उपक्रम पुनर्लेखन १

पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम: भक्ती-शक्ती लेखमाला 
साहित्यप्रकार : कादंबरी
कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..!
लेखक : रमेश यशवंत वाकनीस 
प्रसारण दिवस : रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६
भाग १ ला 
--------------------------------------------
आदि मंगल...मध्य मंगल..!
--------------------------------------------
०
हे महासिद्धा..
मला संबोधि प्राप्त होईल 
अशी एखादी कथा सांगून 
उपकृत करशील काय?
...
त्या शून्यागारात मुमुक्षुचा 
तो आवाज दीर्घकाळ घुमत राहिला..
पाठोपाठ तेथील प्रगाढ शांततेला 
भेदत आणखी आवाज घुमू लागला..
डोळे मिट पहा आणि ऐक..ऐक..
...
खळदंग खदळंग खळदंग खदळंग
खदळंग खदळंग खळदंग खळदंग...
बैलाच्या घुंगरांचा आवाज येतोय दूर वरुन..! प्रवाळ, पाचू ,रत्न, माणके, तैल, घृत, मध, औषधी वनस्पती, धान्यधुन्य..गाडे खचाखच भरुन जाताहेत या देशातून त्या देशात...श्रीमंत उद्यमी नगरश्रेष्ठींचं एक बरं असतं. जगात कुठेही आणि कितीही उलथापालथ होऊ देत, यांच्या जीवनात काहीही फरक पडत नाही. राज्य दुष्टांचं असो की सुष्टांचं..मनुष्याला जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोळा करायच्या..गरजवंत माणसांना पुरवायच्या. या कष्टाचं वाजवी किंवा वाजवीपेक्षा अधिक धन वसूल करायचं आणि निघायचं पोट पाठीला बांधून... पोटासाठी कष्ट करा, पोटासाठी मिळवा आणि पोटासाठीच खर्च करा..पोटासाठीच जगा हा एकच कानमंत्र त्यांना ठाऊक. सकाळपासून रात्रीपर्यंत हा एकच ध्यास. बैल कसे, गाडा कितीही खचाखच भरलेला असला तरी निमूटपणे ओढत राहतात..ओढतच राहतात..धनी जे पुढ्यात‌ टाकेल ते पोटात ढकलायचं..रवंथ करीत बसायचं..सकाळी पुन्हा गाडा ओढायला तय्यार..खाली मान घालून विनातक्रार चालत राह्यचं. चालत राह्यचं.. ज्या गाड्याला जुंपलंय त्या गाड्यात काय काय भरलंय याच्याशी कर्तव्य असतं ते माणसांना या मुक्या जीवांना त्याच्याशी काहीही घेणंदेणं नसतं. धनी थांबेल तिथे मुक्काम आणि चालवेल तितकी यात्रा..अजून, अजून येतोच आहे आवाज..खळदंग खळदंग..खदळंग..खदळंग..खळदंग..खदळंग..बैल चालताहेत चाकेही त्यांचा अनुकार करताहेत..
*
    माय-तातांची, गोपाची अनुमती घेऊन ब्राह्मोमुहूर्तावर उठून, बाळ राहुलचे निरागस मुखकमल एकदाच डोळ्यात भरुन घेतले आणि साधा सुती पोषाख अंगावर चढवून मी राज-प्रासाद सोडला. मुनीवर भारद्वाजांच्या कुटीवर सूर्याचे पहिले कोवळे किरण झळाळत असताना मी पोहोचलो. मुनीवर माझी प्रतिक्षा करत कुटी बाहेरील प्रांगणात एका शीलाखंडावर पद्मासनात बसले होते. त्यांच्या उजव्या बाजूला एक व्याघ्र उभा होता आणि ते त्याच्या मस्तकावरुन, गळ्यावरुन मायेने हात फिरवत होते. मांडीवर एका मृगाचे पाडस अंगाचे मुटकुळे करुन निवांत डोळे मिटून बसले होते. मला पाहताच मुनीवरांनी माझे प्रसन्न मुद्रेने स्वागत केले व म्हणाले- 
" स्वागत आहे तुझे. वत्सा, केवळ त्रिकालज्ञ असितमुनींनी अनुमती दिली म्हणून तुला परिव्रज्येची दिक्षा देण्यास मी तयार झालो.." 
" म्हणजे? "
" म्हणजे असे की शास्त्राप्रमाणे परिव्रज्या घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीची आधी चार संवत्सरे परिक्षा घ्यावी लागते. दिक्षार्थ्याची वैराग्य पूर्ण जीवन जगण्याची मानसिक तयारी झाली आहे याची खात्री झाल्यानंतरच परिव्रज्येचा दिक्षा विधी करायचा असतो. पण तू त्याला अपवाद ठरलास..
" आपली आणि त्रिकालज्ञ असितमुनींची कृपा.." 
- मी बोलून गेलो खरा पण मनात आलं, खरंच असितमुनी त्रिकालज्ञ आहेत कां?- भूत भविष्य आणि वर्तमानातलं त्यांना सर्व खरोखरच दिसतं कां? असितमुनींप्रमाणे आपणही त्रिकालज्ञ होऊ शकू कां? - गुरुवर भारद्वाज मुनींच्या पायाशी व्याघ्रासारखा  हिंस्त्र पशू कसा निवांतपणे बसतो?..असे माझ्या मनात उभे राहिले. 
