मी रविंद्रनाथांची पत्नी ३

मी रविंद्रनाथांची पत्नी 
------------------------------
३.
माझ्या दीरांमध्ये सर्वात मृदुभाषी,
प्नतिभावंत म्हणजे ज्योतिंद्रनाथ.हे नाटकककार,संगीतकार,गायक,चित्रकार होते.दिसायला अत्यंत देखणे.रवि ठाकुरांपेक्षा काकणभर जास्तच देखणे.तरी पण पाहता क्षणीच लक्षात यायचं माणूस अत्यंत दु:खी आहे.पहावं तेंव्हा उदास दिसत.कुणात कधीच मिसळायचे नाहीत.पण एकेकाळी खूपच माणसांचे लोभी होते म्हणे.गीत,संगीत,नाटक, हे त्यांचं व्सनच होतं.पत्नीच्या,कादंबरीदेवींच्या आत्महत्ये नंतर एकदम बदलले.मी नेहमी या बदललेल्या ज्योतिंद्रनाथानाच पहात आले.त्यांच्या मनमोकळ्या,जिंदादिल व्यक्तीमत्वा बद्दल बरंच ऐकलंय मी पण ते त्यांचं रुप कधी पाह्यला नाही मिळालं मला.माझ्याशी तर कधी बोलले सुद्धा नाहीत.कदाचित मला पांढऱ्या पायाची,अपशकुनी समजत असतील.स्वाभाविकच म्हणायला पाहिजे कारण मी कारण लग्न होऊन या घरात आले त्या दिवशीच माझ्या मोठ्या नणदेचे पती शारदाप्रसाद बंदोपाध्यायांचे शिलाईदहमध्ये निधन झाले.बाबा मोशाय विवाहात अनुपस्थित होते आणि माझ्या लग्नानंतर काही महिन्यातच नोतुन बोऊठाननी आत्महत्या केली.एक गोष्ट मनात सतत टोचत राहिलीय.लहान-मोठ्यांच्या तोंडी सतत वेगवेगळ्या गोष्टी चर्चेत असाव्यात त्यामुळेच कुणाला काही सांगू शकले नाही.
*
नोतुनदादांना एकजरी मूल असतं तर त्यांचं जीवन वेगळं झालं असतं.कां नाही झालं त्यांना मूलबाळ?- सर्वांनी सगळा दोष नोतुन बोऊठानलाच दिला.अशा मामल्यात स्त्रीलाच दोषी धरलं जातं.हेच तर पहात आलीय मी.मोठ्या भाऊजीं मध्ये सुद्धा दोष असू शकत होता ना..! पण बोलणार कोण?- असा विचार मनात येणं म्हणजे सुद्धा अन्याय आहे.कुटुंबातल्या सर्वांनी नोतुन बोऊठानकडेच बोट दाखवलं.त्यांनी सुद्धा मनोमन स्वत:लाच वांझ समजून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.मनातलं ठणकणारं हे दु:ख सांगणार तरी कुणाला?- मनमोकळं करायला फक्त एकच माणूस होतं- माझे पति..! - माझ्या लग्नानंतर आपला एकमात्र प्रिय  सखा रवि पण आपल्यापासून दूर गेला.‌.! - नोतुन बोऊठानला मी लांबूनच फक्त पहात होते.जवळ जाऊन बोलावं,समजून घ्यावं, अशी संधीही मिळाली नाही.त्यात मी आले रवि ठाकुरांची पत्नी म्हणून.गेल्या त्या परत न येण्यासाठी..आता काय त्याचं..!! 
