मी रविंद्रनाथांची पत्नी २
मी रविंद्रनाथांची पत्नी
------------------------------
२.
त्यांचं म्हणणं त्यांच्या विवाहाची कुठली गोष्ट नाही.कशी असेल? - माझ्यासारख्या सामान्य,अल्प शिक्षित,गावंढळ मुली बरोबरचा विवाह म्हणजे अभिमानाने सांगायची गोष्ट होऊच शकत नाही.पण माझ्या लग्नाची गोष्ट मात्र मजेदार आहे.रवि ठाकुर बरोबर लग्न- काही साधी गोष्ट आहे काय?- माझं संपूर्ण जीवन म्हणजेच माझ्या लग्नाची गोष्ट आहे.माझं लग्न झालं वयाच्या दहाव्या वर्षी.रवि ठाकुरांची बायको म्हणून जगले जेमतेम १९ वर्ष.एका पाठोपाठ एक करत त्यांच्या मुलांची आई होणं,मुलांना वाढवणं, आणि हळूहळू रुग्ण होऊन अंथरुणाला खिळण्याशिवाय दुसरे घडलेच काय माझ्या जीवनात? - नाही,नाही असेही नाही.आणखी एक आहे की गोष्ट.तीच महत्वाची.
ती आहे माझी गौरवगाथा.माझा महिमा.हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलंय की त्यांचं तेजस्वी आयुष्य हेच माझेही तेज आहे.त्यांच्या महान यात्रेतून निर्माण होणाऱ्या ईतिहासात माझे स्थान अक्षुण्ण आहे.माझ्या इतकं जवळून त्यांना कुणीच पाहिलेलं नाही.हेच माझे सौभाग्य आहे.माझ्यावरच्या ईश्वरी करुणेला अंतच नाही.सर्व बाजूनी किती सामान्य आणि तुच्छ आहे मी..! तरी पण मी पाहिलाय लोभस चंद्रमा..! ईश्वराचा आशीर्वादच नाही कां हा?-मी ज्या रवि ठाकुरांना ओळखते त्यांना किती जणांनी ओळखलंय? -आधीपासूनच सांगतीय मला लिहीता येत नाही.ते कसे मनातले सगळे भाव..कथा-व्यथा.. विविध अलंकारांनी सजवून नटवून सांगतात..तसं नाही लिहायला जमत मला.त्यांची गृहिणी म्हणून घरात आले,संसार अर्थात यालाच संसार म्हणत असतील तर तो केला..एवढी वर्ष काढली त्यांच्या सोबत पण इच्छा असूनही लेखनकला काही अवगत करु शकले नाही.तरी पण कितीही शरीराने जर्जर होत असले,संसाराच्या जबाबदाऱ्यांचं ओझं वहात असले,एकटेपण छळत असले तरी वाटतं की काही लिहून वेळ घालवू.पाहात आलेय, मी लेखनात किती वेळ निघून जातो कळत नाही.लिहायचे,पण काय लिहायचे?-आत्मकथा?
मी लेखक थोडीच आहे त्यांच्यासारखी नवनिर्मिती करायला?-माझीच कहाणी लिहीते.मुद्दाम काही रचायला नको.कथा कादंबरी सारखं.माझीच कथा लिहीते.जे पाहिलं,भोगलं तेच लिहीते.ते रवि ठाकुरांसारखं उत्कृष्ट नसेल पण स्वाभाविक असेल,माझं स्वत:चं असेल.
- त्यांनी लिहीली समजा आमची कहाणी तर ती छापील अक्षरात लोकांपर्यंत जाईल.कादंबरी सारखी कादंबरी.कल्पनेच्या भराऱ्या घेत रचलेली साहित्यकृती.रविंद्रनाथ ठाकुरांची साहित्यकृती..!!
मी मात्र कुठे छापून जगा समोर आणण्यासाठी नाही लिहीत आहे.उलट लिहून लपवून ठेवण्यासाठी लिहीतेय.त्यांना लिहीलेल्या या साऱ्या चिठ्ठ्या मला माहित आहे माझ्या चितेबरोबर जळतील.कधी कुणीही शोधून त्या वाचण्याचे कष्ट घेणार नाही.
