आदि मंगल..मध्य मंगल..! २
क्रमश:-२
* *
निळ्या संगमरवरात बांधलेल्या अतिभव्य अशा राजप्रासादामधील महाराज शुद्धोदन व मायावती यांच्या विश्राम महालाला जोडून उभे असलेले अतिथीगृह आज आम्रपर्ण व झेंडूंच्या फुलमाळांनी सजवले दिसत होते.अतिथीगृहात उघडणाऱ्या रत्नजडीत स्तंभावरील कमानी पासून जमिनी पर्यंत गुलाबी रेशमी पडदामंद समीर झुळकांनी झुलत होता.या कमानीच्या बरोबर समोर अतिथीगृहाचे विशाल प्रवेशद्वार होते.प्रवेशद्वाराच्या दोन्ही स्तंभांवर दोन सिंहमुखे कोरलेली होती.त्यांच्या विसकटून उभ्या राहिलेल्या आयाळी इतक्या खऱ्या वाटत होत्या की पाहणाऱ्याला त्यांना स्पर्श करुनबघण्याचा मोह आवरला नसता.गडल तांबड्या पाषाणात बांधलेल्या या अष्टकोनी वास्तुच्या भिंतीवर स्वागतातुर नर्तिकांची शिल्पे अशा खुबीने कोरली होती की स्वच्छ सुर्य प्रकाश आणि मोकळी हवा खेळवणारी ती गवाक्षे आहेत हे प्रथम दर्शनी कळूनच येत नाही.प्रवेशद्वारावर उभे असलेले प्रहरी हातात भाले धरुन पहाटेपासूनच विनम्र भावाने अतिथींची प्रतिक्षा करत होते.त्यांच्या लालफेट्यांवरील सोनेरी पट्टे आता प्रात:काळचे किरण पडून चमकू लागले होते.गुबऱ्या गालांचे व काळ्यभोर गलमिशांचे हे तरुण शिपाईगडी चपट्या गोल नाकाचे असले तरी त्यांची जांभळासारखी काळीकंच बुबळे कुणाचेही लक्ष वेधून घेणारी होती.
-अतिथीगृहाच्या मध्यभागी चांदीचे अर्धवर्तुळाकार नक्षीदार आसन होते.त्याच्या दोन्ही बाजूस अतिशय लोभस दिसणारी राजहंसाची विनम्र मुखे होती.विश्राम महालातून आमात्य झिरमिरीत गुलाबी पडदा बाजूला सारुन लगबगीने आत आले.अंगभर रेशमी वस्त्रातूनही पुष्ट नितंब आणि उन्नत उरोजांचे उभार उठून दिसत असलेल्या दोन दासी अतिथींसाठी मांडलेल्या शिसवीच्या प्रशस्त चौरंगावर काळपट लाल रंगाचे,जरीची वेलबुट्टी असलेले गालीचे अंथरण्यात मग्न होत्या.त्यांच्याकडे एक ओझरता कटाक्ष टाकून आमात्य प्रवेशद्वाराबाहेर येऊन उभे राहिले.मान उंचावून डोळ्यांवर उजव्या हाताची सावली धरुन त्यांनी दूरवर नजर फेकली.मग रंगीबिरंगी फुलांनी बहरलेल्या वाटिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या पुष्करिणीवर विसावणाऱ्या उन्हाकडे पाहिले व सुटकेचा नि:श्वास टाकला.आमंत्रित केलेल्या तीन ब्रह्मणांना घेऊन येणारे मेणे हळूहळू याच दिशेने येताहेत.'चला..मुख्य काळजी मिटली' असे मनात येऊन त्यांची चर्या प्रसन्न झाली,क्षणभरच..एकदम काही लक्षात येऊन झटकन त्यांनी मागे वळून पाहिले.महाराणी मायावतींच्या खास मर्जितली दासी नंदिनी गंधाक्षता व गुलाबपुष्पांनी भरलेले एक मोठे तबक घेऊन एका दासी बरोबर आली.या दासीच्या डोईवर एक व हातात दोन चांदीची नाजुक: नक्षीदार घंगाळी होती.पाठोपाठ दोन दासी गुलाबपाण्यानेभरलेले तीन सुवर्णकलश घेऊन नंदिनीच्या आदेशाची वाट बघत उभ्या राहिल्या.सर्व कामे बिनबोभाट हे पाहून आमात्य सुखावले.तीनही चौरंगा भोवती मानावेळावत एकमेकांचा पाठलाग करणाऱ्या मोरांची रंगाकृती बघून तर त्यांचे डोळे चमकले आणि अगदी सहजच 'वाऽह..!' असा उद्गार बाहेर पडला.ते पाहून नंदिनीने सस्मित मुद्रेने आमात्यांना वंदन केलं आणि म्हणाली-
"मान्यवर आमात्य,अतिथींच्या स्वागताची व पाद्यपूजेची तयारी आपण पाहातच आहात, आता महाराज व महाराज व महारणींना पाचारण करण्यास कोणतीच अडचण नाही.आपली आज्ञा असेल तर.."
"नको मीजातीने जाऊन त्यांना घेऊन येतो.तो पर्यंत तू तीनही ब्राह्मण श्रेष्ठांना आसनस्थ व्हायला सांग.."
कानातील बाळ्यांपर्यंत भिडणाऱ्या आपल्या रुपेरी मिशांवरुन मूठ फिरवत ते झपझप निघून गेले.नंदिनी पाहाण होती,अतिथीगृहाबाहेरील प्रांगणातील उंच चौथऱ्यांवर मेणे ठेवले जात होते.त्यातून एकेक ब्राह्मण श्रेष्ठ उतरत होते.नंदिनी पुढे होऊन त्यांना दोन्ही हात जोडून म्हणाली-
"देवतुल्य ब्रह्म वृंदांचे स्वागत असो..!"
- स्वप्न रमलात पारंगत असलेले ते तीन ब्राह्मण दोन विशेष प्रतिनिधींसमवेत अतिधीगृहाच्या प्रवेशद्वारातून आत आले.लिच्छवी,मद्र व कुशिनारा,या देशातून आलेले ब्राह्मण पाहताच आमात्यांनी विनित भावाने हात जोडले व म्हणाले-
"देवतुल्य ब्रह्मवृंदांचा विजय असो..!-कृपया आसनस्थ व्हावे.महाराज व महाराज्ञी काही क्षणातच उपस्थित होतील.."
