आदि मंगल.. मध्य मंगल..! १.
कादंबरी
---------
आदि मंगल..मध्य मंगल..!
लेखक : रमेश यशवंत
-----------------------------------
०
हे महासिद्धा..!
मला संबोधी प्राप्त होईल,
अशी एखादी कथा सांगून
उपकृत करशील काय?
मुमुक्षुचा हा प्रश्न त्या महाशून्यागारात किती वेळ तरी घुमत राहिला.मग प्रगाढ शांततेला चिरत एक आवाज त्याच्या कानावर पडला-
"कथा ऐकून संबोधि प्राप्त होत नाही..!
" मग? "
"रोकडा अनुभवच घ्यावा लागतो त्यासाठी..!
" मी तयार आहे..! "
" शंभरातले नव्याण्णव मुमुक्षुंना असेच वाटते की आपण अध्यात्मिक जीवनास पात्र आहोत.पण ते पात्र नसतात.."
" ही पात्रता ओळखायची तरी कशी? "
" प्रत्यक्ष मार्गक्रमण करतानाच ते कळू शकेल. तुला आतून ' साद ' ऐकू आलीय कां?"
"हो, म्हणूनच तर या शून्यागारा पुढे येऊन प्रश्न केलाय.."
" मग डोळे मिट ऐक आणि पहा.."
- शांत सरोवरावर काठावरच्या एखाद्या वृक्षाचे फळ पडावे आणि वलया मागून वलये उठावीत तशा प्रसंगांची मालिका डोळ्यापुढे सरकू लागली..शब्दांचे ध्वनि त्याच्या अंतरात्म्यात घुमू लागले..
१.
खळदंग..खळदंग..खळदंग..खळदंग
खदळंग.. खदळंग.. खळदंग.. खळदंग..
बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज येतोय दूरवरुन..! प्रवाळ,पाचू,रत्नं,माणके,तैल,घृत,मध,औषधी वनस्पती,धान्यधुन्य.. गाडे खचाखच भरुन चालले आहेत या देशातून त्या देशात..श्रीमंत उद्यमी; नगरश्रेष्ठींचं एक बरं असतं.जगात कुठंही आणि कितीही उलथापालथ होऊ देत.यांच्या जीवनात काहीही फरक पडत नाही.राज्य दुष्टांच असो की सुष्टांचं,मनुष्याला जगण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोळा करायच्या,गरजवंत माणसांना पुरवायच्या.या कष्टाचं वाजवी किंवा वाजवीपेक्षा जास्त धन वसूल करायचं आणि पुन्हा निघायचं पोट पाठीला बांधून.. पोटासाठी कष्ट करा, पोटासाठी मिळवा आणि पोटासाठीच जगा..हा एकच कानमंत्र त्यांना ठाऊक.सकाळपासून रात्रीपर्यंत हा एकच ध्यास.बैल कसे गाडा कितीही खचाखच भरलेला असला तरी निमूटपणे ओढत राहतात,ओढत राहतात,ओढतच राहतात..धनी जे पुढ्यात टाकेल ते पोटात ढकलायचं,रवंथ करत बसायचं.सकाळी पुन्हा नव्या दमानं गाडा ओढायला तय्यार..! खाली मान घालून विनातक्रार चालत राह्यचं.ज्या गाड्याला जुंपलंय त्या गाड्यात काय काय भरलंय याच्याशी कर्तव्य असतं ते माणसांना.या मुक्या जीवांना त्याच्याशी काही घेणंदेणं नसतं.धनी थांबेल तिथे मुक्काम आणि चालवेल तितकी यात्रा,अजून येतोच आहे आवाज..खळदंग खदळंग..खळदंग..खदळंग..खदळंग.खदळंग..बैल चालताहेत चाकेही त्यांचं अनुकरण करताहेत..
* *
माझ्या दोन्ही खांद्याला धरुन मुनीवर भारद्वाजांनी मला उठवलं.आपले तेजस्वी नेत्र माझ्या नेत्रात ठेवत ते गहिवरुन म्हणाले-
" सिद्धार्थ,लक्षावधीत एखाद्यालाच असे साहस शक्य होते.शास्त्रापेक्षा शस्त्राकडे,ज्ञानापेक्षा धनाकडे आणि सत्कर्मापेक्षा दुष्कर्माकडेच अधिक ओढा असलेल्या मनुष्य समूहात सत्यान्वेषी माणसाच्या वाट्याला जे एकाकीपण येते तेच त्याचे खरे सामर्थ्य असते,हे ध्यानी असू दे.सर्वसंग परित्याग करुन सद्धर्माच्या शोधार्थ प्रस्थान ठेवतो आहेस तू..तुझ्यासारखे धीरवीर पुरुषच जगाला मार्ग दाखवू शकतात.तुझ्या यात्रेचा हा आदि मंगल..मध्य मंगल..आणि अंत देखील मंगलच असेल..
मुनिवरांचं हे वाक्य कानी पडताच माझ्या ओठावर स्मित झळकलं.ते बोलणार काही,तोच मी म्हणालो-
" गुरुवर अगदी सहज ओठांवर उमललेल्या या स्मिताने आपल्या वत्सल वाणीचा ओघ खंडित झाला त्याकरीता क्षमस्व.माझ्या जिवणीवर सदोदीतच विलसणारं हेे स्मित,माझ्या जन्मदात्रीकडून मला महाप्रसाद म्हणून प्राप्त झालं आहे.कधी कधी ते जरुरीपेक्षा अधिक फाकते,उठून दिसते त्यामुळे गैरसमज निर्माण होतात.माझ्या यात्रेचा अंत कसा होईल याची मला परवा नाही.आपल्या कृपाशीर्वादाने यात्रेचा प्रारंभ माझ्याकडून होतोय,हीच गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे.या प्रसंगी मला इतकाच आशिर्वाद द्या की,सत्य शोधाच्या या मार्गावर प्रत्येक कठीण आणि कसोटीच्या क्षणी माझा सद्सद् विवेक माझी साथ कधीही सोडणार नाही.माझ्या ध्येयापासून माझे मन कधीही विचलीत होणार नाही.." मुनिवरांनी मला प्रेमभराने आलिंगन दिले आणि माझ्या भाळाचे चुंबन घेऊन म्हणाले-
" हे शाक्यकुलभूषणा,तुला बुद्धत्व प्राप्त होणार आणि साऱ्या जगाला तू सद्धर्माचा मार्ग दाखवशील अशी त्रिकालज्ञ असितमुनींची भविष्यवाणी आहे.ती कदापिही मिथ्या ठरणार नाही.ध्येय प्राप्तिसाठी भगिरथ प्रयत्नांची कांस धरणारा माणूसच असा आशिर्वाद मागू शकतो.तुझ्या मनासारखे होईल.माझे तुला अंत:करणपूर्वक आशिर्वाद आहेत.नीघ आता.इथून पुढे तुला मागे वळून बघण्याचे कारण नाही.."