- माझ्या विवाहानंतर काही वर्ष ते शिलाईदह च्या जमींदारीच्या देखभालीत व्यग्र होते.कथा,कादंबरी,कविता,गाणी लिहीणं तर चालूच असतं.त्यांचं कार्य आणि ख्याती दिवसेंदिवस वाढतच होती.मला त्यातलं काही समजतही नाही.लांब राहून त्यांचं शुभचिंतन करणं एवढंच मी करु शकते.इतके दूर आहेत ते.मला अजबच वाटतं त्यांच्या विषयी.किती दिवस झाले बघितलंच नाहीय त्यांना.पण वाटतं माझ्यापासून दूर आहेत म्हणजे छानच असतील.आपल्या मनासारखं काम करायला मिळतंय त्यांना.जोडासांकोच्या वाडीत बायका-बायकातल्या लावालाव्या आणि भांडणांना अंतच नाही.सगळ्या आपापल्या स्वार्थ साधण्यात मग्न असतात.मी पण त्यातलीच एक होऊन राहिलीय.कधी कधी वाटतं संसाराचा गाडा काय माझा एकटीचाच आहे?- ते कधीच सोबत असणार नाहीत कां माझ्या? - मी या घरची गृहस्वामिनी आहे.छोटी सून असले तरी.त्यांना इथल्या अडचणी सांगून काही उपयोग नाही.ते दिवसरात्र पूर्व बंगालच्या नद्यांमधून विहार करत फिरताहेत.पद्मेच्या किनारी एका अज्ञात प्रांता जवळ नौकेवरच ते दिवस काढतायत.कधी इच्छामतीवर,कधी दीर्घा नदीतल्या पथावर तर कधी सूदूर नोयालांग मध्ये एकाकी..! त्यांच्या बरोबर संपर्क होणं कठीणच आहे.कधी असं होतं की पत्र कालिग्रामवरुन येतं पण नंतर कळतं की ते नाटोर मध्ये आहेत.कधी पतीसर,कधी कुष्ठिया मध्येही असतात.मी मात्र पंधरा वर्ष झाली जोडासांकोच्या वाडीची दायी म्हणून राबतीय.त्याशिवाय दुसरा उपायच नाहीय.वाडीची मोठी सून सर्वसुंदरी खूप दिवसांपूर्वी मरता मरता वाचलीय.मोठी सून म्हणजे द्विजेंद्रनाथांची पत्नी.माझी मधली जाऊ सत्येंद्रनाथांची पत्नी, ज्ञानदानंदिनी,फाॅरेन रिटर्नड आहेत.पहिल्या भारतीय आयसीएस ची पत्नी असल्यामुळे ती जोडोसांकोचा परिवार सोडून साहेब लोकांच्या इलाक्यात पार्कस्ट्रीट मध्ये राहते.मोठ्या लोकांचं सगळंच मोठं.बाबा मोशाय पण आजकाल कलकत्त्याला आले की तिथेच राहतात.मधल्या जाऊबाईंना एक मुलगा,एक मुलगी आहे.सुरेन आणि इंदिरा.अजून एक मुलगा झाला होता त्यांना.दिसायला अतिशय देखणा.कविंद्र त्याचे नांव.तो दोन वर्षाचा असतानाच गेला.विलायतेतली थंडी सोसली नाही त्याला.
-आता माझ्या धाकट्या जावेची नीपमयी विषयी सांगते.तिचे पती हेमेंद्रनाथ वयाच्या चाळीशीतच निवर्तले.अकरा मुलांची ही विधवा कुटुंबापासून वेगळी राहू लागली.माझी आणखीही एक जाऊ आहे.माझ्या सासऱ्यांचे चौथे पुत्र वीरेंद्रनाथ यांची बायको प्रफुल्लमयी.प्रफुल्लमयी नीपमयीची छोटी बहीण आहे.वीरेंद्रनाथांनी नीपमयीच्या या लहान बहिणीशी केवळ याच कारणासाठी लग्न केलं कारण तिचे वडिल हरदेव चाटुर्ज्या सासरेबुवांचे भक्त होते.अशा रितीने भक्ताच्या दोन्ही कन्यांशी दोन्ही मुलांचे विवाह करुन ते घरी आले.पण दैवाला हे सुख बघवलं नाही.अचानकच एक दिवस प्रफुल्लमयीचे पती वीरेंद्रनाथांना वेड लागलं.तुमच्या रवि ठाकुरांनी एक दिवस मला हसून म्हटलं-
" माझे दादा ठार वेडे झालेत आणि मी हाफमॅड.."
" राम-राम..हे काय भलतंच? "
तर म्हणाले," कवी जरा वेडेच असतात ना.."
वीरेंद्रनाथांना वेडाचे झटके येऊ लागले तेंव्हा त्यांच्या एकुलत्या एक बलेंद्रनाथाचा जन्म झाला.पण एकोणीसाव्या वर्षी त्याचं निधन झालं.बलूनी मला संस्कृत,इंग्रजी,भाषा शिकवल्या.माझा चांगला मित्र होता.त्याच्या मृत्यूनंतक्ष मी जास्तच एकटी पडले.बलू विषयी जेवढं सांगता येणं शक्य आहे तेवढं नंतर सांगणारच आहे.आत्ता तर मी जोडोसांको च्या वाडीतील एकाकी जीवना विषयी सांगायला बसलीय.रवि ठाकुर सोबत असावेत असं खूप वाटायचं पण सगळं आयुष्य त्यांच्या शिवायच कंठावं लागलं.एकाकीपणाची परिसीमाच होती ती.बलूच्या मृत्यू नंतर सासरेबुवांनी अत्यंत निष्ठूरपणे वीरेंद्रनाथांना पैतृकसंपत्तीतून बेदखल केलं.कारण काय दिलं तर त्याचा कुणी वारस उरला नाही आणि ते तर वेडेच आहेत.पण त्यांच्या मृत्यूनंतर वैधव्यात दिवस काढणाऱ्या प्रफुल्लमयीचा त्यांनी फार विचार केला नाही.तिला दरमहा फक्त शंभर रुपये मिळतील अशी व्यवस्था केली.मला हे अजिबात आवडलं नाही.प्रफुल्लमयी तुटपुंज्या पैशात प्रपंच ओढता ओढता अक्षरश: मोडून पडली.जोडासांकोच्या परिवाराच्या समस्या दिवसेंदिवस वाढून जटील होत राहिल्या.