- तीनही ब्राह्मण आपापल्या आसनांवर विराजमान झालेले पाहून आमात्य आत निघून गेले.नंदिनीने चांदीचा लंबगोलकृती कुंडा तबकातून उचलला एकेकापुढे वाकून तिने त्यांना त्यातील मनुक्यांचा आस्वाद घ्यावा म्हणून विनवले,मग जलकुंभ घेऊन व चांदीचे तबक घेऊन दोन चांदीचे चषक घेऊन दोन दासी पुढे झाल्या.जलपान करीत, मंद स्मित करीत त्यातल्या दोन ब्रह्मणांनी अतिथीगृहात सर्वत्र दृष्टीक्षेप टाकला.यातला एक ब्राह्मण स्थूल शरीरयष्टीचा व मोठ्या दोंदाचा होता.मस्तकावरील काळ्या कुळकळीत घेरामधून निघालेली त्याची झुपकेदार शेंडी मानेवरती रुळत होती.दोन घनदाट काळ्या भुवयांमध्ये गाजर उभे करुन ठेवावे तसे त्याचे नाक खालील बाजूस पसरट व गोल दिसत होते.डोळे उथळ,मोठे होते.काळ्या लकाकत्या बुबुळांमागील पांढऱ्या पडद्यावर आकाशाची निळी आभा पसरलेली दिसत होती.ओठ जाड व फुटलेले दिसत होते.वरच्या दाताखाली खालचा अधर चावत स्वत:तच मग्न राहण्याची त्याची सवय पाहता क्षणीच लक्षात येत होती.कुशिनारा येथून आलेल्या या ब्राह्मणाचे नांव सुदत्त असे होते.याच्या शेजारच्या आसनावर जो ब्राह्मण बसला होता तो लिच्छवी देशातून आला होता.अर्ध पद्मासन घालून बसलेल्या लख्खणाच्या उजव्या हातात रुद्राक्षमण्यांची माळ होती.ती ओढत ओठातल्या ओठात जपाचे उच्चारण करीत होता.गव्हाळ रंगाच्या या ब्राह्मणाला आपल्या गोल चेहऱ्यावरील आवळ्यासारखे नाक वारंवार ओढायची सवय होती.नाक वर ओढले की आपले गोल गरगरीत डोळे तो मिटून घेत पुन्हा उघडायचा.तिसरा ब्राह्मण भद्रदेशीचा मंती नावाने प्रसिद्ध होता.हा वर्णाने चक्क काळा होता.सुदत्त व लख्खण पेक्षा वयाने थोराड असलेल्या मंतीचा चेहरा उभट होता.त्याच्या विरळ भुवयांमधून निघालेली सरळ नासिकाा ओठांना भिडू पाहात होती.याची मुद्रा करारी पण त्रासिक दिसत होती.तिघांनीही भगव्या रंगाचे रेशमी कद परिधान केले होते.तिघांच्याही खांद्यावर पांढऱ्या शुभ्र उपरण्याची घडी होती.
आमात्यांच्या मागून महाराज व महाराज्ञी येत असलेले पाहून तिघेही ब्राह्मण उठून हात जोडून उभे राहिले.त्यांना वंदन करुन महाराजांनी बसावयाची खूण केली.महाराणी मायावती पुढे होताचसुगंधी जलाने भरलेले कुंभ घेऊन दासी पचढे झाल्या.मायावती व महाराजांनी क्रमाक्रमाने तिघांचेही पादप्रक्षालन केले.गंध,फुल,अक्षतावाहिल्या.नमस्कार करुन पतीपत्नी दोन पावले मागे सरकून सुवर्णाच्या मयूरासनावर विराजमान झाले.महाराज व महाराज्ञींनी शुभ्र रेशमी वस्त्रे परिधान केली होती.शुद्धोदन उंच, धिप्पाड शरीरयष्टीचे गौर गुलाबी अंगकांतीचे होते.दोन मनुष्याकृती भुवयांच्या मधे चंदनाचा टिळा त्यांचे भव्य कपाळ सुशोभित करीत होता.रापलेल्या राकट चेहऱ्यावर उजव्या डोळ्याच्या खाली गुंजे एवढी मोस त्यांना आवडत नसे पण त्यामुळे ते विलक्षण निग्रही दिसत.उंच धारदार नाकाच्या नाकपुड्या जाड व फुगीर होत्या.ते बोलू लागले की त्या अधिक फुगीर होत.ओठावरच्या भरघोस मिशांमुळे त्यांचा अधर पूर्ण झाकला गेला होता.भरदार छातीवर रुळणारा मोत्याचा कंठा त्यांच्या ऐश्वर्याची साक्ष देत होता.राणी मायावतींच्या अंगावर एकही आभूषण नव्हते.तरी देखील त्यांची अंगकांती इतकी तजेलदार होती की,बावनकशी सुवर्णालंकारांनी तिचा हेवा करावा.काहीशी ठेंगण्या ठुसक्या बांध्याची ही राणी कठोर व्रताचरणामुळे कृश झाली असली तरी तिचे लालचुटुक ओठ आणि कंचकाळे बोलके डोळे समोरच्या व्यक्तीला अदृश्य धाग्यांनी बांधून ठेवत.लहानखुऱ्या पण नाजूक धारदार नासिकेच्या पाकळ्या शब्दा गणिक थरथरु लागल्या की पाहणारा पाहातच राही.त्यांचा स्वर इतका मधाळ होता की ऐकणाऱ्या जीवाची तृप्ती कशी ती होतच नसे.आपले काळेभोर कुरळे केस त्यांनी पाठीवर मोकळे सोडले होते.आतून कितीही अस्वस्थ असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेली नुक्त्या उमललेल्या प्राजक्त फुलांसारख्या मंद स्मिताची आभा मिटता मिटत नसे.
- आपल्या प्रिय पत्नीकडे एकवार प्रेमभराने पाहून महाराजांनी तिनही ब्राह्मणांना हात जोडून पुन्हा एकदा वंदन केले व म्हणाले-
"हे व्युत्पन्न ब्राह्मण श्रेषठांनो,स्वप्नरमलज्ञ असलेली आपली दिगंत कीर्ती ऐकून आम्ही आपणास आज मुद्दाम पाचारण केले आहे.आमच्या राज्ञींचा प्रसूती समय निकट येत असतानाच त्यांना जे विचित्र स्वप्न पडले ते ऐकून राज्ञीं इतकेच आम्ही देखील अत्यंत अस्वस्थ आहोत.असे म्हणतात की भविष्यात घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांची सूचना स्वप्नाद्वारे माणसाला मिळत असते.आपण स्वप्न रमल शास्त्रात पारंगत आहात.महाराज्ञींचे स्वप्न कथन ऐकावे व त्याचा अर्थ, शुभाशुभ संकेत काय असू शकतात ते सांगावे अशी आपणास प्रार्थना आहे.."
"महाराज्ञींनी स्वप्न कथनास सुरुवात करावी.."
-लख्खण ब्राह्मणाने असं म्हणाताच सुदत्त आणि मंती यांनी सावरुन बसत जीवाचे कान केले.गालावर आलेली एक बट कानामागे सारत मियखवतीने स्वप्न कथनास सुरुवात केली..
" सायंकालीन पूजाविधी यथासांग पार पडल्यानंतर थोडे दुग्ध प्राशन करुन मी नेहमीसारखीच कुशाच्या शय्येवर निजले होते.काही क्षणातच गडद,गाढ निद्रेने माझा कधी ताबा घेतला ते कळले नाही.. अचानक कसे कोणजाणे सागाच्या कठीण मंचकावर मी स्त:ला पहूडलेले पाहिले.स्वच्छ निळ्या आकाशातून पिसासायखे तरंगत चतुर्दिकपाल येऊन माझ्या मंचकाच्या चार बाजूंना उभे राहिले.लोचने उघडून मी त्यांना नीट पाहिलेही नाही तोच त्या चौघाांनी माझ्याकडे कटाक्ष टाकून,परस्परांकडे मंदस्मित फेकत दोन्ही बाहू उंचावले..आणि अहो आश्चर्यम् माझ्यासह तो मंचक व ते दिक्पाल एखाद्या पक्ष्यासारखे आसमंतात विहार करु लागले.हिमालयाच्या पायथ्याशी एका शालवृक्षातळी आम्ही अलगद उतरलो.मला हव्या त्या नेमक्या सुरक्षितस्थळी आणून पोहोचवल्या बद्दल मी धन्यवाद देण्यासाठी हात जोडले तोच ते दिकपाल अदृश्य झाले.. मग त्यांच्या स्त्रियांचे,अष्टदिशांचे आगमन झाले.. माझी वस्त्रे उतरवून त्यांनी माझ्या सर्वांगाला चंदन उटीचे विलेपन केले..मग सुवासिक जलाचे तुषार अंगावर पडू लागले..काही क्षणानंतर त्या स्त्रियाही अदृश्य झाल्या..उत्तमोत्तम अलंकारांनी आभूषणांनी नटून थटून मी कुणा अनामिकाची प्रतिक्षा करत असल्यासारखी आतूर नजरेने पाहात बसून होते तोच तो आला..! दोन्ही कर जोडून त्याने मला वंदन केले व म्हटले-
"मी सुमेध.पृथ्वीवरील अंतिम जन्म घेण्याचे मी निश्चित केले आहे.तू माझी माता होशील कां?"
