पुनर्लेखन ४
पिंपरी-चिंचवड साहित्य मंच
विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : भक्ती-शक्ती लेखमाला
साहित्यप्रकार : कादंबरी
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..!
लेखक : रमेश यशवंत वाकनीस
प्रसारण दिवस : रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२६
भाग : ४
-------------------------------------------
आदि मंगल..मध्य मंगल..!
४
--------------------------------------------
- बसल्या जागीच दीर्घ श्वास घेऊन त्यांनी आपले चित्त थाऱ्यावर आणले.महामंत्र्यांचे बोलणे ते मन लावून ऐकू लागले..
*
" तर प्रिय नगरजन हो, एकशेएक ब्राह्मणांनी गायलेल्या वेदमंत्राचे ध्वनी आणि त्यांचे हात आपणा सर्वांस आशीर्वाद देत आहेत आणि आज एक अभूतपूर्व असा वचननामा अस्तित्वात येतो आहे- "
"रोहिणी जलनीती वचननामा.."
-महामंत्यांनी असे म्हणताच उपस्थित जनसमूहाने टाळ्या वाजवून तो महामंडप दणाणून टाकला. समुदाय शांत झाल्यावर महामंत्र्यांनी बोलायला सुरुवात केली-
" बंधु-भगिनींनो, रोहिणी नदीच्या पाण्यावर आपण शाक्य व कोलिय नगरजन जगतो आहोत.जगणार आहोत. आपल्यासारखे कितीतरी जीव हीच्या अंगाखांद्यावर खेळले..वाढले..याच रोहिणीच्या जलावर आपण धान्यधुन्य पिकवले..फळबागा फुलवल्या..नानाविध रंगांच्या आणि सुवासिक फुलांच्या बागा फुलवल्या..चाफा..आवळा..कडूनिंब..बेल..बकुळ..वड..पिंपळ..नारळी..पोफळी..आपटा.. अशा देववृक्षांनी कपिलवस्तू आणि कोलिय नगरी गजबजून गेलेली दिसते...ती केवळ रोहिणीमातेच्या जलामुळे..म्हणूनच वैदिक ऋषी-मुनीनी जलाला अमृत संबोधले आहे..जल हेच जीवन म्हटले आहे. नित्यनव्या होत अप्रतिहत वाहणाऱ्या सरीतांना आपण वेदकालापासून मातेचा मान दिला तो म्हणूनच..! बंधूंनो निसर्गाच्या या धनावर सर्व प्राणीमात्रांचा सारखाच अधिकार आहे. ही गोष्ट आपण एकीकडे मान्य करतो..पण कृती मात्र नेमकी उलटी करतो...बंधूंनो, भूतकाळात जे तंटे-बखेडे झाले..ते विसरुन भविष्यात दोन राज्यातील नगरजन गुण्यागोविंदाने नांदतील असे काहीतरी आपण निश्चित करु शकतो. याच विश्वासाने रोहिणी जलनीती वचननाम्याची कल्पना शुद्धोदन महाराजांनी मांडली, कोलिय कुलपतींनी ती आनंदाने उचलून धरली आणि दोन राज्यातील अनुभवी जलव्यवस्थापन तज्ञ अधिकाऱ्यांनी दोन्ही राज्यातील कृषीक्षेत्रांची पाहणी केली.ओढे तलाव व विहीरींची मोजणी केली, दरडोई किती जलाची आवश्यकता आहे याचा आढावा घेतला आणि पूर्ण अभ्यासांती वचननाम्याचा अंतिम मसुदा तयार केला आहे. वचननाम्यातील नियम व अटी दोन्ही राज्याच्या नृपतींनी मान्य केल्या असून..दोन्ही राज्यातील नागरीकांनाही त्या मान्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. आता आज आपण सर्वजण वचननाम्यातील नियम व अटींचे पालन करणार असल्याची शपथ घेऊन एकमेकांना आश्वस्त करणार आहोत. आजच्या या ऐतिहासिक समारोहाचे सन्माननीय अतिथी महासम्राट कोशल नरेश यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर ठेवलेल्या भुर्जपत्रांवरील वचननाम्यातील नियम व अटींचे अभिवाचन करावे. महाराज शुद्धोदन, राजे अंजन व समस्त कोलिय व शाक्य नगरजन विनम्रभावे त्याचे अनुसरण करतील. आदरणीय कोशल नरेश यांच्या मुखातून येणारे शब्द प्रथम महामान्य शुद्धोदन व अंजन उच्चारु लागले..त्यांच्या पाठोपाठ समस्त जनसमुदाय धीरगंभीर स्वरात बोलू लागला-
-आम्ही शाक्य व कोलिय नगरजन एकमेकांचे मित्र आहोत व चिरकाल मित्रच राहू असे अंत: करणपूर्वक परस्परांना वचन देतो.