- प्रफुल्लमयीवर हा घोर अन्याय आहे असंच मला वाटत होतं.पण तुमच्या रवि ठाकुरांनी त्याचं समर्थन केलं.एका पत्रात त्यांनी लिहीलं-
" आपला एकुलता एक मुलगा गमावल्या नंतरही ही बाई पैसा,इस्टेटीची कागदपत्र,खरेदी-विक्री असल्या बाबतीत गुंतलीय याचं सगळ्यांना आश्चर्य आणि तिरस्कार वाटतोय..मला वाटलं होतं यांना राग येईल.पण यांचं सगळं उलटंच.ते म्हणाले-
" मानवी स्वभावाची विसंगती लक्षात घेऊन वहिनीच्या हावऱ्या मनोव्यापारांकडे शांत,तटस्थपणे पाहण्याचा मी प्रयत्न करतोय.."
-मला प्रथमच नवऱ्याच्या या पत्राला तडकाफडकी उत्तर लिहावं असं वाटलं.त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा होता.पण नाही विचारला.धाडसच झालं नाही.माझ्या या सैरभैर पण सच्चा आत्मकथेत रवि ठाकुरांसाठी तो एक प्रश्न समोर ठेवतीय-
" तुमचा ठार वेड्या भावाचा एकुलताएक मुलगा बलू गेला तेंव्हा तो मागे आपली पंधरा वर्षाची विधवा पत्नी ठेवून गेला होता ही गोष्ट तुम्ही विसरलात कां? - त्या विधवा मुलीच्या सहानाच्या पालनपोषणाची जबाबदारी छोट्या जाऊबाईंवर,प्रफुल्लमयींवर नव्हती कां?- तुमचे मोठे बंधू ही गोष्ट कशी विसरले?- त्यावर तुम्ही एका अक्षरानंही त्यांना बोलला नाहीत.तुमच्या अशा वागण्याचं जेवढं आश्चर्य वाटतंय त्याहून जास्त लाज वाटतीय मला..!
- याच सुमारास एक घटना घडली अगदी माझ्या डोळ्यासमोर.
सहाना आपल्या वडीलांकडे गेली.तिचे वडील फकीर चाटुर्ज्या मोठी आसामी होती.त्यांनी लगेचच आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह करण्याचा प्रयत्न करु लागले.सहाना बाराव्या वर्षी बलू ची पत्नी म्हणून या घरात आली.तीन वर्षात तिला मूलबाळ झालं नव्हतं ही एक चांगली बाब होती.बाबा मोशाय ना म्हणजे आमच्या सासरेबुवांच्या कानावर ही बातमी पडताच त्यांचा जळफळाट होऊ लागला.कारण ते विधवा विवाहाचे कट्टर विरोधक होते.घरातल्या एका बारा वर्षाच्या विधवा मुलीचं लग्न झालं तर त्यांच्या घराण्याच्या प्रतिष्ठेला तडा जाईल.हा विवाह थांबवून सहानाला परत जोडासांकोच्या वाडीतील कैदखान्यात डांबण्याचं महत्कार्य(?) करायला सासरेबुवांनी तुम्हाला पाठवलं.वडीलांची आज्ञा शिरसावंद्य मानून तुम्ही सुद्धा लगेच गेलात.कारण त्यांच्या पुढे तोंड उघडायची हींमत फक्त तुमच्या मधल्या मोठ्या भावामध्ये होती हे मी पाहिलंय.तुम्हा भावांमध्ये तेच एक आधुनिक विचाराचे होते.याचं एकमेव कारण म्हणजे ते भारतातले पहिले आय.सी.एस.अधिकारी होते.मोठ्या पगाराची नोकरी त्यांना होती.ते आपल्या बापकमाईवर अजिबात अवलंबून नव्हते.माझ्याशी लग्न केलंत तेही फक्त वडीलांची आज्ञा म्हणून.आपल्या लेकीचा, सहानाचा पुनर्विवाह मोडायला गेलात तेही वडीलांची इच्छा म्हणून.बरोबर ना?- कां केलंत माझ्या बरोबर लग्न?-बोला.
तुम्ही दु:खात पडलात,आणि मी?-माझं जाऊदे..म्हणजे आत्ता लगेच नको.पुढे बोलायच्याच आहेत सगळ्या गोष्टी.मला जे सांगायचं होतं ते हेच की तुम्ही अलाहाबादला नक्की कशासाठी चालला आहात हे मला स्पष्टपणे सांगितलं सुद्धा नव्हतं.मी विचारलं होतं.तेंव्हा तुम्ही म्हणालात-
" सहानाच्या घरी एक दिवस जावं लागणार आहे."
" सहानाच्या वडीलांच्या घरी?-ते तर अलाहबादेत असतात.त्यांच्याकडे जायची काय आवश्यकता आहे? "
" बाबा मोशाय चा आदेश आहे.."
