उपक्रम पुनर्लेखन२

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच 
विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : भक्त-शक्ती लेखमाला  
साहित्य प्रकार : कादंबरी 
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..!
लेखक : रमेश यशवंत वाकनीस
प्रसारण दिवस : रविवार दि. ८ नोव्हेंबर २०२६ 
--------------------------------------------
आदि मंगल...मध्य मंगल..!
भाग २ 
--------------------------------------------
" नीघ आता इथून पुढे मागे वळून बघण्याचे तुला कारण नाही. शुभास्ते पंथान: संतु.."
२
अशा रितीने शास्त्रशुद्ध दीक्षा घेऊन परिव्राजक झालो.
यात्रेस प्रारंभ झाला. माझ्यावर अलोट प्रीती करणारे माता-पिता, प्राणप्रिय गोपा, बाळ राहुल, आजे,काके, बंधुभगिनी, माझा सखा छंद, लाडका अश्व कंटक, ती रम्य नगरी कपिलवस्तू, सारे सारे मागे पडले..आता मी अगदी एकटाच आहे असं मनात येतं ना येतं तोच मागून आवाज आला-
" एकटाच आहेस?- मग मला घे की सोबत.. " 
वळून पाहिले तर मागची पायवाट दाट झाडीत लुप्त झाली होती. 
" कोण बोललं?"  
मी थांबलो होतो..पदरव कानावर पडत होते पण माणूस कुणीच दिसत नव्हतं.
" परिव्राजकानं मागे वळून बघायचं नसतं.." 
एक हास्याची लकेर शांत वातावरणावर तरंग उठवून क्षणातच लुप्त झाली.मी पुन्हा चालू लागताच कानात आवाज आला-
" कळलं कां? "
 अचानक माझ्या डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक असे दोन साधु माझ्याकडे बघत उभे राहिलेले दिसले..
" कळलं "
मी पटकन बोलून गेलो खरा पण त्यावर " कळलं पण वळलं नाही " असे म्हणत ते दोन्ही साधू दोन दिशांना हसत हसत गर्द दाट झाडीत नाहीसे झाले.स्वत:लाच चिमटा काढून मी खात्री करुन घेतली की क्षणभरापूर्वी जे पाहिलं तो भास नव्हता.निदान माझ्या पुरता तरी. हो, खरोखरीच दोन साधू दोन दिशांना जाताना मी पाहिले होते.त्यातला एक मुंडण केलेला होता तर दुसरा जटा,दाढी राखलेला होता.
ते म्हणत होते ते खरंच होतं,
परिव्राजक होणं म्हणजे काय ते मला कळलं होतं पण वळलं नव्हतं. नाही तरी मुनीवर भारद्वाज म्हणालेच होते, परिव्रज्येचा दीक्षा विधी हा प्रतिकात्मक असतो. होमात चार समिधा पडल्या म्हणजे रज आणि तमाचे ताप संपले, आपण साधु झालो असे नाही.यज्ञोपवीत तोडलं, स्वत:चं श्राद्ध केलं  म्हणजे या देहाची राख झाली आणि संसारत्याग झाला, आपला नवीन जन्म झाला असं तर अजिबातच नाही. परिव्रज्या दीक्षा विधीचा प्रतिकात्मक अर्थ समजून घेऊन अखंड ध्यान- साधनेत रत होता आले पाहिजे. माय-तातां पासून सुरु झालेल्या नातेसंबधांच्या आठवणी मनात रुंजी घालताहेत तोवर काषाय वस्त्र अंगावर चढवून रानोमाळ भटकण्याला काहीच अर्थ नाही. नुसतं शरीरानं  दूर झालो म्हणून नाती तुटली असे नाही. म्हणजे भौतिकदृष्ट्या तुटली असे दिसले तरी मानसिक स्तरावर ती साद घालतच राहणार ना?-समजा सगळी नाती मनातून हद्दपार झाली तरी ज्यांनी मला जन्म दिला,माझे पालन-पोषण केले, जीवन जगण्यासाठी आवश्यक असे शिक्षण दिले त्या  साऱ्या गुरुतुल्य माणसांच्याप्रती माझे काही कर्तव्य बाकी राहतेच ना?- त्या कर्तव्याला जागल्याशिवाय शांतता कशी लाभेल मनाला? - मान्य, प्रेम-वात्सल्यासारखी काही ऋण फेडता येत नाहीत. पण ती वाहता येतात ना?- जेवढे प्रेम-वात्सल्य आपल्याला मिळाले तेवढे प्रेम आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक जीवाला लाभेल असे नको कां वागायला आपण? - नाही, कर्तव्यच्यूत होऊन मोक्ष किंवा ब्रह्मानंद अजिबात मिळवायचा नाही मला. आता असा एक मार्ग शोधायचा आहे ज्या मार्गाने प्रामाणिक प्रयत्न केल्यास माणसाला दुसऱ्या कुणालाही न दुखवता भौतिक सुख प्राप्त होईल आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी, मोक्षाचा अधिकारी होण्यासाठी तो पात्र होईल. हे ध्येय साध्य करण्यासाठी आधी मला माझ्यातूनच एक परिव्राजक, एक आदर्श माणूस घडवावा लागेल, जन्माला घालावा लागेल. तरच या काषाय वस्त्राची प्रतिष्ठा राखली जाईल. हस्त नक्षत्रात मध्ये गजराजाच्या प्रतिमे भोवती मुली फेर धरुन गातात तसे असंख्य प्रश्न माझ्या मनात  भोवती फेर धरुन नाचतायत. या प्रत्येक प्रश्नाचे स्वरुप समजून घेतले पाहिजे. त्यांच्या मुळाशी जाऊन उत्तरे शोधली पाहिजेत.