मी रविंद्रनाथांची पत्नी ९

मी रविंद्रनाथांची पत्नी
------------------------------ 
९.
एका माणसाविषयी सांगितल्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होणार नाही.कारण त्याच्यावर मी खूप प्रेम करत होते.प्रेमाची ही गोष्ट मी कुणाला सांगू शकले नाही.मी कुणावरही अन्याय केला नाही.मी अगदी एकटी पडले होते.किती यातना मी सोसत होते हे त्यानं न सांगताच ओळखलं होतं.समजून घेतलं होतं.म्हणूनच त्याच्यावर जीव टाकला.त्याच्या इतकं प्रेम माझ्या सासुरवाडीत कुणीही केलं नाही माझ्यावर.तो माझ्यापेक्षा चार वर्षाने मोठा होता.मी जेंव्हा नवव्या वर्षी जोडासांको ठाकुरवाडीची सून म्हणून आले तेंव्हा मित्रासारखे पुढे येऊन त्याने माझा हात हातात घेतला.तेंव्हा तो तेरा वर्षाचा होता.
अगदी रवि ठाकुरांचे जसे दोन वर्षाहून मोठ्या नोतुन बोऊठान सोबत बंधुत्वाचं,मित्रतत्वाच प्रेम फुललं,बहरलं तसच माझ्याही बाबतीत झालं. ठाकुरवाडीचा हा पुत्र जन्मापासून आजारीच होता.त्याच्या वडीलांनाही सगळे वेडा म्हणायचे.आई सुद्धा त्याचा फार काही चांगला सांभाळ करत होती असं नाही.ठाकुरवाडीत हे लोक जरा एकटे पडल्यासारखेच होते. तो नीट चालू शकत नव्हता.पाय घासत लंगडत  चालायचा त्यामुळे मुलामाणसात मिसळायला संकोचायचा.त्याचं दु:ख मी समजू शकत होते.त्याची मी प्रेमिका,मैत्रिण,बहीण,आई सर्वच होते.तो दिसला नाहीतर मला चैन पडायचं नाही.त्यानीच मला लिहायला,वाचायला शिकवलं.तो संस्कृत चांगले जाणत होता.संस्कृत मधली काव्य-नाटके तो मला वाचून दाखवायचा.समजावून पण सांगायचा.त्यानीच मला कालीदासाचं 'मेघदूत' ' कुमारसम्भव' शिकवलं. कुमारसम्भव वाचताना फार लाज वाटायची.शिव आणि पार्वती यांच्या मधले प्रणय प्रसंग किती धाडसाने व मोकळेपणाने लिहीलेत कालिदासानी.मी जे थोडेफार संस्कृत शिकले ते त्याच्यामुळेच.तो कविताही किती सुंदर लिहायचा..!! 
सोळाव्या वर्षी त्याने एक गीत लिहीलं होतं.ते त्यानं माघोत्स्वात गायलं होतं.माझे पती त्यावेळी ' बालक ' या पत्रिकेचे संपादक होते.त्या पत्रिकेत त्याची कविता प्रकाशित झाली होती.त्या नंतर जेंव्हा तो शिलाईदहला आमच्या सोबत थोडे दिवसांसाठी आला तेंव्हा त्याने आपल्या वहीत काही फकीरांकडून गायलेली गाणी लिहून ठेवली होती.गगन हरकरचे एक गीत सुद्धा त्याच्या वहीत होते.
*
आता एक अशी गोष्ट सांगते जी कुणालाच माहीत नाहीय.नोतुन बोऊठान सारखी मला पण एकदा आत्महत्या करावीशी वाटली होती.तो त्या दिवशी माझ्या सोबत होता.त्यावेळी आम्ही दोघेही शिलाईदहला होतो.आम्ही दोघेही मेलो असतो कुणाला काय कळलं असतं?-नोतुन बोऊठान एकटीच वीष खाऊन मेली.आम्ही दोघे कदाचित बरोबरच मेलो असतो.त्या दिवशी शिलाईदहच्या दुसऱ्या तीरावरील वाळूच्या किनाऱ्यावर आमची नांव लावली होती.विस्तीर्ण विशाल तट..दूर पर्यंत पसरलेला..अंत नाहीच जसा..गाव नाही..लोक नाही..काही काही नाही फक्त रेतीचा किनारा..! तो म्हणाला- 
" चल, या रेतीच्या किनाऱ्याचा अंत कुठे होतो ते पाहून येऊ..असं ऐकलंय की तिथे रुपककथां मधला देश आहे.." 