आणि समजा जवळ जाऊन बोलण्याची संधी मिळाली असती तरी दहाव्या वर्षी तीन महिन्याच्या काळात मी कितीसं समजून घेऊ शकले असते त्यांना?-मला फक्त एवढंच आठवतं की माझ्याविषयी त्यांना थोडं सुद्धा प्रेम वाटत नव्हतं.तरी बरं आपल्या प्रिय धाकट्या दिराची रविची वधू म्हणून पसंत करणाऱ्या लोकांमधे ती पण होती.तिला हे जग सोडून जावं असं वाटत नव्हतं.तरी पण गेली.असं वाटतं की नाईलाज झाला तिचा.या मागे बाबा मोशायांचा कठोर आदेश होता.अनिच्छेनंच तिला हे जग सोडावं लागलं.तिला तो धक्का सहन झाला नाही.खूप आजारी झाली.त्यांच्या प्राणप्रिय रविची पत्नी म्हणून मी त्यांना पसंत नव्हतेच.इतकंच काय आपल्या दिराचं,रविचं लग्न व्हावं हेच त्यांना मान्य नव्हतं.मी जर सुंदर असते,किंवा अल्लड मुलगी असते तर?- त्यांना खूपच वाईट वाटले असते.एकदम कृशकाय,गरीब घरातली,गावखेड्यातली,उपेक्षित मुलगी मिळाली रविला, हा दु:खात सुखाचा भाग वाटला असेल त्यांना.कुठे ऐन पंचवीशीतली सुंदर,तरुण विदुषी रवि ठाकुरांची प्राणाधार नोतुन बोऊठान आणि कुठे नऊ वर्षाची तुच्छ गावंढळ पोर- तुलनाच नाही होऊ शकत.
-माझ्या रवि ठाकुरांचं वय होतं फक्त तेवीस वर्षाचं.तरणेबांड,सहाफूट उंच,पिळदार शरीरयष्टीचे रवि ठाकुर..!! काय सांगू?- पहात रहावं बस्स..!!! आणि नोतुन बोऊठान सुडौल,बांधेसूद,तरुणी.रवि जेवढे गोरेपान होते तितकीच नोतुन बोऊठान सावळी होती.पण नोतुन बोऊठान मध्ये एक अजब चीज होती ती म्हणजे त्यांचे डोळे..!! पाहता क्षणीच माणसाला संमोहित करणारी शक्ती होती त्यांच्या कंचकाळ्या डोळ्यात..!! ते नेहमीच म्हणायचे नोतुन बोऊठानचे डोळे मी कधी विसरुच शकणार नाही.एका बाजूला अशी वहिनी की हसली तर शतपटीनं सुंदर दिसते,नेत्रकटाक्ष असा की प्राणांना ओढ लागते..जिला पाहणं म्हणजे अद्वितीय आनंदाची वर्षा...नाही, माझ्याकडे भाषा नाही,शब्द नाहीत..कसं सांगू?- मी तर गावंढळ अशिक्षित मुलगी..!! असं असलं तरी रवि ठाकुरांची पत्नी आहे..!! 
- नोतुन बोऊठान अलिकडे खूपच म्लान काळी दिसत होती.एक दिवस तेच म्हणाले-
" छोट्या सूनबाई,नोतुन बोऊठान अजिबात अशी नव्हती.गेल्या काही महिन्यातच अशी दिसायला लागलीय.." 
" कशा दिसायच्या त्या? "
" तुला नाही समजणार.मायावी सौदर्यच ते.जणू नागपाश.विलायतेहून पहिल्यांदा परतलो की परत माझा तोच बंगाल..तीच गच्ची.. तोच चंद्र..तोच दक्षिणेचा वारा आणि तीच नोतुन बोऊठान..वाटलं तिच्या पाशात बद्ध होऊन,गुंतून बसून राहावं..बाकी काही नको..!!!
