पाॅडकास्ट

प्रकट मुलाखत 
--------------------
१प्रश्न : सर्व प्रथम...आयुष्याकडे
उत्तर : 
-मोहाच्या नव्या क्षणाला 
मी जिवंत इतुका होतो 
जगणारा हजार वर्षे 
लाजेने मोडुन पडतो..
२प्रश्न : तुमचं नांव घेतलं लोकांना   कवी..नाटककार..दिग्दर्शक अशा अनेक ओळखी आठवतात पण रमेश वाकनीस स्वत:ला कोणत्या एका शब्दात ओळख करुन देतील? 
उत्तर : सहृदय व स्वत:शी प्रामाणिक माणूस 
प्रश्न : लहानपणीचं घर.. आई वडील.. वातावरण..त्या काळातल्या कोणत्या आठवणी अजूनही मनात जिवंत आहेत? 
उत्तर : खूप म्हणजे खूपच आठवणी आहेत.आम्ही टिळकरोड न्यू इंग्लीश स्कूलच्या मागे वर्धमान भवन या वाड्यात रहात होतो.माझं ६ वी पर्यंतचं शिक्षण तिथेच झालं.लपंडाव,डबाऐसपैस,वगैरे खेळ इथे चालायचे. चौथीत असताना एक दिवस काही तरी कारणावरुन माझ्या मित्रानी मला मारलं मी रडतरडत घरी गेलो वडील म्हणाले-
" त्यानी मारलं तर तुझे हात काय केळी खायला गेले होते कां? "
आई म्हणाली," हा सुद्धा काही कमी नाहीय.यानंच खोडी काढली उगाच कोण कशाला मारेल? " 
या दोन वाक्यांनी माझ्यावर महत्वाचा संस्कार घडवला.दुसऱ्याच्या दोषांकडे एक बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात याचं भान ठेवावं आणि आपली चूक नसेल,अन्याय होत असेल तर त्या विरोधात उभं रहावं.या प्रसंगानंतर मित्रां बरोबर खेळण्यापेक्षा मला वेड लागलं ते गणपतीच्या मूर्ती कशा घडवतात ते पहात राहण्याचं.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुढे एक दुकान होतं तिथे जून उजाडला की गणपती घडवण्याचं काम सुरु व्हायचं.शाळा सुटली की मी तिथे जाऊन शाडू मातीचे गणपती कसे बनवतायत,कसे रंगवतायत ते तास न् तास पहात बसायचा.घरी आलो की अंगणातल्या कुंड्यांमधली चिकणमाती काढून गणपती बनवण्याचा माझा रोजचा उद्योग सुरु व्हायचा.गणपती तयार झाला की आईला दाखवायचा.आई म्हणायची त्याची पूजा कर शेजारच्या विहीरीत विसर्जन कर तसाच ठेवू नाही.पुढे अथर्वशीर्षाचा काव्यानुवाद माझ्या हातून व्हायचा होता म्हणून ही नित्य पूजा साधना घडत होती. पण वडीलांना माझ्या या मातीत खेळण्यावर उपाय सापडला आणि माझी रवानगी शिवाजी मंदिर शाखेत झाली. सहावी पर्यंत मी शाखेत जात होतो. शाखेत मला नवीन मित्र भेटला प्रदीप त्याचं नांव.याला एक पूर्ण पांगळा आणि मतीमंद भाऊ होता.त्याला दर गुरुवारी एका महाराजांकडे घेऊन जायचं काम प्रदीपकडे असायचं.मी पण त्याच्या बरोबर कधी कधी जायचो.ही गोष्ट ६ वीतली तेंव्हापासून प्रदीपचा भाऊ अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करत माझ्या मनात सदैव राहिला.अशी माणसं जन्माला घालणारा तो देव कसा असेल?-देव खरोखरच आहे का?
प्रश्न : पुणे.. ग्वाल्हेर ,फलटण, मुंबई, विशाखापट्टण इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाच्या निमित्ताने फिरणं झालं.या बदलत्या शहरांनी तुमच्यात काय बदल घडवले?
