पुनर्लेखन ९
पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : लिहीते व्हा..
साहित्यप्रकार: कादंबरी
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..!
लेखक : रमेश यशवंत वाकनीस
प्रसारण दिवस : रविवार
-------------------------------------------- *
निळ्या संगमरवरात बांधलेल्या अतिभव्य अशा राजप्रासादा मधील महाराज शुद्धोदन व महाराज्ञी मायावती यांच्या विश्राम महालाला जोडूनच उभे असलेलेले अतिथीगृह आज आम्रपर्ण व झेंडूच्या फुलमाळांनी मंडित झालेले दिसत होते. अतिथीगृहात उघडणाऱ्या रत्नजडित स्तंभावरील कमानीपासून जमिनीपर्यंत गुलाबी झिरमिरीत रेशमी पडदा मंद समीर झुळकांनी झुलत होता.या कमानीच्या बरोब्बर समोर अतिथीगृहाचे विशाल प्रवेशद्वार होते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही स्तंभांवर दोन सिंहमुखे कोरलेली होती.त्यांच्या विस्कटून उभ्या राहिलेल्या आयाळी इतक्या खऱ्या वाटत होत्या की पाहणाऱ्याला त्यांना स्पर्श करुन बघण्याचा मोह आवरला नसता. गडद तांबड्या पाषाणात बांधलेल्या या अष्टकोनी वास्तूच्या भिंतींवर स्वागतातुर नर्तिकांची शिल्पे अशा खुबीने कोरली होती की स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा खेळवणारी ती गवाक्षे आहेत हे प्रथम दर्शनी कुणाच्या लक्षातच येणार नाही. प्रवेशद्वारा बाहेर उभे असलेले प्रहरी हातात भाले धरुन भल्या पहाटेपासूनच विनम्र भावाने अतिथींची प्रतिक्षा करत होते. त्यांच्या लाल फेट्यांवरील सोनेरी पट्टे आता प्रात:काळचे किरण पडून चमकू लागले होते. गुबऱ्या गालांचे व काळ्याभोर गलमिशांचे हे तरुण शिपाईगडी चपट्या गोल नाकांचे असले तरी त्यांची जांभळासारखी काळीकंच बुबुळे कुणाचेही लक्ष वेधून घेतील अशीच होती.
अतिथीगृहाच्या मध्यभागी चांदीचे अर्धवर्तुळाकार नक्षीदार आसन होते.त. त्याच्या दोन्ही बाजूंस अतिशय लोभस दिसणारी राजहंसाची विनम्र मुखे होती. विश्राम महालातून अमात्य झिरमिरीत गुलाबी पडदा बाजूला सारुन लगबगीनं आत आले. अंगभर रेशमी वस्त्रातूनही पुष्ट नितंब आणि उन्नत उरोजांचे उभार उठून दिसत असलेल्या दोन दासी अतिथींसाठी मांडलेल्या शिसवीच्या प्रशस्त चौरंगांवर काळपट लाल रंगाचे, जरीची वेलबुट्टी असलेले गालीचे घालण्यात मग्न होत्या. त्यांच्याकडे एक ओझरता कटाक्ष टाकून आमात्य प्रवेशद्वाराबाहेर येऊन उभे राहिले. मान उंचावून डोळ्यांवर उजव्या हाताची सावली धरुन त्यांनी दूरवर नजर फेकली. मग रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या वाटिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या पूष्करिणीवर विसावणाऱ्या उन्हाकडे पाहिले व सुटकेचा निःश्वास टाकला. आमंत्रित केलेल्या तीन ब्राह्मणश्रेष्ठांना घेऊन येणारे तीन मेणे हळूहळू याच दिशेने येत होते. " चला, मुख्य काळजी मिटली.." असे मनात येऊन त्यांची चर्या प्रसन्न झाली. क्षणभरच..काही लक्षात येऊन झटकन त्यांनी मागे वळून पाहिले. महाराज्ञी मायावतींची खास मर्जीतली दासी नंदिनी गंधाक्षता व गुलाबपुष्पांनी भरलेले मोठे तबक घेऊन एका दासी बरोबर आली. या दासीच्या डोईवर एक व दोन हातात दोन चांदीची नाजुक, नक्षीदार घंगाळी होती. पाठोपाठ दोन दासी गुलाबपाण्याने भरलेले तीन सुवर्णकलश घेऊन नंदिनीच्या आदेशाची वाट पहात उभ्या राहिल्या. सर्व कामे बिनबोभाट होताहेत हे पाहून आमात्य सुखावले. तीनही चौरंगा भोवती माना वेळावत एकमेकांचा पाठलाग करणाऱ्या मोरांची रंगाकृती बघून तर त्यांचे डोळे चमकले आणि अगदी सहजच त्यांच्या मुखातून "वाह.." असा उद्गार बाहेर पडला. ते पाहून नंदिनीनं सस्मितमुद्रेनं आमात्यांना वंदन केलं आणि म्हणाली-
" मान्यवर, आमात्य अतिथींच्या स्वागताची व पाद्यपूजेची सर्व तयारी झालेली आपण पाहताच आहात. आता महाराजांना व महाराज्ञींना पाचारण करण्यास कोणतीच अडचण नाही. आपली आज्ञा असेल तर..."
" नको. मी जातीने जाऊन त्यांना घेऊन येतो. तोपर्यंत तू त्या तिनही ब्राह्मणश्रेष्ठांना आसनस्थ व्हायला सांग.."
कानातील बाळ्यांपर्यंत भिडणाऱ्या आपल्या रुपेरी मिशांवरुन मूठ फिरवत ते झपझप आत निघून गेले. नंदिनी पहात होती.अतिथीगृहा बाहेरील प्रांगणातील उंच चौथऱ्यांवर मेणे ठेवले जात होते. त्यातून एकेक ब्राह्मणश्रेष्ठ उतरत होते. नंदिनी पुढे होऊन दोन्ही हात जोडून म्हणाली-
" देवतुल्य ब्रह्मवृंदांचा विजय असो...महाराज शुद्धोदन यांच्या अतिथीगृहात आपलं स्वागत असो.."
*
क्रमश:
Comments
Post a Comment