद्ध करावयाच्या निर्णयाला मी विरोध केल्यमुळेच माझ्यावर परिव्राजक होण्याची वेळ आली आहे अशीच सर्वांची समजूत होती. परंतू माझा युद्ध विरोध हे केवळ एक निमित्त होतं. सत्याच्या शोधार्थ देशत्याग, गृहत्याग करायची उर्मी मला बालपणापासूनच स्वस्थ बसू देत नव्हती. पण ही गोष्ट प्रत्येकाला सांगत बसण्याचे कारण नव्हते. मी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन घेत मौन धारण करुन पुढे चालत राहिलो..
    आता राजगृह नगरीत प्रत्यक्ष पाऊल ठेवले. मित्रा, विधिवत दीक्षा घेतली तेंव्हाच ठरवले होते की या नगरीत साधनेचा प्रारंभ करुन दीर्घकाळ वास्तव्य करायचे. अनेक थोर ऋषी-मुनींनी इथे वास्तव्य करुन आपल्या तपाचरणाने ही नगरी पुनीत केली आहे. पाच टेकड्यांनी गळ्यात गळे गुंफून या नगरीला वेढून टाकले आहे. त्यातल्या पांडव टेकडीच्या पायथ्यास साग, चंदन,बेल,अश्वत्थ, अशा श्रीमंत वृक्षराजांनी दाटी करुन आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. याच ठिकाणी कुटी बांधावी असे योजून मी योग्य स्थानाच्या शोधात चालतो आहे. माझ्या उजव्या हाताला एक छोटा जलाशय सरोवरासारखा शोभतो आहे. त्यातील सूर्यमुखी कमलिनी सांध्यकालीन छाया दाटून आल्यामुळे अंगे आक्रसून अधोवदना युवतींसारख्या बसल्या आहेत. जलाशयाला वळसा घालून पुढे गेलो तर एका अतीप्राचीन वास्तूचे ध्वस्त अवशेष मूक क्रंदन करीत असल्यासारखे भासताहेत. मित्रा, मला वाटते कधी तरी, कुणी तरी, मुमुक्षुंसाठी, पांथस्थांसाठी बांधलेला हा विहार होता, असावा. हो, विहारच हा. नीट लक्षपूर्वक पाहिले तर साऱ्या खुणा पटताहेत. सभोवार काही कलथून पडलेले स्तंभ दिसताहेत..धारातीर्थी योद्ध्यांसारखे..! दगड- मातीच्या ढिगाऱ्यातून कष्टाने मस्तक वर उचलून मानवसमूहाच्या अधोगत इतिहासाविषयी खंत करीत प्रगतीचे वर्तमान ऐकण्यास उत्सुक असलेले पायातील मजबूत प्रशस्त शिलाखंड, माझ्यासारख्या परिव्राजकांना जणू आमंत्रण देत आहेत. " या, बसा..थोडे आमच्या सोबत चार शब्द बोला.." 
   हे ऋषी-मुनींनो, सत्य शोधकांनो, ज्या सत्याच्या दर्शनासाठी आपण आपली आयुष्ये वेचलीत त्या सत्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कोणता याविषयी निश्चित काहीच सांगता येत नाही. पण आपण सारे त्या सत्यात विलीन होऊन महाकालावर नर्तन करीत असाल. एक दिवस माझाही उगवेल. मलाही संबोधी प्राप्त होईल. सत्याचा तो निर्मळ प्रकाश जगताला वाटत मीही फिरेन. सद्धर्माचा मार्गदर्शक होईन. माझेही असंख्य अनुयायी असतील. मी प्रकाशित केलेल्या धर्माच्या साधकांनी आणि त्यांच्यासाठी बांधलेल्या विहारांनी ही पृथ्वी गजबजून जाईल...
" प्रयत्न शून्य आणि फुशारक्या मात्र खंडीभर.." 
*
क्रमश: 
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या : ९०९६८००६५३
   

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७