उत्तर : हो जरा कुठे शाखेत रमतोय प्रदीप सारखे मित्र होतायत तोच वडीलांची ग्वाल्हेरला बदली झाली.ग्वाल्हेरला पार्वतीबाई गोखले विद्यालयात ७ वीत प्रवेश घेतला.या शाळेतल्या गॅदरींगला 'बरं आहे मंडळी' या एकांकिकेत मी प्रथमच काम केलं.सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं बक्षीस मला राज्यपाल पाटसकरांच्या हस्ते मिळालं.खरं म्हणजे अभिनय म्हणजे मी नक्की काय केलं हे सांगता येणार नाही.पण शिक्षकांनी मित्रांनी, आई-वडीलांनी चिक्कार कौतुक केलं..नाटक म्हणजे काहीतरी भन्नाट गोष्ट आहे हे तिथे कळालं. ग्वाल्हेरचं घर, शाळा,मित्र सगळं मला खूप आवडलं होतं पण  पुन्हा वडीलांची बदली झाली.पुन्हा पुण्यात आलो.विद्या महामंडल प्रशाला म्हणजे आजच्या आपटे विद्यालयात ८ व्या यत्तेत प्रवेश घेतला.इथे नाट्यवाचन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,गॅदरींगच्या नाटकातून काम अशी चिक्कार धमाल केली.अवांतर वाचनाचे महत्व, सिलॅबसच्या पलिकडचं शिक्षण पुस्तकं आणि अनुभवांमुळेच मिळू शकतं याचा साक्षात्कार याच शाळेत झाला.पण मॅट्रीकला फार्म परिक्षेत नापास झाल्यामुळे माझी रवानगी फलटणला माझ्या मामाकडे झाली.त्याचे इंग्लीश गणिताचे क्लासेस होते.मुधोजी हायस्कूल मधून मॅट्रीक झालो.पुन्हा पुणे मुंबई विशाखापट्टण असा शिक्षणाच्या निमित्ताने फिरलो. पण या सगळ्या भ्रमंतीत माझा औपचारिक शिक्षणावरचा विश्वासघ उडाला.मग ठरवलं  अभ्यास करायचा पण परिक्षेत पास व्हायचंच नाही. बदलती शहरं बदलत्या शाळा मला बदलांना सामोरे जायला शिकवत होत्या.जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत याचा प्रत्यय देत होत्या.याच बरोबर या जगात कायमस्वरुपी टिकाऊ, शाश्वत, असं काहीही नसतं आणि असेल  तर ते काय?- असा प्रश्न पडला.थोडक्यात काय आपुलाची वाद आपणासी सुरु झाला आणि मनात कुठेतरी  काव्य-साहित्याचा जन्माचे बीजारोपण झाले..
भाग२-५(साहित्याचा जन्म) 
प्रश्न : पहिली कविता लिहीण्याची वेळ आठवते कां?
- कविता एक- दोन लिहील्या होत्या पण सिरीयसली घ्यावं असं काहीच त्यात नव्हतं.पण नववीत असताना एक कथा लिहीली तिने  मला थक्क करुन सोडलं.कारण ती एकटाकी कुठेही न थांबता लिहून झाली आणि शेवट हादरवून टाकणारा झाला. एका परित्यक्तेच्या प्रेमात पडलेल्या तरुणाला शेवटी कळतं की जिच्या बरोबर संसार थाटायची स्वप्नं बघितली ती आपली आई आहे.ही कथा वडीलांना दाखवली ती वाचून ते म्हणाले तांत्रिक चूक सोडली तर कथा छान जमलीय
 तू वि.वि.बोकीलांना भेट ते तुला गाईड करतील.वि.वि.बोकील म्हणजे जुन्या पिढीतले मोठे लेखक.असे वडील मिळाले हे माझे भाग्य.दुसरे एखादे असते तर कानाखालीच मारली असती.ती कथा कालौघात कुठेतरी हरवली पण त्या कथेने माझ्यातल्या सृजनशक्तीशी ओळख करुन दिली.ती ओळख माझ्या सोबत आहे. किंग इडीपस हे ग्रीक शोकात्मिक नाटक खूप नंतर वाचनात आलं.
उत्तर :  हो..सुचतात खरी.पण सगळ्यांनाच ती आवडतात असं नाही.माझ्या पहिल्या कविता संग्रहाचं शीर्षक ' डाॅग शो आणि इतर कविता ' असं होतं पण ते नंतर बदलावं लागलं.