हे पहिले काम. यासाठी ज्या मनात हे विचार किंवा प्रश्न उभे राहतायत ते मन म्हणजे काय? दिक्षा विधी संपन्न झाल्यानंतर मुनीवरांनी -  " "अहं ब्रह्मास्मी " या बृहदारण्यक उपनिषदातील महावाक्याचा  आपल्या कानात उच्चार केला. 'मी ब्रह्म आहे' म्हणजे काय?- मांडुक्योपनिषदात " अयमात्मा ब्रह्म " असे महावाक्य आहे यातला ' आत्मा ' म्हणजे काय?- तो दिसत नाही. मन?- मन सुद्धा  दिसत नाही पण मन आहे असं वाटतं. आत्माही दिसत नाही पण खरंच आहे कां असा प्नश्न पडतो. ज्या मनात हे सगळे येते आहे त्या मनाचाच शोध घेतला, मन म्हणजे काय?- हेच समजून घेतले तर आत्मा म्हणजे काय, तो आहे कां, हेही समजू शकेल..चालेल, ठरलं, याच दिशेने प्रयास करायचे. युद्ध करुन रोहिणी नदीच्या पाणी वाटपाचा प्रश्न सुटणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन आपण शाक्यसंघाच्या जबाबदारीतून मुक्त झालो पण मनाने मनाशीच पुकारलेल्या युद्धाला सामोरे जाऊन ते जिंकण्याचे दायित्व आता आपले आहे. यात विजयी झालो तरच आपण जनसामान्यांना मार्ग दाखवू शकू. तेंव्हा आता या एकाच हेतूसाठी उभे आयुष्य पणाला लावायचे हे निश्चित. ज्या वेगात मी पायाखलची वाट तुडवत होतो त्याच्या शतपटींनी मनातल्या विचारांचा वेग होता. कधी ते भूतकाळातल्या कडू-गोड आठवणीत घेऊन जायचे तर कधी भविष्यातील सुख-स्वप्नांचे, मनोरथांचे प्रासाद बांधायचे..!    
माझ्या प्रमाणेच कौंडिण्य, वप्प, महानाम, भद्दीय, या माझ्या मित्रांनी सुद्धा दीक्षा घेऊन यात्रेस प्रारंभ केला होता. पण कोणी कोणत्या दिशेने जायचे, कोणत्या गुरु कडून अध्यात्मिक साधना शिकायची याचा निर्णय प्रत्येकाने स्वतंत्रपणे घ्यायचा होता. एकट्यानेच यात्रा करायची होती. आधी शाक्य राज्याची सीमा ओलांडून मला राजगृह नगरीत जायचे आहे.तिथे काही दिवस वास्तव्य करुन मग ओनामा नदी ओलांडून मला आलारकालामांच्या आश्रमात पोहोचायचे आहे. माणूस कोणत्या गावापासून निघाला आणि कोणत्या गावी पोहोचला हे समजणं फारसं महत्वाचं नसतं.तो कसा पोहोचला याचं ज्ञान होणं महत्वाचं असतं.म्हणूनच ही माझी नुसतीच जीवनयात्रा नाही तर अंतर्यात्रा आहे.जी सुरु व्हायला एवढे जन्म जावे लागले. चालली आहे यात्रा पाय पुढे पडताहेत.अजून तो नाद वातावरणात आंदोळतोच आहे-
खळदंग..खदळंग..खळदंग..खदळंग..खदळंग..खदळंग..खळदंग..खदळंग..
*
- मोठ्ठी जांभयी आली तर त्यातून सुमेध बाहेर पडला. म्हणाला- 
" या सूक्ष्म देहात आता मन रमत नाही.एकदाच जन्म घेऊन ही पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची भानगडच संपवावी असं वाटतंय " मला कौतुक वाटलं त्याचं.जन्म घेण्याआधीच जीवनाचा हेतू त्याच्या दृष्टी पुढे स्पष्ट आहे. नाही तर इथे...पापणी लवायच्या आत किती जीव जन्म घेतात आणि मरतात..म्हणजे माझ्याकडेच परत येतात..मोजदाद नाही..खेळ चाललाय पहात राह्यचं...गालातल्या गालात हसत राह्यचं. सुमेध विषयी आस्था कितीही वाटली तरी त्याला झुकतं माप वगैरे द्यावं असं वाटलं तरी ते अशक्य असतं. कुठे गुंतलोच नाही कधी. सृजन- विसर्जनाच्या खेळात सतत नवीन काहीतरी घडत असतं. जुनं मोडून पडत असतं. परत नवीन काहीतरी घडत असतं. थांब म्हटल्यानं काही थांबणार नाही. पण सुमेध, सुमेध इथे कां थांबलाय?...याचा अर्थ त्याचं काम फत्ते होणार..बघूया काय काय घडतंय..दृश्य मी..द्रष्टा मी..तरीही नाहीच कुठेही..!!!
क्रमश: 
*
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या:९०९६८००६५३ 



Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७