पुनर्लेखन ११
पिंपरी -चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : लिहीते व्हा..
साहित्यप्रकार : कादंबरी
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..!
लेखक : रमेश यशवंत वाकनीस
प्रसारण दिवस : रविवार ११ जानेवारी २०२७
भाग ११
--------------------------------------------
आदि मंगल..मध्य मंगल..!
-------------------------------------------- - " तेंव्हा महाराज्ञींचे स्वप्न ऐकावे व त्याचा अर्थ, त्या मागील शुभाशुभ संकेत काय असू शकेल ते सांगावे अशी आपणास प्रार्थना आहे.."
*
" महाराज्ञींनी स्वप्न कथनास सुरुवात करावी.."
- लख्खण ब्राह्मणाने असे म्हणताच सुदत्त आणि मंती यांनी सावरुन बसत जीवाचे कान केले. गालावर आलेली एक बट कानामागे सारत मायावतीने स्वप्न कथनास सुरुवात केली..
" सायंकालीन पूजा-विधी यथासांग पार पडल्यानंतर रात्री थोडे दूध प्राशन करुन मी नेहमी सारखीच कुशाच्या शय्येवर निजले होते. काही क्षणातच गडद गाढ निद्रेने माझा कधी ताबा घेतला कळलेच नाही...अचानक कसे कोणजाणे सागाच्या कठीण मंचकावर मी स्वत:ला पहूडलेले पाहिले. स्वच्छ निळ्या आकाशातून पिसासारखे तरंगत तरंगत चतुर्दिकपाल येऊन माझ्या मंचकाच्या चारही बाजूंना उभे राहिले. लोचने उघडून मी त्यांना नीट पाहिलेही नाही तोच त्या चौघांनी माझ्याकडे कटाक्ष टाकून परस्परांकडे मंद स्मित फेकत दोन्ही बाहू उंचावले...आणि अहो आश्चर्यम..! माझ्यासह मंचक व ते चतुर्दिकपाल एखाद्या पक्ष्यासारखे आकाशात विहार करु लागले. हिमालयाच्या माथ्यावर एका शालवृक्षा तळी आम्ही अलगद उतरलो. मला हव्या त्या नेमक्या स्थळी सुरक्षित आणून पोहोचवल्या बद्दल मी धन्यवाद देण्यासाठी हात जोडले तोच ते दिकपाल अदृश्य झाले..मग त्यांच्या स्त्रियांचे, अष्टदिशांचे आगमन झाले...माझी वस्त्रे उतरवून त्यांनी माझ्या सर्वांगाला चंदन उटीचे विलेपन केले...मग सुवासिक जलाचे तुषार माझ्या अंगावर पडू लागले..काही क्षणा नंतर त्या स्त्रियाही अदृश्य झाल्या. उत्तमोत्तम अलंकारांनी, आभूषणांनी नटून- थटून मी कुणा अनामिकाची प्रतिक्षा करीत असल्यासारखी आतुर नजरेने पहात बसून होते तोच तो आला. दोन्ही कर जोडून त्याने मला वंदन केले व म्हटले-
" मी सुमेध, पृथ्वीवरील अंतिम जन्म घेण्याचे मी निश्चित केले आहे. तू माझी माता होशील कां?.."
" माझ्या वत्सल कटाक्षाने मी त्याचे अवघ्राण करुन त्याला होकार देताच सुमेध हसत हसत मेघमंडलात लुप्त झाला आणि क्षणातच एक महाकाय गजराज शुंडेतील कमळ उंचावत माझ्याच दिशेने वेगाने धावत येताना दिसला..भयाने देह-मनाचा थरकाप उडाला..विस्फारलेल्या नेत्रांनी मी पहात राहिले. मला उठून पळून जावेसे वाटत होते पण उठताच येत नव्हते. इतक्यात जणू मला आश्वस्त करण्यासाठी त्या गजराजाने सौम्य उदार रूप धारण केले.. मंचका भोवती तीन प्रदक्षिणा घालून तो अगदी तान्हुले बाळ होऊन माझ्या कुशीत शिरला...डोळे उघडले तेंव्हा मी माझ्या कुशाच्या शय्येवर होते.."
एवढे म्हणून दाटून आलेल्या उमाळ्यांना तिने आसवांची वाट मोकळी करुन दिली व म्हणाली-
" सांगा काय होणार तरी काय आहे माझ्या बाळाचं?- त्याला हे जग बघायचंय. नुसतं बघायचं नाही तर..."
मायावतीदेवींना अश्रू अनावर झाले. त्या पुढे काही बोलू शकणार नाहीत हे लक्षात येऊन तिघेही ब्राह्मण एका सुरात म्हणाले-
" महाराज्ञींनी शांत व्हावं यात चिंता करण्याचं किंवा दु:ख करावं असं काहीच नाही. मार्ग निर्वेध आहे.."
- तिनही ब्राह्मण वेगळ्या शब्दात पण एकच गोष्ट आत्मविश्वासाने सांगत होते-
" राजन, आपल्याला पुत्र प्राप्ती होणार असून हा पुत्र जगाला ललामभूत ठरेल. हा संसारात रमला तर चक्रवर्ती सम्राट होऊन पृथ्वीचे राज्य उपभोगेल. पण हा संसारात रमला नाही, यानं गृहत्याग केला तर मात्र हा धर्म व अध्यात्माच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणेल...याने स्थापित केलेल्या धर्माची पताका त्रिखंडात फडकत राहिल.."
तीनही ब्राह्मण श्रेष्ठांचे हे भाकीत ऐकून शुद्धोदन क्षणभर दिग्मूढ झाल्याप्रमाणे बसून राहिले. त्यांना काय आणि कसं बोलावं ते सुचेना. शुद्धोदनांची मती कुंठित झाली. त्यांनी आपल्या पत्नीकडे एकवार पाहिलं. मायावती नंदिनीने भुर्जपत्रावर लिहून घेतलेल्या तीनही ब्राह्मण श्रेष्ठांच्या भविष्याचे शब्द डोळ्यांमधून हृदयात साठवून घेत होती. तिचा चेहरा शांत व स्वस्थ होता. आपल्याला होणारा पुत्र चक्रवर्ती सम्राट होतो की क्रांतदर्शी तत्वज्ञ होतो याची तिला काळजी नव्हती. उदरातल्या आपल्या बाळाला जीवन मिळणार आहे. जुन्या जगाचा नवीन अनुभव घेण्यासाठी ही पृथ्वी हे आकाश तो पाहणार आहे. एवढे आश्वासन तिला मिळालं होतं. हेच तर तिचं खरं सुख होतं..!
*
क्रमश:
Comments
Post a Comment