प्रश्न : कां बरं?
उत्तर : कारण त्या संग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालं होतं.तज्ञज समितीतल्या कवीवर्यांनी शीर्षक बदलायची अट घातली..
प्रश्न : कां?
उत्तर : मराठी कविता संग्रहाचं नांव मराठीच असावं असं त्यांचं म्हणणं होतं.अनुदान नाकारुन विद्रोही कवी अशी प्रसिद्धी मला मिळवता आली असती पण मी नांव बदलून कां होईना पण संग्रह प्रकाशित होतोय यात मी समाधान मानलं.
प्रश्न : ८६ साली तुमचा पहिला  कविता संग्रह निघाला.एवढ्या वर्षानंतर त्याबद्दल काय सांगाल?
उत्तर : साठच्या दशकानंतरचा तो काळ होता. त्याकाळाचा  अप्रत्यक्ष प्रभाव पूर मधल्या कवितांवर दिसतो.म्हणजे भाषा दलित कवींसारखी असली तरी त्यांच्या कवितेचं अनुकरण माझ्या कवितेत दिसणार नाही.दलित काव्य-साहित्य समाजव्यवस्था बदलण्याची,क्रांतीची भाषा करणारी होती पण 'पूर' मधली कविता माणूस निर्दोष झाल्याशिवाय निर्दोष व्यवस्था अस्तित्वात येणार नाही हे सूत्र घेऊन व्यक्त होत होती.हा मोठा फरक होता.यादृष्टीने ती लक्ष्यवेधी होती म्हणूनच या संग्रहाला तज्ञजांनी अनुदान देण्याची शिफारस केली.
प्रश्न : कोण होते तज्ञज समितीवर?
उत्तर :  नारायण सुर्वे, अनिरुद्ध  कुलकर्णी 
प्रश्न : १९८६ नंतर एकदम २००३ साली तुमचा रुबायांचा संग्रह निघाला.त्याचं शीर्षकही वेगळं आहे.चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..! अशी शीर्षकं सुचतात कशी?
 उत्तर : इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत अशी ओळख झाल्यावर वेगळेपण प्रत्येक बाबतीत जपलंच जातं.घराचा पत्ता लिहीताना बहूतेक जण घर नंबर असं लिहीतात मी घरांक म्हणतो.चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..हे नामकरण मात्र ज्येष्ठ रुबाईकार रमेश गोविंद वैद्यांनी केलं.त्यातल्या रुबायांची निवडही त्यांनीच केलीय..
प्रश्न : तुमचं लेखन कसं सुरु होतं.?एका ओळीपासून..प्रसंगापासून..एखाद्या अस्वस्थतेपासून?..
उत्तर : लेखनाला निमित्त कोणतंही पुरतं.. माणूस म्हणून जगत असताना कवी मनात शेकडो अनुभव नोंदवले जातात. अनुभवले जातात. कधी जाणीवपूर्वक कधी नकळत चिंतन मनन चालू असतं.अनुभवाचं चक्र पूर्ण झालं की अचानक एखाद्या दिवशी फाॅर्म आणि कंटेंट  घेऊन साहित्यकृती एकटाकी लिहून पूर्ण होते..
प्रश्न : कविता आणि रंगभूमी दोन्ही तुमच्या आयुष्यात समांतर चालत राहिल्या..कोण जास्त जवळचं..
 उत्तर : अर्थातच कविता.ती सावलीसारखी सतत सोबत असते..रंगभूमीवरही तीच घेऊन जाते..
प्रश्न : दिग्दर्शक म्हणून..कलाकार म्हणून..लेखक म्हणून..यापैकी सर्वात कठीण भूमिका कोणती?
उत्तर : सोपं आणि कठीण हे कलावंत म्हणून तुम्ही किती गंभीर आणि मनस्वी आहात यावर अवलंबून असतं.माझ्यातला कवी मात्र अत्यंत कठीण वाटणारी गोष्टंही कधी कधी सोपी करुन टाकतो.मग भूमिका कुठलीही असो.
प्रश्न : रंगमंचाने किंवा साहित्याने तुम्हाला काय शिकवलं?
