पुनर्लेखन ६

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : लिहीते व्हा..
साहित्यप्रकार : कादंबरी 
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..! 
लेखक : रमेश यशवंत वाकनीस 
प्रसारण दिवस : रविवार दि. ६ डिसेंबर २०२६
भाग ६
--------------------------------------------
आदि मंगल...मध्य मंगल..!
--------------------------------------------
तीन संवत्सरांनतर..
*
डोळ्यावर बांधलेल्या पट्ट्या सोडण्यात आल्या.वीरभद्र आणि शिवभद्र यांनी प्रथम एकमेकांकडे पाहिले. मग ज्या ठिकाणी त्यांना आणून उभे केले होते ते स्थान, समोर बाजेवर बसलेला भवदायू, अवती भवती उभे असलेले सशस्त्र तरुण यांच्याकडे ते डोळे विस्फारून पहात राहिले. आनंद भिती आणि कुतुहल अशा विविध भावनांचे ढग त्यांच्या डोळ्यातून सरकत होते. सभोवारच्या स्तंभांवर जळत असलेल्या पलित्यांच्या ज्वाला त्यांच्या चेहऱ्यांवर नाचत होत्या. त्यांना काय आणि कसं बोलावं तेच समजत नव्हतं. विलक्षण गोंधळून गेले होते ते, त्यांची ती अवस्था पाहून भवदायू हसला.हसत हसतच म्हणाला-
" घाबरु नका या भवदायूच्या राज्यात तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी तुम्हाला जेरबंद करायला शाक्य राज्यातील एकही सैनिक किंवा अधिकारी यायचं धाडस करणार नाही.." 
वीरभद्र आणि शिवभद्रने नकळत हात जोडले. ते कसनुसं हसले पण डोळ्यात भयाचे ढग अजूनही तरंगत होते त्यांच्या. आपल्या हातापायात मणाहणाच्या बेड्या नाहीत याचं त्यांना सुख होत असतानाच आपण आगीतून फुफाट्यखत तर पडलो नाही ना अशा शंकेने ते व्यथित झालेले दिसत होते. भवदायू पुन्हा हसला आणि म्हणाला-
" बोला काय मनात असेल ते बोला.." 
तरीही ते दोघेही गप्पच राहिले. मध्येच बोलण्यासाठी तोंड उघडायचा प्रयत्न करत होते पण ओठ नुसतेच थरथरुन त्यांना ते मिटून घ्यावे लागत होते. भवदायू उठून त्यांच्या निकट आला त्यांच्या डोळ्यात आपले लालभडक डोळे रुतवून पुन्हा विचित्र हसला...हसतच म्हणाला- 
" अरे काहीतरी बोला..घाबरु नका म्हणालो ना मी?- म्हणालो ना घाबरु नका..मग? " 
" हो..म्हणजे..नाही म्णजे आम्ही आम्हाला.." 
वीरभद्रची बोबडी वळलेली पाहून शिवभद्र जागीच थरथरायला लागला. दोघेही इतके घाबरलेले होते की त्यांना बोलायला शब्दच सापडत नव्हते. भलदायूच्या डोळ्यात आणि आवाजात एवढी जरब होती की आता जर बोललो नाही तर जीवच गमवावा लागेल हे त्यांना मनोमन पटलेले दिसत होते.शेवटी वीरभद्र सारी शक्ती एकवटून म्हणाला-
" दायूजी, आमच्या हातापायातल्या मणामणाच्या बेड्या काढून आम्हाला या निबिड जंगलातल्या गुहेत कां आणलं गेलेय माहित नाही..खरं आहे ना शिवभद्रा?- " 
" हो..वीरभद्रा तीन वर्षे शाक्य राज्याच्या कालकोठडीत आसूडाचे फटके खात..मरणयातना भोगत कसे दिवस काढत होतो ते आमचं आम्हाला माहीत.."