-किती मोहक सुंदर बोलतात माझे रवि ठाकुर?- असं बोलणं मी आजवर कूठेही ऐकलेलं नाही.ते कवी आहेत.कल्पनेनंच‌ सगळं काही जाणतात.जे घडलं नाही,घडणार नाही, तेही कल्पनेनंच जाणतात..अगदी सामान्य,साध्या प्रसंगातून ते असामान्य गीत रचना करतात.आता हेच बघा नोतुन बोऊठान म्हणजे नागपाश म्हणाले आणि विलायतेहून परतल्यावर त्याच पाशात गुंतून बद्ध झाले..मला वाटतं की या सगळ्या त्यांच्या कवी कल्पना आहेत.नोतुन बोऊठान माझ्या जवळपास कधी फिरकलीच नाही.स्वत:हून जवळ बोलवणं,प्रेमानं बोलणं,गळ्यात गळे घालणं तर दूरच..! आमच्या गल्लीत दुपारी किती फेरीवाले खेळणी घेऊन येतात,बाहुल्या,भातुकलीची चूल-बोळकी,कितीतरी खेळणी येतात पण एक खेळणं कधी घेऊन दिलं नाही नोतुन बोऊठाननी.लग्नानंतर बाबा मोशायनी मात्र ढीगभर खेळणी पाठवली होती.मुलाच्या लग्नात हजर राहता आलं नाही पण माझ्यासाठी खेळणी आणायला विसरले नाहीत.विवाहानंतरच्या तीन महिन्यात नोतुन बोऊठानला मी जितकं ओळखलंय..अर्थात त्या लहान वयात अशी किती समज असणार..पण जितकं ओळखलंय त्यावरुन हाच निष्कर्ष निघतो नोतुन बोऊठान ही बाई  अजिबातच मिळूनमिसळून राहणारी नव्हती..ती तिच्या कोषात रमणारी स्वार्थी व्यक्ती होती.नंतर म्हणजे मी मुलाबाळांची आई झाले,गृहिणी झाले तेंव्हा माझ्या लक्षात आलं की नोतुन बोऊठानला या परिवारात काही स्थानच नव्हते.या घरात तिला कधी यथोचित सन्मान मिळालाच नाही.तरी पण कुटुंबातल्या पुरुषांमधे तिला मोठा मान होता.तेही माझ्या पतीमुळे.स्वत: रवि ठाकुरांनीच कितीतरी पुस्तकं एकापाठोपाठ एक फक्त नोतुन बोऊठानलाच अर्पण केलीयत.ती सुद्धा अद्भूत, अलौकिक शब्दात..!! स्पष्टपणे तिच नांव नाही लिहीत इतकंच.'प्रकृतिर प्रतिशोध' या पुस्तकातल्या  अर्पणपत्रिकेतल्या या ओळी पहा-
' तुला दिलं ' त्यानंतर ' शैशवसंगीत' पण तिलाच अर्पण-
'फक्त तुलाच' या शब्दात.हे सगळं प्रथम मला काहीच कळलं नव्हतं.किंवा यात फार काही विचार करण्यासारखं आहे असंही मनात आलं नव्हतं.खूप नंतर समजलं.तो पर्यंत नोतुन बोऊठान जग सोडून गेली होती.पण असं तरी कसं म्हणू?- ' भानुसिंहेर पदावली' प्रकाशित झालं तो पर्यंत नोतुन बोऊठानचं निधन होऊन गेलं होतं.पण तेही पुस्तक त्यांनी तिलाच अर्पण केलं होतं.लिहीलं होतं- 
" भानुसिंह की कविता प्रकाशित कर अशी तुझीच इच्छा होती.तेंव्हा ती नाही पूर्ण करता आली.आज त्या प्रकाशित झाल्यात.पण तू मात्र हे बघायला नाहीस..!! " 
सहा वर्षानंतर ' मानसी ' प्रकाशित झालं.त्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत लिहीलं होतं- 
" तुझ्या हातात सोपोवतोय.प्राणांचा सर्वश्रेष्ठ प्रकाश.." 
कुणाच्या हातात,स्पष्ट काही लिहीलं नाही.माझ्या हातात असा अर्थ निघू शकतो.ज्या वर्षी ' मानसी ' प्रकाशित झाली त्या वर्षीच आमच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली होती.पण आपल्या ' प्राणांचा सर्वश्रेष्ठ प्रकाश ' जिच्या हातात सोपवला ती होती नोतुन बोऊठान.सगळ्यांना समजलं होतं ते मला का नाही समजणार?- सात वर्ष उलटली नोतुन बोऊठानचं निधन झालं त्याला,तरी सुद्धा नोतुन बोऊठानच त्यांच्या मन-प्राणांना व्यापून उरल्यात सर्वत्र.मी असून नसल्यासारखीच.नीट लक्षात नाही पण सहा वर्षानंतर त्यांचा खूप गाजलेला ' चैताली ' कविता संग्रह प्रकाशित झाला तेंव्हा मी त्यांच्या पाच मुलामुलींची आई झाले होते.मला माहित होतं ' चैताली ' ते कुणालाही करु देत मला नाही अर्पण करणार.तो पर्यंत मी केवळ अमुक ची अमुक ची,आणि अमुक ची आई फक्त झाले होते.किंवा घर-कामगार होते.तरी पण ' चैताली ' हातात पडताच माझे डोळे प्रथम अर्पण -पत्रिकेवर खिळले.त्यांनी ते कुणाला अर्पण केलंय याची केवढी उत्सुकता..! धन्य आहे स्त्री मन...हे कसलं समर्पण..! - त्यांनी लिहीलं होतं- 
' तव उष्ठ दशनदंशने टूटे जाक पूर्णफलगुली..'
