पुनर्लेखन १२

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजिज उपक्रम : लिहीते व्हा..
साहित्यप्रकार : कादंबरी 
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..! 
लेखक : रमेश यशवंत वाकनीस 
प्रसारण दिवस : रविवार १८ जानेवारी २०२७
भाग १२ 
-------------------------------------------- आदि मंगल..मध्य मंगल...! 
--------------------------------------------
- जुन्या जगाचा नवीन अनुभव घेण्यासाठी ही पृथ्वी..हे आकाश तो पाहणार आहे..एवढं आश्वासन तिला मिळालं होतं. हेच तर तिचं खरं सुख होतं..! 
*
- म्हणजे माणूस इथपर्यंत येऊन पोहचला कां?- भविष्याचाही वेध घेऊ लागला कां?- कधी काळी माझ्या रौद्र-भीषण रूपाला घाबरुन गुहेत भेदरल्यासारखा लपणारा..नागडा..दुबळा..माणूस इतका पुढे येऊन पोहोचला..!! मला राहून राहून नवल वाटतंय..हे घडलं‌ कसं?- मी कसा आणि केंव्हा अगणित शकलात विखुरला गेलो ते मलाच आठवत नाही. पुढेही किती, कुठे कुठे पसरत जाणार आहे ते मलाही सांगता येत नाही. त्या माझा शोध हा माणूस घेतोय..थक्क व्हायला होतंय..यानं काय निर्माण केलं नाही?- शस्त्रास्त्रांचा शोध लावून, नाना कल्पना लढवून स्वत:चं संरक्षण करायला शिकला..स्वत:ची भाषा..स्वत:ची संस्कूती..धर्म..देवदेवता निर्माण केल्या..शेतीचा शोध लावला..टोळ्या निर्माण करुन माझ्या भूगोलावरचे अनेकानेक प्रदेश ताब्यात घेतले..राज्ये निर्माण केली..नीती-नियम बनवले विविध ज्ञानशाखा शोधून काढल्या..माझ्या अस्तित्वा संबंधी त्याला जे जे प्रश्न पडले त्याची उत्तरे त्याने मिळवली..त्यातून पुन्हा नवीन प्रश्न पडले..गंमतच आहे या माणसाची..आता यातून याची सुटका नाही. कोळी जाळं विणतो आणि स्त:च त्यात अडकून पडतो तसा प्रकार झालाय. अशा परिस्थितीत सुमेध जन्म घेऊन या साऱ्याला कसा सामोरा या विषयी मला प्रचंड उत्सुकता आहे. तुलाही असेल..