अशा रितीने शास्त्रशुद्ध दीक्षा घेऊन परिव्राजक झालो.यात्रेस प्रारंभ झाला.माझ्यावर अलोट प्रीती करणारे मातापिता,प्राणप्रिय गोपा,बाळ राहुल,आजे,काके, बंधू भगिनी,माझा सखा छंद,लाडका अश्व कंटक,ती रम्य नगरी,कपिलवस्तु सारेसारे मागे पडले. आता मी अगदी एकटा होतो.माझ्या प्रमाणेच कौंडिण्य,वप्प,महानाम,भद्दीय,या माझ्या मित्रांनी देखील दीक्षा घेऊन यात्रेस प्रारंभ केला होता.पण कुणी कोणत्या दिशेला जायचे,सुरुवात कुठून करायची,कोणी कोणत्या गुरुकडून अध्यात्मिक साधना करायची याचा निर्णय प्रत्येकाने स्वतंत्रपणे करायचा होता.एकट्यानेच यात्रा करायची होतीठ.एक मात्र आमच्या मित्रात ठरलं होतं.मुद्दाम एकमेकांना भेटायचं नाही योगायोगाने भेट झालीच तर टाळायची नाही.आपापल्या साधनापथावर दृढ श्रद्धेने चालत राहायचे आणि पाच वर्षा नंतर राजगृहला भेटायचे.परस्परांना आपले साधनकाळातले अनुभव सांगायचे.एकमेकांपासून शिकायचे.साधनापथावर दृढ श्रद्धेने चालत राहायचे.ज्या राजगृह नगरीत संबोधी प्राप्ती नंतर भेटायचे त्या नगरीत काही काळ वास्तव्य करावे आणि मग ओनामानदी ओलांडून आलारकालामांच्या आश्रमात जावे असे मनाशी ठरवून मी माझ्या मित्रांचा निरोप घेतला.माणूस कोणत्या गावापासून निघाला आणि कोणत्या गावी पोहोचला हे माहित होणं फारसं महत्वाचं नसतं.तो कसा पोहोचला याचं ज्ञान होणं महत्वाचं असतं.म्हणूनच ही माझी नुसती जीवनयात्रा नाही तर अंतर्यात्रा आहे.जी सुरु व्हायला एवढे जन्म जावे लागले.चालली आहे यात्रा पाय पुढे पुढे पडताहेत..अजून तो नाद वातावरणात आंदोळतोच आहे..
खळदंग..खदळंग..खदळंग खदळंग खळदंग..खदळंग..
* *
०
मोठ्ठी जांभयी आली तर त्यातून सुमेध बाहेर पडला.म्हणाला-
" या सूक्ष्मदेहात,अजन्मावस्थेत आता मन रमत नाही.एकदाच जन्म घेऊन पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची ही भानगडच संपवावी असं वाटतंय.."
मला कौतुक वाटलं त्याचं.जन्म घेण्याआधीच जीवनाचा हेतू त्याच्या दृष्टी पुढे स्पष्ट आहे.नाही तर इथे,पापणी लवायच्या आत किती जीव जन्म घेतात...मरतात..माझ्याकडेच परत येतात..मोजदाद नाही.खेळ चाललाय पाहात राहायचं.गालातल्या गालात हसत राहायचं.सुमेध विषयी आस्था वाटली तरी त्याला झुकतं माप वगैरे द्यावं असं वाटलं तरी ते अशक्य असतं.कुठं गुंतलोच नाही कधी.सर्जन विसर्जनाच्या या खेळात सतत नववीन काहीतरी घडत असतं.जुनं मोडून पडत असतं.परत नवीन काही घडत असतं.थांब म्हटल्यानं काही थांबणार नाही.पण,पण सुमेध इथं कां थांबलाय..याचा अर्थ त्याचं फत्ते होणार..बघूया काय काय घडतंय..दृश्य मी..द्रष्टा मी..तरी नाहीच कुठेही..!!
* *
"उत्तर भरतभूमीवरील एकमेवाद्वितीय, महाप्रतापी,महासम्राट कोशल नरेश यांचा विजय असो..! "
महापराक्रमी,प्रजाहितदक्ष,मगध सम्राट महाराज बिंबिसार यांचा विजय असो..!! "
विजय असो..! विजय असो..!!
कपिलवस्तू आणि कोलीयनगरीच्या सीमेवरील भव्य पटांगणावरील महामंडपाच्या प्रवेशद्वारापासून घातलेल्या असंख्य फुलांच्या सुवासिक पायघड्यांवरुन मंद, रुबाबदार पावले टाकीत ते दोन्ही राजे सुशोभित,विशाल अशा व्यासपीठाच्या दिशेने चालत होते आणि अपार आनंदाने उसळणाऱ्या जनसागराच्या उत्स्फूर्त घोषणांनी आसमंत दुमदुमत होता.काही क्षणा नंतर जयघोष थांबला.सनई चौघड्याचे मंगल ध्वनी वातावरणात आंदोळू लागले.भरजरी वस्त्रे परिधान केलेल्या,सुवर्णालंकारांनी,नखशिखांत नटलेल्या सात सुवासिनी पुढे आल्या.कुंकुमतिलक लावून गुलाब पाकळ्यांची उधळण करीत त्यांनी दोन्ही नृपतींचे औक्षण केले आणि नम्रपणे मान लववून त्या बाजूला झाल्या.
शाक्य कुलभूषण महाराज शुद्धोदन आणि कोलिय कंठमणी महाराज अंजन दोन्ही हात जोडून सस्मित मुद्रेने त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठावर उभे होते.दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या दोन सुंदर ललनांच्या हातातील चांदीच्या तबकातील गुलाबपुष्पांचे हार शुद्धोदन आणि अंजन यांनी त्या दोन्ही नृपश्रेष्ठांच्या गळ्यात घातले..पुन्हा जयघोष निनादला..
महाराज प्रसेनजीत आणि बिंबिसार यांच्यासाठी मध्यभागी मांडलेल्या रत्नजडीत सिंहासना पर्यंत महामंत्री त्यांना घेऊन आले.दोन्ही राजांनी आसन ग्रहण केले.पाठोपाठ शुद्धोदन व अंजन स्थानापन्न झाले.टाळ्यांचा कडकडाट झाला.महामंत्री पुढे झाले.हात जोडून त्यांनी मस्तक नमवले.जनसमुदायाला उद्देशून बोलू लागले...
" ॐ तत्सत् ! मोठ्या उतृसुकतेने आणि स्नेहशील अंत:करणाने उपस्थित असलेल्या शाक्य व कोलिय नगर बांधवांचे मी मनापासुन स्वागत करतो.आपल्या सर्वांच्या वतीने, शाक्य व कोलिय संघाचे कुलपती महाराज शुद्धोदन व श्रीमान अंजन यांच्या वतीने मी आजच्या ऐतिहासिक समारंभाचे प्रमुख पाहुणे,आदरणीय महाराज प्रसेनजीत ,मगधसम्राट बिंबिसार महाराज यांचे हार्दिक स्वागत करतो.."
बंधूंनो,आपल्याला स्मरत असेल दोन मासापूर्वी आपण शाक्य कुलश्रेष्ठ महाराज शुद्धोदन यांचा मंगल परिणय कोलिय कुलपती महाराज अंजन यांच्या लाडक्या कन्ये समवेत,मायावतीदेवीं समवेत संपन्न झाला होता.महामान्य कोशल नरेश यांच्या कृपाछत्राखाली नांदत असलेल्या अंग,काशी,कुरु,पांचाल,अवंती,गांधार,अशा सर्व छोट्या छोट्या देशाच्या राजांनी त्या प्रसंगी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या होत्या.त्या शुभघडीला महाराज प्रसेनजीत यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले होते की,महाराज शुद्धोदन आणि मायावतीदेवी यांचा मंगल परिणय म्हणजे काही दोन व्यक्तींचा किंवा दोन राजघराण्यांचा नाते संबंध नाही तर शाक्य आणि कोलिय नगरबांधवांचाही अतूट असा स्नेहबंध आहे.रोहिणी नदिच्या पाणी वाटपावरुन दोन्ही राज्यांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती."
