मी रविंद्रनाथांची पत्नी११
मी रविंद्रनाथांची पत्नी
-------------------------------
११.
मला ते लोक कलकत्त्याच्या जोडासांको वाडीला घेऊन आलेत.या वाडीच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात,मुलांना जन्म देऊन त्यांचन पालनपोषण करण्यातच मी मृत्यूच्या दरवाजा पर्यंत आलीय.डोळ्यांनी मी आता नीट पाहू शकत नाही. हात कापतायत. श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय.तरी सुद्ध एकदोन गोष्टी लिहायच्या राहिल्यात. या नि:संग धरतीवर मला दोन जीवाभावाची माणसं मिळाली होती-
मझ्या दोन मुली, माधुरीलता,म्हणजे बेला आणि रेणुका. गेल्या वर्षी १५ जूनला रवि ठाकुरांनी खूप विचारपूर्वक माधुरीलताला माझ्यापासून तोडलं. तिचा विवाह करुन टाकला. कुणा बरोबर?-तर बिहारीलाल चक्रवर्तींच्या मुला बरोबर. नोतुन बोऊठानचे भक्त होते ना बिहारीलाल.बेलाचं वय होतं पंधरा. मी रेणूकाला उरीपोटी सांभाळत जगत होते पण बेलाच्या लग्नानंतर नऊ महिन्यातच तिला देखील माझ्यापासून तोडलं. तिचं लग्न केलं अवघ्या दहाव्या वर्षी. कारण बाबा मोशायनी ८ डिसेंबर १८९९ मधे आपले अखेरचे मृत्यपत्र लिहीले होते.त्या मृत्यू-पत्रा प्रमाणे बाबा मोशाय जिवंत आहेत तोवरच मुलींच्या लग्नाचा खर्च जोडासांकोच्या खजिन्यातून होणार होता. किती आश्चर्यजनक हिशोब आहे..! - माझ्या पोटचा मुलगा शमी सहा वर्षाचा आहे,त्याला डोळे भरुन पहावंसं वाटतंय. त्यांना किती वेळातरी म्हटलं जाण्यापूर्वी एकदा शमीला भेटायचंय..त्याला घेऊन या. पण शमी आहे कुठे?-रथी?- त्यालाही येऊ दिलं नाही. आता कुणाशी बोलण्याची माझ्यात शक्ती राहिली नाही. लिहीता पण येत नाहीय. तरी शेवट करायच्या आधी एकदोन गोष्टी सांगितल्या पाहिजेत. खूपच भरकटल्या गत लिहीलंय म्हणून क्षमा करा. काय करु?- शरीरात आता आणखी ताकद राहिली नाही. रवि ठाकुरां बाबतीत कधी आदरार्थी, कधी एकेरीत उल्लेख केला गेलाय लिहीता लिहीता.कधी तुमचे रवि ठाकुर कधी माझा नवरा..समजून घ्या इतकंच. मी हे सर्व लेखन माझ्या पेटीतल्या चोर कप्प्यात ठेवून देतीय. हे कधी तरी अशा एखाद्या व्यक्तीच्या हातात पडेल आणि तो हे ठाकुरवाडीच्या बाहेर घेऊन जाईल अशी आशा आहे. शमीला एकदा शेवटचं डोळे भरुन पहावं..त्याच्या कोवळ्या मृदू ओठांचं चुंबन घ्यावं..नीट रहा रे बाबा..! - तुम्ही पण सगळे काळजी घ्या छान रहा. आणि त्यांनी..त्यांनीही छान रहावं..ईश्वर तुम्हा सर्वांच्या सदैव सोबत राहै.
*
उपसंहार
-------------
मृणालिनी देवींवा उपचारासाठी १२ डिसेंबर १९०२( १३०९ भाद्र वार २७) या दिवशी कलकत्त्याला आणण्यात आलं. त्यांना जोडासांको मध्ये रविंद्रनाथांच्या लालवाडीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत ठेवण्यात आलं.तिथे दिवे नव्हते. पंखा सुद्धा नव्हताच.