"माझ्या वत्सल कटाक्षाने त्याचं अवघ्राण करुन मी त्याला होकार देताच सुमेध हसत हसत मेघमंडलात लुप्त झाला आणि क्षणातच एक महाकाय गजराज शुंडेतील कमळ उंचावत माझ्याच दिशेने वेगाने धावत येताना दिसला.भयाने देहमनाचा थरकाप उडाला.विस्फारलेल्या नेत्राने मी पाहात राहिले.मला उठून पळून जावेसे वाटत होते पण शक्यच होत नव्हते.इतक्यात जणू मला आश्वस्त करण्यासाठी त्या गजराजाने सोम्य उदार रुप धारण केले.मंचका भोवती तीन प्रदक्षिणा घालून तो अगदी तान्हुले बाळ होऊन माझ्या कुशीत शिरला.डोळे उघडले तेंव्हा मी माझ्या कुशाच्या शय्येवर होते.अनामिक आनंद आणि भितीच्या हिंदोळ्यावर मी अशी...!!!
-एवढे बोलून दाटून आलेल्या उमखळ्यांना तिने आसवांची वाट मोकळी करुन दिली व म्हणाली-
"सांगा काय होणार तरी काय आहे माझ्या बाळाचं? त्याला हे जग बघायचंय,नुसतं बघायचंच नाही तर-"
"महाराज्ञींनी शांत राहावं.यात चिंता करण्याचं किंवा दु:ख करावं असं काहीच नाही.मार्ग निर्वेध आहे..!"
- तिघेही ब्राह्मण वेगळ्या शब्दात पण एकच गोष्ट जाहीर करत होते..
"राजन, आपल्याला पुत्र प्राप्ती होणार असून हा पुत्र जगाला ललामभूत ठरेल.हा संसारात रमला तर चक्रवर्ती सम्राट होऊन पृथ्वीचं राज्य उपभोगेल.पण हा संसारात रमला नाही तर मात्र धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणेल.याने स्थापित केलेल्या धर्माची पताका त्रिखंडात फडकत राहील."
- तीनही ब्राह्मण श्रेष्ठांचे हे भाकित ऐकूनशचद्धोदन दिगमूढ झाल्या प्रमाणे बसून राहिले.त्यांना काय बोलावं ते सुचेना.शुद्धोदनांची मती कुंठित झाली.त्यांनी आपल्या पत्नीकडे एकवार पाहिले.मायावती नंदिनीने भूर्जपत्रावर लिहून घेतलेल्या तीनही ब्राह्मण श्रेष्ठांच्या भविष्याचे शब्द डोळ्यामधून हृदयात साठवून घेत होती.तिचा चेहरा शांत,स्वस्थ होता.आपल्याला पुत्र होणार आहे.तो चक्रवर्ती सम्राट होतो की क्रांतदर्शी तत्ववेत्ता होतो याची तिला काळजी नव्हती.उदरातल्या या बाळाला जीवन मिळणार आहे. जुन्या जगाचा नवीन अनुभव घेण्यासाठी ही पृथ्वी,हे आकाश तो पाहणार आहे,एवढं आश्वासन तिला मिळालं होतं.हेच तर तिचं सुख होतं..!!
* *
आदि मंगल..!
म्हणजे माणूस इथं पर्यंत येऊन पोहोचला कां?-भविष्याचाही वेध घ्यायला लागला कां?- कधी काळी माझ्या रौद्र-भीषण रुपाला घाबरुन गुहेत भेदरुन लपणारा नागडा दुबळा माणूस इतका पुढे येऊन पोहोचला..!!! मला राहून राहून नवल वाटतंय,सालं हे घडलं कसं?- मी कसा आणि केंव्हा अगणित शकलात विखुरला गेलो ते मलाच आठवत नाही.पुढेही किती,कुठे,कुठे पसरत जाणाराय मी ते मलाही सांगता येत नाही.त्या माझा शोध हा माणूस घेतोय..थक्क व्हायला होतंय..यानंं काय निर्माण केलं नाही?-शस्त्रास्त्रांचा शोध लावून नाना कल्पना लढवून स्वत:चं संरक्षण करायला शिकला,स्वत:ची भाषा,स्वत:ची संस्कृती,धर्म,देवदेवता निर्माण केल्या.शेतीचा शोध लावला,टोळ्या निर्माण करुन माझ्या भूगोलावरचे अनेकानेक प्रदेश ताब्यात घेतले,राज्ये निर्माण केली,नीतीनियम बशवले,विविध ज्ञानशाखा शोधून काढल्या..माझ्या अस्तित्वा संबंधी त्याला जे जे प्रश्न पडले त्याची उत्तरे त्याने मिळवली.त्यातून नवीन प्रश्न उभे राहिले.गंमतच आहे या माणसाची.आता यातून याची सुटका नाही.कोळी जाळं विणतो त्याचं भक्ष पकडण्यासाठी आणि स्व:च त्यात अडकून पडतो तसा प्रकार झालाय.अशा परिस्थितीत सुमेध जन्म घेऊन या साऱ्याला कसा सामोरा जाईल याची मला प्रचंड उत्सुकता आहे.तुलाही असेल..
* *
देवदह
" सखे,नंदिनी,मेणा इथेच थांबवायला सांग.."
"इथे?" मेण्याचा पडदा बाजूला सारुन नंदिनीने बाहेर पाहिले आणि म्हणाली-
"राज्ञी,हे लुंबिनी वन आहे.."
"म्हणूनच तर थांबायला सांगते आहे"
"पण देवी, नियोजनाप्रमाणे.."
"सर्वच घडतं असं नाही.थांबूयात इथे.देवदहला,माझ्या मातापित्यांच्या घरा पर्यंत जावे लागेल असे वाटत नाही."
"खूप त्रास होतोय कां राज्ञी?"
"खूप नाही पण.."
- नंदिनीला काळजी वाटू लागली.तिने मेणा थांबवायला सांगितला.महाराज्ञींचा मेणा थांबल्या बरोबर मागून येणारे राजवैद
य,स्थापत्यविद, अन्नधान्य,इतर आवश्यक सामानसुमान असलेले सर्वच गाडे,मेणे थांबले.राजवैद्य मेण्यातून उतरुन माया्तींच्या मेण्याकडे चालू लागले.जांभळया रंगाचे बारीक काठ असलेला फेटा कानावर घट्ट आवळून बांधलेली त्यांची मुद्रा धीरगंभर दिसत होती.झपझप पावले टाकताना त्यांच्या कानातील बाळ्या सकाळचे कोवळे किरण पडून चमकत होत्या.सरळ नासिकेच्या शेंड्यावर घर्मबिंदू जमा झाले होते.गळ्यातली रुद्राक्ष माळ हलत होती.खांद्यावरुन घसरणारे उत्तरीय त्यांनी मागे सारले आणि ते त्यांच्याच प्रतिक्षेत असलेल्या नंदिनीला म्हणाले-
"निश्चिंत असा.महाराज्ञींची प्रकृती पाहू आणि मगच काय तो निर्णय घेऊ."
