पुनर्लेखन १३

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम ; लिहीते व्हा..
साहित्यप्रकार  कादंबरी
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..! 
लेखक : रमेश यशवंत वाकनीस 
प्रसारण दिवस : रविवार २५ जानेवारी २०२७ 
भाग १३
-------------------------------------------
आदि मंगल..मध्य मंगल..! 
--------------------------------------------
- गौतमीलाही आनंदाचं भरतं आलं. दोघी बहिणींनी एकमेकींच्या गळ्यात पडून आनंदाश्रूना वाट मोकळी करुन दिली...!!
*
बाळंतपणासाठी राज्ञी मायावतीला तिच्या माहेरी पाठवताना महाराज शुद्धोदनांनी आवश्यक ती सर्व काळजी घेतली होती पण मनाला स्वस्थता कशी ती नव्हती. आपल्या राज्ञीची प्रसूती निर्विघ्न पणे होईल ना?- ती देवदह पर्यंत सुखरुप पोहोचली असेल ना?- कठोर व्रताचरणांनी आपली प्रिय पत्नी आधीच कृश झाली आहे.. तिला प्रसूतीच्या वेदना सहन होतील ना? - वाटेत काही त्रास तर झाला नसेल ना?- अशा अनेक प्रश्नांनी त्यांचे चित्त भरकटून गेले होते. कशात म्हणून लक्ष लागत नव्हते. यावर उपाय म्हणून आपणच दूत पाठवावा अशा निष्कर्षाप्रत ते येणार इतक्यात राज्ञींच्या प्रसूतीची सर्व तयारी लुंबिनी वनातच केली असल्याचा सांगावा घेऊन राजवैद्यांनी पाठवलेला दूत हजर झाला. महाराजांची काळजी व उत्सुकता अधिकच वाढली पण मायावतीची सख्खी बहिण गौतमी देवदहहून आली असल्याचे कळल्यामुळे काळजीची तीव्रता काही अंशी कमी झाली. राजवैद्यांच्या म्हणण्यानुसार उद्या पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार होती..!! 
*
लुंबिनीवन 
--------------- 
शाक्यकुलपतींच्या पुत्राच्या स्वागताची ही सिद्धता जणू लुंबिनीवनालाही समजली. वृक्षलतांची पाने मंद समीर लहरींवर टाळ्या वाजवू लागली. आम्रतरुंवर कोकीळ गाऊ लागले् त्यासरशी राघू,मैना, हंस, साळुंक्या साऱ्याच पाखरांनी त्यांच्या सुरात सूर मिसळले. मृगांनी तर कमालच केली. मायावती, गौतमीच्या आणि नंदिनीच्या आधाराने विहार करत होती. अगदी निमंत्रण धाडल्यासारखे हे सात-आठ मृग या तिघींच्या भोवती फेर धरुन पाठशिवणीचा खेळ खेळू लागले. भ्रमरांच्या आणि फुलपाखरांच्या गुंजारवाने सारे वन निमिषात डोलू लागले. सुंगधाने ओथंबलेल्या कळ्या फुलून दरवळू लागल्या.. 
- हे सारं पाहून मायावती हरखून गेली व म्हणाली-
" गौतमी, सृष्टीत प्रतिक्षणी घडणारा हा सृजनोत्सव पहायला माझा बाळही आतुर झालेला दिसतो.." 
" काय झालं ताई, काही त्रास तर नाही ना होत? " 
" छे गं..! त्रास कसला.. खूप सुख होतंय..या प्रसव वेदना म्हणजे आनंद तरंग आहेत..जरा माझा हात धरशील? " 
" काय हवंय देवींना?- " नंदिनीने न राहववून विचारलं 
" काही नको..ती फुलांनी गच्च डवरलेली फांदी..बस्स ती तेवढी मला धरु दे.." 
 गौतमी आणि नंदिनीनी मायावतीला पवनावर डोलणाऱ्या त्या फांदी पर्यंत नेलं..गौतमीच्या खांद्यावरचा उजवा हात काढून मायावतीनं ती फांदी धरली. मग नंदिनीच्या खांद्यावरचाही हात काढून त्या फांदीला धरुन ती उभी राहिली. फुलांचा मत्त सुगंध तिने छातीत भरुन घेतला..श्वास तसाच रोखून धरत निळाभोर आकाशवितान डोळ्यात साठवून घेतला. डोळे मिटले आणि म्हणाली-
" गौतमी आज वैशाख पौर्णिमा. छान दिवस निवडलाय लबाडानं. इतके दिवस उदरात मुटकुळे करुन पडून राह्यचा..पण आता, आता ते त्याला अशक्य झालंय. " समजतंय रे छकुल्या मला...थांब..क्षणभरच.." 
  - असे म्हणत तिने पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊन रोखून धरला. दोन्ही गुडघे छातीच्या दिशेने वर उचलले. एव्हाना सुईणींनी येऊन रेशमी वस्त्राचा आडोसा तयार केला होता आणि तो क्षण आला...निसर्गाच्या सहवासात सर्वशक्तीनिशी त्या चिमुकल्याने उदरातला तो अंधार फोडला...त्याच्या पहिल्या ट्यॅंहॅं ने सारा आसमंत दुमदुमून गेला..भुतकाळ मागे टाकून समस्त मानवसमूहाचे उज्वल भविष्य बाळमुठीत घट्ट धरुन नव्या युगाच्या निर्माणाची द्वारे उघडीत..क्षणाक्षणाचे मौन मुखरीत वर्तमान सर्वदूर वाहू लागला..!! 
*
क्रमश: 
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या :९०९६८००६५३ 


Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७