" उपस्थित सज्जन हो.. मला सांगायला अत्यंत हर्ष होत आहे..महाराज प्रसेनजीत यांचे शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी आज आपण इथे सारे जमलो आहोत.ब्राह्मो मूहूर्तापासूनच सुरु झालेल्या शांतीयज्ञाची समाप्ती झाली असली तरी यज्ञवेदीत पडलेल्या समिधांचा व घृताचा सुवास अद्यापही दरवळतो आहे.आपली सर्वांची मने प्रसन्न ठेवीत आहे.१०१ब्राह्मणांनी गायलेल्या वेदमंत्रांचे ध्वनी आणि त्यांचे हात आपणा सर्वांना आशिर्वाद देत आहेत आणि आज एक अभूतपूर्व असा वचननामा येतो आहे..
रोहिणी जलनीती वचननामा ! "
- महामंत्र्यांनी असे म्हणतात उपस्थित जन समूहाने प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने महामंडप दणाणून सोडला.समुदाय शांत झाल्यावर महामंत्र्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.म्हणाले-
" बंधूंनो,रोहिणी नदीच्या पाण्यावर शाक्य आणि कोलिय नगरजनांच्या कित्येक पिढ्या जगल्या,जगताहेत.आपल्यासारखे कितीतरी जीव या रोहिणीमातेच्या अंगाखांद्यावर खेळले,वाढले,पोसले याची गणना करणे केवळ अशक्य आहे.म्हणूनच वैदिक ऋषीमुनींनी,पाण्याला अमृत म्हटले आहे.हे अमृत सर्व प्राणीमात्रांना उदारहस्ते पाजणाऱ्या या धरत्रीच्या लेकींना,नद्यांनाा,माता असे संबोधून त्यांचे पूजन अर्चन करण्याची आपली परंपरा आहे.सुजन हो.. पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे.पाणी हेच जीवन आहे.निसर्गाच्या या धनावर सर्व प्राणिमात्रांचा सारखाच अधिकार आहे,ही गोष्ट आपण एकिकडे मान्य करतो पण कृती मात्र नेमकी उलटी करतो.आज पर्यंत याच पाण्यावरुन आपल्यात किती भांडणतंटे झाले,किती जणांनी आपले जीव गमावले हे आठवले तरी अंगावर काटा उभा राहतो.मित्रांनो,भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात दोन राज्ये गुण्यागोविंदाने नांदतील असे काहीतरी आपण निश्चितच करु शकतो.याच विश्वासाने रोहिणी जलनीती वचननाम्याची कल्पना शुद्धोदन महाराजांनी मांडली.कोलिय कुलपतींनी ती उचलून धरली.दोन्ही राज्यातील अनुभवी जलव्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सर्व कृषी क्षेत्रांची पाहणी करुन पूर्ण अभ्यासाअंती वचनाम्याचा अंतिम मसुदा तयार केला आहे.या वचननाम्यातील जल वापरा संबंधीचे नियम व अटी पाळण्यासाठी आज आपण वचनबद्ध होणार आहोत.आजच्या समारोहाचे सन्माननीय अतिथी महासम्राट कोशल नरेश यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी समोर ठेवलेल्या भूर्जपत्रावरील वचननाम्यातील प्रमुख वचनांचे अभिवाचन करावे.राजे शुद्धोदन,राजे अंजन आणि समस्त शाक्य व कोलिय नगर बांधव विनम्रभावे त्याचा अनुनय करतील."
- कोशल नरेश यांच्या मुखातून येणारे शब्द प्रथम राजे शुद्धोदन व अंजन उच्चारु लागले.त्यांच्या पाठोपाठ समस्त जनसमुदाय धीरगंभीर स्वरात बोलू लागला-
'आम्ही शाक्य व कोलिय नगरजन एकमेकांचे मित्र आहोत व चिरकाल मित्रच राहू असे अंत:करणापासून परस्परांना वचन देतो'
'रोहिणी जलव्यवस्थापन वचननाम्यातील सर्व नियम व अटी यांचे आम्ही कधीही उल्लंघन करणार नाही.'
दोन्ही राज्यांनी नियुक्त केलेल्या जल व्यवस्थापन समितीने अधिकृत म्हणून जाहिर केलेले पाट आम्हास माहित आहेत व फक्त त्याच पाटांद्वारे मिळणारे जल आम्ही वापरु.'
' वर्षाकाल उत्तम असेल तेंव्हा सदर पाट आम्ही बंद ठेवू व जलाचा अपव्यय टाळू.'
जल वापराबाबत भविष्यात कोणतीही समस्या उद्भवली तर ती संयुक्त जल व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सोडवू.'
अधिकृत पाटांपेक्षा अधिक पाटांची गरज भासल्यास नवे पाट निर्माण करणे,जुने बंद करणे,नियम अटींमध्ये आवश्यकते नुसार बदल करणे,इत्यादीं बाबतचे सर्व अधिकार संयुक्त जल व्यवस्थापन समितीकडे असून समितीच्या अनुमती शिवाय कोणत्याही शाक्य अथवा कोलिय व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या समूहाला निर्णय घेण्याचा व प्रत्यक्ष कृती करण्याचा अधिकार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे.'
'आज सर्वानुमते संमत झालेला रोहिणी जलनीती वचननामा आम्हास मान्य असून आमच्याकडून भविष्यात कधीही वचनभंग केला जाणार नाही.'
' आमच्यामधील व्यक्ती किंवा व्यक्तींच्या एखाद्या गटाकडून वचनानाम्यातील नियम व अटींचा भंग झाल्यास संयुक्त जल व्यवस्थापन समिती जी शिक्षा ठोठावेल त्या शिक्षेच्या विरोधात असा गट किंवा व्यक्ती कोणत्याही न्यायालयात दाद मागणार नाही.'
'आम्ही शाक्य व कोलिय एकमेकांचे मित्र आहोत व चिरकाल मित्रच राहण्यास नेहमीच वचनबद्ध आहोत.आमच्या मैत्रीत कुणी बाधा आणण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही तो परस्पर विश्वासाच्या व सौहार्दाच्या जोरावर हाणून पाडू अशी रोहिणी जलदेवतेची शपथ घेऊन परस्परांना आश्वस्त करीत आहोत.'