नंदिनीने राजवैद्यांसाठी मेण्या जवळ आसन मांडले.त्यावर ते पद्मासन घालून बसले.नाडीवर तीन बोटे हलकेच दाबून त्यांनी डोळे मिटले,ध्यान लावले.क्षणभर त्यांची मुद्रा सचिंत झाली पण मंद स्मित करुन त्यांनी डोळे उघडले.नंदिनी त्यांच्याकडे आतुरतेने पहात होती.तिच्याकडे कटाक्ष टाकून ते स्वत:शीच म्हणाले-
"फार फार तर अजून एक दिवस...याहून अधिक प्रतिक्षा करावी लागणार नाही..नंदिनी..!!"
"सर्व व्यवस्था इथेच करावी लागणार आहे.देवदहला महाराज्ञींच्या मातापित्यांनाही हा बदल कळवावा लागेल.हे काय स्थापत्यविदही आलेच.."
"चिंता नसावी..महाराज्ञींची आणि सर्व सेवकांची निवासाची व्यवस्था दुपारपर्यंत होईल"
- राजवैद्य काही बोलणार तोच स्थापत्यविद तत्परतेने म्हणाले,आणि क्षणाचाही विलंब न लावता ते मेण्याभोवती उभ्या असलेल्या सेवकांना सूचना देऊ लागले.बैलगाड्यांवर लादलेले गवताचे भारे आणि वेताचे बांबू उतरविले गेले.बघता बघता काही घटिकातच सूतिकागृह उभे राहिले. गायीच्या शेणाने जमीन सारवण्यात आले.पलंग मांडण्यात आला.त्यिभोवती जमिनीवर दासींनी पत्रलेखा चितारल्या.गृहाच्या प्रवेशद्वारावर जातमातृकादेवीचे चित्र काढून तिची विधीवत पूजा करण्यात आली.पलंगा समोरच्या भिंतीवर वर्धमान मंगलचिन्ह चितारण्यात आलं.गृहा समोरच्या प्रांगणात मनोहारी रंगावली रेखण्यात आल्या.देवदेवतांच्या रेखाकृतींवर कपाशीची फुले ठेवून त्या शोभायमान केल्या गेल्या.याशिवाय राजवैद्य,स्थापत्यविद यांच्यासाठी स्वतंत्र कुट्या उभ्या राहिल्या.अन्य सेवक व सुरक्षा रक्षकांसाठी राहूट्या बांधण्यात आल्या.भोजमंडप आणि मुदपाकखाना देखील सेवेला सज्ज झाला.
-यथावकाश देवदहला गेलेला दूत मायावतीदेवींच्या धाकट्या भगिनीला गौतमीला घेऊनच परतला.जवळजवळ वर्षभरानंतर आपल्या धाकट्या बहिणीला पाहून मायावतीदेवींचा ऊर भरुन आला.दासदासी,सुईणी,वैद्यराज,असे सगळे काळजी घ्यायला असले तरी अशावेळी आपलं रक्ताचं माणूस जवळ असावं असं कोणत्याही सामान्य स्त्रीला वाटतं तसं मायावतीलाही वाटत होतं.गौतमीलाही आनंदाचं भरतं आलं.दोघी बहिणींनी एकमेकींच्या गळ्यात पडून आनंदाश्रूंना वाट मोकळी करुन दिली..!!
* *
शाक्य कुलपतींच्या पुत्राच्या स्वागताची ही सिद्धता जणू लुंबिनी वनालाही समजली.वृक्षलतांची पाने मंद समीर लहरींवर टाळ्या वाजवू लागली.आम्रतरुंवर कोकीळ गाऊ लागले.त्यासरशी मैना,राघू,हंस,साळुंक्या साऱ्याच पाखरांनी त्याच्या सुरातसूर मिसळले.मृगांनी तर कमालच केली.मायावती,गौतमीच्या आणि नंदिनीच्या आधाराने विहार करत होती.अगदी निमंत्रण धाडल्यासारखे हे साताठ मृग या तिघींच्या भोवती फेर धरुन पखठशिवणीचा खेळ खेळू लागले.भ्रमरांच्या व फुलपाखरांच्या गुंजारवाने सारे वन निमिषात डोलू लागले.सुगंधाने ओथंबलेल्या कळ्या फुलून दरवळू लागल्या..!! हे सारं पाहून मायावती हरखून गेली.म्हणाली-
"गौतमी,सृष्टीत प्रतिक्षणी घडणारा हा सृजनोत्सव पाहायला माझा बाळही आतूर झालेला दिसतोय.."
"काय झालं ताई? काही त्रास तर होत नाही ना?"
"छे गं..! त्रास कसला..खूप खूप सुख होतंय..या प्रसव वेदना म्हणजे आनंदतरंग आहेत.जरा माझा हात धरशील.."
"काय हवीय देवींना?" नंदिनी
"काही नको.ती फुलांनी गच्च डवरलेली फांदी..बस्स..ती तेवढी मला धरु दे.."
-गौतमी आणि नंदिनी मायावतीला पवनावर डोलणाऱ्या त्या फांदी पर्यंत घेऊन गेल्या.गौतमीच्या खांद्यावरचा उजवा हात काढून मायावतीने ती फांदी धरली.नंदिनीच्या खांद्यावरचाही हात काढून त्या फांदीला धरुन ती उभी राहिली फुलांचा सुगंध तिने छातीत भरुन घेतला.तो तसाच रोखून धरत तिनं निळेभोर आकाश डोळ्यात साठवून घेतले.डोळे मिटले आणि म्हणाली-
"गौतमी,आज वैशाख पौर्णिमा.छान दिवस निवडला लबाडानं.इतके उदरात मुटकुळं करुन पडून राह्यचा.पण आता ते त्याला अशक्य झालेय.समजतंय रे छकुल्या मला..थांब क्षणभर.."
-असं म्हणत श्वास कोंडून घेतला.दोन्ही गुडघे छातीच्या दिशेने वर उचलले.एव्हाना सुईणींनी येऊन रेशमी वस्त्रांचा आडोसा तयार केलाच होता...आणि तो क्षण आला..निसर्गाच्या सहवासात सर्वशक्तीनिशी त्या चिमुकल्यानं उदरातला तो अंधार फोडला..त्याच्या पहिल्या "ट्यहां"ने सारा आसमंत दुमदुमून गेला.. भूतकाळ मागे टाकून समस्त मानव समूहाचे उज्वल भविष्य बाळमुठीत घट्ट धरुन नव्या युगाच्या निर्माणाची द्वारे उघडीत क्षणाक्षणाचे मौन मुखरीत वर्तमान सर्वदूर वाहू लागला..!!!!
* *
आदि मंगल..!