*
देवदह
--------- 
" सखे..नंदिनी, मेणा इथेच इथेच थांबवायला सांग.." 
 " इथे? " मेण्याचा पडदा बाजूला करुन नंदिनीनं बाहेर पाहिलं आणि म्हणाली, " राज्ञी, हे लु़बिनी वन आहे.." 
" म्हणूनच तर थांबायला सांगते आहे.."
" नियोजनाप्रमाणे..सर्व घडतेच असं नाही..थांबूयात इथेच. देवदहला माझ्या माता-पित्यांच्या घरापर्यंत आपल्याला जावं लागेल असं वाटत नाही.." 
" खूप त्रास होतोय कां राज्ञी? " 
" खूप नाही पण.." 
 नंदिनीला काळजी वाटू लागली. तिने मेणा थांबवायला सांगितला. महाराज्ञींचा मेणा थांबल्या बरोबर मागून येणारे राजवैद्य, स्थापत्यविद, अन्नधान्य,सामानसुमान असलेले सर्वच गाडे मेणे थांबले. राजवैद्य मेण्यातून उतरुन मायावतींच्या मेण्याकडे चालू लागले. जांभळ्या रंगाचे बारीक काठ असलेला फेटा कानावर घट्ट आवळून बांधलेली त्यांची मुद्रा धीर गंभीर दिसत होती. झपझप पावले टाकताना त्यांच्या कानातील बाळ्या सकाळचे कोवळे किरण पडून चमकत होत्या. गळ्यातील रुद्राक्षमाळ हलत होती. खांद्यावरुन घसरणारे उत्तरीय त्यांनी मागे सारले आणि ते त्यांच्याच प्रतिक्षेत असलेल्या नंदिनीला म्हणाले- 
" निश्चिंत असा.महाराज्ञींची प्रकृती पाहू आणि मगच काय तो निर्णय घेऊ.." 
  नंदिनीने राजवैद्यांसाठी आसन मांडले. त्यावर पद्मासन घालून ते बसले. नाडीवर तीन बोटे हलकेच दाबून त्यांनी डोळे मिटले, ध्यान लावले. क्षणभर त्यांची मुद्रा सचिंत झाली पण मंद स्मित करुन त्यांनी डोळे उघडले. नंदिनी त्यांच्याकडे आतुरतेने पहात होती. तिच्याकडे कटाक्ष टाकून ते स्वत:शीच म्हणाले- 
" फार फार तर अजून एक दिवस..याहून अधिक प्रतिक्षा करावी लागणार नाही..नंदिनीऽ " 
" आज्ञा शिरसावंद्य " 
" सर्व व्यवस्था इथेच करावी लागणार आहे. देवदहला, महाराज्ञींच्या माता-पित्यांनाही कळवावे लागेल. एक दूत कपिलवस्तूसही पाठवावा लागेल..महाराजांनाही हा बदल कळायला हवा..
" हो..वैद्यराज.." 
 हं..हे पहा स्थापत्यविदही आलेच.." 
" चिंता नसावी... महाराज्ञींची आणि सर्व सेवकांची निवासाची व्यवस्था दुपारपर्यंत होईल.." 
राजवैद्य काही बोलणार तोच स्थापत्यविद म्हणाले आणि क्षणाचाही विलंब न लावता ते आपल्या मेण्या भोवती उभ्या असलेल्या सेवकांना सूचना देऊ लागले. बैलगाड्यांवर लादलेले गवताचे भारे..वेत्राचे बांबू उतरविले गेले. बघता बघता काही घटीकातच सूतिकागृह उभे राहिले. गाईच्या शेणाने जमीन सारवण्यात आली. पलंग मांडण्यात आला. त्या भोवती जमिनीवर दासींनी पत्रलेखा चितारल्या. गृहाच्या प्रवेशद्वारावर जात मातृदेवीचे चित्र काढून तिची विधीवत पूजा करण्यात आली. पलंगा समोरच्या भिंतींवर वर्धमान मंगलचिन्ह चितारण्यात आले. गृहा समोरच्या प्रांगणात मनोहारी रंगावली रेखण्यात आल्या. देवदेवतांच्या रेखाकृतीवर कपाशीची फुले ठेवून त्या शोभायमान केल्या गेल्या. याशिवाय राजवैद्य, स्थापत्यविद, यांच्यासाठी स्वतंत्र कुट्या बांधण्यात आल्या. अन्य सेवक व सुरक्षा रक्षकांसाठी राहूट्या उभ्या राहिल्या.भोजमंडप आणि मुदपाकखाना देखील सेवेला सज्ज झाला. 
  यथावकाश देवदहला गेलेला दूत मायावतींच्या धाकट्या भगिनीला- गौतमीला घेऊनच परतला. जवळ जवळ वर्षभरानंतर आपल्या धाकट्या बहिणीला पाहून मायावती देवींचा उर भरुन आला. दास, दासी, सुईणी, वैद्यराज, सगळे दिमतीला असले तरी अशावेळी आपलं रक्ताचं माणूस जवळ असावं कोणत्याही सामान्य स्त्रीला वाटतं तसं मायावतीलाही वाटत होतं. गौतमीलाही आनंदाचं भरतं आलं. दोघी बहिणींनी एकमेकींच्या गळ्यात पडून आनंदाश्रूंना वाट मोकळी करुन दिली.ं
*
क्रमश: 



Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७