" तिला बिचारीला इकडे खूप एकटं,एकटं वाटत होतं.सारखी रडायची..! "
" सुरुवातीला रडणारच.खूप लहान वयात वैधव्य आलं तिला.पण तुम्हाला सांगू कां छोट्या सूनबाई, हळूहळू सवय होते माणसाला.ँँ
या घरात इतकी सारी माणसं आहेत.तिला माणसांच्या सोबतीची गरज आहे. "
" म्हणजे तिला परत इकडे आणणार आहात? "
" बघतो.."
" वडीलांकडे तिला बरं वाटत असेल तर राहू दे ना तिथे..आत्ता लगेच आणायलाच हवं कां? "
" तुम्हाला नाही समजणार,छोट्या सूनबाई.सहाना ठाकुरवाडीची सून आहे.तिचं स्थान इथे आहे.तिचं मन दुसरीकडे लागत असेल तर ते तिच्या भविष्याच्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही."
-मला नंतर बाकी लोकांकडून कळलं की सहानाला इकडे आणण्याची एवढी घाई कां करत होतात.
*
बाबामोशाय आयुष्यभर विधवा विवाहाला विरोधच करत आले.पण तुम्हाला तुमचं मत होतं ना?- कितीवेळा तरी तुम्ही मला सांगितलंय की विधवा विवाहाचे तुम्ही समर्थक आहात.पण वडीलांच्या विरोधात एक शब्द सुद्धा बोलायचं कधी धाडस केलं नाहीत तुम्ही.माझी तुमच्यावर श्रद्धा आहे.नितांत प्रेम आहे तुमच्यावर.म्हणूनच तुम्ही तिला गोड गोड बोलून जोडोसांकोच्या वाडीला आणायला म्हणून अलाहाबादला गेलात तेंव्हा मला अपार यातना झाल्या.इतकच नाही तर फार लाज वाटली मला.
-मला माहित होतं.सहानाच्या वडीलांकडे तुमचं म्हणणं मान्य करतील.सहाना तर एक लहान अबोध मुलगी तिला कसलं आलंय मतबीत.मला जराही शंका नव्हती.तुम्ही तिला आणायला चाललाय म्हणजे घेऊनच येणार.तिचं उर्वरीत आयुष्य विधवा म्हणूनच तिला कंठावं लागणार.तुमच्याबरोबर बोलून,तर्कवितर्क लढवून आपलं म्हणणं कोण तुमच्या गळी उतरवू शकणार?- तुम्ही भाषेचे देवच आहात.तुमच्या बोलण्यातली जादू मी कितीवेळा तरी अनुभवलीय.
- एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलीच.मी कृतघ्न नाहीय,हे सांगायलाच हवं.जेंव्हा जोडोसांकोच्या वाडीत मी एकटीच रहात होते तेंव्हाची गोष्ट आहे.घर सांभाळता संभाळता माझी कुत्तर-ओढ होत होती.तेंव्हा माझी मोठी नणंद हातभार लावायला थोडे दिवस सोबत होती.थोड्याच दिवसात तिच्या लक्षात आलं की हे काम साधंसोपं नाही.जास्त काळ नाही टिकली.वाटलं पडद्या मागून बाबा मोशायनीच सूत्र हलवली असणार.या मागे ज्ञानदानंदिनीचा काही हात नसेल असा विचार पण आला नाही मनात.
*
बाबा मोशाय आजकाल कलकत्त्याच्या प्रवास काळात पार्कस्ट्रीटच्या घरातच मुक्काम करतात.जोडोसांकोला फिरकत नाहीत.माझी मोठी नणंद बाबा मोशायांची सेवा करायला पार्क स्ट्रीटच्या घरी गेली.बाबा मोशायांना पण मोठी मुलगी जवळ होती.म्हणून जोडोसांकोचा सगळा भार माझ्या खांद्यावर टाकून नणंदबाईंनी वडीलांच्या आज्ञा पालन करायच्या कामा बाबत जरासुद्धा कांकूं केली नाही.
त्यावेळी पार्कस्ट्रीटचं घर ऐश्वर्याने झगमगत होतं.जे मोठे दीर माझ्या पती इतकेच देखणे व गुणवान होते ते ज्योतींद्रनाथही तिथेच होते.पण आपल्या पत्नीच्या कादंबरीदेवीच्या आत्महत्येनंतर ते कसे तरी दिवस काढत होते.ते मधल्या वहिनीच्या खूप जवळचे झाले.पण तुमच्यापासून मात्र दूर होत गेले.याचं कारण मला हळूहळू समजू लागलं होतं.तुम्ही मात्र मला काही सांगितलं नाहीत.एवढी वर्ष झाली लग्नाला पण तुमचा तिच्याकडे असलेला ओढा जराही कमी झाला नाही. बरच काही जाणता.एवढी साधी गोष्ट लक्षात नाही आली तुमच्या?-
तुमच्या अनोख्या आणि अद्वितीय ज्योतिदादांचा विषय निघाला म्हणजे तुमच्या प्राणप्रिय नोतुन बोठानची गोष्ट ओघाने येणारच.पण त्या विषयात मी जास्त काही बोलू इच्छित नाही.तुम्ही तिचा विषय माझ्यापासून लपवलेला आहे तर तो तसाच राहू दे.पण अगदीच काही सांगितलं नाही मला असंही नाही.तुम्ही तुमच्या पद्धतीनी जवळ जवळ सगळंच सांगितलंय.तुम्हीच एक असे आहात की सगळं सगळं सांगता पण खुबीनं लपवताही ते सगळं..