- कोशल नरेश थांबले .सर्वत्र शांतता पसरली.भूर्जपत्रावरील लिखित वचननाम्याच्या खालील बाजूस महाराज शुद्धोदन यांनी आपापल्या राजमुद्रा उमटवल्या.पुन्हा एकदा तो महामंडप टाळ्यांच्या कडकडाटात आणि जयघोषांच्या आवाजात न्हाऊन निघाला.महामंत्र्यांनी पुढे येऊन कोशल नरेश यांना चार शब्द बोलण्याची विनंती केली.कोशल नरेशांनी आपले उथळ मोठे डोळे गरगारा सर्वत्र फिरवले.मगध नृपती बिंबिसारांकडे एक कटाक्ष टाकला तेंव्हा ते आपल्याकडे पाहून कुत्सितपणे हसताहेत की काय असे त्यांना क्षणभर वाटून गेले.पण लगेचच तो विचाार झटकून टाकत त्यांनी समोरील प्रजाजनांना वंदन केले व म्हणाले-
"माझ्या शाक्य व कोलिय नगरवासियांनो,रोहिणी जल नीती वचननाम्यावर जाहिररित्या राजमुद्रा उमटविण्यासाठी मला आमंत्रित करुन जो बहूमान दिलात त्या बद्दल उभय कुलपतींचे व आपले साऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.आजचा दिवस खरोखरच सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका ऐतिहासिक व अभूतपूर्व आहे.दोन राज्यातले प्रजाजन आपापसातले मतभेद, हेवेदावे विसरुन एकत्र येतात,ज्या रोहिणीमातेच्या जलावरुन सतत संघर्ष होत आले ते भविष्यात कधीही घडू नयेत म्हणून एक नीती ठरवतात.तिचे पालन करण्यासाठी परस्परांशी कटिबद्ध होतात ही गोष्टच मुळी अलौकिक आहे.अशा अलौकिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले याचा अगदी मनापासून आनंद व्यक्त करतो.उक्ती आणि कृती यातील अंतर फिटून सर्वेपि सुखीन: संतु..सर्वे संतु निरामय: सर्वे भद्राणी पश्यंतू मा कश्चित दु:खभाग भवेत्..या वेद ऋचे मधील महास्वप्न प्रत्यक्षात साकार झालेले पाहायला आपल्या सर्वांना मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.उत्तर भरतभूमीवरील सर्वात मोठा बलाढ्य देशाचा नृपती म्हणून मी शाक्य आणि कोलिय बांधवांना असे आश्वासन देतो की भविष्यात कोणत्याही समस्येच्या सोडवणूकीसाठी,मग ती राज्यांतर्गत विकासा संबंधी असो,सीमांच्या सुरेक्षे संदर्भात असो,किंवा व्यापार उदीमा संबधी असो,आमच्या मदतीची गरज लागली तर आमचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडे आहेत.युद्ध करुन नवनवे प्रदेश पादाक्रांत करीत राहण्यापेक्षा परस्पर सहकार्य व प्रेमाने जग जिंकण्यावर आमचा अधिक विश्वास आहे.म्हणून रोहिणी जलनीती वचननाम्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आम्ही जाहीर करतो.रोहिणी नदीच्या घाटांच्या दुरुस्तीसाठी तसेच नव्या पाटांच्या निर्मितीसाठी संयुक्त जल व्यवस्थापन समितीला एक लाख सुवर्ण मुद्रांची मदत जाहीर करतो.उभय देशांच्या सीमांवर सदैव शांतता नांदावी अशा शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होतो.बोला," शाक्य व कोलिय मैत्रीचा विजय असो..!"
हजारो कंठ निनादले.ढोलावर थाप पडली.ताशे कडाडू लागले.आबालवृद्धांची पावलं जमीन सोडून थिरकू लागली.रंग उधळले गेले.साऱ्यांची थोबाडे तर रंगलीच पण अवघे आकाश सप्तरंगात नाहून निघाले.संध्याराणीची सोनेरी आभा त्यात मिसळून गेली आणि एक स्वप्नस्थ झळाळ धरित्रीवर उतरु लागला.मोहाच्या आसवांचे कुंभ फुटले.यज्ञात बळी दिलेल्या शेकडो गायी-म्हशींचे मांस मोठमोठ्या चुलाण्यांवर रटरट शिजू लागले.आसवांच्या प्राशनाने प्रदीप्त झालेला उदराग्नी शमविण्यासाठी मुलामाणसांचे पाय आपोआप भोजमंडपाकडे वळू लागले.एकूण काय, महामंत्र्यांना आमंत्रित अतिथींची बडदास्त नीट ठेवली जातेय की नाही हे पाहण्याशिवाय दुसरे कामच उरले नाही.बेहोषीत आकंठ बुडून गेलेल्या या समारोहाच्या स्थानापासून दूर असलेल्या उकिरड्यावर कुत्र्यां बरोबरच काही पोट पाठीला मिळालेली माणसं जमा झालेली दिसत होती.भोजमंडपा पासून दूर असलेल्या या उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळी कधी भिरकावल्या जातायत आणि त्यावर आपल्याला कधी तुटून पडायला मिळेल अशी आशा त्यांच्या डोळ्यात दाटून आली होती.तिखटजाळ मटणाचा घमघमाट नाकपुड्यात भरुन घेत तोंडातून गळणारी लाळ आपल्या जिभांनी पुसत ती आशाळभूते भोजमंडपाकडे पाहात ताठकळत उभी राहिली होती..!!!
* *
डोळ्यावर बांधलेल्या काळ्या पट्ट्या सोडण्यात आल्या.वीरभद्र आणि शिवभद्र यांनी एकमेकडे पाहिले.मग ज्या ठिकाणी त्यांना आणले होते ते स्थान त्यांना दिसले.समोर एका सागच्या मंचकावर बसलेला भवदायू.अवती भवती कोणत्याही क्षणी शिरच्छेद करायला सज्ज असलेले सशस्त्र तरुण सैनिक.त्यांच्याकडे ते दोघे डोळे विस्फारुन पाहात राहिले.आनंद,भिती आणि कुतुहल अशा संमिश्र भावनांचे ढग त्यांच्या डोळ्यातून सरकत होते.सभोवारच्या दगडी स्तंभावर जळत असलेल्या पलित्यांच्या ज्वाला त्यांच्या चेहऱ्यांवर नाचत होत्या.त्यांना काय आणि कसं बोलाव ते समजत नव्हतं.विलक्षण गोंधळून गेले होते ते.त्यांची ती अवस्था पाहून भवदायू हसला.हसतहसतच म्हणाला-
"घाबरु नका.या भवदायूच्या राज्यात तुमचे स्वागत आहे.या ठिकाणी तुम्हाला जेरबंद करायला शाक्य राज्यातलाच काय अतीबलाढ्य कौशल देशातला शिपुर्डा किंवा अधिकारी यायचं धाडस करणार नाही.."
वीरभद्र आणि शिवभद्रने नकळत हात जोडले.ते कसेबसे हसले पण त्यांच्या डोळ्यात भयाचं सावट तरंगत होतं.आपल्या हातापायात मणामणाच्या बेड्या नाहीत याचं सुख होत असतानाच आपण आगीतून फुफाट्यात तर पडलो नाही ना अशा शंकेनं ते व्यथित झालेले दिसत होते.भवदायू पुन्हा हसला आणि म्हणाला-
"बोला काय मनात असेल ते..बोला..!"
त्याच्या आवाजात आणि टपोऱ्या डोळ्यात इतकी दहशत होती की काही बोलण्यासाठी तोंड उघडलं तरी ओठ नुसतेच थरथरत होते.भवदायू उठून त्यांच्या निकट आला.त्यांच्या डोळ्यात पाहात पुन्हा विचित्र हसला.हसतच म्हणाला-
"अरे बोला काहीतरी.घाबरु नका म्हणालो ना मी?- म्हणालो ना घाबरु नका..मग?"