(' तव ओठावर दंतव्रणांनी 
तुटून पडल्या पक्वफळासम 
हृदय तुझे हे तुलाच अर्पण..') 
प्रथम मला काही कळलं नाही.वाटलं त्यांनाच विचारावं.नंतर मनात आलं कुणीच त्यांना काही विचारत नाहीयत.सगळे एकदम गप्प आहेत.याचा अर्थ सगळ्यांना समजलं म्हणून सगळे ओठ मिटून आहेत.जे सगळ्यांना समजू शकतंय ते मलाच कां नाही समजतंय?- दशनदंशने - हा शब्द सोडला तर अवघड असा कुठलाच शब्द नाही.दशन म्हणजे दात आणि दंशन म्हणजे चावणे.म्हणजे जिला अर्पण केलाय तिच्या दातांनी चावलेले- असेच ना?-काय होईल दातांनी चावल्यावर रसाळ फळाचे तुकडे पडतील..
' चैताली ' मधल्या कविता म्हणजे तीच मधुर रसाळ फळांची बागच नाही कां? 
-एकदम आठवलं.एक दिवस त्यांनी मला सांगितलं-' हसताना नोतुन बोऊठान किती सुंदर दिसते..!! ' 
त्पांची मोत्यासारखी पांढरीशुभ्र सुंदर दंतपंक्ती..! अर्पण-पत्रिकेच्पानावरील त्या शब्दांकडे मी एकटक बघत राहिले.आता समजायचं काही राहिलं नव्हतं. 
-एक काळ होता.ठाकुरवाडीतल्या काव्य-संगीत आणि साहित्यचर्चांचे केंद्रबिंदू माझी मधली जाऊ ज्ञानदानंदिनी होती.तिचं फार कौतुक होतं सगळ्यांना.पण यांच्या नोतुन दादांचे मित्र,बिहारीलाल चक्रवर्तींमुळे सगळंच चित्र बदललं.जोडोसांकोच्या वाडीत ज्योतिदादांचे मित्र म्हणून ते एक दिवस आले आणि इकडचेच  झाले.बिहारीलाल म्हणजे नामांकित कवी होते.नोतुन बोऊठानला त्यांच्या कविता खूप आवडायच्या.मग काय बिहारीलाल पण नोतुन बोऊठानसाठीच वारंवार येऊ लागले.नोतुन बोऊठानसाठीच कविता लिहू लागले आणि तिला वाचून दाखवू लागले.त्या सगळ्या प्रेम कविताच होत्या म्हणे.
- बिहारीलाल चक्रवर्तींसारखेे कवी ज्या मूलीच्या निमित्ताने लिहायला लागले.जिला आपल्या सगळ्या कविता ऐकवण्यासाठीच घरी येत होते,जी मुलगी त्यांची  हळूहळू आत्मसखी होते,ती मुलगी काव्य-संगीत-साहित्यिक मैफलींच्या आयोजनात महत्वाची नाही ठरली तरच नवल.नोतुन बोऊठानमुळे ज्ञानदानंदिनीचं महत्व काही राहिलंच नाही.पुढे ती हे घरही सोडून गेली.त्या नोतुन बोऊठानचा हेवा करतात हे माझ्या चांगलच लक्षात आलं होतं.
