धम्मपद निरुपणमाला

'धम्मपद' निरुपणमाले विषयी
थोडे मनातले :-
---------------------------------------
समग्र बुद्ध वाड़मय म्हणजे एक महासागर आहे.त्यातला 'धम्मपद' हा ग्रंथ बौद्ध धर्मियात अतिशय पवित्र मानला जातो.' धम्मपद' म्हणजेच सिद्धार्थ तथा बुद्धाची विखुरलेली वाणी.त्याच्या महापरिनिर्वाणा नंतर ही वाणी अनेक शिष्यांनी संग्रहीत केली.हे काम अनेक शतके चालले व ग्रंथ सिद्ध झाला.'धम्मपदात'एकूण २६ वग्ग (वर्ग)म्हणजे अध्याय आहेत.एकूण ४२३ पदे किंवा श्लोक आहेत.प्रत्येक पदामागे अट्ठकथांची(अर्थकथांची)पार्श्वभूमी आहे.बुद्धाने कोणत्या प्रसंगी,कोणाला,कुठे उपदेश केला हे या अट्ठकथांमध्ये समजते.या सर्व पदांचा मी २०/२५ वर्षांपूर्वी सुलभ मराठीत अनुवाद केला.पिंपरी चिंचवड साहित्य मंचावर ज्येष्ठ साहित्यिक,व्याख्याते मा.राजेंद्र घावटे यांनी 'लिहीते व्हा' असे आवाहन केले.ते वाचून मला प्रतिसाद द्यावासा वाटला आणी या निमित्ताने 'धम्मपदां'वर निरुपणे लिहावी असे मनात आले.मनात येणे वेगळे आणी प्रत्यक्ष हे शिवधनुष्य पेलता येणे वेगळे.पण प्रयत्न करुन पाहतो आहे.होऊन होऊन काय होईल?फसेल प्रयत्न.समूहावरील जाणत्यां,ज्येष्ठ साहित्यिकांकडून कुठे,चुकतो आहोत हे तर कळेल.मूळातच अमर्याद असलेला बुद्ध समाजमाध्यमाच्या छोट्या पडद्यावर उतरवायचा ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे.आपण सर्व मित्र आहातच मला सावरायला.असो.
आता निरुपणमालेतील लेखांच्या स्वरुपा विषयी थोडे सांगणे आवश्यक वाटते.प्रस्तुत निरुपणमालेत दर रविवारी दोन अध्यायांचे सारांश रुपाने निरुपणलेख आपल्याला वाचायला मिळतील.सारांश रुपाने अशासाठी की 'धम्मपदा' चा आवाका फार मोठा आहे.त्यामुळे अट्ठकथांना या लेखमालेत स्थान देण्याचे टाळले आहे.तसेच वानगीदाखल मूळ पाली भाषेतील एक/दोन पदे उद्धृत करुन निरुपणलेखाला सुरुवात करणार आहे.उत्स्फूर्तपणे लिहीताना विचार व भावप्रवाहाला आवर घालावा लागणार आहे.ते जमले नाही,लेख पाल्हाळीक झाले तर आपण सांभाळून घ्यावे अशी विनंती आहे.मंचावरील सर्व सदस्य जिज्ञासू आहेत असा विश्वासही मनात आहे.आणखी एक गोष्ट, निरुपणे वाचून 'धम्मपद' वाचावे अशी ईच्छा कुणाला झाली तर धम्मपद : जसे आहे तसे' हे फक्त मराठी काव्यानुवादाचे इ-पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध आहे.तसेच मूळ पाली पदे व मराठी अनुवाद असेही अध्याय उपलब्ध होऊ शकतील.चला तर आस्वाद घेऊ 'धम्मपद' निरुपणमालेचा..

धम्मपद निरुपण १ ले
------------------------
यमक वग्गो(वर्ग)
----------------------
*
मनोपुब्बंगमा धम्मा मनो सेठ्ठा मनोमया
मनसा चे पदुट्ठेन भासति वा करोति वा
ततो नं दु:खमन्वेति चक्कं व वहतो पदं
*
मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेट्ठा मनोमया
मनसा चे पसन्नेन भासति वा करोति वा
ततो नं सुखमन्वेति छाया व अनपायिनी