इतक्यात आपले पाय प्रेमाने चाटणाऱ्या व्याघ्राकडे पहात मुनीवर म्हणाले-
" परिवर्तन एका दिवसात नाही होत. साधना पथावर दृढ श्रद्धेने पावलं पडायला लागली की आपसूकच असे अनुभव येतात..
-त्या व्याघ्राच्या गळ्यावर हात फिरवून त्यांनी त्याच्या मस्तकावर प्रेमाने थापटलं आणि म्हणाले-
 " बरं, परिव्रज्येच्या दिक्षा विधीची सर्व तयारी झाली आहे. नदी तीरावरावरील कप्पकाकडून मुंडण व श्मश्रू करुन घे आणि मग स्नान करुन ये तोवर दोन ब्राह्मण विरजा होमाची तयारी करताहेत ती पूर्ण होईल.." 
" होय गुरुदेव.."
  मुनीवरांच्या आज्ञेनुसार मी मुंडण व श्मश्रू करुन घेतली व रोहिणी नदीत स्नान केले. अंग पुसले मग एका किडकिडीत ब्राह्मणाने दिलेले काषाय वस्त्र परिधान केले. शरीरशुद्धी नंतर आत्मश्राद्धाचा विधी संपन्न झाला मग विरजा होमात माझे राजवस्त्र, यज्ञोपवीत, माय-तात, पत्नी, पुत्र,यांच्याशी असलेले नाते सर्वकाही भस्म  झाले..! - पण म्हणजे नक्की काय झाले?- पोषाख बदलला पण या काषाय वस्त्रातला माणूस बदलला कां?- स्वत:च्याच प्रश्नात बुडून गेलेल्या मला भानावर आणत मुनीवर म्हणाले-
" वत्सा, परिव्रज्येचा हा दिक्षा विधी प्रतिकात्मक आहे. शाक्य व कोलियां मध्ये युद्ध होईल किंवा होणार नाही. पण आता खरे तुझे तुझ्याशीच युद्ध सुरु झाले आहे.." 
-त्यांचे हे उद्गार ऐकून मी झटकन त्यांच्या पायावर डोके ठेवले.. -माझ्या दोन्ही खांद्यांना धरुन मुनीवर भारद्वाज यांनी मला उठविले.आपले तेजस्वी नेत्र माझ्या नेत्रात ठेवत ते गहिवरुन म्हणाले-
" सिद्धार्थ, लक्षावधीत एखाद्यालाच असे साहस शक्य होते. शास्त्रापेक्षा शस्त्राकडे, ज्ञानापेक्षा धनाकडे आणि सत्कर्मापेक्षा दुष्कर्माकडेच अधिक ओढा असलेल्या मनुष्यसमूहात सत्यान्वेषी माणसाच्या वाट्याला जे एकाकीपण येते तेच त्याचे खरे सामर्थ्य असते, हे ध्यानी असू देत.सर्वसंग परित्याग करुन सद्धर्माच्या शोधार्थ प्रस्थान ठेवतो आहेस तू. तुझ्यासारखे धीरवीर पुरुषच जगाला मार्ग दाखवू शकतात. तुझ्या यात्रेचा हा आदि मंगल..मध्य मंगल..आणि अंत देखील मंगलच ठरेल..." 
   मुनीवरांचं हे वाक्य कानी पडताच माझ्या ओठांवर स्मित झळकलं. ते काही बोलणार तोच मी म्हटलं-
" गुरुवर,अगदी सहज ओठावर उमललेल्या या स्मिताने आपल्या वत्सल वाणीचा ओघ खंडित झाला त्या बद्दल क्षमस्व. माझ्या जिवणीवर सदोदीतच विलसणारे हे स्मित, माझ्या जन्मदात्रीकडून मला महाप्रसाद म्हणून प्राप्त झाले आहे. कधी कधी ते जरुरीपेक्षा अधिक फाकते, उठून दिसते.. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. माझ्या यात्रेचा अंत कसा होईल याची मला पर्वा नाही. आपल्या कृपाशीर्वादाने यात्रेचा प्रारंभ माझ्याकडून होतोय, हीच गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे. या प्रसंगी मला इतकाच आशीर्वाद द्या की, सत्यशोधाच्या या मार्गावर प्रत्येक कठीण आणि कसोटीच्या क्षणी माझा सदसद्विवेक माझी साथ कधीही सोडणार नाही.माझ्या ध्येयापासून माझे मन कधीही विचलीत होणार नाही.." 
   मुनीवरांनी मला प्रेमाभराने आलिंगन दिले आणि माझ्या भाळाचे चुंबन घेऊन ते म्हणाले-
" हे शाक्य कुलभूषणा, तुला बुद्धत्व प्राप्त होणार आणि साऱ्या जगाला तू सद्धर्माचा मार्ग दाखवशील अशी त्रिकालज्ञ असितमुनींची भविष्यवाणी आहे ती कदापिही मिथ्थ्या ठरणार नाही. ध्येय प्राप्तीसाठी‌ भगिरथ प्रयत्नांची कास धरणारा सुपुत्रच असा आशीर्वाद मागू शकतो. तुझ्या मनासारखे होईल. माझे तुला अंत: करणपूर्वक आशीर्वाद आहेत.नीघ आता..इथून पुढे तुला मागे वळून बघण्याचे कारण नाही. शुभास्ते पंथान: संन्तू.." 
क्रमश:-
©रमेश यशवंत वाकनीस 
भटकबोल्या: ९०९६८००६५३ 


Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७