-रात्री शवासनात ध्यान लावावं असं म्हटलं आणि गुहेतल्या कातळावर अंग टेकले.अशी गडद गाढ झोप लागली की विचारु नकोस.सूर्याचे पहिले कोवळे किरण अंगावर पडले,पाखरांचे कूजन कानी पडले आणि जाग आली.गुहेच्या माथ्यावरुन कोसळणाऱ्या प्रपाताखाली उभा राहिलो,यथेच्छ स्नान केलं.ओले चिवर पिळून कोरडे अंगावर घातले.रात्रभर ज्या अग्नीने माझे हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण केले तो अग्नी आता राख पांघरुन अजून आतल्या आत जळत धगधगत होता.त्याकडे एक खिन्न कटाक्ष टाकला.वाटलं,प्रत्येक माणूस असाच आतल्या आत धगधगतो आहे.जळतो आहे.रागानं,द्वेषानं,संतापानं,मत्सरानं तडफडतो आहे.संपूर्ण मानव जातीचा इतिहास म्हणजे सूडाने पेटलेले धगधगते अग्नीकुंडच आहे की काय?-हा इतिहास प्रेमाचा,सौजन्याचा,मैत्रीचा होईल असे काहीच करु शकणार नाही कां आपण?-तुला काय वाटते?-एकमेकांशी वैर धरा,युद्ध करा आणि मिळवा काय तर एखादा जमीनीचा तुकडा,नदीचं पाणी..!
- एक नदी जी आपले उगम स्थान सोडून वाहत राहते.अप्रतिहतपणे..या टापूतून त्या टापूत..या प्रदेशातून त्या प्रदेशात..तिला माहित नसते आपले वाहणे कुठे थांबणार आहे..माहीत नसते आपल्या दोन्ही तीरावर माणूस नांवाचा प्राणी वसती करुन राहू लागलाय, शेती करु लागलाय,अन्नधान्य पिकवू लागलाय,तिला देवता समजून तिची पूजा करु लागलाय,आपल्याला नांवे दिलीयत या माणसाने.गंगा,भागीरथी,यमुना,नर्मदा,कृष्णा,गोदावरी,कावेरी,नैरंजना,रोहिणी..! रोहिणी..!!-कोणत्या पर्वतावरुन उडी घेत,फुफांडत,उसळत,खळखळत,वाहत आली माहित नाही.तिच्या नदी असण्याचे प्रयोजन कळलंच नाही तिला.कळलंच नाही कधी रोहिणीला
की आपल्या दोन्ही तीरांवर माणूस नांवाच्या निसर्ग पुत्रांनी आपापली राज्ये वसवलीयत,एकाच मातीची लेकरं.. कुणाला शाक्य असण्याचा अभिमान..कुणाला कोलिय असण्याचा अभिमान..तर कुणी लिच्छवी असण्याचा अभिमान बाळगतो.मुक्तपणे स्वत:च्या मस्तीत वाहणाऱ्या आपल्याला घाट बांधतात,पाट काढतात,कालवे काढतात,मनाप्रमाणे आपला प्रवाह हवा तसा वळवतात आणि मग हक्क सांगतात आपल्या जलावर..वाटणी करतात आणखी आणखी वाटण्या करण्यासाठी बाह्या सरसावतात,तंटेबखेडे करतात,एकमेकांच्या जीवावर उठतात..या साऱ्याला कंटाळून जल वापराचे नीतीनियम ठरवतात.मैत्रीचे शपथा घेतात..पुन्हा आपणच त्या मोडतात..युद्धे करतात..काय म्हणावं या माणसाला?..शाहणा की वेडा?- हा आपल्या सारख्याच दुसऱ्या माणसाला वचन देतो.शपथ घेतो आणि सहज विसरुनही जातो.इतके फसवे,इतके तकलादू असतात कां स्वत:च्याच हृदयातून आलेले शब्द?
-हा माणूस म्हणजे नक्की आहे तरी कोण?-कसा लावायचा याच्या हरघडी बदलणाऱ्या रुपाचा अर्थ?-कसा घडतो, बिघडतो माणूस?-आणि मित्रा, कां मलाच पडतात असे प्रश्न आणि कां शोधावीशी वाटतात त्यांची उत्तरं?-बरं उत्तरं मिळाली तरी मनाचं समाधान,शांती?-ती मिळणार आहे कां?- माहीत नाही.पण जाणून घ्यायचंय सगळं..त्याशिवाय स्वस्थताच नाही मिळणार मनाला..नदीत मनसोक्त स्नान करुन कंबरभर पाण्यात मी उभा आहे.तीरावर जाऊन पुढच्या यात्रेला निघण्यापूर्वी पोटभर पाणी प्यावे म्हणून दोन्ही हातांची ओंजळ प्रवाहात बुडवून मुखाजवळ नेणार तोच..एक छोटीशी मासोळी ओंजळीतल्या पाण्यात सुळसुळताना दिसली बोटांच्या फटीतून पाणी जसं जसं प्रवाहात पडू लागलं तसतशी पिटुकली मासोळी तडफडू लागली.काही क्षण तिच्याकडे नुसताच पाहात राहिलो.सुळसुळत..तडफडत तिने टुण्णदिशी पाण्यात उडी घेतली..मी हसलो थोडा कौतुकाने,थोडा खिन्नतेने..ओंजळीतच राहिली असती तर तिचं मरण निश्चित होतं.नदीच्या प्रवाहात पडून ती काही अमर होणार नव्हती पण जगण्याची शक्यता होती.ओंजळीतल्या पाण्यात तडफडून मरण्यापेक्षा सागराच्या ओढीनं वाहणाऱ्या नदीच्या जीवनाला सामोरं जाणं केंव्हाही उत्तम.. चल मित्रा,या नदीला वाहू दे अशीच अप्रतिहत..मला निघायला पाहिजे. जेवढ्या लवकर शाक्य राज्याची सीमा ओलांडता येईल तेवढ्या लवकर मला ओलांडायचीय..
- यात्रेला प्रारंभ केला त्याला आता चार मास उलटून गेले असतील.परिव्रज्या घेतली,हातात भिक्षेचा कटोरा घेतला खरा मित्रा पण शाक्य राज्याची सीमा ओलांडे पर्यंत ' ॐ भवती भिक्षान्न देही ' अशी याचना करायची वेळच आली नाही. ठिकठिकाणी माझ्या स्वागताची जय्यत तयारी करुन नगर बांधव माझी प्रतिक्षा करत उभे असायचे.मला आग्रह करकरुन मिष्टान्न खाऊ घालण्यात मातभगिनी सर्वात जास्त पुढे होत्या.त्यांना कठोरपणे नकार देऊन टाळून पुढे जाणं म्हणजे महाकठिण काम होतं.अन्नाचा अपमान नको या भावनेने घासभर तरी खावं लागायचं.इतका वैताग आला होता.ही सगळी आमच्या पितामहांची मुद्दाम आखलेली योजना होती.रोहिणी जल वाटपाचा प्रश्न आपण परस्पर सामंजस्याने सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असं सांगत तरुणांचे किती तरी गट पुढे येत होते.माझं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते.एक दिवस तर कहरच झाला.माझा शोध घेत घेत मगध सम्राट महाराज बिंबिसार त्यांच्या लवाजम्यासह मी ज्या ठिकाणी तात्पूर्ती कुटी बांधून रहात होतो तिथे हजर झाले. इतका वैताग आला होता,कुठून राजकुळात जन्माला आलो असं वाटायला लागलं होतं.शाक्यसंघाच्या युद्ध निर्णयाला विरोध केल्यामुळेच माझ्यावर परिव्रज्या घेण्याची वेळ आली अशीच बहूतेकांची समजूत झाली होती.महाराज बिंबिसारही याला अपवाद नव्हते.नमस्कार करुन मी म्हणालो-
" माझ्या पितामहांना काय म्हणावे समजेनासे झाले आहे..मी आचार्य भारद्वाजांकडून मी संन्यास दिक्षा घेतली आहे..कृपया माझे मन वळवण्याचा प्रयत्न करु नका. मला तो शाक्य संघ, शाक्यांचे राज्य, यात मला काडीचाही रस नाही..