भवदायूनं अंगठा आणि चारी बोटात धरलेला शिवभद्रचा जबडा त्याला मागे ढकलून सोडला आणि वीरभद्रच्या पुढे येऊन उभा राहिला.तशी बोबडी वळल्यामुळे त्याच्या तोंडातून " हो..म..मम..मंजे आ मी..ममम.." असे काहीतरी शब्द बाहेर पडले.त्यांची अशी अवस्था पाहून भोवती उभे असलेले सैनिकांमध्ये हास्याची कारंजी उडाली.भवदायूने एका हाताने इशारा करताच सगळे शिपूर्डे चिडीचूप झाले.भवदायू म्हणाला-
"हं.. आता बोला.."
ते दोघेही इतके घाबरलेले,गोंधळेले होते की त्यांना बोलायला शब्दच सापडत नव्हते.वीरभद्रने सारी शक्ती गोळा करुन म्हटलेे-
"दायूजी तीन वर्षे झाली शाक्य राज्याच्या कालकोठडीत आसूडाचे फटके खात मरणप्राय यातना भोगत आम्ही कसे दिवस काढत होतो ते आमचं आम्हाला माहीत.-खरं आहे ना शिवभद्र?"
"हो,शिवा दायूजींच्या या उपकारांची परतफेड करण्यातच इथून पुढचं आयुष्य घालवावे आणि धन्य व्हावे असं वाटतंय.तशी संधी मिळावी एवढीच प्रार्थना आहे.."
" अरे वा..! छान बोलता की तुम्ही.."
-असे म्हणत गडगडाटी हसत भवदायू पुन्हा पलंगावर जाऊन बसला.मग एकदम उठून म्हणाला-
"तेवीस होते.पंचवीस झाले.किती झाले?-"
भवदायूनं असं विचारताच सगळे सैनिक एका सूरात "पंचवीस" असे ओरडले.
"आता काम जास्त आणि बोलणं कमी.काय म्हटलं मी?"
"काम जास्त..!"
"पण काय काम करायचं?- विचारा,विचारा.."
"काहीही सांगा दायूजी.."
"काहीही सांगू?"
शिवभद्र आणि वीरभद्र यांच्याकडे एक नजर टाकून बाकी शिपुर्ड्यांकडे पाहात म्हणाला-
"ऐकलं कां?-काय म्हणाले?-
"काहीही सांगा.."
सगळे तरुण एका सूरात म्हणाले.तसा दायू एकदम वळून या नवख्या उमेद्वारांना म्हणाला-
"या इथं हा दगड आहे ना..त्यावर डोकं आपटून जीव द्या..आपटा डोकं,द्या जीव..!"
हे शब्द ऐकताच वीरभद्र आणि शिवभद्र दोघांनी एकमेकांकडे पाहीलं मग दायूकडे बघून मान खाली मान घातली.दगडाच्या दिशेने चालू लागले.तशी जोरात हसून दायू म्हणाला-
"किती बावळट आहात रे..! तुमचा जीव वाचवून तुम्हाला इथं घेऊन येणारा दायू तुम्हाला जीव द्यायला सांगेल कां?-वेडा आहे कां मी?-वेडा आहे?"
सगळे दायूचे ते गरगरा फिरणारे डोळे पाहात राहिले.दायू स्वत:शीच बोलत असल्यासारखा म्हणाला-
" हो.वेडाच आहे मी.मला जीव घ्यायला आवडतो.एकेकाच्या माना मुरगाळायला आवडतात.तुम्ही व्हाल ना असे माझ्यासारखे वेडे?- नुसते पाहात उभे राहू नका..काय सांगतो ते नीट ऐका.."
बोलता बोलता दायूनं एका स्तंभावरचा पलिता काढला त्याच्या आकाशागामी ज्वालांकडे पाहात स्वत:शीच बोलत राहिला-
" सूड..! सूडाग्नी आहे हा..हे राज्यकर्ते स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्याकडून गुन्हे करवून घेत आले.आपल्या जीवावर सत्ता,संपत्ती भोगत राहिले.आपला वापर करुन फेकून देणाऱ्या या सत्ताधीशांना,धनदांडग्या नगरश्रेष्ठींना आणि अशांच्या पायी आपली बुद्धी गहाण ठेवणाऱ्या ब्राह्मण पुरोहितांना सुखानं जगू द्यायचं नाही आपण.."
पलिता प्रत्येक तरुणाच्या पुढे धरुन दायू म्हणत होता-
"पहा या अग्नीज्वाला..या विझू देऊ नका कधीच..! कोलिय,अंग,लिच्छवी अशा राज्यांमधले गुन्हेगार नाही आहात.तुम्ही आहात 'मुक्तिदाता'..!"
"मुक्तिदाता"?- वीर आणि शिवाने एकदमच विचारलं.
" हो.आता हीच तुमची ओळख.एक लक्षात घ्या,या उत्तर भरतभूमीवर प्रत्येक दोन राज्यांमध्ये आग लागलीय.त्या आगीत फक्त तेल ओतत राहायचं.दहशत पसरवत राहायची.आपलं पहिलं लक्ष्य आहे,शाक्य आणि कोलिय.. रोहिणी काय यांच्या बापाची आहे?-जलनीती शिकवतात साले..जगू द्यायचं नाही..जगू द्यायचं नाही..कुणालाच.."
* *
रोहिणी जलनीती वचननामा समारोहाच्या आनंदात मशगुल असलेल्या शाक्य व कोलिय राजांना कल्पनाही नसेल की कुठे तरी कुणी तरी भय आणि क्रौर्याचे तांडव सुरु केलंय.या षडयंत्रा मागे एकटा भवदायू नक्कीच नसणार.हा भवदायू सुद्धा कुण्या अज्ञात व्यक्तिच्या हातातलं बाहुलं असणार..असे विचार वीर आणि शिवाच्या मनात आले पण शांत राहून समोर आहे ती परिस्थिती स्विकारण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते.
