ललित
शेपूट अख्ख्यान
------------------
शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धा म्हटली की सरांनी भाषण लिहायचे आणि सहभागी विद्यार्थ्याने ते तोंडपाठ करुन परिक्षक व विद्यार्थी-श्रोत्यांपुढे उभे राहून ठोकायचे असाच त्यावेळेला प्रघात होता.एकदा ' मी कोण होणार? ' या विषयावर स्पर्धा होती.सरांनी भाषण लिहून माझ्या हातात सोपवले होते खरे पण त्या भाषणात मला काय व्हावेसे वाटते हे सरांनीच ठरवून टाकले होते.म्हणजे मला आरामात टांग्यात बसायला मज्जा वाटायची मला सरांनी टांगेवाला बनवले होते.आमच्यावेळेला पुण्यात ' बाबू टांगेवाला ' अतिशय प्रसिद्ध होता.'सकाळ' सारख्या दैनिकातून तो प्रसिद्ध झाला होता.त्यावरुनच मला टांगेवाला व्हावेसे वाटत असणार अशी सरांची खात्री झाली असावी.टांगेवाल्याचे भूत मानेवरुन उतरल्यावर भाषणातल्या ' मला ' पोस्टमन व्हावेसे वाटू लागले आणि सायकलवर टांग मारुन घराघरात मी कशी पत्र वाटत फिरेन,वाचता येत नाही त्यांना त्यांची पत्रे कशी छान वाचून दाखवेन,अशा स्वप्नात रंगून गेलो.स्वप्नातून बाहेर काढून मग सरांनी मला सैनिक बनवून राष्ट्ररक्षण करायला सीमेवर पाठवून दिले.तिथे काय झाले कोण जाणे पण मी एकदम वैमानिक झालो व देशापरदेशात आकाशामार्गे हिंडू लागलो.नंतर ते विमान सरांनी एकदम जमीनीवरच आणले आणि मला 'भला माणूस' बनवले.खरे म्हणजे नुसते माणूस बनवले असते तरी चालले असते पण नुसता हाडामासाचा भावभावना बुद्धी असलेला माणूस कोणत्याही काळातील व्यवहारी जीवनात खपणार नाही हे त्यांना माहित असावे म्हणून त्यांनी मला ' भला माणूस ' बनवले असेल.खरे म्हणजे शंभरटक्के 'भला'किंवा शंभरटक्के 'बुरा' माणूस शोधूनही सापडणार नाही.पण दुसऱ्याला 'भला' म्हटले की आपणही 'भले' होतो.सांगायचा मुद्दा काय तर नुसता माणूस कालच्या किंवा आजच्या किंवा उद्याच्याही बाजारात खपणार नाही म्हणून आपल्यामागे मागे काहीतरी 'शेपूट' हवेच.कारण लहानपणापासून आईबापांनी,थोरामोठ्यांनी,काहीतरी 'बनून दाखव''कुणीतरी होऊन दाखव' असा हट्ट आपल्या प्रत्येकापाशी धरला आहे.त्यामुळेच नुसते 'माणूस' होऊन चालणार नाही.जरा नीट निरीक्षण करा म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आपापले 'शेपूट' मिरवणारी शेकडो माणसे दिसतील.डाॅक्टर,लेखक, साहित्यिक,व्याख्याते,कार्यसम्राट,हास्यकवी,अभिनेता,विचारवंत,समीक्षक,वगैरे वगैरे,वगैरे.बाकीच्यांचे कशाला- माझेच उदाहरण सांगतो.अपघाताने कां होईना जरा चार बऱ्या कविता लिहू लागल्यावर मी काही दिवस 'कवी' हे शेपूट लावून फिरु लागलो.पण कवींच्या गर्दित मीच लावून घेतलेले माझेच शेपूट काही उठून दिसेना.मग मी एक आयडियाची कल्पना काढली. एक वाड़मयीन त्रैमासिक सुरु केले आणि 'संपादक' हे शेपूट लावले.आता संपादनातलं मला ओ की ठो कळत नव्हते.पण त्याचा फायदा असा झाला की हा माणूस आज न उद्या आपली कविता मासिकात छापेल अशी आशा मनात धरुन मला काव्य साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची, आमंत्रणे येऊ लागली.कुठे कवी संमेलनाचा अध्यक्ष,कुठे प्रमुख अतिथी,काव्यस्पर्धेचा परिक्षक म्हणून मी सन्मान घेऊ लागलो.कधी रटाळ कधी ढिसाळ,कवितांना दोनदोन तास बसून माना डोलवत दाद देऊ लागलो.व्यासपीठांवरुन माझी ओळख एकदम जाणकार कवी/साक्षेपी संपादक अशी करुन देऊ लागले.गालातल्या गालात हसत मी दोनदोन शेपटं हलवत कवी संमेलनांच्या फडातून फिरु लागलो.नवोदित कवींना उपदेश वगैरे देऊ लागलो.पन्नाशी उलटल्यावर एक दिवस अचानक लक्षात आले की अरेच्चा..! नाटकाची हौस अजून भागलेलीच नाही.मग नवीन संस्था काढून नाट्यक्षेत्रात थोडी लूडबूड सुरु केली.आता नाट्यक्षेत्र केवढं..मी केवढा..!पण लोकं आदरानं बघू लागले. परिणामी काही वर्षात ज्येष्ठ रंगकर्मी हे 'शेपूट' आपसूकच येऊन चिकटले.
तर मंडळी,आता पर्यंतच्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कोणत्याही क्षेत्रात असा तिथे फार काही भव्यदिव्य करायला पाहिजे असं नाही. फक्त तुम्ही आवडत्या क्षेत्रात काम करत राहिलात तरी तुमच्या नांवामागचे 'शेपूट' आणि तुमचा जन्म सार्थकी लागल्यासारखे वाटेल..!
तात्पर्य एवढेच की नुसते माणूस होऊन मरण्यात काहीही अर्थ नाही.'शेपूट' हवेच.शेपटाला साजेसे काम एकवेळ नसेल तरी चालेल.पण 'शेपूट' मस्ट आहे.शेपटा शिवाय मजा नाही.माकडाच्या जन्मात परमेश्वराने आपल्याला 'शेपूट' दिले असूनही आपण त्याचा उपयोग केला नाही म्हणून ते गळून पडले.त्याची शिक्षा म्हणा,आठवण म्हणा प्रत्येकाच्या नांवा मागे 'शेपूट' हे असले च पाहिजे.'च' फार महत्वाचा.'शेपूट' म्हणजे तुम्ही या जगात मेल्यानंतरही आहात याचा भरभक्कम पुरावा..! अमरपट्टाच म्हणाना..!! तेंव्हा 'शेपूट' लावून घ्या,ते हलवत फिरा,शेपूटवाल्या माणसांच्या गर्दित ते उठून कसे दिसेल याची सतत काळजी घ्या.तुम्ही मेल्यानंतरच्या शोकसभेत तुमचे 'शेपूट महात्म्य'च वक्त्यांच्या कामी येणार आहे हे लक्षात ठेवा.समर्थांच्याच उक्तीत जरा बदल करुन म्हणायचे झाले तर 'मरावे परी शेपूट रुपे उरावे' इति 'शेपूट आख्यान' संपूर्णम्...!!
*
२०/१२/२०२५
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या:९०९६८००६५३
Comments
Post a Comment