मी रविंद्रनाथांची पत्नी१०

मी रविंद्रनाथांची पत्नी
------------------------------
१०.
बलूची मी काकू आई.फक्त काकू आईच होते कां?- तो मला तशी हाक मारायचा.पण त्या 'काकू आई' म्हणण्यात त्याचं प्रेम मिसळून आलेलं असायचं.ठाकुरवाडीत मला कुणीही कधी अशी हांक मारली नाही.मी त्याच्यापेक्षा चार वर्षाने लहान होते.तरीही तो काकू आईच म्हणायचा.
बलू माझ्यापेक्षा वयानेच फक्त  मोठा नव्हता बुद्धी,वाचन,लेखन अशा सगळ्या बाजूने‌ मोठा होता.ही गोष्ट त्याच्या व माझ्या नात्यात  कधी अडसर म्हणून आली नव्हती.मी त्याची काकू आई असून सुद्धा त्याचा आदर करत होते.त्याच आदरभावात धीरगंभीर प्रेमाचा भाव मिसळून गेला.प्रेम- जे हृदयाच्या अंतर्हृदयाला साद घालते..ठोके चुकवते.. ते प्रेम.मला फार भिती वाटतीय प्रश्न विचारायची तरी पण‌ विचारतेय- याचंच नांव प्रेम आहे कां?- बलू जेंव्हा माझा हात धरुन लंगड लंगडत चालायचा तेंव्हा असं वाटायचं की त्याच्या शरीरातून माझ्या शरीरात काही अनामिक गोड..हवं हवंसं प्रवेश करतंय.एक दिवस बलूला मी ही गोष्ट सांगितली.तो हसून माझ्याकडे अनिमिष नेत्राने पहात राहिला.माझ्या डोळ्यात डोळे ठेवत त्यानं विचारलं-
" काय प्रवेश करतं ठावुक आहे? "
" माहितीय पण सांगू नाही शकणार " मी
" कां नाही सांगू शकणार? " बलू
" सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत "
" कां सांगता येत नाहीत? "
" सांगितलं तर पाप लागतं " 
" पाप लागतं?- मनातला भाव व्यक्त केला तर पाप लागतं?- हे काय अडाण्यासारखं बोलतीयस तू,?- तुला एवढं काय काय शिकवून काहीच फायदा नाही झाला.. "
" तुझ्या-माझ्या संबंधात ती गोष्ट बोलायची नसते.तसा विचार करणंही पाप आहे.सांगणं तर दूरची गोष्ट.. "
" तू एक स्त्री आहेस आणि मी पुरुष..हा आपला आदिम संबंध आहे.सामाजिक संबंध तर माणसाने निर्माण केलेले आहेत..आपण माणसं आहोत..सामाजिक साचातले पुतळे नाही आहोत.. " 
" तरी पण नाही सांगू शकणार.. "
" तू सांगितलंस माझ्या शरीरातून तुझ्या शरीरात काहीतरी प्रवेश करते..मी विचारतोय, काय प्रवेश करतं?.. "
" काही नांव नाही त्याला.काहीतरी प्रवेश करतं शरीरात इतकंच सांगू शकते.."
" नांव आहे त्या गोष्टीला?.. "
" नांव मला माहीत नाही.. "
" मला माहीत आहे " 
" काय? "
" इच्छा " 
*
- मला खात्री आहे.बलू विषयी ठाकुरवाडीत बहूतेकांनी अविचार केला आहे.माझे मधले सासरे सत्येंद्रनाथांना मला वाटतं बलू दिसतच नाही.रवि ठाकुरांकडून बलूवर जो अन्याय झालाय त्याचा माझ्या मनाला खूप त्रास झालाय.बलू आपल्या रवि काकावर खूप प्रेम करायचा.बलूचा ठाकुरवाडीत होणार अवमान आणि अन्याया बद्दल लिहीलं नाही तर ते अन्यायकारक होईल.बलू चे आदर्श होते देवेंद्रनाथ.बोलपूरच्या भुवनडांगाच्पा निर्जन परिसरात देवेंद्रनाथांना साधनेसाठी स्थान मिळाले.काय नांव त्या जागेचं?- भुवनडांगाचे माठ- मैदान..! कुठे आहे हे विशाल निर्जन स्थळ?- सर्वांना माहीत आहे.ते बोलपुरात आहे.त्या जागेचे वेगळे काही नांव नाहीय कां?- नाही.
