कविता

कविता
-------- 
या आपल्या 
पृथ्वी वरून हळूहळू,
अस्थी मांस मज्जा असलेली,
बुद्धी भावभावना असलेली,
स्वत:चे पोट भरण्याआधी 
एखाद्या उपाशी जीवासाठी 
घास काढून ठेवणारी,
हसणारी हसवणारी 
रडणारी रडवणारी 
भांड भांड भांडून पुन्हा 
गळ्यात गळे घालून 
एकोप्याने नांदणारी माणसं 
गायब होताहेत..
नष्ट होताहेत 
आणी 
जन्म घेताहेत हुबेहूब 
माणासासारखेच दिसणारे प्राणी 
असे प्राणी-
ज्यांच्या पोटात 
न मावणारा आनंद नसेल 
नसेल तहान भूकेची जाणीव..
ते फक्त वाट पाहात राहतील 
तुमच्या तोंडून निघणाऱ्या आज्ञेची..
आज्ञा-ज्या तुमच्या 
सुजलाम सुफलाम पृथ्वीचा, 
तुमचा स्वत:चा विनाश 
घडवून आणतील..!!;
हो.हे होणार आहे-
कारण तुमच्या प्रत्येकाच्या हातात 
आहे एक खूप गोंडस,सुंदर खेळणं..
या खेळण्याशी खेळता खेळता 
हे खेळणंच तुमच्याशी 
कधी खेळायला लागेल 
तुम्हाला-
कळणार सुद्धा नाही..
म्हणून म्हणतो
वेळीच सावध व्हा- वेळ निघून गेल्यावर 
कितीही ओरडलात,
एऽआऽय,एऽआऽय म्हणून 
तरी काहीही उपयोग होणार नाही
ए आय मात्र 
थंड निर्विकार मेसेज पाठवेल- 
साॅरी मी तुझी आई बनवू शकत नाही.
*
©रमेश यशवंत वाकनीस
२१ फेब्रुवारी २०२६

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७