" सिद्धार्था, संन्यास दिक्षा झाल्या नंतर दिक्षित पुरुषाचा भौतिकाशी असलेला संबंध संपुष्टात येतो हे कां मला माहित नाही? "
" तरीही माझा माग काढत इथवर येण्याचे कष्ट आपण कां घेतलेत? "
" कारण सरळ आहे.मला अजूनही असं वाटतं की गृहत्याग करण्याची,संन्यास दीक्षा घेण्याची तुझी कृती म्हणजे केवळ शाक्यसंघाच्या सभेत झालेल्या तुझ्या पराभवावरची प्रतिक्रिया आहे.."
" चुकीची समजूत आहे तुमची.मी पूर्ण विचारांती घेतलेला हा निर्णय आहे.तो बदलणार नाही.."
" असं तुला वाटतंय पण मला नाही तसं वाटत. तू सळसळत्या रक्ताचा आणि कुशाग्र बुद्दीचा तरुण आहेस..कपिलवस्तूच्या जनतेला तुझ्या क्षात्रतेजाची सर्वाधिक गरज आहे.तेंव्हा ही पलायनवादी वृत्ती सोड आणि तुझ्या क्षत्रिय धर्माला जाग..गृहस्थाश्रमाची सगळी कर्तव्ये पूर्ण कर,तुझी पत्नी यशोधरा, बाळ राहूल यांचा विचार कर..त्यांना तुझ्या सहवासाची, प्रेमाची गरज आहे..
" मी माझ्या पत्नीच्या अनुमतीने गृहत्याग केला आहे.. त्यामुळे गृहस्थाश्रमाची सर्व कर्तव्ये पार पाडायला ती समर्थ आहे..माझे माता-पिता आता तिचे झालेत.त्यांची जबाबदारी देखील तिचीच आहे.मुख्य म्हणजे ही जबाबदारी तिने अगदी आनंदाने स्विकारलेली आहे..."
" पण तुझ्या माता- पितांचं काय?-तू गृहत्याग केलास त्यांच्याविषयी तुझे काही कर्तव्य आहे कां नाही?"
" मी आधीच सांगितलेय यशोधराने ती जबाबदारी स्विकारलेली आहे.."
" म्हणजे कुटुंबा विषयी तुझ्या मनात कोणतीच आत्मियता राहिलेली नाही.तू गृहत्याग केलास तेंव्हापासून माता गौतमी पितामह महाराज शुद्धोदन, यशोधरादेवी सगळे तुझी क्षणाक्षणाला आठवण काढत अश्रू ढाळतायत..रक्ताच्या माणसांना दु:खात लोटून तुझ्या संन्यासधर्माला तरी तू न्याय देऊ शकणार आहेस कां? "
" त्याची चिंता आपण करु नका.गृहस्थाश्रमातील कर्तव्यांपेक्षाही समाजाप्रती असलेली कर्तव्ये मी श्रेष्ठ समजतो.अखिल मनुष्य समूहासाठी सद्धर्माचा मार्ग शोधणं हे माझे एकमेव ध्येय आहे.या ध्येयापासून माझे मन कदापिही विचलीत होणार नाही.कृपया आपला आणि माझा अमूल्या वेळ वाया घालवू नका..माझ्या पितामहांच्या विनंतीला मान देऊन आपण वाकडी वाट करुन इथपर्यंत आलात त्याबद्दल आभार..मगध साम्राज्याची जनता आपली वाट पहात असेल.आपण त्यांची चिंता वहा..अगदी हात जोडून विनंती आहे.."
" अखिल मानव समाजाचे कल्याणच करायचे तर ते तुझ्या क्षात्रधर्माला जागूनही करता येईल.त्यासाठी मी तुला मदत करीन..आपण दोघे एकत्र आलो तर कोलियांचेच काय कौशल नरेशांचेही साम्राज्य धुळीला मिळवून टाकू शकतो.तुझ्या पितामह देखील हेच स्वप्न उराशी बाळगून आहेत.त्यांना आणि मला, तू पृथ्वीचा अधिपती झालेलं पहायचंय. आपण दोघे एकत्र आलो तर हे सहज शक्य आहे.सत्याचा शोध,सद्धर्म वगैरे म्हातारपणात करायच्या गोष्टी.तेंव्हा तुला लाभलेले लाखमोलाचे तारुण्य असे भलत्या गोष्टीच्या मागे लागून वाया घालवू नकोस.चल मिळव हात.दोघे मिळून उत्तर भरतभूमीवरील छोट्या छोट्या राजांना एकत्र आणू..कोशल नरेशांची महासत्ता उलथून पाडू आणि आपले एकछत्री साम्राज्य स्थापन करु..हवे तर मी मगधाचे अर्धेराज्य तुला देतो पण तू ...
" थांबा.भलती स्वप्ने दाखवून मी माझ्या निश्चयापासून ढळेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो केवळ भ्रम आहे तुमचा.सत्ता,संपत्ती हे माझे ध्येय कधीच नव्हते आणि नाही.शाक्यसंघाच्या सभेत
मी केलेला युद्ध विरोध हे एक फक्त निमित्त होतं.जीवन सत्याच्या शोधार्थ गृहत्याग, देश त्याग करण्याची उर्मी मला बालपणापासूनच स्वस्थ बसू देत नव्हती.पण ही गोष्ट प्रत्येकाला सांगायचे प्रयोजन नव्हते.आपण फारच आग्रह धरलात म्हणून तुम्हाला सांगतो आहे.आता या पुढे वाद-प्रतिवाद करण्याची माझी अजिबात इच्छा नाही.आपण आपल्या मार्गाने जा आणि मला माझ्या मार्गाने जाऊ दे एवढीच विनंती आहे."
माझे निकराचे बोलणे ऐकून महाराज बिंबिसार जरा नाराजीनेच परतले.ध्येयापासून परावृत्त करणारे प्रसंग शाक्य राज्याची सीमा ओलांडे पर्यंत येत राहिले.पण मी मंद स्मित करुन मार्गक्रमण करत राहिलो.
-आता राजगृह नगरीत प्रत्यक्ष पाऊल ठेवले.मित्रा,विधीवत दीक्षा घेतली तेंव्हाच ठरवले होते की या नगरीत योग साधनेचा प्रारंभ करुन दीर्घकाळ वास्तव्य करायचे.अनेक थोर ऋषीमुनींनी इथे वास्तव्य करुन आपल्या तपाचरणाने ही नगरी पुनीत केली आहे.पाच टेकड्यांनी गळ्यातगळे गुंफून या नगरीला वेढून टाकले आहे.त्यातल्या पांडव टेकडीच्या पायथ्यास साग,चंदन,शीसम,अशा श्रीमंत वृक्षराजांनी दाटी करुन आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.याच ठिकाणी कुटी बांधावी असे योजून मी योग्य स्थानाच्या शोधात चालतो आहे.माझ्या उजव्या हाताला एक मोठा जलाशय सरोवरासारखा शोभतो आहे.त्यातील सूर्य मुखी कमलिनी,सांध्याकालीन छाया दाटू लागल्यामुळे अंगे आक्रसून अधोवदना युवतीसारख्या बसल्या आहेत.जलाशयाला वळसा घालून पुढे गेलो तर एका अतीप्राचीन वास्तुचे ध्वस्त अवशेष मूक आक्रंदन करीत असल्यासारखे भासताहेत.मित्रा,मला वाटते कधी तरी कुणी तरी मुमुक्षू परिव्राजकांसाठी,पांथस्थांसाठी बांधलेला हा विहार असावा,हो विहारच हा.नीट लक्षपूर्वक पाहिले तर साऱ्या खुणा पटताहेत.सभोवार काही कलथून पडलेले स्तंभ दिसताहेत,धारातीर्थी योद्ध्यांसारखे.दगडमातीच्या ढिगाऱ्यातून कष्टाने मस्तक उचलून मानव समूहाच्या अधोगत इतिहासा विषयी खंत करीत प्रगतीचे वर्तमान ऐकण्यास उत्सुक असलेले पायीचे मजबूत प्रशस्त शिलाखंड, माझ्यासारख्या परिव्राजकांना जणू आमंत्रण देत आहेत.या,बसा थोडे आमच्या सोबत चार शब्द बोला.."