देवेंद्रनाथांनी याच ठिकाणी एक घर बांधलं स्वत:साठी म्हणून.नाही,नाही,एखाद्याला निर्जन स्थळीच साधना करायची असेल तर तो ती इच्छा पुरी करु शकतो.देवेंद्रनाथ भुवनडांगाच्या या एकाकी भवनात राहू लागले.या भवनाचं नांव त्यांनी ठेवलं ' शांतिनिकेतन ' या नांवानेच पुढे हे स्थळ नांवाने प्रसिद्ध झाले.देवेंद्रनाथांनी एक ट्रस्ट डीड शांतिनिकेतन च्या बाबतीत तयार केले होते.त्यात त्यांनी आपली अंतिम इच्छा लिहीली होती.शांतिनिकेतन मध्ये एक ' ब्रह्म विद्यालय ' ची स्थापना करावे ही ती इच्छा होती. परंतु त्यांची ही इच्छा तशीच राहिली.त्यांचे पुत्र त्यांची ही इच्छा पूर्ण करु शकले नाही.असं असेल की त्यांना तशी इच्छा नव्हती किंवा ते सारे इतर कार्यात व्यग्र होते,असतील.
- बलू एक दिवस मला म्हणाला-
" मी पितामहांचे स्वप्न पूर्ण करायचं ठरवलंय.हे खूप मोठे कार्य आहे पण मी करणार. "
" कोणतं कार्य? " मी 
" कोणतं कार्य म्हणजे?- तुला पण माझ्या बरोबर कार्य करावं लागेल.. मनाची तयारी ठेव.फार मोठी जबाबदारी आहे.. "
" असं कोणतं कार्य आहे?- सांग तर मला.. "
" तुला माहीत नसेल कदाचित पण पितामहांची इच्छा होती ' शांतिनिकेतन ' मध्ये ' ब्रह्म विद्यालयाची स्थापना करायची.त्यांना हे कार्य करायला वेळ मिळाला नाही.पण आता मी हे कार्य हाती घेणार.. "
" अरे बापरे..! हे तर खूप मोठं कार्य आहे.मी काय जबाबदारी घेणार यात?-त्यात  तुझ्या काकाचा संसार ओढायचा आहेच दिवस-रात्र.. " 
-माझं ऐकून बलू काहीवेळ गप्प झाला.तो दुखावला गेला हे खरंच. त्याला माझी साथ हवी होती.एकमेकांचा हात धरुन जसे आम्ही चालत आलो तसंच ' ब्रह्म विद्यालया'च्या स्थापनेतही मला सोबत घेऊन त्याला पुढे जायचं होतं.मी त्याला निराश केलं.माझ्यापुढे दुसरा मार्ग नव्हता.त्यांच्या अनुमती शिवाय मी बलूला साथ देऊ शकत नव्हते.
" तू तुझे काका आणि बाकी वडीलधाऱ्यांची परवानगी घेतलीयस कां? " मी विचारलं.
मला माहीत होतं की काकाच्या अनुमती खेरीज तो हे कार्य हाती घेऊ शकत नव्हता.. "
" रवि काका तेवढे उत्साही नाही दिसले या बाबतीत "
बलू बरोबर हे सारे बोलले तेंव्हा आम्ही शिलाईदहला होतो.तुमचे रवि ठाकुर तेंव्हा दुसऱ्याच कार्यात मग्न होते.जोडासांकोतील मुलामुलींच्या शिक्षणासाठी घरातच एक विद्यालय सुरु केलं होतं त्यांनी.हे विद्यालय इतर विद्यालयांसारखे नियमांच्या चौकटीतले नव्हते.एक प्रकारचं मुक्त विद्यालय होतं ते.त्यांनी जोडासांको मधून मला मुलाबाळांसहीत सरळ शिलाईदहला नेऊन टाकलं.तिथे एक शाळा सुरू केली.माझी मुलं-मुली तिथे शिकू लागली.स्वाभाविकपणे बलूच्या ' ब्रह्म विद्यालय ' सुरु करण्याच्या कल्पनेवर पाणी फिरवलं गेलं.बलू शिलाईदहहून कलकत्त्याला परत येण्याच्या दोन दिवस आधी माझ्या सोबत व्हरांड्यात बसला होता.अचानक माझा हात आपल्या छातीशी लावत तो म्हणाला -
" तुला माहीत आहे मी एकेश्वरवादी आहे.. "
-मला काय करावं काय बोलावं समजत नव्हतं.कशामुळे कोणजाणे माझं शरीर माझं राहिलं नाही.माझी छाती क्षणात घामानी भिजून गेली.बलू म्हणाला-
" वचन दे मनापासून मला साथ देशील.मी कलकत्त्याला जाऊन एकटाच कार्याला सुरुवात करीन.समजेन की तूही माझ्या सोबत आहेस.. "
" कोणतं कार्य? " 
" एकेश्वरवादाचा प्रचार म्हणून ब्रह्म विद्यालयाच्या स्थापनेचे कार्य.पितामहांची पण हीच‌ इच्छा होती.." 
