पुनर्लेखन ३
पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : भक्ती- शक्ती लेखमाला
साहित्यप्रकार : कादंबरी
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..!
लेखक : रमेश यशवंत वाकनीस
प्रसारण दिवस : रविवार दि. १५ नोव्हेंबर २०२६
भाग ३रा
--------------------------------------------
आदि मंगल..मध्य मंगल..!
--------------------------------------------
-बघूया काय काय घडतंय..दृश्य मी..द्रष्टा मी..तरीही नाहीच कुठेही..
*
उत्तरभरतभूमीवरील एकमेवाद्वितीय..महासम्राट..महाप्रतापी कोशल नरेश महाराज प्रसेनजित यांचा विजय असो..!
महापराक्रमी, प्रजाहितदक्ष, मगधसम्राट महाराज बिंबिसार यांचा विजय असो..!
-कोलिय आणि कपिलवस्तू नगरीच्या सीमेवरील भव्य पटांगणावर उभारलेल्या महामंडपाच्या प्रवेशद्वारापासून घातलेल्या असंख्य सुवासिक फुलांच्या पायघड्यांवरुन मंद रुबाबदार पावले टाकीत ते दोन्ही राजे सुसज्ज, सुशोभित विशाल व्यासपीठाच्या दिशेने चालत होते. अपार आनंदाने उसळणाऱ्या जनसागराच्या उत्सफूर्त घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमत होता. काही क्षणानंतर जयघोष थांबला आणि सनयी-चौघड्याचे मंगलध्वनी वातावरणात आंदोळू लागले. भरजरी वस्त्रे परिधान केलेल्या, सुवर्णालंकारांनी नखशिखांत नटलेल्या सात सुवासिनी पुढे आल्या. कुंकुमतिलक लावून, गुलाब-पाकळ्यांची उधळण करीत त्यांनी दोन्ही नृपतींचे औक्षण केले. नम्रपणे मान लववून त्या बाजूला झाल्या...
- शाक्य कुलभूषण महाराज शुद्धोदन आणि कोलिय कंठमणी महाराज अंजन दोन्ही हात जोडून सस्मित मुद्रेने त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठावर उभे होते.दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या दोन सुंदर ललनांच्या हातातील चांदीच्या तबकातील गुलाबपुष्पांचे हार शुद्धोदन आणि अंजन यांनी त्या दोन्ही नृपतींच्या गळ्यात घातले.पुन्हा एकदा जयघोष निनादला..!
-महाराज प्रसेनजित आणि बिंबिसार यांच्यासाठी मध्यभागी मांडलेल्या रत्नजडित सिंहासनापर्यंत महामंत्री त्यांना घेऊन आले. दोन्ही राजांनी आसन ग्रहण केले. पाठोपाठ शुद्धोदन व अंजन आपल्या सिंहासनांवर स्थानापन्न झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला. महामंत्री पुढे झाले. दोन्ही हात जोडून त्यांनी मस्तक नमविले. समोर बसलेल्या विराट जनसमुदायाला उद्देशून ते बोलू लागले-
" ॐ तत्सत..! मोठ्या प्रेमाने आणि स्नेहशील अंत:करणाने उपस्थित झालेल्या शाक्य व कोलिय नगरबांधवांचे मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांच्यावतीने तसेच शाक्य व कोलिय संघाचे कुलपती महाराज शुद्धोदन व श्रीमान अंजन यांच्या वतीने मी आजच्या ऐतिहासिक समारंभाचे प्रमुख अतिथी आदरणीय कोशल नरेश महाराज प्रसेनजित , मगधसम्राट महाराज बिंबिसार यांचे हार्दिक स्वागत करतो.."
टाळ्यांचा कडकडाट झाला.पुन्हा दोन्ही नृपतींच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला. मग प्रसन्न मुद्रेने समोर पहात महामंत्री पुन्हा बोलू लागले-
" बंधूंनो, आपल्याला स्मरत असेल दोन वर्षांपूर्वी आपण शाक्य कुलश्रेष्ठ महाराज शुद्धोदन यांचा मंगल परिणय कोलिय कुलपती महाराज अंजन व राज्ञी सुलक्षणादेवी यांच्या लाडक्या कन्या मायावतीदेवींसमवेत संपन्न झाला होता. महामान्य कोशल नरेश महाराज प्रसेनजित यांच्या कृपाछत्राखाली नांदत असलेल्या अंग,कुरु,काशी,पांचल,अवंती,गांधार अशा सर्व छोट्या छोट्या देशाच्या राजांनी त्या प्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्या शुभ घडीला महाराज प्रसेनजित यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले होते की महाराज शुद्धोदन आणि मायावतीदेवी यांचा मंगल परिणय म्हणजे काही फक्त दोन व्यक्तींचा किंवा दोन राज घराण्यांचा नाते संबंधच नाही तर कोलिय आणि शाक्य नगरजनांचाही अतूट असा स्नेहबंध जुळलेला आहे. रोहीणी नदीच्या पाणी वाटपावरुन जे वारंवार तंटे उभे रहात होते त्याला या मंगल परिणयामुळे कायमची मूठमाती मिळेल आणि दोन्ही राज्यांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.."
