कवींचा कारखाना

कवीवर्य भांबूराव 
---------------------- 
आमच्या गावात कवितेचे वारेमाप  वेडे
पीक निघाले त्याचे श्रेय मात्र भांबूरावलाच दिला पाहिजे.पुण्या-मुंबई सारख्या शहरातील काव्य मंडळात काही दिवस उमेदवारी केल्यामुळे येताना त्याने नव्या कवितेचे बियाणे आणले होते.सुरुवातीच्या काळात हे बियाणे आमच्या गावात रुजले नाही.भांबूरावाच्या नव्या कवितांची बहूतेक ठिकाणी उपेक्षा,कुठे कुठे तर हेटाळणी झाली.पण निराश होईल तो भांबूराव कसला? चौकात उभं राहून येईल त्या वाहनचालकाकडून हप्ता वसूल करणाऱ्या पोलीसमामां सारखा भांबूराव समस्त वस्तुमात्रावर कविता करु लागला.गावात असा कोणताही प्रकार घडला नाही की ज्यावर भांबूरावाची कविता झाली नाही.मेलेल्या आप्तांचे सांत्वन,सग्यासोबत्यांच्या बर्थ डे बद्दल अभिनंदन,वधूवरांसाठी मंगलाष्टक,आजाऱ्यांचे आरोग्य शुभेच्छा,थोडक्यात काय तर गावातल्या बारीकसारीक घडामोडींचे चित्रगुप्ती टाचण भांबुरावच्या कवितेत होऊ लागले.इतकेच काय,महापूर,वावटळ,ओला-कोरडा दुष्काळ,महामारी, यासारख्या विषया पासून ठेच लागणे,शिंक येतायेता बंद होणे,चहा पिताना साय मिशांना चिकटणे,अशा अगदी खाजगी भानगडीं पर्यंत भांबूरावाच्या काव्य-कृपेचा वर्षाव होत राहिला.विशेष म्हणजे गावातल्या तरुण पोरांना भांबूरावाचे फार कौतुक वाटत असे.भांबूरावाने कविता करायची खोटी,तरुण रसिकांचा घोळका तिचा आस्वाद घ्यायला तय्यार..! भांबूची सुरावट नेहमी तिसऱ्या सप्तकात चालायची त्यामुळे त्याच्या जुन्या कविता रसिकांना कम-अस्सल वाटायला लागल्या.सौभाग्याला पारखी झखलेली विधवा असो किंवा अंगठा तुटलेल्या वहाणे बद्दल कविता असो भांबूराव नेहमी एकाच चढ्या सुरात गायचा,गावात पेटलेल्या होळीच्या ज्वाला असो किंवा बाळंतीणीच्या शेकशेगडीतला मंदअग्नी असो, भांबूरावाची प्रलयाग्नीची उपमा ठरलेली.कविता सादर केल्यानंतर तिचे गुणवर्णनही लागोपाठ उरकून घेण्याचे त्याचे विशिष्ट तंत्र होते.प्रथम ज्येष्ठ कवींच्या हेटाळणीस हाणून पाडायचे म्हणून नवीन कवींचा कंपू त्याला उत्तेजन देत होता.पण पुढे भांबूरावच्या कवितांचे प्रमाण बेसुमार वाढत चालले.प्रभात,संध्या,वैश्वदेव,आकाशात उडणाऱ्या शिंगरास,फोडणी देताना पाहून,विंचूवंचना,अशा विविध विषयांवर भांबूरावाने एकाच दिवशी २५-३० कविता ऐकवल्या.तेंव्हा सगळेच म्हणू लागले सोडीव देवा या  जाचातून.नवरसांचा असा रतीब पचनी पाडण्या इतके सामर्थ्य गावात कुणाकडेच राहिले नाही.हळूहळू काव्यलोलूप मंडळी भांबूला भेटायला कचरु लागली.कोणताही समारंभ असो साऱ्यांना एकच धाकधूक लागलेली असायची.कारण गावकीच्या गोष्टी कितीही चोरुनमारुन करा भांबू तिथे नेमका टपकणारच.सांगायचा मुद्दा काय तर भांबूरावच्या कवितेने उभ्या गावाला सळोकी पळो करून सोडले होते.