- हे ऋषीमुनींनो,सत्य शोधकांनो,ज्या सत्याच्या प्राप्तीसाठी आपण आपली आयुष्ये वेचलीत त्या सत्याप्रत जाण्याचा मार्ग कोणता या विषयी निश्चित काहीच सांगता येत नाही.पण आपण सारे त्या सत्यात विलीन होऊन महाकालावर नर्तन करत असाल.पण एक दिवस माझाही असेल.मला देखील संबोधी प्राप्त होईल.सत्याचा तो निर्मळ प्रकाश जगताला वाटत मी फिरेन.सद्धर्माचा मार्गदर्शक होईन.माझेही असंख्य अनुयायी असतील.मी प्रकाशित केलेल्या धर्माच्या साधकांनी आणि त्यांच्यासाठी बांधलेल्या विहारांनी ही पृथ्वी गजबजून जाईल..
"प्रयत्न शून्य पण फुशारक्या मात्र खंडीभर..!"
-खोल अंधाऱ्या विहीरीतून घुमत वर यावेत तसे हे शब्द माझ्या कानावर कुठून आदळताहेत?-पुन्हा पुन्हा घुमताहेत..प्रयत्न शून्य पण फुशारक्या मात्र..मित्रा,माझ्या शिवायही कुणी आहे कां इथे?-दचकून सावध होऊन पाहतोय मी पण कुणीच दिसत नाहीय.मग बोलले तरी कोण?-हा भास की सत्य?-काहीही असले तरी या विधानात तथ्य आहेच.'यंव करीन न् त्यंव करीन'अशा नुसत्या वल्गना करण्यात लाभ काय होणाराय?-सत्य शोधाच्या दिशेने आपण असा कितीसा प्रयत्न केलाय?-पण मग भृगुऋषींचा निरोप घेताना जेंव्हा आपण त्यांना म्हणालो,'की तुमच्या उग्र तपश्चर्येमुळे ऐहिक दु:ख मुक्तीचा मार्ग सापडेल असं वाटत नाही.तेंव्हा ते असे कसे म्हणाले की तुझे ध्येय शूराचे आहे.तू विंध्य कोष्ठास आलारकालामांच्या आश्रमात जा.ते तुला मार्ग दाखवतील.म्हणजे मी अध्यात्मिक उन्नती निश्चितपणे प्राप्त करु शकेन अशी त्यांची खात्री झाली म्हणूनच ना?
'शकेन..! असेल..!..होईल..!!! छान मनोराज्ये चाललीयत..!!!"
-पुन्हा तोच तसाच आवाज आणि हास्याचा गडगडाट...गेला.सूर्य अस्ताचली बुडाला.आकाश काळवंडून गेले.चांदण्या एकेक करत उमलून हसू लागल्या,समस्त वस्तूजाताला..अरे..! हा चंद्रही आला..! शांत जळात त्याचे प्रसन्न रुप पाहून कमलिनींचा जीव हर्षोत्फुल्ल झाला.आता रात्र कितीही दीर्घ असू देत.चंद्र सोबत आहे.जीवाचा जीवलग.तो कोटी भास्कर..तोही जीवलगच.मित्रच साऱ्या जगताचा..पण चंद्र अधिक प्रिय.मलाच नव्हे साऱ्या मनुष्यांना..साऱ्यांच्या मनात चंद्राप्रती ऐशी प्रीती..ऐशी प्रीती..अगदी ओसंडून वाहणारी..!!
-पोट पाठीला बांधून दिवसभर श्रमावे,गात्रे थकून आंबून जावीत,अंगणात, सौधावर..बाजेवर पहूडावे आणि एका चंद्राशी गोष्टी कराव्यात,सारी सुखं-दु:खे,मनोगते,कथा-व्यथा फक्त चंद्राला निवेदाव्या,मने खुशाल उघडी मोकळी करावीत..अगदी कुणीही.अहाहा..! काठावर बसून शांत जळातील चंद्रबिंब निरखता निरखता रात्र कशी निघून जाईल कळणारही नाही.देव असो वा दानव,धनवान असो की बलवान, निर्बुद्ध असो वा मेधावान..याला सारे समान.संपूर्ण ब्रह्मांडाचेच होईल चिमूटभर भस्म असा अग्नीदाह पचवून,रिचवून हा साऱ्या जगताला शीतल चांदण्यात न्हाऊ घालतो.यातच त्याचे खरे सुख..
"पाल्हाळ बरेच झाले.मुद्याचं बोल.."
"कोण?"
-दचकलो.अंगावरील रोमरोम उभे राहिले.भयचकित नजरेने सर्वत्र पाहू लागलो.त्यासरशी एका छद्मी हास्याने वातावरण ढवळून निघाले.अगदी तळापासून.डोळे-स्वत:चेच अगदी टक्क उघडे.पण विश्वास बसेना..सर्वत्र पाहात मी त्या काळोखाला चिरत चाललेल्या हास्याच्या दिशेने साद घातली-
"कोण आहात कोण आपण?-असे समोर तर याल..???"
-रातकिड्यांची किरकिर कर्णकर्कश्श भासू लागली.काजव्यांच्या झुंडीच्या झुंडी गर्द झाडीतून चमकू लागल्या.पाठोपाठ बैलांच्या गळ्यातील घंटाध्वनी अंधाराला भेदत जाऊ लागले..खळदंग..खदळंग..खळदंग..खदळंग.. व्यापार उदीमास निघालेले बैलगाडे संथपणे एका लयीत चालले आहेत.कुठे जात असतील? कपिलवस्तूत की कोशलनगरीत?
"कपिलवस्तूकडेच निघालेत जायचेय कां तुला?"
"........."
फार आठवण होतेय ना माय तातांची?लहानग्या राहुलची,गोपाची?"
"अरे..! कोण आहात कोण आपण?- अंधारातून तीर कां मारता आहात?-असे समोर येऊन ठाका कसे..!!"
"आश्चर्य वाटले ना?-तुला काय वाटते तुला ऐकणारे कुणीच नाही या निर्जन वनात?"
"........."
"वनात ऐस वा जनात,तुझ्यासवेच आहे मी.अगदी जन्मापासून.."
"काय? जन्मापासून?"