* *
सत्ता संपत्ती आणि स्त्री च्या लालसेचं भूत एकदा कां मानगुटीवर बसलं की ते मरे पर्यंत माणसाला सोडत नाही.प्रसेनजीत महाराजांना या भूताने असे काही झपाटले होते की त्यांच्या महत्वाकांक्षेला काही सीमाच राहिली नव्हती.छोट्या छोट्या राजांशी प्रत्यक्ष युदध न करता त्यांनी एक वेगळाच कुटील डाव टाकला होता.कोणत्याच राजाची संपत्ती त्यांनी लुटली नव्हती.फक्त सत्ता व संपत्ती कुणी कशी आणि किती काळ भोगायची अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली होती.व्यापार उदीम,शस्त्रास्त्रे,शेती,जनहिताच्या कामांसाठी त्यांच्यापेक्षा गरीब राजांना त्यांनी भरघोस कर्जे देऊन मिंधे करुन ठेवले होते.उत्तरभरतभूमीवरील महासत्ता म्हणून ते उदयाला आले होते.त्यांना शह देणे सोपे नव्हते.आपापसात युद्ध करीत राहिलेले छोटे छोटे राजे संघटित झाले तर ते शक्य होते पण सर्वांना संघटीत करेल असे समर्थ नेतृत्व दिसत नव्हते.आपले राजेपण शाबूत आहे,ऐषोरामात,विलासात,लोळायला मिळते आहे यात सगळे खूष होते.कोशल नरेशांच्या हातातले आपण कळसूत्री बाहुले आहोत याचे शल्य बाकी कुणाला नाही तर महाराज शुद्धोदन यांना मात्र बोचत होते.पण ते काही काळा पुरतेच.मुका मार लागला की त्या दुखऱ्या जागेवर आपण हलकेच हात फिरवतो.मनाला दिलासा देतो तसे ते दिवास्वप्न पहात होते.अलिकडे तर त्यांच्या या स्वप्नात एक नवाच आशेचा किरण चमकू लागला होता.त्यांच्या मनाला उभारी देत होता.हा किरण म्हणजे त्यांची पत्नी मायावती, हीच्या उदरात वाढणारा त्यांचा अंश.आपल्याला पुत्र होणार आणि एक ना एक दिवस हाच आपले स्वप्न पूर्ण करणार.उत्तर भरतभूमीवर शाक्यांचे एकछत्री साम्राज्य अस्तित्वात येणार.या दिवास्वप्नाने ते मनोमन सुखावत होते.न्यायासाठी लढण्याची,प्राणांची बाजी लावण्याची कितीही इच्छा असली तरी परिस्थिती अनुकूल नसेल तेंव्हा माणूस दैवी न्यायाची प्रतिक्षा करत बसतो.शुद्धोदन महाराजांची नेमकी हीच अवस्था झाली होती.खरा शत्रू समोर दिसत असला तरी त्यालाच उपकारकर्ता मित्र मानून खऱ्या मित्राच्या विरोधात उभं राहावं लागतं.शस्त्रास्त्रं गोळा करावी लागतात याला दैवदुर्विलास म्हणायचं नाहीतर काय म्हणायचं?
- शाक्य संघाच्या सभेत राज्याच्या एकूण परिस्थितीवर झालेल्या चर्चेवर विचार करीत महाराज शयन महालात एकटेच पहूडले होते.अधिकाधिक अस्वस्थ होत होते.मनात जे काही खदखदत होते ते कुणापुढे बोलायची सोय नव्हती.रोहिणी जलनीती वचननामा समारोह होऊन तीन वर्षेही झाली नाही तोच वचनभंगाच्या घटना समोर आल्या होत्या.दोन कोलिय कृषकांनी एका शाक्य कृषकाच्या शेताकडे जाणारा पाट आपल्या शेताकडे वळविला होता.शस्त्रागारातून दहा खड्ग चोरीला गेली होती.त्यात शस्त्रागाराचे प्रहरीच सामील होते असा गुप्तचर अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला होता.सभेच्या अखेरीस संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश देऊन ते परत आले होते खरे पण मनात नाना शंकाकुशंका येऊन ते उद्विग्न झाले होते.एवढ्यात महाराज्ञी मायावतींचा त्वरित बोलावले असल्याचा निरोप आणि त्यांची चर्या बदलली.एका अस्वस्थतेची जागा दुसऱ्या अस्वस्थतेने घेतली.निरोप कानावर पडताच ते ताडकन उठून मायावतीदेवींच्या शयन महालाकडू चालू लागले.काय झाले असेल?- सकाळी तर उत्तम होती प्रकृती?..
* *
मायावतीच्या लालचुटुक ओठांवर हलकेच ओठ टेकवून महाराज शुद्धोदनांनी आपल्या लाडक्या पत्नीच्या कुरळ कुंतलामधून प्रेमभराने हात फिरवला.मग आपल्या उजव्या हाताचा तळवा तिच्या गालावर हलकेच थापटत त्यांनी विचारलं-
"काय आज्ञा आहे राणी? मंचकावर पाठ टेकली होती तोच तुझा निरोप आला म्हणून त्वरीत आलो.किती कृश झाली आहेस? काही त्रास तर नाही होत ना?..वैद्यराज,दासदासी,काळजी घेताहेत ना नीट?"
"झाली कां तुमच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु?- तुम्ही हे सारं प्रेमापोटीच विचारता हे कळतंय मला पण खरंच सांगते, मी खूप आनंदात आहे.थोडी कृश झाली आहे,पण आपल्या येणाऱ्या बाळासाठी सारं सोसायला हवं..तुमचा पुत्र पृथ्वीचा अधिपती व्हावा,चक्रवर्ती सम्राट व्हावा अशी इच्छा आहे ना तुमची?"
"हो.पण त्यासाठी कठोर व्रताचरण करण्याची काय गरज आहे?"
"गरज आहे या उदरात वाढणाऱ्या छकुल्याची पहिली चाहूल लागली ना तेंव्हा त्यानंच जणू मला सांगितलं-
"सारी राजवस्त्रे,उंची आभूषणे त्यागून टाक,दिवसभर उपोषित रहा,सत्शील ब्राह्मणांची,गुरुजनांची सेवा कर,गरीबांना अन्नदान दे,कुशाच्या गवतावर निद्रा घे,ब्राह्मोमूहूर्तावर उठून पिंपळाला प्रदक्षिणा घाल..हे सगळं मी आनंदाने आणि उत्साहाने करती आहे.यात काय समाधान आहे ते तुम्हाला नाही समजायचं.."
"ठिकाय.तू म्हणतेस तसं तर तसं .पण मला आपली काळजी वाटते सतत.सांग बरं एवढ्या रात्री कां बोलावून घेतलंस?"
"थांबा सांगते.."
असं म्हणून मायावतीने मंद स्मित करीत कटीचे वस्त्र जे आधीपासून सैल होते ते आणखी सैल केले.नितंब किंचित उचलून तिने ते गुडघ्या पर्यंत खाली सरकवले.टरारलेल्या नितळ गौर उदराची चंद्रकोर,गवाक्षा बाहेरील प्राजक्तामागील चंद्रकोरीला लाजवू लागली.आपल्या पतीचा हात हातात घेत मायावती म्हणाली-
"इथे हात ठेवा...आहे नं गंमत.."
"काय झालंय काय तुला आज?"
-महाराज गोंधळून नुसतेच तिच्याकडे पाहात राहिले.तशी हसून ती म्हणाली-
"कमाल आहे हं तुमची..बरं आता इथे कान लावा..लावा की..इथे नाभीच्या किंचित खाली..तसेच थांबा..लब्बाड आत्तापासूननच दंगा करायला लागलाय..अंहंह..थांबा..ऐकत रहा..काय म्हणतोय तुमचा छकुला?..मला तर वेडच लावलंय यानं.. उदरातल्या अंधारात आता फार काळ नाही फिरावं लागणार तुला..अगदी थोडेच दिवस राहिलेत राजा..उगाच हट्ट नको मांडूस.."
-दोन्ही हातांनी आपल्या पतीचं मस्तक कुरवाळत मायावती एकटीच बडबडत होती.शुद्धोदन ओटीपोटाला कान लावून..लहान मुलासारखे ऐकत होते..ऐकू काहीच येत नव्हतं पण हालचाल जाणवत होती.मायावतीच्या डोळ्यातून घळाघळा आसवे वाहून कानाच्या पाळ्यात,मानेखाली जमा होत होती.पण तिला कशाचंच भान नव्हतं.बोटे महाराजांच्या केसांवरुन,गालावरुन फिरत होती..अंतरीचा सारा भावकल्लोळ ओठांवर येत होता-
"कसं सांगू तुला? मला एकटीला नाही सहन होत हा आभाळा एवढा आनंद..माझ्या चिमण्या,तुझ्या कुसुमाहून कोमल अंगाचं मुटकुळं करुन सोऽहं..सोऽहं चा जप करत जरा शांत पडून रहा बरं..हो रे हो..मला जाणवतीय,मी भोगतेय तुझी तगमग..तुझा मूक आक्रोश..तुला प्रकाश हवाय..निर्मळ सूर्य प्रकाशात तू पहिला श्वास घेशील तेंव्हा मी..मी पाहू शकेन कां रे तुझं रुपडं?..!!