एकदा असाच एक चमत्कारीक प्रसंग घडला.गावातल्या मोरोबांची बायको प्रसूत होऊन उपजतच मेलेले मूल झाले..! हा प्रकार पाहून भांबू कुंठीत झाला.मूल झाल्याबद्दल मोरोबांचे अभिनंदन करावे की ते मेले म्हणून सांत्वन करावे याचे त्याला कोडे पडले.भांबूरावाच्या विवंचनेची बातमी फुटताच मोरबाच्या दाराशी गर्दी जमू लागली.आमच्या गावात कोणत्याही समारंभास एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमल्याचे कुणाच्या ऐकीबात नव्हते.मेलेल्या मुलाच्या दर्शनासाठी धक्काबुक्की होऊन दंगल उडाली.कशीबशी प्रेतयात्रा एकदाची बाहेर पडली.सर्वांच्या तोंडावर अपूर्व उत्साह दिसत होता.इतके लहान मूल वस्तुत: परसातच पुरण्याची वहिवाट होती.पण ती प्रथा मोडून प्रेत वाजत गाजत स्मशानात नेण्याचे ठरले.साऱ्या गावाचे जेवण सुद्धा स्मशानातच व्हायचे ठरले.त्यासाठी प्रमुख नागरिकांची कमिटी स्थापन करण्यात आली.उत्तम पोशाख करुन लोक स्मशानाकडे धावू लागले.स्मशानात दुकाने,चहाच्या टपऱ्या,पाळणे वगैरे आले आणि स्मशानाला जत्रेची शोभा आली.त्या दिवशी एक भांबूराव सोडला तर गावात कुत्र सुद्धा राहिलं नाही.दिवसाढवळ्या ठिकठिकाणी आरास करण्यात आली होती.मात्र मुलांनी स्मशानात प्रसंगोचित पद्ये म्हणावीत अशी सूचना एकाने करताच अध्यक्षांनी तिथल्यातिथे त्याचा गळा दाबून प्राण घेतला.त्या मुलाच्या स्मारकासाठी मोठा फंड गोळा करण्याचे ठरताच वर्गण्यांचे आकडे कानावर पडू लागले.अशा प्रकारे सर्व जय्यत तयारी झाली.काही स्वयंसेवक खड्डा खणू लागले.मोठी सभा भरुन चिंतूकाकांच्या अध्यक्षते खाली विसूनाना बोलायला उभे राहिले- 
' ग्रामबांधवांनो,आज ज्या महोत्सवास आपण जमलो आहोत त्याची माहिती आपणा सर्वांस आहेच.आज बरेच दिवसांनी हा पहिला प्रकार घडतो आहे की ज्या बद्दल भांबूरावाची कविता नाही.(टाळ्यांचा कडकडाट)मी पुन्हा आनंद व्यक्त करतो की आज भांबूरावाच्या कवितेपासून गावाला थोडी सोडवणूक मिळाली आहे.हा उत्कट लाभ आम्हाला मोरोबांनी मिळवून दिला आहे.त्या बद्दल कृतज्ञता म्हणू मी हा हार मोरोबांच्या गळ्यात घालतो.मित्र हो,या अति आनंदाच्या,उत्कट हर्षाच्या या-को.‌..कोण तो..' 
विसूनाना धाडकन खाली कोसळले.अध्यक्षांचे डोळे पांढरे झाले..! दिशा धुंद झाल्या..!! दिवसा उल्कापात होऊ लागला..!! अशनिपात सुरु झाला..!! कोण? कोण तो? - होय, तोच भांबूरावच तो..!! आणि त्याच्या हातात पहा ते कागदाचे चिटोरे..! त्यात दुसरे काय असणार? कविता..! त्याशिवाय तो धापा टाकीत कशाला इथे येईल? 
क्षणार्धात जिकडेतिकडे पळापळ सुरु झाली.त्या मेलेल्या मुलाने सुद्धा आपण होऊन आपल्या खड्ड्यात दडी मारली..! माझ्या खेरीज त्या जागेवर कोणीही उरले नाही.जे स्थळ क्षणापूर्वी आनंदी जनसंमर्दाने गजबजून गेले होते.तेच एखाद्या स्मशानासारखे झाले- हो,पण ते स्मशानच होते नाही कां?..!! 
-बाळकराम 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७