पुनर्लेखन १६

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : लिहीते व्हा..
साहित्यप्रकार : कादंबरी 
कादंबरीचे नाव : आदि मंगल..मध्य मंगल...! 
लेखक : रमेश यशवंत वाकनीस 
प्रसारण दिवस : रविवार २१ फेब्रुवारी २०२७ 
भाग १६
--------------------------------------------
आदि मंगल...मध्य मंगल..! 
--------------------------------------------
-  ज्याचा केवळ आवाज ऐकत होतो त्याचे भेसूर रुप समोर आले..
*
   हडबडून गेलो..आदि मानव की दानव?- याचा व आपला संबंध काय?- ठेंगण्या बांध्याच्या त्या सोंगाचे गुंजेसारखे लाल डोळे चमकले. हावरेपणानेजिभल्या चाटत तो माझ्याकडे पाहू लागला.एखादे अजस्त्र अंडे उभे करुन ठेवावे तसा त्याचा देह दिसत होता. डोके दोन्ही बाजूने दबलेले, खडबडीत टेंगळासारखे दिसत होते, पण त्यावर केसांचा पत्ताच नव्हता. नाक अती लहानखुरे पण चपटे होते. त्याखाली आत वळलेली रेघ नीट पाहिली तरच दिसत होती. गाल खोलगट तर कान उंबरा एवढे..त्याचे ओठ मिटून हसणे, मध्येच त्यावर जीभ फिरवणे संतापजनक होते. समोर पाहतो आहे ते सत्य आहे की भास असे वाटून मी तीनतीनदा डोके झटकून, डोळे चोळून, त्याच्याकडे पहात होतो. काही म्हणता काही कळेना. इतक्यात ते विद्रूप ध्यान दोन्ही बाहू पसरुन पुढे होत म्हणाले-
" भिऊ नकोस, मी मित्रच आहे तुझा. चंद्रा इतका रुपवान नसेन पण त्याच्यासारखाच जगन्मित्र आहे.." 
" काय?- तू?- आणि जगन्मित्र?- जरा आरशामध्ये स्वत:चं ओंगळ भिकारडं थोबाड पहा आणि मग माझ्याशी मैत्रीची भाषा कर..! " 
  तो हसला.समजावणीच्या सुरात म्हणाला- 
" आरशात पाहू?- कवण्या आरशात पाहू?- आणि पाहून दिसणार तरी काय कप्पाळ?..तुम्हा माणसांसारखे शारिर अस्तित्व मला कदाचित नसेल..तसे असते तर मला ते इतक्या वर्षात दिसले नसते कां?..असो..! तू म्हणतोस तसे भिकारडे तर भिकारडेच असेल माझे थोबाड..ते पाहू म्हटले तरी मला दिसणार नाही. पण खरेच सांगतो, जीवमात्रांची सतत सोबत मी त्यांच्या जन्मापासूनच करत आलो आहे. फार काय..मृत्यूनंतर सुद्धा जीवांना माझी आणि माझीच साथ लाभत असते. अरे, मानवाचे सोड...पशू..पक्षी..कीटक..जलचरच नाही तर साक्षात देवांनाही माझ्याशिवाय गती नाही...ये, ये मला आलिंगन दे..!..सुखाचा शोध घ्यायला एवढ्या दूर यायची..भिक्षेची झोळी घेऊन फिरायची गरज नव्हती..ऐक माझं, ये मला उराउरी भेट..माझा अनुनय केलास तर सुखाचे अनंत रंग तुला नित्य अनुभवता येतील..ये, ये व्यर्थ वेळ दवडू नकोस..माझ्या बाहूत मिटून जायचाच अवकाश की सुखसागराचे अनंत किनारे तुला दिसू लागतील...ये, ये.."
   ते विद्रूप ध्यान दोन्ही बाहू पसरुन मला आलिंगन द्यायला पुढे..पुढे येऊ लागले..त्याची अत्यंतिक किळस येऊन मी ओरडलो-
" शीऽऽ इतक्या दूर अंतरावरुन सुद्धा तुझ्या अंगाचा सडक्या फळासारखा वास माझ्या नाकातले केस जाळतो आहे..थांब तिथेच. अजिबात येऊ नकोस पुढे.." 
" तो हसत हसत आणखी पुढे येत म्हणाला- 
" मी सोबत असण्याची ही आणखी एक खूण..तुला सडक्या फळासारखा जो गंध येतो आहे ना, तोच सवयीने मोहाच्या फुलांसारखा मधुर भासू लागेल. एक गोष्ट ध्यानी घे, कोणत्याही जीवाला माझ्याशिवाय गती नाही..आज तुला दर्शन झाले ते योगायोगानेच.. पण नेहमीच तुझ्या तुच्छ नजरेला मी दिसेन असे नाही.." 
" तुच्छ तू..! तुच्छ तुझा सारा वंश..! जा नाहीसा हो इथून..!! "
" कसा नाहीसा होऊ?- मला नाहीसे करण्यासाठी तरी एकदा आलिंगन दे...ये असा पुढे..मला मार म्हणतात..मार.." 
   असे म्हणत ते किळसवाणे ध्यान माझ्या जवळ जवळ येऊ लागले. त्याच्याकडे एक जळता कटाक्ष टाकून मी त्याच्या थोबाडावर एक जबरदस्त मुष्टी प्रहार केला. त्यासरशी शांत निश्चल जलाशयात कुणी तरी भलामोठ्ठा धोंडा फेकावा तसा भयंकर ध्वनी झाला. काही कळायच्या आत मागून कुणीतरी लत्ता प्रहार करावा तसा मी तलावाच्या काठावर जाऊन आदळलो. तळापासून ढवळून निघालेली जळातील सारी प्रतिबिंबे एकमेकात मिसळून नाहीशी झाली. पाठोपाठ तेच छद्मी हास्य निनादत पुन्हा ते विरुप डोळ्यासमोर उभे राहिले. त्यासरशी बारा हत्तींचे बळ अंगात संचारल्या प्रमाणे मी बेंबीच्या देठापासून ओरडलो-
" तूच काय..तुझा अख्खा अंश निर्वश करुन टाकेन मी निर्वंश..! "
   मेघगर्जेनेसारखा माझाच महाशब्द आसमंतात घुमत पुन्हा पुन्हा माझ्याच कर्णरंध्रावर आदळू लागला. काही काळ तलावाच्या काठावर मी तसाच पडून राहिलो. तळापासून ढवळून निघालेला जलाशय शांत स्तब्ध झाला...! 
  दचकून उठून, डोळे उघडून सर्वत्र पाहिले तेंव्हा मी माझ्या कुटीत होतो.‌ ते प्राचीन ध्वस्त वास्तूचे कलथून पडलेले खांब..तोज्ञजलाशय..तो...मित्रा, असे होते. जमिनीला पाठ टेकली, तुझ्याशी बोलता बोलत कधी झोप लागली हे कळलेच नाही..मी मार, मार म्हणतात मला, मार..! - मित्रा, स्वप्न पण‌ काय‌ भारी पडतात नाही?- मी मार..,!- आता तू म्हणशील हा मार कोण?- कळेल तुला, जरा डोळे मिटून तर घेशील?- खूप वेगवेगळ्या रुपात भेटतो हा मार..!! 
*
क्रमश:
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या :९०९६८००६५३ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७