- काहीही असो,बिहारीलालजींच्या प्रेमामुळे नोतुन बोऊठान जोडोसांकोच्या ठाकुरवाडीची नायिका म्हणून विराजित झाली हे मात्र खरं.तेंव्हा माझे रवि ठाकुर तसे लहान,अजाण होते.बिहारीलाल नोतुनब बोऊठानच्या प्रेमात होते आणि नोतुन बोऊठान?- ती बिहारीलालजींच्या प्रेम कवितांवर खुष होऊन त्यांना तऱ्हेतऱ्हेचे खाद्य पदार्थ खाऊ घालायची अशी चर्चा कानावर पडलीय माझ्या.कधी कधी त्यांना भेटवस्तुही द्यायची.एकदा तर आपल्या हातांनी विणलेलं एक आसनही तिनं बिहारीलालना दिलं ते पाहून रवि ठाकुर बिहारीलालवर जळायला लागले.
बिहारीलाल सारख्या कविता तुला कधीच लिहीता यायच्या नाहीत असं जेंव्हा नोतुन बोऊठान रवि ठाकुरांना म्हणायच्या तेंव्हा त्यांना खूप वाईट वाटायचं..! 
-तुमच्या रवी ठाकुरांनी एक दिवस मला हसत हसत सांगितलं -
" तुला माहीत आहे कां,मी १५/१६ वर्षाचा होतो.नोतुन बोऊठान नेहमी बिहारीलालजींची प्रशंसा करायची इर्षेने पेटून मी एक दिवस मी शेक्सपियरच्या ' मॅकबेथ " चा अनुवाद करुन तिला ऐकवू लागलो.पण त्यानं ती जराही प्रभावीत झाली नाही.ती बिहारीलालच्या कवितातच रममाण होत राहिली. पण छोटी बहू,'मॅकबेथ'चा अनुवाद करता करता एक अद्भूत घटना घडली..जरावेळ थांबून विचार करत राहिले.कदाचित मला काय समजणार त्यातलं असा विचार करत असतील.पण काही क्षणाने बोलू लागले-
" मॅकबेथ नाटकात एक ' हेकट' नावाच्या हडळीचा प्रसंग आहे.वास्तविक 'हेकेटी' किंवा 'हेकट' नांवाची हडळ फक्त शेक्सपियरच्या नाटकातच नाहीय
तर ती एक ग्रीक देवी आहे.जी मायावी अंधारात वास करते.ती तमोगुणी देवी आहे.तिला पाहू किंवा समजू शकत नाही.तिची अदृश्य खेच फक्त अनुभवता येते.हे वाचून मला नोतुन बोऊठान आठवली.'हेकेटी' सारखीच नि:स्संग..अंतराळवासिनी..!! मी माझ्या ' मालती पोथी ' च्या पानावर प्रबळ आवेगात वारंवार लिहीत राहिलो- हेकेट ठाकुराइन,हेकेट ठाकुराइन..! थोड्याच दिवसात मी तिला हेकेटी वहिनी अशीही हांक मारु लागलो.नंतर फक्त ' हे ' म्हणू लागलो.मी ' हे ' म्हटलं की ती कधी ओ नाही द्यायची गोड स्मित करुन तिरपा कटाक्ष टाकायची माझ्याकडे.वहिनींचा तो कटाक्ष मी विसरु शकत नाही.पहिल्यापासून नोतुन बोऊठान खोडकर स्वभावाची होती.कुणीही जीव टाकावा असा गोड खोडकर स्वभाव.एक दिवस नोतुन बोऊठान मला जवळ बोलवून हळूच म्हणाली," ' हे ' नाव कुणालाही कळता कामा नाही.तू ठेवलेलं हे लाडकं नांव तुझ्या-माझ्या पुरतंच राहू दे " 
त्या दिवशी जास्त काही बोलले नाहीत तुमचे रवि ठाकुर.नोतुन बोऊठान विषयी ज्या काही गोष्टी मला माहित आहेत त्या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत.नाना लोकांकडून नाना प्रकारे जे ऐकलं त्यातून नोतुन बोऊठानची एक प्रतिमा माझ्या मनात निर्माण झालीय तीच तुम्हाला दाखवाचा प्रयत्न.ठाकुरवाडीतल्या बायकांमध्ये नोतुन बोऊठान विषयी सातत्यानं काही न् काही कुजबुज चालूच असायची.नोतुन बोऊठानला काहीजण तिच्या अपरोक्ष 'मधमाशी' पण म्हणायचे.किती वेळातरी ऐकलंय.
(प्रकरण ३ रे समाप्त) 




Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७