बलेंद्रनाथाच्या कल्पनेतले ब्रह्म विद्यालय शांतिनिकेतन मध्ये स्थापन झाले पण तोपर्यंत बलू‌ हे जग सोडून गेला होता..! 
त्या ब्रह्म विद्यालय भवनाचं उद्घाटन कुणी केलं तर सत्येंद्रनाथ ठाकुरांनी.त्यावेळेला ते खूप काही बोलले. पितामह देवेंद्रनाथांची इच्छा आज पूर्ण होते आहे असं म्हणाले, पण एक नाव घेतलं नाही.बलेंद्रनाथाचे नांव- त्याच्या शिवाय ब्रह्म विद्यालय उभं राहू शकलं नसतं त्या बलूचंच नांव घ्यायला माझे मधले मोठे दीर विसरले.मी सुद्धा बलूच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहू शकले नाही.ब्रह्म विद्यालया च्या उद्घाटन समारंभाला पण जाऊ शकले नाही.मी त्यावेळेला शिलाईदह मध्ये निर्वासितासारखी रहात होते.तुमच्या रवि ठाकुरांनी मला स्पष्टच सांगितलं होतं,कलकत्त्याच्या गर्दीत माझं जीवन नीरस निष्फल होऊन जातं.म्हणून माझ्यासाठी तुला ही निर्वासिता सारखं जगण्याची शिक्षा भोगावीच लागेल.मी माझी संपूर्ण शक्ती कलकत्त्यात खर्च करावी असं तुलाही नक्कीच वाटत नसेल.
- खरंच आहे.अशी कशी इच्छा धरु शकेन मी?- शेवटी रवि ठाकुरांची पत्नी आहे ना..!! तुम्हीच सांगा बलू बरोबर काम करणं मला शक्य होतं कां?
*
या घटने नंतर सहा महिन्यानी २२ डिसेंबरची गोष्ट आहे. रविंद्रनाथांनी अनुष्ठान पद्धतीने ब्रह्म विद्यालयाची सुरुवात केली.त्यांनी म्हटलं,या कार्यासाठी त्यांनी पितामहांची अनुमती घेतली होती.पितामहांच्या इच्छेची पूर्ती आज पूर्ण श्रद्धेने होते आहे असं ते म्हणाले. किती सुंदर..!!-फक्त बलूच्या आठवणीनी डोळ्यात पाणी आलं.मी बलूला मनोमन नमस्कार केला.त्याच्या भाळाचे चुंबन घेतले.त्याला छातीशी धरुन खूप रडले.हे माझ्या रविंद्रनाथा तू सुद्धा ब्रह्म विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी एकदाही बलूचं नांव नाही घेतलंस.कशाचा एवढा राग आहे त्याच्या बद्दल तुमच्या मनात?
- तुम्हाला एक सांगते रवि ठाकुर.तुम्ही लोक ब्रह्म विद्यालया च्या उद्घाटन समारंभात व्यग्र होतात.तुमचं भाषण सुरु झालं होतं तेंव्हा मी घरातल्या एका कोपऱ्यात बसून बलूनं लिहीलेलं एक गीत गात होते.त्यानीच मला शिकवलं होतं आणि म्हणाला होता- हे तुझ्याच आवाजात ऐकायला खूप छान वाटतं-
*
अंधाराला उजळत येशी नित्य निळ्या आकाशी..
बाळ जगाचे हासत खेळत रडते तव चरणांशी..
अभिमान नसे अहंकार नसे, ना 
शोक ताप ना भय दु:ख नसे
कोटी कोटी ब्रह्मांडही झाले लीन तुझ्या चरणांशी..
अंधाराला उजळत येशी नित्य निळ्या आकाशी..!!
बलू ने हे गीत लिहीले होते आपल्या सोळाव्या वर्षी..!
(प्रकरण १० समाप्त)





Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७