मी रविंद्रनाथांची पत्नी ६
मी रविंद्रनाथांची पत्नी
६.
त्या दिवशी ते सकाळपासूनच गंभीर दिसत होते.कधी कधी असेच सकाळपासून स्वत:तच बुडालेले दिसतात.मी खोलीत कपाट आवरत होते.ते पलंगाच्या पाठीला टेकून एक इंग्रजी पुस्तक वाचत होते.अचानक विचारलं-
"छोटी बहू,तू माझी " राहूर प्रेम " कविता वाचलीयस कां? "
" नाही बुवा..! तुम्हाला ठाऊकच आहे तुमच्या खूपशा कविता मला समजतच नाहीत."
ते बराच वेळ गप्प बसून राहिले.मला वाटलं,आता पुढे कदाचित ते काही बोलणारच नाहीत. खरं सांगायचं म्हणजे ते साहित्यावर काही बोलू लागले की माझी पंचाईतच होते.कसं आणि काय बोलावं समजतच नाही.पण थोडावेळाने ते म्हणाले-
" राहूर प्रेम " कविता खूप वर्षांपूर्वी लिहीली होती. माझ्या ' छवि ओ गान ' या संग्रहात ती आहे.
" तुमच्या या " राहूर प्रेम " मध्ये असं काय आहे? "
" त्यात मी माझ्याविषयी काहीच लिहीलेलं नाही.लिहीलंय ते फक्त नोतुन बोऊठान च्या मनातलं "
" नोतुन बोऊठानच्या मनातलं?- असं काय होतं त्यांच्या मनात? "
" नोतुन बोऊठानच बोलतीय त्या कवितेत. छोटी बहू,मला माहिताय माझ्याविषयी तुझ्या मनात असंख्य प्रश्न असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित तुला त्या कवितेत मिळू शकतील "
" नोतुन बोऊठानचं निधन होऊन खूप वर्ष लोटली.सगळे तिला विसरुन गेलेत.त्यांच्या मनातलं जाणून मी काय करू "
माझे शब्द जणू त्यांच्या कानापर्यंत पोहोचलेच नाहीत सांगत होते-
" छोटी बहू,त्यावेळी मी दिवस-रात्र वेडानं झपाटला गेलो होतो.एका नशेत लिहून गेलो मी " राहूर प्रेम " ही कविता..! त्यावेळी तू मला पाहिलं असतंस तर म्हटली असतीस की काय वेड्यासारखं वागतोय..मला कळत नव्हतं की मी कुठे चाललोय..एका आंधळ्या प्रेमानं मला ग्रासून टाकलं होतं.."
-तुमचे रवि ठाकुर एकदम गप्प झाले.मी कपाट आवरायचं सोडून त्यांच्याकडे पहात राहिले.माहित नाही,कां ? पण मला खूप भिती वाटायला लागली. ते अचानक सरळ माझ्याकडे पहात म्हणाले-
" 'राहूर प्रेम' कविता नोतुन बोऊठानच्या आवाजात मला आजही ऐकू येते..ती मला सोडून गेलेली नाही.जाणारही नाही "
- मग कविता आठवेल तशी म्हणू लागले.- ते त्या वेळेला माझे कुणीही नव्हते..ते फक्त रविंद्रनाथ होते..!! नोतुन बोऊठानचं मनोगत मी ऐकत होते त्यांच्या आवाजात -
-
आस नसो वा ध्यास नसो
साद असो वा साद नसो
निकट रहा वा दूर रहा
सोबत मी सदा तुझ्या
आसपासही मीच तुझ्या
मिसळुनी तव देही बघ
हा विषाद घोर पहा
तम निबिड मुख हताश
नि:श्वासित भग्न उर
तुटलेली तार तार
सरताना दिवसरात्र..
नित्य तुझा सांगाती
सावली जणू तुझी
अद्भूत त्या रुदनात
अद्भूत त्या हास्यात
पाहशील तू मला
जवळ तुझ्या
मागे,पुढे
अमोर समोर माझीच काया
गंभीर रात्री एकाकी असता
मलिन प्राण
विस्मयाने पाहशील पैल
मी सुद्धा आहे सोबत तुझ्या
याचका सारखा बघतो आहे
तुझ्याकडे
- ते थांबले.तुमचे रविंद्रनाथ.त्यांना मी ओळखत नाही. त्यांच्या डोळ्यात पाहिलं तेंव्हा वाटलं ते सुद्धा मला ओळखत नाहीत.ते माझे कुणी नाहीत.मी पण त्यांची कुणी नाही.दुसऱ्याच कुणाच्या प्रेमानं राहू प्रमाणे ग्रासलंय त्यांना.ती स्त्री त्यांना सोडून गेलेली नाही.कधी सोडून जाणारही नाही.मी घरातून बाहेर पडून व्हरांड्यात ओठ मिटून उभी राहिले.मला भयंकर भिती वाटत होती.पण कुणाला सांगणार या भिती बद्दल?- हे सगळं मी लिहू शकले नसते.पण आपसूकच ती घटना कागदावर उतरली.मनात ठेवताही आली नसती.मी खरोखरच एका बरोबर संसार मांडलाय.त्यांच्या मुलामुलींची आई झालेय. पण तो कुणा दुसऱ्याचाच होऊन राहिलाय. असा एक माणूस जो पृथ्वीवर नाहीय तरी सुद्धा तो आहे- माझ्या आणि त्यांच्या मध्ये.- ती कधीही आमच्या आयुष्यातुन जाणार नाही.तिच्या असण्यामुळे आम्हाला दोघांनाही मुक्ती नाही.अंधाऱ्या व्हरांड्यात ती अशरीरी अंधार होऊन अंधारात मिसळून गेली आहे. त्याचवेळी एकदम आठवली अशीच दुसऱ्या एका दिवसाची कहाणी. माझ्या नवऱ्यानेच सांगितलेली. त्यांच्यासारखी रंगवून नाही सांगता येणार मला. रोजच्या सर्वसामान्य जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा ते किती सुंदर पद्धतीने सांगतात.