- रोहिणी जलनीती वचननामा त्यातील नियम व अटी यांचे आम्ही कधीही उल्लंघन करणार नाही.
-उभय राज्यांनी नियुक्त केलेल्या संयुक्त जलव्यवस्थापन समितीने अधिकृत म्हणून जाहीर केलेले पाट, तलाव, विहीरी, आम्हास माहित आहेत व त्या जलसाठ्यांचा अवैध वापर आम्ही कधीही करणार नाही.
- शेतीसाठी वळवलेल्या अधिकृत पाटांचेच जल आम्ही वापरु व संयुक्त जलव्यवस्थापन समितीच्या अनुमती शिवाय नवीन पाट निर्माण करणार नाही व नवीन विहीरी खोदणार नाही.
- वर्षाकाल उत्तम असेल तेंव्हा सदर अधिकृत पाट आम्ही बंद ठेवू व जलाचा अपव्य टाळू..
- जल वापरा बाबत कोणतीही समस्या भविष्यात उत्पन्न झाल्यास आम्ही ती संयुक्त जलव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सोडवू..
-अधिकृत पाटांची, विहीरींची व तलावांची देखभाल करणे, दुरुस्ती करणे नवीन जलसाठे निर्माण करणे याचे अधिकार संयुक्त जलव्यवस्थापन समितीचे असून समितीच्या अनुमती शिवाय कोणत्याही शाक्य अथवा कोलिय नागरीकाला,अधिकाऱ्यांना, वा नागरीकांच्या गटाला त्याबाबत निर्णय घेण्याचा अथवा कृती करण्याचा अधिकार नाही याची आम्हास जाणीव आहे व राहील..
-आम्ही शाक्य व कोलिय नागरीक एकमेकांचे मित्र आहोत व चिरकाल मित्रच राहू असे एकमेकांना वचन देतो.
- आमच्या मैत्रित कुणीही बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो परस्परांच्या विश्वासाच्या व सौहार्दाच्या जोरावर हाणून पाडू अशी रोहिणीमातेची शपथ घेऊन परस्परांना आश्वस्त करीत आहोत.."
कोशल नरेश थांबले.सर्वत्र शांतता पसरली. भूर्जपत्रावरील सुलिखित कराराच्या खालील डाव्या-उजव्या बाजूला महाराज शुद्धोदन व अंजन यांनी आपापल्या राजमुद्रा उमटविल्या.पुन्हा एकदा तो महामंडप टाळ्यांच्या कडकडात न्हाऊन निघाला. महामंत्र्यांनी पुढे येऊन कोशल नरेश यांना चार शब्द बोलण्याची विनंती केली. कोशल नरेशांनी आपले उथळ मोठे डोळे गरगरा सर्वत्र फिरवले. मगध नृपती बिंबिसारांकडे त्यांनी एक कटाक्ष टाकला तेंव्हा ते आपल्याकडे पाहून कुत्सितपणे हसताहेत कि काय असे त्यांना क्षणभर वाटून गेले. पण त्याकडे दूर्लक्ष करीत ते म्हणाले-
- " माझ्या कोलिय व शाक्य नगरवासियांनो.. रोहिणी जलनीती वचननाम्यावर जाहीररीत्या साक्षीदार म्हणून नाममुद्रा उमटविण्यासाठी मला आमंत्रित करुन जो बहूमान दिलात त्याबद्दल उभय कुलपतींचे मी मन:पूर्वक आभार मानतो. आजचा दिवस हा खरोखरच सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा अभूतपूर्व आहे. दोन राज्यातील प्रजाजन आपापसातील मतभेद, जुने हेवेदावे, शत्रुत्व विसरुन एकत्र येतात.ज्या रोहिणीमातेच्या जलावरुन आजपर्यं सतत संघर्ष होत आले ते भविष्यात कधीही होऊ नयेत म्हणून एक जलनीती ठरवतात तिचे पालन करण्याची प्रतिज्ञा करतात ही गोष्टच मुळी अलौकिक आहे.