रुबाया
रुबाया
---------
रुबाया
--------
तिरडीवर ठेवा शव माझे तात्काळ
रे ढोल वाजवा नाचा धरुनी ताल..!
कवितेने पिडले मी पिडले साऱ्यांना
आणू ना शकलो जमिनीवर ताऱ्यांना..!
*
हाताशी आल्या उल्का माझ्या चार
माझ्याहून झाल्या प्रिय मला त्या फार..
फुंकता प्राण मी गाऊ लागल्या साऱ्या
तो चंद्र उतरला खाली त्यांस पहाया..!
*
विर्घळता विर्घळेना शब्द गाण्यात येऊन..
माझी तहान भागेना खोल पाण्यात राहून..!
जीव शांतवावा कसा तिने फिरवली पाठ..
मागे- पुढे दिसे आता फक्त जमीन रेताड..!!
*
शब्दांच्या उदरी किती जन्मांची स्मरणे
मी लिहीत गेलो विसरुन माझी मरणे..!
ही दीर्घ रात्र अन् त्याहून दीर्घ प्रतिक्षा
उगवेल...तोवरी जगावयाची शिक्षा..!!
*
©रमेश यशवंत वाकनीस
Comments
Post a Comment