- मी माझ्या पद्धतीनं- कधी कधी त्यांच्या सारखी सांगायचा प्रयत्न करतीय.कदाचित असंबद्ध पण वाटेल पण व्हरांड्यातल्या अंधारात आकाशाकडे एकटक बघत असताना नोतुन बोऊठानची, त्या भयानक दिवसाची गोष्ट आठवतीय.
-ते जेंव्हा लिहीतात किंवा गीते स्वरात बांधतात तेंव्हा मी तिकडे फिरकत सुद्धा नाही.पण त्या दिवशी काय झालं कळलं नाही, मी अचानक त्यांच्या खोलीत जाऊन उभी राहिले.लग्न होऊन चार वर्ष झाली असतील आमच्या.गाजीपुर मध्ये संसार थाटला होता तेंव्हा. मला जवळ पाहून त्यांनी लिहीणं थांबवलं आणि म्हणाले-
" फारा दिवसाची इच्छा आहे की पश्चिम भारतात कुठेतरी मुक्काम ठोकून भारतवर्षाच्या प्राचीनत्वाचा अनुभव घ्यावा.मला त्यांचं बोलणं नीटसं कळलं नाही हे त्यांना माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच समजलं.ते म्हणाले-
" पश्चिम भारताने माझ्या बाल्यावस्थे पासूनच आदर्श कल्पनांचे बीजारोपण केले आहे.छूटी,(कधी कधी ते मला छुटी/छुटकी म्हणतात) एवढे सारे देश असताना गाजीपूरच कां?- दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे गुलाबाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे.मी कितीतरी वेळा मनोमन ठरवून गुलाबांच्या देशातला बादशहा होऊन गाजीपुरला आलोय.पण आल्यावर कळलं की व्यावसायिक गुलाबांची ही जमीन आहे.इथे बुलबुल पक्ष्यांचा बुलावा नाही.जिथे बुलबुलच नाहीत तिथे कवी काय करणार?- भारतवर्षाच्या महिमामंडित इतिहासाच्या खुणा सापडतील म्हणून गाजीपुरात आलो खरा पण तसं इथे काहीच सापडलं नाही.
" मग तुम्हाला गाजीपुर आवडलंच नसेल?"
" अगदी तसंच काही नाही छोटी बहू, पण माझ्या नजरेत गाजीपुर एखाद्या श्वेत वस्त्रधारी विधवा स्त्री सारखे प्रतिबिंबित झालेलं आहे.- ती सुद्धा कुठल्या मोठ्या घरातली विधवा नाही.."
" मग चला परत जाऊ जोडासांकोला.मला पण इथे करमत नाही.एकच सुखाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा एकट्याचा सहवास लाभलाय.."
" एकट्याला पाहणं आणि एकट्याला मिळवणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत छोटी बहू.."
मी काहीच बोलले नाही.ओठ मिटून राहिले.पण नंतर ते म्हणाले-
" गाजीपुर आणि दिल्ली- आगऱ्याची तुलना होऊ शकत नाही.सिराज-समरकंद बरोबर तुलना होऊ शकत नाही.तरी सुद्धा गाजीपुरचा मी ऋणी आहे.कां माहिताय? "
"कां बरं? "
" कारण गाजीपूरच्या असीम अवकाशात माझं मन रंगून गेलं.मनोराज्यात स्वाधीनता आली.या अवस्थेत माझ्या काव्य रचनेचे अभिनव पर्व सुरु झाले. इतक्या मोठ्या बंगालमधे संथ वाहणारी गंगा आहे.गंगेला लागूनच मैलोमैल पसरलेला किनारा आहे..किनाऱ्यावर मोहरीची आणि हरभऱ्याची शेती आहे. मी खिडकी जवळ बसून पाहू शकतो गंगेचा प्रवाह..!! - मंथर गतीने प्रवाहा बरोबर वाहणाऱ्या नौका...घनदाट वृक्षराजींमधून येणारे कुहू कुहू चे स्वर.. रणरणत्या उन्हात मलूल होऊन मंदपणे वाहणारे वारे..सगळं मला खूप आवडतं. तू कधी नीट पाहिलास कां छोटी बहू, पश्चिमेच्या त्या कोपऱ्यात उभा असलेला कडूनींबाचा महावृक्ष? - मी पाहतोय.एकटक फक्त पाहात राहतो..मग माझं मन खूप दूर भूतकाळात निघून जातं...असाच गंगा नदीचा किनारा..प्रचंड तप्त दुपार..असाच कडूनींबाचा वृक्ष..त्याच्या घनदाट छायेत...नोतुन बोऊठान बरोबर चंदननगरात कितीतरी काळ घालवलाय मी.."