अशा अलौकिक आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले याचा अगदी मनापासून आनंद व्यक्त करतो. रोहिणी जलनीतीचा वचननामा अतिशय आदर्श आहे. आता उक्ती आणि कृती मधील अंतर फिटून " सर्वेपि सुखिन: संतु , सर्वे संतु निरामय: | सर्वे भद्राणी पश्यंतु , मा कश्चित दु:खभाग भवेत | " या वेद ऋचेतील महास्वप्न प्रत्यक्ष साकार झालेले पाहायला आपल्या सर्वांना मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. उत्तर भरतभूमीवरील सर्वात मोठ्या बलाढ्य राज्याचा नृपती म्हणून मी शाक्य आणि कोलिय राजांना असे आश्वासन देतो की भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्येच्या सोडवणूकीसाठी मग ती समस्या राज्यांतर्गत विकासासंबंधी असो, सीमा सुरक्षेच्या संबंधात असो, किंवा व्यापार-उदीमा संदर्भात असो आमच्या मदतीची गरज लागली तर आमचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडे आहेत. युद्ध करुन नवनवे प्रदेश पादाक्रांत करीत राज्यविस्तार करण्यापेक्षा परस्पर सौहार्द व प्रेमाने जग जिंकण्यावर आमचा अधिक विश्वास आहे. म्हणूनच रोहिणी जलनीती वचननाम्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. रोहिणी नदीच्या घाटांच्या दुरुस्तीसाठी, व नवीन पाटांच्या निर्मितीसाठी संयुक्त जल व्यवस्थापन समितीला एक लाख सुवर्णमुद्रांची मदत जाहीर करतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होतो...बोला शाक्य-कोलिय मैत्रिचा विजय असो..!
हजारो कंठ निनादले...ढोलांवर थाप पडली ताशे कडाडू लागले..अबालवृद्धांची पावले जमीन सोडून थिरकू लागली..रंग उधळले गेले..साऱ्यांची थोबाडे तर रंगलीच पण अवघे आकाश सप्तरंगात न्हाऊन निघाले. संध्याराणीची सोनेरी आभा त्यात मिसळून गेली आणि एक स्वप्नस्थ झळाळ धरित्रीवर उतरु लागला.. आसवांचे कुंभ फुटले..यज्ञात बळी दिलेल्या शेकडो गायी-म्हशींचे मांस मोठमोठ्या चुलाण्यांवर रटरट शिजू लागले. उदराग्नी प्रदीप्त होऊन मुला-माणसांचे पाय आपोआप भोजमंडपाकडे वळू लागले. एकूण काय, महामंत्र्यांना आमंत्रित अतिथींची बडदास्त नीट ठेवली जातेय की नाही हे पाहण्याशिवाय दुसरे कामच राहिले नाही. बेहोषीत आकंठ बुडून गेलेल्या या समारोहाच्या स्थानापासून दूर वेशीबाहेर असलेल्या उकिरड्यावर कुत्र्यां बरोबरच काही पोटे खपाटीला मिळालेली माणसं जमा झालेली दिसत होती.भोजमंडपा बाहेर उष्ट्या पत्रावळी कधी भिरकावल्या जातायत आणि त्यावर आपल्याला कधी तुटून पडायला मिळेल अशी आशा त्यांच्या डोळ्यात दाटून आली होती..तोंडातून गळणारी लाळ आपल्या जिभांनी पुसत ती आशाळभूते ताठकळत उभी राहिली होती..!
क्रमश:
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या : ९०९६८००६५३
Comments
Post a Comment