ग्रंथाचा प्रारंभ वरील पदांनी होतो.मनो पुब्बंगमा धम्मा म्हणजे सर्व धर्माच्या आधी मन पुढे येते.इथे धम्म किंवा धर्म  म्हणजे स्व-भाव,उपजत प्रवृत्ती.इथे धर्म ज्या अर्थाने व्यहारात वापरला जातो तो अर्थ अभिप्रेत नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे.थोडक्यात सर्व प्रकारच्या प्रवृत्तीं ना चालना देणारे मनच आहे.म्हणून मन सेट्ठ म्हणजे श्रेष्ठ आहे.सर्व प्रवृत्ती मनोमय आहेत.पुढे बुद्ध म्हणतात मनसा चे पदुट्ठेन म्हणजे मन प्रदुषित असते.विकारांनी ग्रस्त असते तेंव्हा ते  दूषित विचारच तुमच्या बोलण्यातून आणी कृतीतून व्यक्त होतात.मग काय होतं?- तर बैलगाड्याची चाकं जशी बैलांच्या पावलांमागे धावतात तसे दु:ख आपला पाठलाग करते.मग माणूस आयुष्यभर घोकत बसतो त्याने मला मारले,त्याने मला फसवले,तो असा वागला न् तो तसा वागला,असे घोकत घोकतच माणूस स्वत:च्या अध:पतनाला कारणीभूत ठरतो.पुढे मनाचे कार्य कसे चालते हे पुन्हा सांगून बुद्ध म्हणतो,' मनसा चे पसन्नेन भासति वा करोति वा 'म्हणजे मन जर प्रसन्न असेल,शुचितापूर्ण असेल तर काय होते?- तर ' ततो नं सुखमन्वेति छाया व अनपायिनी ' म्हणजे आपली सावली जशी आपल्या बरोबर चालते तसे सुख आपल्या वाट्याला येते.आपले सगेसोबती आपल्यासारखेच प्रसन्न मनाने,सौहार्दाने वागतात.प्रेमाने वागतात.भलाईला भलाई आणी बुराईला बुराईच वाट्याला येते.
या ग्रंथातील सर्वच पदांचे एक वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखे आहे.एकाच विचाराच्या दोन बाजू आपल्या समोर येतात.एक नकारात्मक,एक सकारात्मक.एवढं सांगून बुद्ध मौनात जातात.आता जबाबदारी आपली.दोन विरुद्ध टोकाचे विचार आहेत.कुठला विचार स्विकारुन कुठे जायचे ते ऐकणाऱ्याने,वाचणाऱ्याने ठरवायचे.निर्णय घ्यायचा.कारण पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाला स्वत:ची प्रज्ञा निसर्गाने बहाल केली आहे असा बुद्धाचा विश्वास आहे.म्हणूनच मी सांगतो आहे म्हणून विश्वास ठेवू नकोस.तुझ्या प्रज्ञेचा उपयोग कर.मनाचे तटस्थतेने निरीक्षण कर माझे म्हणणे पटले तरच विश्वास ठेव आणी योग्य निर्णय घे व पुढे जा.असे बुद्धाचे सांगणे आहे.म्हणजे घोर तपश्चर्या करुन संबोधी प्राप्त झाली,आत्मज्ञान प्राप्त झाले तरी बुद्ध गुरुपद आपल्याकडे घेत नाही.उपदेश ऐकणाऱ्याच्या मनुष्यत्वाचा,प्रज्ञेचा,सन्मानच बुद्ध करतो.तूच तुझा गुरु होऊ शकतोस याची जाणीव बुद्ध करुन देतो.हे लक्षात घेण्यासारखे आहे.
आता आपण म्हणू,' आमच्या प्रज्ञेचा सन्मान,निर्णय स्वातंत्र्याचा सन्मान वगैरे सगळं ठिक आहे हो.पण मनाकडे तटस्थतेने बघायला,निरीक्षण करायला वेळ कुणाकडे आहे?-सारखं स्वत:वर प्रकाशझोत‌ टाकून कसं जगता येईल?- सकाळी उठलं की आन्हीके उरकायची घाई,कामाला वेळेत पोहोचायची घाई,स्वयपाकाची घाई.एक न दोन किती कामं असतात?जागरुकतेने मनाचे निरीक्षण करणं,अखंड सावध चित्ताने वर्तन करणं हे काम योगी पुरुषांचं.अध्यात्मिक साधकांचं,मुमुक्षुंचं आपल्यासारख्या संसारी माणसांचं हे काम नाही..' अशा सारख्या तक्रारी चालूच असतात आपल्या आणी त्या
अगदी बरोबर सुद्धा आहेत.पण मग तक्रारीच किती दिवस करणार आपण?-प्रयत्न करणारच नाही कां आपण?-प्रयत्न केले तर काय होतं?
अप्रमादी राहण्यातला आनंद कसा असतो? अप्रमादी साधक कसा
असतो? हे या पुढच्या अप्पमाद वग्ग या अध्यायात बुद्ध सांगतो आहे.ते या
पुढच्या लेखात वाचू..