- माझ्या छातीत धस्स झालं..चार वर्षांपूर्वीच्या आठवणीत रमलेले रवि आमच्या सोबत गाजीपुरातही होते आणि मी चार वर्षानंतर घर-संसाराच्या कोलाहलापासून दूर आपला पती आपल्या एकटीच्या वाट्याला आला या सुखात बुडालीय.ते आणि मी.बस्स बाकी कोणीही नाही.
-आमची मोठी बेला अचानक कुठून तरी मंद पावलं टाकत आली आणि माझा पदर ओढू लागली.तिला मांडीवर बसवत मी त्यांना न राहववून विचारलं-
" तुमच्या नव्या काव्यसंग्रहाला नांव काय दिलंयत तुम्ही? - कुणाला अर्पण करणार आहात? " तिलाच जी नाहीय आज अस्तित्वात..पण माझ्या देहमनाला व्यापून उरली आहे...काय लिहीलंय माहिताय?"
-माझे सगळे शब्द गळ्यातच गोठून गेले..!! - तुमचे रविंद्रनाथ यावेळी माझ्यासाठी एक अनोळखी व्यक्ती होऊन समोर बोलत होते-
" त्या सर्व आनंदी क्षणांना..प्राणांच्या सर्वश्रेष्ठ कुपीत दरवळत राहू दे.. "
मी बराचवेळ नि:शब्द.ते सुद्धा ओठ मिटून गप्प.माझं हृदय यातनांनी काठोकाठ..!! खूप वेळाने मग रवि ठाकुर म्हणाले-
" छोटी बहू, मला माहिताय तुला कविता वाचायला तितक्याशा आवडत नाहीत.तरी पण ' मानसी ' मधल्या पहिल्या कवितेच्या काही ओळी तुला ऐकवण्याची इच्छा होते आहे.माझ्या मनातली ही वेदना तुझ्याजवळ प्रकट करावीशी वाटते-
" सलज्ज हसरा चेहरा
आणिक
सरस्वतीसम मधुरा वाणी
भान नव्याने जागवते..
जागवते मज आठवते ग
त्या डोळ्यातच हृदय थांबले
विसरुन आलो तू- मी तरीही
कसा विसरलो..
कशी जायची मधुरा- रात?
दक्षिणवारा..
कुणी न माझा सगा सोयरा..
चहू दिशांना घुमतो आहे
ऐका पावा..सुखात असता
गावे गान..
व्याकुळ वारा..फुलाफुलांचा
मत्त सुवास..
चुकून कोणी आला तर मग
श्वास नाही कां थांबायाचा?-
त्याचा..माझा..तुमचा..!!! "
- मी शब्द सुद्धा बोलले नाही. त्यांना वाटलं मला कविता समजली नाही. बेलाला उचलून कडेवर घेत मी गुपचूप खोलीच्या बाहेर आले.."
ते स्नान करायला गेले तेंव्हा मी परत त्यांच्या लेखनाच्या खोलीत आले.सर्वत्र सन्नाटा होता.फक्त बाथरुममधून पाण्याचा आवाज येत होता.दूरवरुन कोकीळ कुहूकुहू गात होता.मला फार अपराधी वाटत होतं पण धाडस करुन त्यांच्या कवितांचं पुस्तक उघडलं.एका पानावर फक्त या काही ओळी होत्या- घाईघाईत लिहीलेल्या.-त्यांच्या जीवनातील एका प्रेमकथेचं गुपित. मला वाटतं नंतर कधीतरी ते या ओळी एखाद्या दीर्घ कवितेत लिहीतील-
" प्राणांचे प्रेम-गुपित..
अंधाऱ्या हृदयातील माणिक
जाज्वल्यमान,
प्रखर तेजात मात्र
कलंका समान.."
- त्यांच्या कवितेच्या पुस्तकातील त्या पानावर माझे अश्रू ओघळून पडले,सुदैवानं अक्षरांवर नाही पडले.मी पुसून टाकले.त्यांना कळणार पण नाही.
(प्रकरण ६ वे समाप्त)
Comments
Post a Comment