" उपस्थित सज्जन हो..मला सांगायला अत्यंत हर्ष होत आहे.. की महाराज प्रसेनजित यांचे शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत.ब्रह्मो मूहूर्तापासूनच सुरु झालेल्या शांती यज्ञाची समाप्ती झाली असली तरी यज्ञवेदीत पडलेल्या समीधा व घृताचा सुवास अद्यापही दर्वळतो आहे. आपली सर्वांची मने प्रसन्न ठेवीत आहे. एकशेएक ब्राह्मणांनी गायलेल्या वेदमंत्राचे ध्वनी आणि त्यांचे हात आपणा सर्वांना आशीर्वाद देत आहेत आणि आज एक अभूतपूर्व, ऐतिहासिक असा वचननामा अस्तित्वात येतो आहे..!
"रोहिणी जलनीती वचननामा..!!"
महामंत्र्यांनी अशी घोषणा करताच प्रचंड टाळ्यांनी आणि शिट्ट्यांनी त्या महामंडपात एकच कल्लोळ सुरु झाला. त्याच वेळी
अचानक व्यासपीठावर कोशल नरेशांचा एक दूत महाराज प्रसेनजितांच्या कानात काही वेळ कुजबुजला आणि क्षणात नाहीसा झाला. हे दृश्य पाहून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उभे राहिले.. महाराज प्रसेनजित जरा गंभीर झालेलेही दिसत होते. पण महामंत्र्यांचा गोंधळलेला चेहरा पाहून प्रसेनजितांनी आपली चर्या बदलली. त्यांनी आपला उजवा
हात उंचावून बोलणे सुरुच ठेवा अशी खूण केली. महामंत्री पुन्हा जनसमुदायाकडे पाहून बोलू लागले..
पण शुद्धोदन महाराज प्रचंड अस्वस्थ, आतून धास्तावलेले दिसत होते. काल मध्यरात्री आपला गळा कुणीतरी अजस्त्र केसाळ पंजात आवळतोय असे पाहून ते ओरडत उठले होते. त्यांना दरदरून घाम फुटला होता. मायवतीने त्यांचा घाम पुसला. त्यांचे मस्तक छातीशी घेऊन तिने विचारले-
" काय झालं?- अलिकडे वारंवार असे मध्यरात्रीच ओरडत उठता. असे कोणत्या भयाने तुमचे चित्त ग्रासले आहे?- किती वेळा विचारले पण तुम्ही उत्तर द्यायचे टाळत आलात. सांगा, मन मोकळं करा म्हणजे बरे वाटेल तुम्हाला.."
" काय सांगू?- तुला तर माहीत आहे सारं.."
" काय माहीत आहे?- नीट सांगा बरे..कोड्यात बोलू नका.."
" चार वर्षांपूर्वी आपण केलेलं पाप आठवत नाही तुला?- "
" पाप? "
" हो, हो पापच..प्रसेनजितांनी आमचे धाकटे बंधू अमितोदन यांच्या मृगजाला मागणी घातली होती. पण आपण काय केलं?- राजकुमारी म्हणून एका प्रतिष्ठीत शाक्याच्या दासीपुत्रीचा हात प्रसेनजितांच्या हातात दिला.."
" हो, पण दासीपुत्री वासभखत्तिया एखाद्या राजकुमारीला लाजवेल इतकी सुंदर आहे दिसायला..
" पण शेवटी दासीपुत्री ती दासीपुत्रीच..हे आपलं कपट उघडकीला आलं तर काय होईल याची कल्पना आहे कां तुला? "
" हो, पण आपल्या ईक्ष्वाकु वंशाच्या अस्मितेचा प्रश्न जास्त महत्वाचा होता..शाक्यवंशीय रक्तात दुसऱ्या कुठल्या वंशाच्या रक्ताची भेसळ अगदी सामान्य शाक्य नागरिकानेही खपवून घेतलीच नसती. आपण तर शाक्यांचे सम्राट आहोत "
" सगळं खरं असलं तरी हातून घडलेलं हे दुष्कर्म मला रात्रंदिवस छळतंय त्याचं काय?- सुखाची निद्रा गिळून टाकलीय त्या पापकर्मानं..सतत भिती वाटते.. एक दिवस हे प्रसेनजितांना कळणार आणि शाक्यांचा निर्वंश होणार.."
" काही होत नाही निर्वंश..भित्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, तसं झालंय तुमचं..जायफळ उगाळून दूध देते गरम गरम ते घ्या आणि झोपा..उद्या रोहिणी जलनीती वचननामा समारोह आहे त्याचा विचार करा..आता जे घडून गेलं त्यावर विचार करुन काय उपयोग आहे?- उलट तशीच वेळ आली तर कोशल नरेशांना टक्कर कशी देता येईल त्याचा विचार करा..
आपल्या प्रिय पत्नीचे समजावणीचे बोल आठवून त्यांनी मनातील विचार महत्प्रयासाने दूर सारले.बसल्या जागीच दीर्घ श्वास घेऊन त्यांनी आपले चित्त थाऱ्यावर आणले. वचननामा समारोहातील महामंत्र्यांचे बोलणे ते मन लावून ऐकू लागले..
*
क्रमश :
© रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या : ९०९६८००६५३
*
Comments
Post a Comment