©

निरुपण २ रे
अप्पमाद वग्गो (अप्रमाद वर्ग)
------------------------------
अप्पमादो अमतपदं पमादो मच्चुनो पदं
अप्पमत्ता न मीयन्ती ये पमत्ता यथा मता
एतं विसेसतो न्यत्वा अप्पमादम्हि पण्डिता
अप्पमादे पमोदन्ति अरियान गोचरे रता

आत्ताच वाचलेल्या यमक वर्गात आपण जीवनातल्या सुख-दु:खाला आपले मनच कसे कारण ठरते ते पाहिले.आता अप्पमाद वग्ग म्हणजेच अप्रमाद वर्गात बुद्ध काय सांगतो ते पाहू..
अप्पमादो अमतं पदं म्हणजे अप्रमादी अर्थात प्रमाद,अपराध हातून कधीच घडू न देणारा माणूस अमृतपदाला प्राप्त होतो.सर्व सुखाला प्राप्त होतो.कारण तो आपले दैनंदिन व्यवहार सावध चित्ताने,जागरुकतेने करतो.सदैव अप्रमाद राहण्याचे महत्व लक्षात घेऊन तो तिन्ही त्रिकाळ अप्रमादात आनंदाने जीवन-व्यापन करण्यात रमून जातात.असे साधक सतत ध्यानात असतात.आपले प्रत्येक कर्म ध्यानपूर्वक करतात त्यामुळे  त्यांचे साधे वागणे बोलणेही पवित्र व आनंदायक असते असे साधक सरते शेवटी निर्वाणास,जीवनमुक्तावस्थेस प्राप्त होतात.या पद्धतीने सदर अध्यायात अप्रमादी वर्तनाचे व त्यापासून मिळणाऱ्या अलौकिक आनंदाच्या स्थितीचे वर्णन करणाऱ्या आहेत.ही अप्रमादी स्थिती टिकवून ठेवण्यासाठी साधकाने काय प्रयत्न करावा किंवा खरा साधक कसा प्रयत्न करतो हे सांगणारी पदे या अध्यायात आहेत.आपल्यासारख्या सामान्य माणसांना अखंड सावध चित्ताने जगता नाही आले तरी आपण त्या दिशेने प्रयत्न मात्र जरुर करु शकतो.
पण प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचे असा प्रश्न सहाजिक पडेल.याचे उत्तर शोधण्यासाठी मनाच्या चार अवस्था जाणून घेतल्या पाहिजेत.जागृत,स्वप्न,सुषुप्ती व तुरिया या त्या चार अवस्था आहेत.
पहिली जागृत अवस्था.तिचे दोन भाग आहेत.एक अर्ध जागृत व दुसरी पूर्ण जागृत.अर्ध जागृत अवस्थेचा अनुभव आपल्याला आहे.कारण आपण नेहमी अर्धजागृत अवस्थेतच सकाळी झोपेतून उठतो आणी अशा अर्धजागृत अवस्थेतच आपली दिनचर्या सुरु होते.कारण दिवसभर दैनंदिन कर्म करताना आपण स्वप्नावस्थेतच असतो.एक तर भूतकाळातल्या भल्याबुऱ्या आठवणीत रमतो किंवा भविष्यकाळात असे करु न् तसे करु,असे होईल न् तसे होईल.करत काही नाही व होत ही काही नाही. नुसतेच स्वप्न. मनातले मांडे खात खात वर्तमानकाळात यांत्रिकपणे कर्म एकापुढे एक चालू असते.स्टीअरींगवर हात असतात.फर्स्ट-सेकंड-थर्ड गियर पडत असतात.गाडी चालू राहते.विचार मात्र मागे नाही तर पुढे कुठे तरी धावत असतात.थोडक्यात काय तर कर्म कुठलेही असो ते करताना आपण त्यात असूनही नसतो.त्यामुळे कुठल्याच कर्माचा पूर्ण आनंद आपल्याला घेता येत नाही.परिणाम भोगावा लागतो तो रात्री पाठ टेकल्यावर.सुषुप्ती म्हणजे गाढ,स्वप्नरहीत शांत झोप आपल्याला कधी मिळतच नाही.मग पुन्हा तेच कालचेच चक्र पुढे फिरत राहते.चिडचिड,त्रागा,विस्मरण,त्याच त्याच चुकांचा पाढा सुरुच राहतो.पूर्ण जागृत साधकाचे तसे नसते.त्याची प्रत्येक कृती ही ध्यानच असते.ध्यानपूर्वकच असते.त्यामुळे त्याच्या हातून छोट्यामोठ्या चुका घडत नाहीत.परिणामी तो सतत उत्साही आणी आनंदी असतो.तो आनंदी असतो म्हणून त्याच्या सहवासात येणाऱ्याला त्याची सोबत हवीहवीशी वाटते.मोक्ष,मुक्ती स्वर्गसुख म्हणजे काही वेगळा प्रदेश, कुठले गाव  नाही.माणसाच्या मनाचीच ती एक सर्वोच्च स्थिती आहे.ही मनाची सर्वोच्च स्थिती म्हणजेच तुरीयावस्था.ही तुरीयावस्था प्राप्त करुन घेण्यासाठीच अध्यात्मिक साधकाची सारी धडपड असते.तुरीयावस्थेत रमलेला एखादाच बुद्ध असतो.बाकी सारे साधक बुद्धत्व प्राप्तिसाठी साधना-रत असतात.
आपण सामान्य माणसे असे बुद्धत्व प्राप्त करुन घेऊ शकतो कां?- तर हो.अगदी संसारात राहूनही प्रत्येक माणसाला हे शक्य आहे. असे माझे नाही तर बुद्धाचे सांगणे आहे.पृथ्वीवरील सर्व संतांचे सांगणे आहे.गरज आहे ती त्या दिशेने प्रयत्न करण्याची.आज इतकेच.भेटू पुढील गुरुवारी..!!