-पुन्हा तेच,तसेच छद्मी हास्य.अंधार अधिकच गडद झाला.त्यात कितीही डोळे खुपसले तरी काहीही दिसत नव्हते.हा आहे तरी कोण? आणि हा आपला चेहरा कां दडवतो आहे? जमिनीत खोलवर पसरलेल्या अश्वत्थाच्या पारंब्यांचा आश्रय करुन हा उभा आहेसे भासतेय.दोन पावले पुढे आला तर याला नीट पाहता तरी येईल.तो येत नाही तर आपणच जाऊ असे ठरवून मी चालू लागलो तर वाऱ्याच्या प्रचंड झोता बरोबर पायाखालचा पाचोळा सर्वदूर उडू लागला.एक ताडमाड उंच सावली चांदण्यात चमकून वृक्षराजीत लुप्त झाली.भयातिशयाने अंगावर काटा उभा राहिला.तोंड कोरडे पडले.माझी अशी अवस्था बघून कूत्सित हास्याच्या लहरी वातावरणात घुमू लागल्या.सावज गिळायला हजारो सर्प पायाखालून सळसळत वेगाने जावेत तसे झाले.प्रयत्नपूर्वक सारे बळ एकवटून मी उच्चरवात ओरडलो-
"लक्षावधी गेंड्यांच्या कातडीसारख्या टणक अंधारात तोंडलपवून नुसता हसू नकोस.असा समोर येऊन उभा रहा..!!"
-पुन:श्च एक हास्य मला खिजवत निबिड वनात विरुन गेले.पान न् पान थरारले.वटवाघळांची एक झुंड माझ्या डोक्यावरुन "चीं..चीं..चीं.."करत उडत निघून गेली.इतका वेळ ढगाआड झालेला चंद्र चांदण्यां सवे आला.ज्याचा केवळ आवाज ऐकत होतो त्याचे भेसूर रुप समोर आले..!!
-हबडून गेलो.हा आदि मानव की दानव?-याचा न् आपला संबंध काय?-ठेंगण्या बांध्याचच्या त्या सोंगाचे गुंजेसारखे लाल डोळे चमकले.हावरेपणाने जिभल्या चाटत माझ्याकडे पाहू लागले.एखादे अजस्त्र अंडे उभे करुन ठेवावे तसा त्याचा देह दिसत होता.डोके दोन्ही बाजूने दबलेले खडबडीत टेंगळासारखे दिसत होते.पण त्यावर केसांचा पत्ताच नव्हता.नाक अती लहानखुरे पण चपटे होते.त्याखाली आत वळलेली ओठांची रेघ नीट पाहिली तरच दिसत होती.गाल खोलगट तर कान उंबरा एवढे.त्याचे मिटल्या ओठात हसणे,त्यावरुन मधेच जीभ फिरवणे संतापजनक होते.समोर पाहतो आहे ते सत्य आहे की भास असे वाटून मी तीनतीनदा डोके झटकून,डोळे चोळून त्याच्याकडे पाहात होतो.काही म्हणता काही कळेना.इतक्यात ते विद्रूप ध्यान दोन्ही बाहू पसरुन पुढे होत म्हणाले-
"भिऊ नकोस मी मित्रच आहे तुझा.चंद्रा इतका रुपवान नसेन पण त्याच्यासारखाच जगन्मित्र आहे.."
"काय तू आणि जगन्मित्र?-जरा आरशामध्ये स्वत:चं ओंगळ भिकारडं रुप थोबाड पहा आणि मग माझ्याशी मैत्रीची भाषा कर..!!"
-तो हसला आणि समजावणीच्या सुरात म्हणाला-
"आरशात?-कवण्या आरशात पाहू?आणि पाहून दिसणार तरी काऽय कप्पाळ..!-तुम्हा माणसांसारखे शारीर अस्तित्व मला कदाचित नसेल.असते तर ते इतक्या वर्षात मला दिसले नसते कां?-असो..! तू म्हणतोस तसे भिकारडे तर भिकारडेच असेल माझे थोबाड.ते पाहू म्हटले तरी मला दिसणार नाही पण खरेच सांगतो जीवमात्रांची सतत सोबत मी त्यांच्या जन्मापासून करीत आलो आहे.फार काय..मृत्यू नंतरही साऱ्या जीवांना माझी आणि माझीच साथ लाभत असते.अरे,मानवाचे सोड,पशू-पक्षी,किटक,जलचरच नाही तर साक्षात देवांनाही माझ्याशिवाय गती नाही..ये ये..मला आलिंगन दे.सुखाचा शोध घ्यायला तुला एवढ्या दूर यायची गरज नव्हती.ये,माझा अनुनय केलास तर सुखाच्या अनंत दशा तुला अनुभवता येतील.ये..आता उराउरी भेट.व्यर्थ वेळ दवडू नकोस..!!"
-त्याची अत्यंतिक किळस येऊन मी ओरडलो-
"शीऽऽ इतक्या दूर अंतरावरूनही तुझ्या अंगाचा सडक्या फळा सारखा उग्र दर्प माझ्या नासिकेतले केस जाळतो आहे.."
"मी सोबत असण्याची ही आणखी एक खूण..तुला सडक्या फळासारखा जो गंध वाटतो आहे ना, तोच सवयीनं मोहाच्या फुलांसारखा मधुर भासेल.एक गोष्ट ध्यानी घे,जिवांना माझ्याशिवाय गती नाही.आज तुला दर्शन झाले ते योगायोगानेच.पण नेहमीच तुझ्या तुच्छ नजरेला मी दिसेनच असे नाही.."
"तुच्छ तू ..! तुच्छ तुझा सारा वंश..! जा नाहीसा हो इथून..!
"कसा नाहीसा होऊ? मला नाहीसा करण्यासाठी तरी एकदाच मला आलिंगन दे..ये,ये असा पुढे..मला मार म्हणतात..मार..!!! "
असं म्हणत ते किळसवाणं ध्यान माझ्या जवळ जवळ येऊ लागलं.त्याच्याकडे एक जळता कटाक्ष टाकून मी त्याच्या थोबाडावर जबरदस्त मुष्टी प्रहार केला.शांत निश्चल जलाशयात कुणी भला मोठ्ठा धोंडा फेकावा तसा भयंकर ध्नवी झाला.काही कळायच्या आत मागून कुणीतरी लत्ता प्रहार करावा तसा मी हेलपाटत जाऊन तलावाच्या काठावर जाऊन आदळलो.तळापासून ढवळून निघाललेली जळातली सारी प्रतिबिंबे एकमेकात मिसळून नाहीशी झाली.पाठोपाठ तेच छद्मी हास्य निनादत पुन्हा तेच विरुप डोळ्यासमोर उभे राहिले.त्यासरशी बारा हत्तींचे बळ अंगी संचारल्याप्रमाणे मी बेंबीच्या देठापासून ओरडलो-
"तूच काय,तुझा अख्खा वंशच निर्वंश करुन टाकेन मी निर्वंश..!"
-मेघ गर्जनेसारखा माझाच महाशब्द आसमंतात घुमत पुन्हा पुन्हा माझ्याच कानावर आदळू लागला.काही काळ तलावाच्या काठावर मी तसाच पडून राहिलो.तळापासून ढवळून निघालेला जलाशय शांत स्तब्ध झाला..!
-दचकून उठून डोळे उघडून सर्वत्र पाहिले तेंव्हा मी माझ्या कुटीत होतो.ते प्राचीन ध्वस्त वास्तूचे कलथून पडलेले खांब..तो जलाशय..तो- मित्रा,हे असे होते.जमिनीला पाठ टेकली..तुझ्याशी बोलत राहिलो..बोलता बोलता झोप कधी लागली ते कळलंच नाही.."मी मार..! मार म्हणतात मला,मार..!!"
"मित्रा,स्वप्नं पण काय भारी पडतात नाही?- मी मार..हसू आवरतच नाहीय..मार..!"
-आता तू म्हणशील हा मार कोण?-कळेल तुला.जरा डोळे मिटून तर घेशील?खूप वेगवेगळ्या रुपात सतत भेटत असतो हा मार..!
* *
क्रमश:
Comments
Post a Comment