मी रविंद्रनाथांची पत्नी ८
मी रविंद्रनाथांची पत्नी
------------------------------
८.
माझी जीवनयात्रा जवळ जवळ संपतच आली आहे.अठ्ठावीस वर्षाचे आयुष्य.त्यातली १९ वर्ष काढली रविंद्रनाथांची पत्नी म्हणून.त्यातली १० वर्ष पाच शावकांना जन्म देण्यात गेली.आमच्या मुलांच्या बाबतीत शावक हा शब्द तेच वापरत असत.त्यामुळे मी पण तसं लिहीण्याचं धाडस करतीय.आणखीही एक पोटात वाढत होता,पण त्याच काळात पडले आणि ते बाळ दगावलं,माझा सर्वनाश झाला.मला ठावुक आहे माझा हा रोग बरा नाही होणार.शरीर खंगत चाललंय.शरीराचा तरी काय अपराध..! एकोणीस वर्ष या शरीरानी आणि मनानी काय काय सहन केलंय त्यालाच माहीत.शरीराची जी काही दशा झालीय त्यावरुन मला नाही वाटत मी आणखी काही दिवस लिहू शकेन.एक तर चोरुनमारुन, गुपचूप लिहीतीय..कुणी पाहिलं तर मग हे सगळं लेखन नष्ट झालंच समजायचं. लिहू पण शकत नाहीये.दृष्टी हळूहळू क्षीण होऊ लागलीय.सगळं धूसर दिसतंय.सगळं शरीर तापलंय.हरघडी घशाला कोरड पडतीय. इतका अशक्त पणा आलाय की विचारुच नका.डाॅक्टर म्हणाले, एवढा रक्तस्त्राव होतोय की शरीरात रक्तच राहणार नाही.असं ऐकलंय की शांतिनिकेतन मध्ये आवश्यक ते उपचार होऊ शकणार नाहीत.पण जे काही उपचार झाले ते शांतिनिकेतन मध्येच. होमिओपॅथीक चिकित्सा.औषधं बदलण्याचे नाना प्रयोग चालू आहेत.आता मला कलकत्त्याला नेणार म्हणतायत.कलकत्त्यात जोडासांकोच्या ठाकुरवाडीत राहून काय आणि किती लिहू शकणार देव जाणे..!
*
माझ्या लग्नानंतर घरात जसा काही उत्सव सुरु झाला.कोणता उत्सव?- नोतुन बोऊठानच्या शयनगृहाची एकदम नवीन सजावट सुरु आहे. कां?- कारण नोतुन बोऊठानची मन:स्थिती चांगली नाही.त्यांना नैराश्याचा आजार जडलाय. त्यांचं शयनगृह सजवून त्यांना व्याधीमुक्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे.कशा प्रकारे सजवताहेत त्यांचं शयनगृह?- ज्ञानदानंदिनीच्या पसंतीने सगळं चाललंय आणि हे कोण करतंय तर ज्ञानदानंदिनीचे प्रिय देवर ज्योतिंद्रनाथ.
*
माझ्या पतीने एकदा चिडून म्हटलं,घरात हे सगळं काय चाललंय?- जिची मन:स्थिती सुधारावी म्हणून हे जे चाललंय ते तिला आवडतंय कां,याचा विचार कुणालाही नाही. भिंतींना दिलेला भडक रंग तिला अजिबात आवडत नाही.आणि पलंग बदलायची काय गरज होती?-तो पलंग नोतुन बोऊठानला खूप आवडायचा.एकेकाळी आम्ही दोघांनी त्या पलंगावर कितीतरी कथा वाचल्यात.तिथेच पडल्या पडल्या कितीतरी कविता लिहून मी नोतुन बोऊठानला ऐकवल्यात. नोतुन बोऊठान या घरी आली तेंव्हापासून त्या पलंगावरच झोपत आली.किती सुंदर फुलांची आणि पाखरांची नक्षी होती त्या पलंगावर.एक दिवस नोतुन बोऊठान म्हणाली होती, ठाकुरपो हा पलंग म्हणजे माझं आणखी एक नंदनकानन आहे.असा पलंग पण मधल्या वहिनीनी बदलून टाकला सरळ.नोतुन दादानी पण जरा विचार करायला पाहिजे होता.आपल्या बायकोला असा बदल हवाय की नको हे तरी पाहायचं..!
- या सगळ्यानंतरच घडली ती घटना.माझा विवाह झाला १८८३ डिसेंबरला आणि १८८४ च्या एप्रिल मध्ये नोतुन बोऊठाननी आत्महत्त्या केली. तो दिवस आठवतो मला. हा प्रकार मला नीट समजला नव्हता. फक्त एवढंच आठवतं की त्या दिवशी नोतुन बोऊठानची खोली दिवसभर बंद होती.सकाळी घरातील सेवकांना शंका आली की नोतुन बोऊठान अस्वस्थ आहेत.त्यांना रोज भल्या सकाळीच जाग येते. मग आज इतकी शांतता कशी?.. सेवक नोतुन बोऊठानच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात ठोठावत ओरडू लागले-
" दरवाजा उघडा, दरवाजा उघडा.."