उत्तर :.यावर मला एक रुबाई आठवते-
मी लिप्त असोनी अलिप्त झालो आहे..
मी अमुक्त असुनी मुक्त जाहलो आहे..
हे असून नसणे नसून असण्यासाठी..
हे ज्ञान 'भल्यांचे' पाय घसरण्यासाठी..! 
प्रश्न : प्रयोगात अशी एखादी घटना जी आज आठवलं की हसूही येतं आणि वाईटही वाटतं..
उत्तर :  'पूल' हे विजय कुवळेकर यांचं नाटक आम्ही कामगार कल्याण नाट्य स्पर्धेला सादर केलं होतं.सुरेश कोकीळांनी दिग्दर्शन केलं होतं.आत्महत्या या विषयावरचं ते नाटक होतं.त्यात मी दोन रोल करत होतो.एक वकील आणि दुसरा हवालदार.वकील पूलावरुन उडी टाकून आत्महत्या करतो.पुढच्या प्रवेशात हवालदार म्हणून एन्ट्री टाकली.एक्झिट घेताना घोळ झाला.आत्महत्या करणाऱ्या पात्रांसाठी जो एरिया होता तिथून चालत विंगमध्ये गेलो.प्रेक्षकात एकच हशा पिकला..
प्रश्न : नोकरी आणि त्याच बरोबर साहित्य यात संतुलन कसं साधलंत?
भाग४ : पहिले काही दिवस जड गेलं पण नंतर ठरवलं की नोकरी मध्ये कुठलीही महत्वाकांक्षा ठेवायची नाही. म्हणजे शरीरानं नोकरी करायची. मानसिक स्तरावर लेखन -वाचनासाठीच सरकार पगार देतंय असं समजलो आणि आनंद केला..
प्रश्न : कुटु़ंबाची साथ नसती तर एवढा पृरवास झाला असता कां?
उत्तर : नसता झाला.माझी पत्नी अरुणा,दोन्ही मुलं, होती आहेत म्हणून आज मी जो काही आहे तो आहे..
प्रश्न : तुमची पत्नी आज जर बोलायला बसल्या तर ती तुमच्या बद्दल काय सांगेल?
११बी : ती बोललीच नसती. किंवा माझ्याकडेच काय बोलू या अर्थानं बघत राहिली असती. तिनं बोलायला हवं लिहायला हवं असं फार वाटतं. तिच्यात अनेक सुप्त गुण आहेत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमातून हळूहळू ते फुलतायत..ते असेच फुलत रहावेत आणि भविष्यात तिनं आत्मकथन लिहावं. गुळमुळीत काही लिहू नाही. रोखठोक बेधडक लिहावं.मनमोकळं करावं अशी इच्छा आहे....
प्रश्न : याचा मुलांवर काय चांगला परिणाम झाला?
उत्तर : मुलं चांगली निघणं हे खरोखरच भाग्याचं लक्षण असतं.माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमात शिकली पण मुलगी इंग्रजी हिंदीत कथा कविता लिहीते तर मुलगा उर्दूत हिंदीत लिहीतो.. त्यांनी लिहीत रहावं ..चिक्कार वाचन करावं..चिक्कार ऐकावं..पहावं..डीग्री मुळे पैसे मिळतील पण शहाणपण मिळतंच असं नाही. त्यासाठी लेखन-वाचनासारखं औषध नाही. प्रसिद्धी हा साईड इफेक्ट आहे.तो होतोच.त्याची फिकीर करु नाही.
प्रश्न : तुमच्या आयुष्यात भारत खूप बदलला बर्थ टू करंट स्टेट याचे काही इंपॅक्ट्स की ज्यामुळे तुम्ही घडत गेलात..
उत्तर : भारत खूप बदलला ही गोष्ट खरी असली तरी ' स्वराज्य आले,सुराज्य पण होणार कधी?' ही खंत प्रत्येक माणसाच्या मनात आहेच.व्यक्तीश: माझ्यावर परिणाम असा झाला की राजकारणाच्या नावाखाली सत्ताकारणात मशगुल असलेल्या राजकिय नेत्यांविषयी माझ्या मनात प्रचंड अनास्था आणि भीती निर्माण झाली..