*
तुम्ही सांगितलं होतं मला नोतुन बोऊठावर तुमचं खूप प्रेम आहे.ती पण तुमच्यावर तितकं प्रेम करते हेही सांगितलं होतत.त्याच नोतुन बोऊठाननी आपल्या दोघांच्या विवाहानंतर काही महिन्यातच आत्महत्या कां केली?- असं कोणतं दु्:ख छळत होतं त्यांना?
त्यांनी आत्महत्या केली तेंव्हा मी दहा वर्षाची होते.काहीच समजू शकत नव्हते.एक दृश्य फक्त आठवतं.तुम्ही आणि तुमचे ज्योतिदादा दोघे नोतुन बोऊठानला दक्षिणेकडच्या व्हरांड्यात चालवत होतात.ती समोर झोक जाऊन झोपू पहात होती.तुम्ही तिला जागी ठेवण्याचे प्रयत्न करत होतात.पण असफल ठरले तुमचे प्रयत्न.मला त्या लख्ख आठवतात.ठाकुरवाबीतल्या इतर सुनांपेक्षा त्यांचा रंग सावळा होता.माझ्याही पेक्षा सावळा.पण त्याच सर्वात सुंदर होत्या.त्यांच्या बरोबर फार संबंध नाही आला माझा.त्या खोलीच्या बाहेर कधी पडायच्याच नखहीत.तुम्ही पण कधी मला त्यांच्या खोलीत घेऊन जायचा नाहीत.एकटेच जायचात.खूप वेळ नोतुन बोऊठान सोबतच असायचात.तिथून परत यायचात तेंव्हा तुमचं मन कुठेतरी हरवलेलं असायचं.मी तुमची बायको खोलीत आहे याचंही तुम्हाला भान नसायचं.एकदा धाडस करुन विचारलं-
" एवढं काय बोललात तिच्याशी?"
तुम्ही काहीच उत्तर दिलं नाहीत.एकदा मी म्हटलं-
" मला एकटीला त्यांच्या खोलीत जायला भिती वाटते.तुम्ही एट दिवस घेऊन जा मला त्यांच्याकडे.."
-तुम्ही म्हणालात,मला एकट्याला राहूदे.तू तिला समजू शकत नाहीस.नोतुन बोऊठानच्या आत्महत्येच्या प्रयत्ना नंतरही ती दोन दिवस जिवंत होती.त्या खूप आजारी होत्या.मी विचारलं-
" काय झालंय त्यांना?.."
" डाॅक्टर बघतायत..भयानक बेहोषी आहे.
एक धडधाकट जीवंत माणूस,एवढ्याशा लहान वयात आत्महत्या करतं.कां? सगळे.गप्प आहेत. कुणाला काही माहीत नाही.पण उडत उडत एकेक गोष्टी माझ्या कानावर येत होत्या.नोतुन बोऊठान आणि रवि ठाकुर हे दोघेही साधारण सारख्याच वयाचे होते.नोतुन दोन वर्षानी मोठी होती आणि या वाडीत माझ्या पती शिवाय त्यांचा दुसरा कुणी मित्र नव्हता.त्या दोघातले नाते मला हळूहळू अनुभवाला येत होते.सावकाश किरण फुटून सकाळ होते तसे ते नाते मला लख्ख दिसत होते.
*
ज्या दिवशी त्यांची नोतुन बोऊठान गेली.त्या दिवशी खूप रात्र झाली तरी आमच्या खोलीत आलेच नाहीत.कुठे होते ते? - मी दबक्या पावलाने गच्चीवर जाऊन पाहिलं तर ते गच्चीवर फेऱ्या मारत होते आणि आकाशाकडे पहात विचारत होते-
" कुठे आहेस तू नोतुन बोऊठान?..तू परत ये.तुझ्याशिवाय मी कसा जगू? "
मी या आधी कधीही त्यांना इतकं शोकमग्न,व्याकूळ वैफल्यग्रस्त पाहिलेलं नाही.त्यांना तसं पाहून मी रडत रडत खाली आमच्या खोलीत आले.
- मी विवाहानंतरच्या शिलाईदहतील एका घटनेच्या आठवणी सांगायला सुरुवात केली होती.पण ती घटना घडून गेली आणि लिहीता लिहीता कुठे येऊन पोहोचले.आमच्या लग्नानंतरच्या दोनतीन महिन्यात.लेखक नाहीय ना, त्यामुळे असं होतं.कुठलाही प्रसंग कुठेही येऊन बसतोय.पण असं झालं म्हणून काय झालं?- कोण छापणार आहे आणि कोण वाचणार आहे?- विरंगुळा म्हणून लिहीतीय.मना गोष्टींचा डोंगर रचून काय फायदा?- लिहून टाकलं तर मन हलकं होतं एवढंच.मनातलं दु:ख,यातना काही कमी होत नाहीत.