" त्या देशात गेल्यावर परत येऊच नाही असं वाटलं तर? " मी विचारलं 
"  मग नाही परत यायचं " बलू
" आणि तू चालू शकशील तिथ पर्यंत?- तुझे पाय हे असे.." 
" तू आहेस सोबत मग काय? " बलू 
वातालरण धुंद झालं.अनामिक नशा चढली आम्हाला आणि अचानक सूर्य बुडाला.धपाकदीशी काळोख कोसळला.दिशा हरवली.भटकत भटकत अशा ठिकाणी पोहोचलो की तिथे पाण्याचा लपक-झपक‌ आवाज येत होता.आम्ही कदाचित किनाऱ्याच्या शेवटच्या टोकावर आलो होतो.अंधारात पाणी कुठे किती पसरलंय काही कळत नव्हतं.बरेच तास उलटून गेले आम्ही चालत होतो.दोघात फक्त एक मौन संवाद होता.एकमेकांचा हात धरुन चालतोय,चालतोय.जरा पुढे गेल्या नंतर काळ्याकंच पद्मेची विशाल रुंद छाती दिसू लागली.आम्ही दोघे थांबलो.नोतुन बोऊठान करु शकली.आम्ही नाही करु शकलो.पुढे चालत राहण्याचं साहस आमच्याकडून नाही झालं.मला वाटलं होतं त्याचा हात सोडून  एकटेच पुढे जावं..पद्मेच्या काळ्याशार पाण्यात मरुन जावं.पण त्याचा हात नाही सोडू शकले.त्याने माझ्या मनातले ओळखून मला घट्ट पकडले.पद्मानदीच्या किनाऱ्यावर अंधाऱ्या रात्री त्याच्या छातीत डोकं खुपसून मी कितीवेळ झाला थांबले होते.मरायची इच्छा विझत चालली होती.एकदम लक्षात आलं, नांवे पर्यंत जायचे कसे?- काहीच कळत नव्हतं. रस्ता पण सापडत नव्हता.अंधारात परतीच्या वाटेवर चाचपड चालत राहिलो.वाटलं रस्ता संपणार नाही.भिती वाटू लागली‌.अचानक आर्त हाका कानावर पडल्या स्वत: रवि ठाकुर काही सेवकांना घेऊन आम्हाला शोधत आले होते.मशालीच्या प्रकाशात आता पाहू शकत होतो.अखेर नौकेवर आलो. त्यावेळी रवि ठाकुरांनी दोन गोष्टी केल्या एक- स्त्री स्वातंत्र्या विरुद्ध ते कटीबद्ध राहतील.दोन आमच्या दोघांचं अशा तऱ्हेनं फिरणं बंद.त्यानंतर त्यांनी माझ्या मित्राकडे एक कटाक्ष टाकला,बस्स.तेवढा पुरे होता.मला वाटलं खरंच मरायला पाहिजे होतं मी.रोज मर्राच्या संसारापासून दूर...सर्वदूर पसरलेल्या निर्जनतेत..नि:शब्द अंधारात..माझ्या प्रिय बंधु सोबत..कां घाबरले मी? कां?
*
तो कलकत्त्याला परत गेला.त्याला रोजच ताप येऊ लागला.त्याचं आजारपण वाढतच चाललं होतं.पण माझ्या नवऱ्याने मला कलकत्त्याला जाऊ दिलं नाही.मी शिलाईदहतच राहिले.मी जेवणखाण सोडलं.सांगितलं,मी कलकत्त्याला जाणार म्हणजे जाणार...पण नाही जाऊ शकले..! त्या आधीच त्याच्या मृत्यूची बातमी कानावर आली.हे आईदेवी...मला कुणी मित्र नाही राहिला..तोच एकमात्र होता सखा बंधू..!! - तो. माझ्या विक्षिप्त सासऱ्यांचा एकुलता एक मुलगा .बलेंद्रनाथ..!! अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी जग सोडून गेला.
(प्रकरण ९ समाप्त) 


Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७