बोलता बोलता तिलाा अनावर हुंदका फुटला आणि ती ढसाढसा रडू लागली.महाराज उठून नीट बसले.पुढे होऊन त्यांनी तिचे डोळे पुसले.म्हणाले-
"काय झालंय तुला आज?"
"सांगितलं ना..मला काहीही झालेलं नाही..मी खूप आनंदात आहे.पण हा आनंद फार काळ माझ्या वाट्याला येणार नाही असं वाटतंय.एका अनाम भितीची छाया सतत माझ्या मागेपुढे वावरत असते.."
"अनाम भितीची छाया?- नीट सांग बरं..काय झालंय?"
"तीन दिवसांपूर्वी मला एक विचित्र स्वप्न पडलं.. तेंव्हापासून सततची अस्वस्थता..भिती..काळजी..मनाला घेरुन असते.."
"हात्तिच्या..! स्वप्न पडलं तर त्यात एवढं घाबरुन जाण्याचं काय कारण आहे सांग बरं?-स्वप्नात घडलेलं सगळं खरं थोडीच होतं?तू उगाच घाबरतेस.."
"तुम्ही हे सारं हसण्यावरी नेऊ नका हं..तुम्हाला कळत कसं नाही?-माझ्या उदरात आपलं बाळ वाढतंय.. माझ्यासाठी नाही,निदान आपल्या बाळासाठी तरी गोष्टी गांभीर्याने घ्या..!"
"बरं बाई चुकलो..!"
चुकलो म्हणून भागायचं नाही.मी सांगते ते ऐका.उद्या पहाटेच स्वप्न रमलात पारंगत कसणाऱ्या तीन ब्राह्मणांना आमंत्रित करण्यासाठी आपले दूत पाठवा.."
" उद्या पहाटे कशाला?-अगदी आत्ता या घडीला पाठवतो.ठिक आहे?-आता माझं ऐक.ते स्वप्न वगैरे सगळं विसर आणि निश्चिंत होऊन झोप.तुला स्वप्नात काय दिसलं ते ऐकायला मी सुद्धा खूप उत्सुक आहे.पण आता रात्र दुसऱ्या प्रहरात प्रवेश करतीय.अशा अवस्थेत जागरण करणं चांगलं नाही.तुझ्यासाठी आणि बाळासाठी.मी वैद्यराजांना बोलवून घेतो."
"नको.मला वैद्यराजांची गरज नाही.तुमची गरज आहे..!"
-शूद्धोदन उठून तिच्या उशागती बसले.मायावतीनं त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं.तिच्या केसातून हात फिरवत ते तिला वत्सल भावाने थोपटत राहिले.एखाद्या निष्पाप चिमुरड्या मुली सारखी मायावती क्षणातच झोपी गेली.गवाक्षा बाहेर उभ्या असलेल्या प्राजक्तावर आकाशीच्या चांदण्या एकेक करत जमा होऊन पानापानातून डोकावू लागल्या.. मघापासून हसणारी चंद्रकोर पूर्ण चंद्रात विलीन होऊन शांत,शीतल प्रकाशात समग्र वस्तुजाताला न्हाऊ घालू लागली.मंद स्मित करीत शुद्धोदन आपल्या पत्नीचं आरस्पानी रुप कौतुकानं न्याहाळत राहिले..असं कोणतं स्वप्न असेल ज्यानं ही वेडी इतकी घाबरुन गेली.वैद्यराजांनी नाडी परीक्षा करुन मुलगाच होईल असं भाकित केलंय खरं पण या मुलाचा मार्ग निर्वेध आहे की नाही ते बघायला पाहिजे.स्वप्न रमलज्ञ ब्राह्मणांना आमंत्रित करा असा आदेश आमात्यांना उदयिकच देऊ,या होणाऱ्या पुत्राचे भवितव्य ही जाणून घेऊ असं मनोमन ठरवित ते तिथेच पहाट होई पर्यंत बसून राहिले.
* *
निळ्या संगमरवरात बांधलेल्या अतिभव्य अशा राजप्रासादा मधील महाराज शुद्धोदन व महाराज्ञी मायावती यांच्या विश्राम महालाला जोडूनच उभे असलेले अतिथीगृह आज आम्रपर्ण व झेंडूच्या फुलमाळांनी मंडित झालेले दिसत होते.अतिथीगृहात उघडणाऱ्या रत्नजडित स्तंभावरील कमानीपासून जमिनीपर्यंत गुलाबी झिरमिरीत रेशमी पडदा मंद समीर झुळकांनी झुलत होता.या कमानीच्या बरोब्बर समोर अतिथीगृहाचे विशाल प्रवेश द्वार होते.प्रवेशद्वाराच्या दोन्ही स्तंभावर दोन सिंहमुखे कोरलेली होती.त्यांच्या विस्कटून उभ्या राहिलेल्या आयाळी इतक्या खऱ्या वाटत होत्या की पाहणाऱ्यांना त्यांना स्पर्श करुन बघण्याचा मोह आवरला नसता.गडद तांबड्या पाषाणात बांधलेल्या या अष्टकोनी वास्तुच्या भिंतीवर स्वागतातुर नर्तिकांची शिल्पे अशा खुबीने कोरली होती की स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा खेळवणारी ती गवाक्षे आहेत हे प्रथमदर्शनी कळूनच येत नाही.प्रवेशद्वाराबाहेर उभे असलेले प्रहरी हातात भाले धरुन भल्या पहाटेपासूनच विनम्र भावाने अतिथींची प्रतिक्षा करीत होते.त्यांच्या लाल फेट्यांवरील सोनेरी पट्टे आता प्रात:काळचे किरण पडून चमकू लागले होते.गुबऱ्या गालांचे व काळ्यभोर गलमिशांचे हे तरुण शिपाई गडी चपट्या गोल नाकाचे असले तरी त्यांची जांभळासारखी काळीकंच बुबळे कुणाचेही लक्ष वेधून घेणारी अशीच होती.