- त्या दिवशी अचानक पाऊस कोसळू लागला.आषाढातला संततधार पाऊस.त्यांनी लिहीणं थांबवलं आणि उठून खिडकी जवळ जाऊन बसले.नेहमीचं आहे हे. पावसाशी त्यांचा अद्भूत गंभीर संबंध होता.पाऊस आणि ते एकमेकांशी जणू बोलतात अगदी खोल मनातलं सगळं बोलतात.परस्परांना समजून घेतात.पावसाशी असं अनोख बंधुत्व मी अनेक वेळा पाहिलंय.शांतिनिकेतन मध्ये पाहिलंय,शिलाईदह,साजादपूर मधे पाहिलंय.वृष्टी सुरु झाली ते मेघांकडे एकटक पाहात राहतात, मेघाच्छादित आकाशात कुठेतरी हरवून जातात.अशावेळी ते एक वेगळाच माणूस होतात.संसारापासून विलग अलिप्त माणूस..!! गीत लिहीताना सुद्धा हीच अवस्था.दुसरं काही लिहीत असले की थोडेफार बोलणे होऊ शकायचं.पण पाऊस आणि गाण्या बरोबर ते अगदी एकाकार होऊन जायचे.तेंव्हा ते आमचे कुणीही नसायचे.मी किती भाग्यवान आहे..! दोन्ही भावमुद्रांमध्ये मी अगदी जवळून त्यांना कितीवेळा तरी बघितलंय..!! मी त्यांच्या निकट उभी आहे.ते हरवलेले आहेत.टेबलावर त्यांचं लिहीण्याचे कागद.पेन.काय लिहीत होते ते?- लिहीणं थांबवून खिडकी जवळच्या खुर्चीत बसलेत.टेबल जवळ जाऊन बघते तर मोत्यासारख्या अक्षरात इंदिराला एक पत्र लिहीतायत.कुठेही जराशी सुद्धा खाडाखोड नाही.मनातल्या सगळ्या गोष्टींचा एक शब्द प्रवाह कागदिवर उतरलाय असं वाटत होतं.पूर्ण पत्र माझ्या लक्षात नाही.पण त्याचा आशय लक्षात आहे.ज्यांच्या अनुभूति अत्यंत सीमित असतात,चिंतनाची खोल डूब नसते,ज्यांच्या कार्यक्षेत्राचा परीघही खूप छोटा असतो,त्यांच्या संसर्गाने मनाला काडीचही सुख मिळत नाही.अगदी हेच शब्द नसतील पण मुख्य आशय हाच होता.
-पत्राच्या शेवटी त्यांनी लिहीलं होतं- " आपल्या संपूर्ण जीवनाची सार्थकता जिथे आहे तिथे प्रेमाचा एक स्पर्श,एका माणसाच्या साहचर्याची उब मिळणं अत्यंत आवश्यक आहे.नाहीतर त्यावर उमलणाऱ्या फुला-फळांमध्ये रंग,गंध रसाचा प्रवाह निर्माण होत नाही.ही वाक्य अशी मनाला लागली की लक्षात राहिलीत कायमची.त्यांनी मला इतकं भावपूर्ण पत्र कधीच लिहीलं नाही.कसे लिहीतील?- मी अशा पत्रांसाठी,अशा भावनांची भाषा समजायला पात्र थोडीच आहे?-मी काय जीवनातल्या प्रत्येक बऱ्यावाईट प्रसंगात प्रेमाचा स्पर्श देणार?-मी काय साहचर्याची उब देणार?- समजा दिली,तरी माझ्यासारख्या सामान्य मुलीच्या प्रेमाचे मुल्य तरी कितीसे ?
- एकदा मनात आलं.त्यांच्या जवळ जाऊन उभं रहावं.त्यांच्या भावविश्वात बळेच प्रवेश करावा आणि स्पष्ट,खणखणीत स्लरात विचारावं, " खरं खऱं सांगा कां माझ्याशी लग्न केलंत?" - पण नाही विचारु शकले.विचारु शकले असते तर मी एक वेगळीच मुलगी झाले असते.किंवा असंही झालं असतं असा रोखठोक प्रश्न विचारल्यामुळेच त्यांच्या प्रेमाला योग्य झाले असते. मी गुपचूप त्यांच्या खोलीतून बाहेर आले.तुम्ही कां केलं असत़त लग्न माझ्याशी?- हे प्रिय रविंद्रनाथ,अखेर कां तुम्हाला हा प्रश्न कां विचारावासा वाटला मला?- या प्रश्नाचं उत्तर,खरं उत्तर तुम्ही कधीच देऊ शकला नसतात.खरं स्विकारणं तुम्हाला शक्यच नव्हतं.पण मला माहीत आहे कां तुम्ही तुमच्या घरी नोकरी करणाऱ्या एका गरीब बापाच्या अतीसमान्य दहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलंत.तेंव्हा तुमचं वय होतं होतं तेवीस वर्षाचं.त्यावेळी नोतुन बोऊठान- म्हणजे तुमच्या जीवनातला एकमेव प्रेमाचा आधार होता.तुमची ध्रुवतारा-ऐन पंचवीशीतली तुमची वहिनी- तिला सोडण्याशिवाय तुम्हाला दुसरा मार्ग नव्हता.म्हणून विवश झालात माझ्यासारख्या लहान मुलीशी लग्न करायला.मी काय देऊ शकणार होते तुम्हाला? - तुम्हाला हवं तरी काय होतं तुमच्याकडून?-तुम्ही कां लग्न केलंत माझ्याशी हे मला थोडं थोडं समजायला लागलंय.तुमच्या जीवनात माझं स्थान काय हेही मी समजून घेतीय.नोतुन बोऊठान बरोबर तुमची मैत्री म्हणा,संबंध म्हणा,प्रेम म्हणा किती खोल आणि गंभीर होतं हेही मी हळूहळू समजून घेत होते.