कलकत्त्याहून आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी १३ डिसेंबरला या खोलीतच आपले आत्मकथन लिहून पूर्ण केले. मृत्यूच्या दोन महिने आधी.
बेशुद्धावस्थेत मृणालीनी वारंवार सांगत होती की हे सारखे म्हणताहेत झोप,झोप..शमीला शांतिनिकेतनला ठेवून आलेत..लहानग्या शमी शिवाय मला झोप येईल कां?- ह्यांना समजत कसं नाही?
-मृणालिनीची तब्येत आणखी ढासळली १७ डिसेंबरला...मृत्यूच्या एक दिवस आधी मोठ्या रथीला तिने शेवटचं पाहिलं.हा तपशील रथींद्रनाथांच्या 'स्मृति कथेत' पुढील प्रमाणे आहे-
" आईच्या मृत्यूच्या एक दिवस आधी बाबा मला तिच्या खोलीत घेऊन गेले.पलंगावर तिच्या जवळ बस म्हणाले.ती बोलू शकत नव्हती. मला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रूधारा गालावरुन वहात राहिल्या. आई बरोबर झालेली ती शेवटची भेट "
२३ डिसेंबर १९०२ ला जोडासांकोच्या वाडीत मृणालिनीची जीवन यात्रा संपली. दोन महिने अकरा दिवस मृत्यूशय्येवर यातना भोगाव्या लागल्या.रथींद्रनाथाने आईच्या मृत्यू दिवशी लिहीलं होतं-
" आम्हा सगळ्या भावा-बहिणींना बाबांनी जुन्या वाडीच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपायला पाठवलं. एका नि:शब्द धाकधुकीत आमची सगळी रात्र गेली.झोप कशी ती नव्हतीच.पहाटेच्या अंधारात व्हरांड्यात जाऊन लालवाडीकडे एकटक पहात उभा राहिलो. संपूर्ण वाडी अंधारात बुडाली होती. नि:स्तब्ध..सुनसान..कसलाही आवाज नाही. आम्ही तेंव्हाच समजलो की आमची आई आता राहिली नाही. तिला घेऊन गेलेत.
- मृणालिनीचा देह त्याच रात्री स्मशानात नेला.मुलामुलींना कळलं सुद्धा नाही कधी नेलं.जाण्यापूर्वी मृणालिनी शमीला शेवटचं बघूही शकली नाही. रवींद्रनाथांनी रथींद्रला सुद्धा स्मशानात मुखाग्नी द्यायला जाऊ दिलं नाही.रवींद्रनाथ स्वत: सुद्धा गेले नाही. एकंदरीत कसे तरी अंत्यविधी पार पडले.एकूण खर्च २८ रुपये २ पैसे
- त्याच दिवशी रवींद्रनाथांनी रथीला बोलवून घेतलं. मृणालिनी च्या चपला त्याला देत म्हणाले,ठेव तुझ्या जवळ. दुसऱ्याच दिवसापासून रवींद्रनाथांनी पत्नी च्या स्मरणार्थ ' स्मरण ' या काव्याग्रंथातल्या कविता लिहायला प्रारंभ केला.रोज एक- दोन कविता लिहीत होते.सत्तावीस कवितांचा हा संग्रह त्या नंतरच्या वर्षी प्रकाशित झाला.मोहितचंद्र सेन यांच्या ' रवींद्रनाथ काव्यग्रंथ ' च्या सहाव्या भागात तो आहेच परंतू स्वतंत्र संग्रह ' स्मरण ' प्रकाशित झाला २५ मे १९१४ ला.मृणालिनीच्या मृत्यू नंतर बारा वर्षांनी.याच्या अर्पण पत्रिकेवर कुणाचंही नांव नाही.केवळ तारीख आहे.
७ अग्रहायन (अगहन) १३०९
मृणालिनीचा प्रयाण दिवस.
||समाप्त||
Comments
Post a Comment