-अतिथीगृहाच्या मध्यभागी चांदीचे अर्धवर्तुळाकार नक्षीदार आसन होते.त्याच्या दोन्ही बाजूस अतिशय लोभस दिसणारी राजहंसांची विनम्र मुखे होती.विश्राम महालातून अमात्य झिरमिरीत गुलाबी पडदा बाजूला सारुन लगबगीने आत आले.अंगभर रेशमी वस्त्रातूनही पुष्ट नितंब आणि उन्नत उरोजांचे उभार उठून दिसत असलेल्या दोन दासी अतिथींसाठी मांडलेल्या शिसवीच्या प्रशस्त चौरंगांवर काळपट लाल रंगाचे,जरीची वेलबुटी असलेले गालीचे अंथरण्यात मग्न होत्या.त्यांच्याकडे एक ओझरता कटाक्ष टाकून अमात्य प्रवेशद्वाराबाहेर येऊन उभे राहिले.मान उंचावून डोळ्यांवर उजव्या हाताची सावली धरुन त्यांनी दूरवर नजर फेकली.मग रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या वाटिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या पुष्करणीवर विसावणाऱ्या उन्हाकडे पाहिले व सुटकेचा नि:श्वास टाकला.आमंत्रित केलेल्या तीन ब्राह्मणश्रेष्ठांना घेऊन येणारे मेणे हळूहळू याच दिशेने येत होते.' चला,मुख्य काळजी मिटली 'असे मनात येऊन त्यांची चर्या प्रसन्न झाली,पण क्षणभरच..एकदम काही लक्षात येऊन त्यांनी मागे वळून पाहिले.महाराज्ञी मायावतींच्या खास मर्जीतली दासी नंदिनी गंधाक्षता व गुलाबपुष्पांनी भरलेले मोठे तबक घेऊन एका दासी बरोबर आली.या दासीच्या डोईवर एक दोन्ही हातात दोन चांदीची नाजुक,नक्षीदार घंगाळी होती.पाठोपाठ दोन दासी गुलाबपाण्याने भरलेले सुवर्णकलश घेऊन नंदिनीच्या आदेशाची वाट पहात उभ्या राहिल्या.सर्व कामे बिनबोभाट होताहेत हे पाहून अमात्य सुखावले.तीनही चौरंगाभोवती माना वेळावत एकमेकांचा पाठलाग करणाऱ्या मोरांची रंगाकृती बघून तर त्यांचे डोळे चमकले.अगदी सहजच त्यांच्या मुखातून वाऽ असा उद्गार बाहेर पडला.ते पाहून नंदिनीने सस्मित मुद्रेने अमात्यांना वंदन केले आणि म्हणाली, ' मान्यवर अमात्य अतिथींच्या स्वागताची पाद्यपूजेची सर्व तयारी झालेली आपण पाहताच आहात.आता महाराज व महाराज्ञींना पाचारण करण्यास कोणतीच अडचण नाही.आपली आज्ञा असेल तर..'
' नको.मी जातीने जाऊन त्यांना घेऊन येतो.तो पर्यंत तू त्या तीनही ब्राह्मणश्रेष्ठांना आसनस्थ व्हायला सांग..' कानातील बाळ्यांपर्यंत भिडणाऱ्या आपल्या रुपेरी मिशांवरुन मूठ फिरवत ते झपझप आत निघून गेले.नंदिनी पहात होती अतिथीगृहा बाहेरच्या प्रांगणातील उंच चौथऱ्यांवर मेणे ठेवले जात होते.त्यातून एकेक ब्राह्मण श्रेष्ठ उतरत होते.नंदिनी पुढे होऊन त्यांना दोन्ही हात जोडून म्हणाली, ' देवतुल्य ब्रह्मवृंदांचा विजय असो..महाराज शुद्धोदनांच्या अतिथीगृहात आपले स्वागत असो..'
-स्वप्नरमलात पारंगत असलेले ते तीन ब्रह्मण दोन विशेष प्रतिनिधीं समवेत अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारातून आत आले.लिच्छवी,कुशीनारा व भद्र अशा तीन देशातून आलेले हे ब्राह्मण पाहताच अमात्यांनी विनम्रभावाने हात जोडले व म्हणाले, ' कृपया आसनस्थ व्हावे.महाराज व महाराज्ञी काही क्षणातच उपस्थित होतील.'
-तीनही ब्राह्मण आपापल्या आसनांवर विराजमाध झालेले पाहून अमात्य आत निघून गेले.नंदिनीने तबकातील चांदीचा लंबगोलाकृती कुंडा उचलला.एकेकापुढे वाकून तिने त्यांना त्यातल्या मनुक्यांचा आस्वाद घ्यावा म्हणून विनवले,मग जलकुंभ व चांदीचे चषक घेऊन दोन दासी पुढे झाल्या.जलपान करीत मंद स्मित करीत त्यातल्या दोन ब्राह्मणांनी अतिथीगृहात सर्वत्र दृष्टीक्षेप टाकला.यातला एक ब्राह्मण स्थूल शरीरयष्टीचा,मोठ्या दोंदाचा होता.मस्तकावरील काळ्याकुळकुळीत घेरामधून निघालेली त्याची झुपकेदार शेंडी मानेवरती रुळत होती.दोन घनदाट भुवयांच्यामध्ये गाजर उभे करुन ठेवावे तसे त्याचे नाक खालील बाजूस पसरट व लालगुलाबी दिसत होते.डोळे उथळ व मोठे होते.काळ्या लकाकत्या बुबुळांमागील पांढऱ्या पडद्यालर आकाशाची निळी आभा पसरलेली दिसत होती.ओठ जाड व फुटलेले दिसत होते.वरच्या दाताखाली खालचा अधर चावत स्वत:तच मग्न राहण्याची त्याची सवय पाहता क्षणीच लक्षात येत होती.कुशीनारा येथून आलेल्या या ब्राह्मणाचे नांव सुदत्त असे होते.याच्या शेजारच्या आसनावर एक ब्राह्मण बसलेला होता.हा लिच्छवी देशातून आला होता.अर्ध पद्मासन घालूध बसलेल्या या लख्खण ब्राह्मणाच्या उजव्या हातात रुद्राक्ष मण्याची माळ होती.ती ओढत जपाचे मंत्रोच्चारण तो करीत होता.गव्हाळ रंगाच्या या ब्राह्मणाला आपल्या गोल चेहऱ्यावरील आवळ्यासारखे नाक वारंवार वर ओढायची सवय होती.नाक वर ओढले की आपले गोल गरगरीत डोळे तो मिटून घेत पुन्हा उघडायचा.तिसरा ब्रह्मण भद्रदेशीचा मंती या नांवाने प्रसिद्ध होता.हा वर्णाने चक्क काळाकुळकुळीत व कृश शरीर यष्टीचा होता.सुदत्त व लख्खणा पेक्षा वयाने थोराड असलेल्या मंतीचा चेहरा उभट होता.त्याच्या विरळ भुवयांमधून निघालेली सरळ नासिका ओठांना भिडू पहात होती.याची मुद्रा करारी पण त्रासिक दिसत होती.तिघांनीही भगव्या रंगाचे रेवमी कद परिधान केले होते.तिघांच्याही खांद्यावर पांढऱ्या शुभ्र उपरण्याची घडी होती.
-अमात्य, महाराज व महारज्ञींसमवेत आत आल्यासरशी तिघेही ब्राह्मण उठून हात जोडून उभे राहिले.त्यांना वंदन करुन महाराजांनी बसावयाची खूण केली.महाराज्ञी मायावती पुढे होताच सुगंधी जलाने भरलेले सुवर्णकलश घेऊन दासी पुढे झाल्या.मायावती व महाराजांनी क्रमक्रमाने तिघांचेही पादप्रक्षालन केले.गंध,फुल,अक्षता वाहिल्या नमस्कार करुन पतीपत्नी सुवर्णाच्या मयूरासनावर विराजमान झाले..
*(या पुढील भाग दिवाळी अंकात आहे..तो टाइप करावा)
.़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
Comments
Post a Comment