भाच्चा रमेश. मित्र रमेश. गुरु रमेश.
माझी रमेशशी पहिली ओळख आक्कानी "हा तुझा मामा बरका" अशी करुन दिली. त्यावेळी ते नव्या पेठेत वर्धमान भवनमध्ये रहात होते. त्यावेळी दिवाळी सुट्टीत आम्ही नात्यापुत्याहून आलो होतो. मग नंतर नेहमीच आम्ही सवड मिळाली की एकमेकाकडे येत असू. रमेश आठवीत होता त्या वेळेस अंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत त्याला १ ले बक्षीस मिळाले.ते भाषण आकाशवाणीवर प्रसारीत झाले. त्याच्या सांस्कृतिक धडपडीचा पहिला धडा ह्या त्याच्या नभोवाणी कार्यक्रमानी त्याला दिला. मग त्याची बालनाट्यात चळवळ सुरु झाली. पुढे त्यानी एका बालनाट्याची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. "भस्मासुर"त्याचं नाव. त्याच्या ह्या स्थित्यंतराच्या काळात मी त्याच्या नेहमीच सोबत असे. त्या काळी डेक्कनवर फिरायला जाण्याची फॅशन होती. एकदा डेक्कन वर बसस्थानका शेजारी दुकाना बाहेर पाच रुपयाची नोट रमेशला सापडली. त्या पाच रुपयांवर आम्ही आठवडाभर यथेच्छ चैन केली. ही बातमी आक्काला कशी समजली कोण जाणे. त्या मूळे आम्हाला जबरदस्त ओरडा खावा लागला. असेच एकदा माझ्या मुंजीत सगळी भाच्चे कंपनी नात्यापुत्यात आमचे घरी जमलेली. आम्ही सगळे जांभळं वर उडवून तोंडात झेलून खात होतो. आणि अचानक कसं कुणास ठावूक रमेशच्या गळ्यात जांभूळ जाऊन अडकलं. तो डोळे पांढरे करायला लागला. ते बघून आई गर्भगळित झाली. सगळी मंडळी घाबरली. पलीकडच्या ओसरीवर ईब्राहीम गुरुजी पेपर वाचीत होते. ते तातडीने लांब ढांग टाकून आले. त्यानी अडकलेले जांभूळ नरड्यात हात घालून आत ढकलले. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. रमेशचा त्यावेळी पुनर्जन्म झाला. ईब्राहीम गुरुजी देवासारखे धावून आले.
आमची दोघांची मैत्री अशीच ऊत्तरोत्तर वाढत राह्यली. मी थोडं बहूत लिहीलय किंवा लिहीतो. त्याला रमेशचं प्रोत्साहनच कारणीभूत आहे. त्याचं काय झालं. आम्ही नाटक, सिनेमाला बरोबरच जात असू. असेच एकदा आम्ही "सामना" सिनेमाला गेलेलो. मास्तर ची लागूंची भूमिका मनावर जाम ठसली. आम्ही लगेच पून्हा दूसरा शो बघीतला. मास्तरची भूमिका परत मनात साठवली. रमेश म्हणाला. त्या मास्तरवर तू कथा लिही. कुणी नाही छापली तर आपण छापू. त्यातूनच "छांदसी" मासिकाचा जन्म झाला. "छांदसी" च्या पहिल्या अंकात ती कथा छापली. पण दुर्दैवाने तो अंक गहाळ झाला. नंतर 91,92 पर्यंत "छांदसी" चालू होते. पण पुढे आर्थिक गणित न जमल्या ने अंक बंद झाला. मात्र माझी कथा लिहीण्याची उमेद वाढली. थोड्या बहुत कथा लिहून झाल्या. म्हणून मी रमेशला माझ्या कथा प्रांताचा "गुरु" मानतो.
त्याला पंच्याहत्तराव्या जन्मदिनानिमित्त अनेक अनेक हार्दिक शुभेच्छां.
चंद्रकांत पांडूरंग सहस्रबुध्दे
31.07.2026.
9922937327.
Comments
Post a Comment