पुनर्लेखन १०
पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : लिहीते व्हा..
साहित्यप्रकार : कादंबरी
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..!
लेखक : रमेश यशवंत वाकनीस
प्रसारण दिवस : रविवार दि. ४ जानेवारी २०२७
भाग १०
--------------------------------------------
आदि मंगल.. मध्य मंगल..!
--------------------------------------------
- देवतुल्य ब्रह्मवृंदांचा विजय असो..! महाराज शुद्धोदनांच्या अतिथीगृहात आपले स्वागत असो..!!
*
स्वप्नरमलात पारंगत असलेले ते तीन ब्राह्मण दोन विशेष प्रतिनिधींसमवेत अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारातून आत आले. लिच्छवी, मद्र व कुशिनारा अशा तीन देशखतून आलेल्या या ब्राह्मणांना पाहताच आमात्यांना विनीतभावाने हात जोडले व म्हणाले-
" कृपया आसनस्थ व्हावे. महाराज आणि महाराज्ञी काही क्षणातच उपस्थित होतील.."
-तीनही ब्राह्मण आपापल्या आसनांवर विराजमान झालेले पाहून आमात्य आत निघून गेले. नंदिनीने तबकातून चांदीचा लंबगोलाकृती कुंडा उचलला .एकेका पुढे वाकून तिने त्यांना त्यातल्या मनुकांचा आस्वाद घ्यावा म्हणून विनवले. मग जलकुंभ घेऊन व चांदीचे चषक घेऊन दोन दासी पुढे झाल्या. जलपान करीत, मंद स्मित करीत त्यातल्या दोन ब्रह्मणांनी अतिथीगृहात सर्वत्र दृष्टीक्षैप टाकला. यातला एक ब्राह्मण स्थूल शरीरयष्टीचा होता व मोठ्या दोंदाचा होता. मस्तकावरील काळ्याकुळकुळीत घेरामधून निघालेली त्याची झुपकेदार शेंडी मानेवरती रुळत होती. दोन घनदाट भुवयांच्या मध्ये गाजर उभे करुन ठेवावे तसे त्याचे नाक खालील बाजूस पसरट व लालगुलाबी दिसत होते. डोळे उथळ व मोठे होते. काळ्या लकाकत्या बुबुळांमागील पांढऱ्या पडद्यावर आकाशीची निळी आभा पसरलेली दिसत होती. ओठ जाड व फुटलेले दिसत होते. वरच्या दाताखाली खालचा अधर चावत स्वत:तच मग्न राहण्याची त्याची सवय पाहता क्षणीच लक्षात येत होती. कुशीनारा येथून आलेल्या या ब्राह्मणाचे नांव सुदत्त असे होते. याच्या शेजारच्या आसनावर एक ब्राह्मण बसलेला होता. हा लिच्छवी देशातून आला होता. अर्ध पद्मासन घालून बसलेल्या लख्खणाच्या उजव्या हातात रुद्राक्ष मण्यांची माळ होती.ती ओठातल्या ओठात जपाचे मंत्रोच्चारण करीत होता.गव्हाळ रंगाच्या या ब्राह्मणाला आपल्या गोल चेहऱ्यावरील आवळ्यासारखे नाक वारंवार वर ओढायची सवय होती. नाक वर ओढले की आपले गोल गरगरीत डोळे तो मिटून घेत पुन्हा उघडायचा. तिसरा ब्राह्मण भद्र देशाचा मंती या नांवाने प्रसिद्ध होता. हा वर्णाने चक्क काळाकुळकुळीत होता व कृश शरीर यष्टीचा होता.सुदत्त व लख्खण पेक्षा वयाने थोराड असलेल्या मंतीचा चेहरा उभट होता. त्याच्या विरळ भुवयांमधून निघालेली सरळ नासिका ओठांना भिडू पहात होती. याची मुद्रा करारी पण त्रासिक दिसत होती. तिघांनीही भगव्या रंगाचे रेशमी कद परिधान केले होते. तिघांच्याही खांद्यावर पांढऱ्या शुभ्र उपरण्याची घडी होती.