-दुसऱ्या वेळेस बॅरीस्टर होण्यासाठी तुम्ही परदेशात जाणार हे कळल्या बरोबर नोतुन बोऊठाननी आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला.त्यांनी आत्महत्त्या केली कारण ठाकुरवाडीत तिचं कुणाशीही जमत नव्हतं.माझ्यासारखी ती पण तुमच्या एका कर्मचाऱ्याची मुलगी होती.त्यांच्यात आणि भाऊजीं मध्येही दहा वर्षाचं अंतर होतं.त्यांना तुमच्या दादांची बायको म्हणून कुणीही स्विकारायला तयार नव्हता.तुमच्या नोतुन दादांना सुद्धा ती पसंत नव्हती.तुम्ही तिचे एकमात्र मित्र होतात.त्यांचे एकुलतेएक मनमीत.तुमच्या बरोबरच जुळला होता त्यांचा मधुर संबंध.तुम्ही जेंव्हा पहिल्यावेळेस परदेशात गेलात तेंव्हा तुम्ही सतरा वर्षाचे होतात.नोतुन बोऊठान होती वीस वर्षाची.तुम्ही दिड वर्षासाठी तिला सोडून दूर गेलात.तुमच्या अभावाच्या जगात दु:ख आणि पीडा ती भोगत होती.नव्या देशात,नित्यनव्या अनुभवातून जाताना तुम्हाला मात्र तिच्या विरहाची पीडा सहन करावी लागली नाही,रवि ठाकुर..!!
- मी जसजसा विचार करत गेले तसतसे नवनवे सत्य समोर येत होते.माझ्या डोळ्या पुढचा पडदा हळूहळू हटत गेला..अगणित सोपान पार करत करत तुमच्या आणि माझ्या संबंधा मागच्या वास्तवाकडे मी पाहू शकत होते.
एक नग्न सत्य -
परदेशी जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मधल्या बंधूंकडे गेलात.परदेशात जाण्याची पूर्व तयारी ते तुमच्याकडून करुन घेणार होते.म्हणजे काय करणार होते?- तर विदेशात राहून देखील देशी मद्यात भिजवू शकतील अशा मुलीं बरोबर तुमच्या ओळखी करुन देऊन तुमची तयारी करुन घ्यायची.तुमच्या मधल्या बंधूंचे एक मित्र डाॅ.आत्माराम पांडुरंग यांच्या घरी तुमची राहण्याची सोय केली होती.आत्मारामांची कन्या नुकतीच विलायतेहून आली होती.ही मराठी मुलगी तुम्हाला विदेशी बोली,त्यांच्या समाज जीवनाचे कायदेकानून शिकवणार होती.पण ही मुलगी तुमच्या प्रेमात पडली.तुमच्या कोण नाही प्रेमात पडणार?-तिचं ठिक आहे,पण तुम्ही सुद्धा तिच्या प्रेमात पडलात.तिचं नांव होतं आना पण तुम्ही प्रेमानं तिला नलिनी म्हणायचात.तुमचा 'कवि काहिनी' हा काव्यसंग्रह तुम्ही तिच्यावर,तिच्यासाठीच तर लिहीलात.तुमच्या मोठ्या बंधुंनी आपल्या लग्नानंतर माझं भवतारिणी हे माहेरचं नांव बदलून मृणालिनी असं ठेवलं.मृणालिनीच कां?- हे मला नंतर कळलं.माझं नांव घेताच तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची,नलिनीची आठवण यावी म्हणून माझं नांव ठेवलं मृणालिनी..! मी एका दुसऱ्याच मुलीचं प्रतिबिंब म्हणून तुमच्या जीवनात प्रवेश केला.पहिल्यापासूनच माझं काहीसुद्धा राहू नाही अशी व्यवस्था करण्यात आली.माझी ओळखच पूर्णपणे ठाकुरांनी पुसून टाकली.अर्थात नलिनीला विसरायला तुम्हाला फार वेळ लागला नाही.नलिनी विषयी तुम्हीच मला कितीतरी गोष्टी सांगितल्यात..