मी व्हरांड्यात आले.दरवाजा उडडत नाही असं लक्षात येताच तो तोडण्यात आला.तो पर्यंत बाबा मोशाय खोली समोर येऊन उभे होते.सर्वात आधी खोलीत ह्यांनी,रवि ठाकुरांनी प्रवेश केला.त्यानंतर काही वेळाने बाबा मोशाय.मला आत जाऊ दिलं नाही.नोतुन बोऊठान बेशुद्ध स्थितीत होती.पण जिवंत होती.रवि ठाकुर खूप सारे कागद चादरीत गुंडाळून बाहेर आले.ते कागद मी कधीच बघितले नाहीत.बाबा मोशाय सुद्धा ढिगभर कागद बाहैर घेऊन आले.त्या मला वाटतं चिठ्ठ्या होत्या.मग ह्यांना म्हणाले-
" ज्योतीला कळव. तो कुठे होता रात्रभर? "
बाबा मोशायना इतकं चिडलेलं मी पाहिलेलं नव्हतं.ते म्हणाले-
" सूनबाई अजून जिवंत आहेत.त्यांच्या उपचारांची व्यवस्था करा..आणि आत्महत्येचे सगळे पुरावे नष्ट करा.ज्योतिला सांगा,आपल्या स्थावर जंगम इस्टेटीतून जे काही त्याला मिळत होतं ते आता मी बंद केलंय.मला पुरावा मिळालाय..तो चरित्रहीन आहे..ही गोष्ट क्षमा करता येण्यासारखी नाही.
खूप वेळा नंतर ज्योतिदादा आले.
त्यावेळी किती उध्वस्त दशा झाली होती त्यांची..!! चेहरा डोळे सुजलेले लाल दिसत होते.ते कदाचित नोतुन बोऊठानला सांगून गेले होते की ते रात्री लवकर परत येतील.पण आले दुसऱ्या दिवशी उशीरा.
*
मला आठवतंय तुमचे रवि ठाकुर आणि ज्योतिदादा नोतुन बोऊठानला दोन्ही बाजूने धरुन दक्षिणेच्या व्हरांड्यात चालवण्याचा प्रयत्न करत होते.नोतुन बोऊठानचा पदर घसरुन जमीनीवर लोळत होता..ती पुढच्या बाजूला झुकत झुकत भेलकांडत पाय पुढे टाकायचा प्रयत्न करत होती.पण ती चालणार कशी?-पोटात गेलेल्या विषामुळे चेतना क्षीण होत चाललीय.असं असलं तरी ती अचेतन अवस्थेत दोन दिवस जिवंत होती. बाबा मोशायच्या आज्ञे प्रमाणे नोतुन बोऊठानचं दोन दिवस जिवंत असणं ही खोटं ठरवण्यात आलं.पोलीसां पासून डाॅक्टरां पर्यंत सर्वांनी भितीनी म्हणा,लाच खाऊन म्हणा,तोंडाला कुलूप लावलं.नोतुन बोऊठानला हृदय विकाराचा झटका आला असं जाहीर करण्यात आलं.दोन दिवसांपूर्वी नोतुन बोऊठाननी अफूची गोळी खाल्ली होती ही बातमी ठाकुरवाडीच्या भितींत चिणून नष्ट झाली.याला म्हणतात घरंदाजांची एकजूट.मी असंही ऐकलंय की शेवटच्या दिवशी नोतुन बोऊठाननी खूप मोठी चिठ्ठी लिहीली होती आपल्या प्राणप्रिय रविला.ती चिठ्ठी कुठे गेली कुणालाही माहीत नाही.नोतुन बोऊठाननी आणखीही एक चिठ्ठी लिहीली होती आपल्या पतीला.त्या चिठ्ठीतही आणखी एक चिठ्ठी होती म्हणे.ते प्रेमपूर्ण पत्र लिहीलं होतं कलकत्त्याच्या प्रख्यात नाट्यकर्मी नटीने ज्योतिंद्रनाथांना.नोतुन बोऊठानला ती चिठृठी मिळाली होती आपल्या पतीच्या जाकीटातील खिशात.नोतुन बोऊठाननी आपल्या पतीला शेवटच्या दिवशी जी चिठ्ठी लिहीली ती चिठ्ठी आणि त्या नटीची चिठ्ठी बाबा मोशायच्या हाती सापडली होती.बाबा मोशायना आपल्या मुलाला क्षमा करणं शक्य झालं नाही.
(क्रमश:)
Comments
Post a Comment