 " हो, पण आज आपण मुक्त झालोत. हे केवळ दायूजींचे उपकार..या उपकारांची फेड करण्यातच इथून पुढचे आयुष्य घालवावे आणि धन्य व्हावे असं वाटतंय..तशी संधी मिळावी एवढीच प्रार्थना आहे.."
" अरे वा..! छान बोलता की तुम्ही.." 
असे म्हणत गडगडाटी हसत भवदायू आपल्या बाजेवर जाऊन बसला..त्यांच्याकडे पहात गालातल्या गालात हहसत राहिला...मग एकदम उठून म्हणाला तेवीस होते आता पंचवीस झाले...ही संख्या हळूहळू वाढत राहिल..पण सध्या एवढे पुरे झाले..आता काम जास्त..बोलणं कमी..काय म्हटलं मी? "
" काम जास्त..! " 
" पण काय करायचं ते नाही विचारलंत?.." 
" काहीही सांगा दायूजी.." 
" काहीही सांगू? " 
" हो " 
" हो?..इथे या खांबावर डोकं आपटून जीव द्या.." 
" हं..आपटा डोकं..व्हा रक्तबंबाळ..हं द्या जीव द्या.." 
-वीर आणि शिवा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं मग भवदायूकडे पाहून दोघांनी माना खाली घातल्या. ते पाहून दायू पुन्हा हसायला लागला. हसता हसताच म्हणाला-
" किती बावळट आहात रे तुम्ही?..हा भवदायू जीव द्यायला सांगेल कां?- वेडा आहे कां मी?- हो.वेडाच आहे मी..! मला जीव घ्यायला आवडतो.एकेकाच्या माना मुरगळायला आवडतात मला..तुम्ही पण व्हाल ना माझ्यासारखे वेडे? " 
" नुसते पहात उभे राहू नका..काय सांगतो ते नीट ऐका.." 
असे म्हणून त्याने स्तंभावरचा एक पलिता काढला. त्याच्या नाचणाऱ्या ज्वालांकडे पहात राहिला..मग स्वत:शीच बोलत राहिला..
" सूड..! सूडाग्नी आहे हा..खऱ्याखोट्या गुन्ह्यात अडकवून ज्यांनी फक्त वापर करुन घेतला त्या सत्ताधीशांना, धनदांडग्या नगरश्रेष्ठींना, त्यांच्याच पायाशी बुद्धी गहाण ठेवणाऱ्या ब्राह्मण पुरोहितांना सुखानं जगू देणार नाही हा भवदायू.." 
" पहा, पहा या अग्नीज्वाला..या विझू देऊ नका..आता तुम्ही शाक्य, कोलिय,लिच्छवी,अंग अशा राज्यातले गुन्हेगार नाही आहात. तुम्ही आहात मुक्तीदाता..! 
मुक्तीदाता? -वीरभद्र आणि शिवभद्राने एकदमच विचारले.
" हो.आता हीच तुमची ओळख.सत्ता आणि संपत्ती हेच तुमचे ध्येय..! या उत्तर भरतभूमीवर प्रत्येक दोन राज्यांच्या सीमेवर आग लागलीय. या आगीत आपल्याला फक्त तेल टाकत राह्यचंय..आपलं पहिलं लक्ष्य आहे- शाक्य आणि कोलिय..!! रोहिणी काय यांच्या बापाची आहे?- जलनीती वचननामा जाहीर करतात साले..जगू द्यायचं नाही..जगू द्यायचं नाही या हरामजाद्यांना..!!" 
- रोहिणी जलनीती वचननामा अंमलात आल्याच्या आनंदात मश्गुल असलेल्या शाक्य व कोलिय राजांना कल्पनाही नव्हती की कुठेतरी, कुणीतरी, भय आणि क्रौर्याचे तांडव सुरु केले आहे. या मागे एकटा भवदायू नाही. हा भवदायू  पण कुण्या अज्ञात व्यक्तीच्या हातातले बाहुले असणार असे त्या दोघांच्या मनात आले पण ते दोघेही शांत राहिले. समोर आहे ते वास्तव स्विकारण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते.
*
क्रमश: 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७