आमात्य, महाराज व महिराज्ञीं समवेत आल्यासरशी तिघेही ब्राह्मण उठून हात जोडून उभे राहिले. त्यांना वंदन करुन महाराजांनी बसावयाची खूण केली. महाराज्ञी मायावती पुढे होताच सुगंधी जलाने भरलेले सुवर्णकलश घेऊन दासी पुढे झाल्या. मायावती व महाराजांनी क्रमाक्रमाने तिघांचेही पादप्रक्षालन केले. गंध,फुल अक्षता वाहिल्या. नमस्कार करुन दोघे पती-पत्नी चांदीच्या अर्धवर्तुळाकार नक्षीदार आसनावर बसले. महाराज व महाराणींनी शुभ्र रेशमी वस्त्रं परिधान केले होती. शुद्धोदन उंच धिप्पाड शरीरयष्टीचे गौर-गुलाबी अंगकांतीचे होते. दोन धनुष्याकृती भुवयांच्या मध्ये चंदनाचा टिळा त्यांचे कपाळ सुशोभित करीत होता. रापलेल्या राकट चेहऱ्यावर उजव्या डोळ्यांच्या खाली गुंजे एवढी मोस त्यांना आवडत नसली तरी त्यामुळे ते विलक्षण निग्रही व करारी दिसत. उंच धारदार नाकाच्या नाकपुड्या जाड व फुगीर होत्या. ते बोलू लागले की त्या अधिकच फुगीर दिसत असत.ओठांवरच्या भरघोस मिशांमुळे त्यांचा अधर पूर्ण झाकला गेलेला होता. भरदार छातीवर मोत्याचा कंठा त्यांच्या ऐश्वर्याची साक्ष देत होता. राणी मायावतींच्या अंगावर एकही आभूषण नव्हते. तरी देखील त्यांची अंगकांती इतकी तजेलदार होती की बावनकशी सुवर्णाच्या अलंकारांनीही तिचा हेवा करावा. काहीशी ठेंगण्या-ठुसक्या बांध्याची ही राणी कठोर व्रताचरणांमुळे कृश झाली असली तरी तिचे लालचुटुक ओठ व कंचकाळे बोलके डोळे समोरच्या व्यक्तीला अदृश्य धाग्यांनी बांधून ठेवत. लहानखुऱ्या पण नाजुक धारदार नासिकेच्या पाकळ्या शब्दागणिक थरथरु लागल्या की ऐकणाऱ्या जिवाची तृप्ती कशी ती होतच नसे. आले काळेभोर कुरळे केस त्यांनी पाठीवर मोकळे सोडले होते. आतून कितीही अस्वस्थ असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेली प्राजक्त फुलांसारख्या मंद स्मिताची आभा मिटता मिटत नसे.
आपल्या प्रिय पत्नीकडे एकवार प्रेमभरानं पाहून महाराजांनी तीनही ब्रह्मणांना हात जोडून पुन्हा एकदा वंदन केले व म्हणाले-
" हे व्युत्पन्न ब्राह्मण श्रेष्ठांनो, स्वप्नरमलात पारंगत म्हणून असलेली आपली किर्ती ऐकून आम्ही आज आपणास मुद्दाम आमंत्रित केले आहे. आमच्या राज्ञींचा प्रसुती समय निकट येत असतानाच त्यांना जे विचित्र स्वप्न पडले ते ऐकून आम्ही अत्यंत अस्वस्थ आहोत. असे म्हणतात की भविष्यात घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांचे संकेत स्वप्नाद्वारे माणसाला मिळत असतात. आपण स्वप्नरमल शास्त्रात पारंगत आहात तेंव्हा महाराज्ञींचे स्वप्न ऐकावे व त्याचा अर्थ, त्यामागील शुभाशुभ संकेत काय असू शकेल ते सांगावे, अशी आपणास प्रार्थना आहे.."
*
क्रमश:
Comments
Post a Comment