प्रश्न : तंत्रज्ञान आलं मोबाईल आला..ए आय आलं लेखकांसाठी हा धोका आहे की ही संधी आहे?
उत्तर : कोणत्याही नवीन गोष्टीचे चांगले आणि वाईट परिणाम हे होतच असतात.मग ते एआय सारखं तंत्रज्ञान असो किंवा आणखी काही. सृजनात्मक लेखनासाठी ते अजिबात वापरु नाही .त्यासाठी मन बुद्धी आहे याचं भान ठेवावं.उपयुक्त माहिती संदर्भ गोळा करण्यासाठी मात्र ते जरुर वापरावं..
प्रश्न : यशाची व्याख्या बदलली कां किंवा अपयशातून कोणता धडा मिळाला?
उत्तर : यश अपयश अपयशातून..
- यश-अपयश,जय-पराजय,सुख-दु:ख यापेक्षा आपण मोठे आहोत हे मला फार लवकर कळलं.त्यामुळे सृजनातल्या आनंदात मी मस्त असतो..
ती मला म्हणाली दे रे दे आनंद 
मी तिला दिले मग श्वास लागला छंद..
लिहीताना असतो लिहावयाला अर्थ 
निर्माल्य घेऊनी नदी वाहते संथ..! 
प्रश्न : एकटेपणाशी कधी सामना झालाय कां?- त्यातून बाहेर कसे आलात?
उत्तर : आपण पुन्हा पहिल्या प्रश्नापाशी येऊन पोचलोय-
प्रारंभच झाला शेवट याला नाही..
या इथे कुणाची कुणास संगत नाही..
हे प्रकाश-पाऊल पडते आहे तेथे 
ना खूण पुसटशी पुढे शून्य हे मोठे..!! 
 कवी- कलावंतांचा प्रवास एकाकीच असतो.या प्रवासात एकटं राहण्यातला आनंद आहे अजून काय हवं?
प्रश्न : आज..साहित्य तुमच्या  आयुष्यात काय भूमिका बजावतं?- छंद?-साधना?-की आधार?
उत्तर : मी कवी कलावंत आहे म्हणजे जीवनाचा साधक आहे. स्वत:च्या शोधातून ही साधना अविरत सुरुच राहणार आहे..
प्रश्न : जर आयुष्य परत जगायला मिळालं तर काय बदलाल? 
उत्तर : आधी मिळू तर दे आयुष्य..मग बघता येईल काय बदलायचं ते..
प्रश्न : आज कोणा कोणा बद्दल सर्वात जास्त कृतज्ञता वाटते?
उत्तर : -अक्षरश: असंख्य नांवं आहेत.कुणाकुणाची नांव घ्यायची.एक दगड या हातातून त्या हातात फिरत राहिला.कुणी त्याला आंजरला,कुणी  गोंजारला, कुणी लाथाडला त्यातून एखादी मूर्ती आकाराला आली तर त्यात दगडाचं कर्तृत्व काय?- तर शून्य.दगडात अनेक प्रकारच्या शक्यता असतात असा विश्वास आणि दृष्टी असलेली थोर माणसं मला भेटली इतका मी भाग्यवंत होतो, आहे इतकंच. तरी पण माझे आई-वडील आणि नाटकाचं वेड लावलं ते श्रीराम रानडे, नापासांसाठी शाळा काढणारे  पु. ग. वैद्य, हिंदी भाषेची गोडी लावली त्या सुधा पेठे, इंग्रजीचे शिक्षक मोहन वाघोलीकर, कवी सुरेश कोकीळ, अशी काही ठळक नांवं नेहमीच स्मरणात असतात..
भाग८: फास्ट पण विचार करायला ...लावणारे
- देवाची काठी 
- अलिप्ततेची साधना 
- संपूर्ण स्वातंत्र्य 
- संपत चाललेलं सार 
- मोकळं रान 
- कोणत्याही परिस्थितीत आवडतं काम करत राहणं हे यश आणि ते सोडून देणं अपयश..
- देत्याची भूमिका वहन करत राहणारा तो देव 
-नवीन सुरुवात 
- आत्ताचा क्षण 
- प्रश्न-उत्तरांचा झकास खेळ..!! 

















Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७