- या नलिनीनीच तुम्हाला एका चांदण्यारात्री तुमच्या पलंगावर बसून म्हटलं," माझा हात ओढ..चल टग-आफ वाॅर खेळू.कोण जिंकतेय पाहू.." नंतर या मुलीनं आपला हातमोजा काढून तुमच्या समोर ठेवला आणि म्हणाली," जिंकलास तर माझं चुंबन घेण्याचा तुला अधिकार मिळेल.केवढं हे साहस..! बाप रे..! अनोळखी पुरुषाबरोबर असं बोलण्याचं धाडस मी करु शकेन कधी?- तुम्ही तिच्या प्रेमात पडलात खरे पण विलायतेत गेल्यानंतर तिथल्या मेमसाहेबां बघून नलिनीला थोड्याच दिवसात विसरलात.जरी 'कवि काहिनी' आणि 'भग्नहृदय' हे दोन्ही काव्यसंग्रह तिच्यावरच लिहीले होते.नलिनीला कुणाच्या प्रेमात पडल्यामुळे विसरलात? -तर लूसी स्काॅटने मोहिनी घातली म्हणून. लंडन मध्ये ज्यांच्याकडे तुम्ही रहात होतात त्यांची सर्वात धाकटी मुलगी म्हणजे लूसी.तिच्याबरोबर सुरु झाले तुमचे गाणे-बजावणे आणि प्रेम.फक्त लूसीच नाही.तुमच्या तोंडूनच ऐकलीयत कितीतरी मुलींची नावं.मिस लंग,मिस,विलियम,मिस मूर वगैरे,वगैरे.या नव्या मुलींबरोबर नृत्य करायला मला काहीच अडचण आली नाही असं तुम्ही नोतुन बोऊठानलाही सांगितलं होतंत.म्हटला होतात, जिथे पाय टाकीन तिथे या विलायती स्त्रिय-पुरुषांची नृत्य-संगीताची मैफल असायचीच.जिकडे पाहावं तिकडे सुंदर सुंदर मुली पाहून डोळे दीपून जायचे.सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू..हसता हसताच पुरुषांच्या मनाचा ताबा घेण्यासाठी विविध क्लृप्त्या आणि नखऱ्यांचा बिनदिक्कत वर्षाव कसा करायचा यात सगळ्या पटाईत असतात.नृत्य-संगीताच्या कक्षातली जमीन इतकी गुळगुळीत असते की पाय हवे तसे हलवायला कोणतेच कष्ट पडणार नाही.पाय आपसूकच थिरकू लागतात..!
- मला कसं माहीत?- तुमच्या नोतुन बोऊठानला हे सगळं लिहीलं होतंत की तुम्ही..! ही सगळी पत्र मुद्रीत अक्षरात आहेत.तुम्ही तिला लिहीलंय- या सगळ्या मुलींपैकी कुणाकडून प्रेमाची उब मिळाली,कुणाबरोबर वनविहार केलात,कुणासमवेत नृत्य केलंत,कुणा मुलीच्या सुरातसूर मिसळून गायलात,कुणी स्पर्शसुखात भिजवून टाकलं तर कुणी मानसिक समाधान दिलं.
- तुम्ही स्वत:च लिहीलंयत की आपलं व्यक्तिमत्त्व फार काही रुबाबदार नाहीय हे तुम्हाला परदेशात गेल्यावर कळलं.तुम्ही मान्य केलंयत की तुम्ही जरा उशीराच मोठे झालात.विलायती मुलींमुळे तुम्ही प्रौढ झालात.बरोबर ना?
- मी त्यावेळेला तुमच्या जीवनापासून खूप दूर होते.फुलतुली गावातली पाच वर्षाची कन्या होते मी.पाच वर्षानंतर तुमच्याशी माझा विवाह झाला.विचार करा.किती असंभव आणि अवास्तव घटना होती ती.खरं ना?
एका बाजूला तुमच्या जीवनात ध्रुवताऱ्यासारखी चमकत होती नोतुन बोऊठान- कादंबरीदेवी.तर दुसऱ्या बाजूला शरीर मनानी तुम्ही विलायतेत व्यग्र होतात.विलायती मुलींचा सहवास मिळत होता.नलिनी सारखी मराठी मुलगी तुम्हाला चुंबनाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी आव्हान देत होती.कुणी मुली तर तुम्हाला वश करायला नानाप्रकारे प्रयत्न करत होत्या- हे सगळं सोडून तुम्ही माझ्याशीच कां लग्न केलंत?-अखेर कां केलंत अस़ं रवि ठाकुर..! कां?-बोला..!!
- या 'कां' चं उत्तर तुम्ही दिलं नाहीत मला.तुम्ही देऊ शकला नाहीतच पण कुणीच देऊ शकलं नाही.पण नंत या 'का' चं उत्तर ठाकुरवाडीतल्या महिलावर्गाच्या डोळ्यांच्या संकेतांतून,एक दुसरीला मारलेल्या कोपरखळ्यातून,चेष्टा- मस्करीतून,आणि कुजबुजीं मधून जगजाहीर होत होतं..!! पट्टीच्या पोहणाऱ्याने अथांग सागरात डुबकी मारुन माणिक-मोती मिळवावेत तसे मी माझ्या गहन व्यथेचा नीलममणी मिळवला- माझ्या 'कां'? चे उत्तर.
(प्रकरण २ रे समाप्त)
Comments
Post a Comment