*

चित्त वग्गो (चित्त वर्ग)
----------------------
फन्दनं चपलं चित्तं दुरक्खं दुन्निवारयं
उजुं करोती मेधावी उसुकारो व तेजनं
--
अस्थिर चंचल या चित्ताची
धाव रोखणे महा कठीण
परंतू प्रज्ञावंत पुरुष त्या
सहज आपुल्या करे अधीन
-
धम्मपदातील तिसरा अध्याय वरील पाली पदाने सुरु होतो.त्यातील शब्दाचे वेगळे अर्थ न सांगता त्याचा मराठी काव्यानुवाद समोर ठेवला आहे.हे वाचल्यावर पहिल्या अध्यायात मनाचे महत्व सांगितले आहे.मग तिसऱ्या अध्यायात मनालाच चित्त कां म्हटले आहे? मन आणी चित्त वेगळे आहे कां?असा प्रश्न पडेल.- तर उत्तर आहे हो.आपण कविता लिहीत असताना,चित्र काढत असताना,एकाग्रता साधलेली असते.आवडत्या कर्मात जे सहजच एकाग्र होते.एकाच दिशेने काम करते ते असते मन.तर असंख्य प्रकारच्या विचाराबरोबर धावत सुटते,भरकटवते ते असते चित्त.चित्ताची ही धाव रोखणे आपल्यासारख्या सामान्य माणसाला कठीण जाते.पण प्रज्ञावंत पुरुष ते सहजच आपल्या ताब्यात ठेवू शकतो.हे म्हणणे जितके सोपे आहे तितकेच आचरणात आणणे कठीण आहे.कारण विचारांशी आपण न कळत भावनेनेही जोडलेले जातो.ही चित्ताची किमया आहे.पण मग प्रज्ञावंत माणूस अशा अस्थिर चित्ताला आपल्या अधीन करु शकतो ते कसं?- आवडत्या कामात एकाग्र झाले असताना चित्ताच्या अस्थिरतेची,चंचलतेची जाणीव होत नाही.पण आवडते काम संपले की पुन्हा रीतेपण येते.सैतानाचा कारखाना सुरु होतो.मग करायचे काय?
प्रज्ञावंत पुरुष चित्ताला पकडायला जात नाहीत. 'धाव किती धावायचं ते-' असे म्हणून विचारांकडे बघत बसतात.निरीक्षण करतात.कसे? -तर बाल्कनीत उभे राहून रस्त्यावर मोकाट सुटलेल्या वाहनांकडे,माणसांच्या कुत्रागर्दीकडे गंमत म्हणून पाहावे तसे.किंवा एखाद्या संध्याकाळी आकाशात विविध रंगी,विविध आकार धारण करीत वाहणाऱ्या मेघांच्या गर्दीकडे पाहावे तसे.अगदी अलिप्तपणे.विचारांच्या कोलाहलात अध्यात्मिक साधक असला तरी तो कोलाहल तो नसतो.जीवनातल्या एखाद्या गंभीर समस्येने डोकं वर काढलं तरी ती समस्या तो साधक नसतो.समजा एखादे नाटक समरस होऊन तुम्ही पहात असलात तरी त्या नाटकातले कुठलेच पात्र तुम्ही नसता.तुम्ही फक्त ते पाहणारे दर्शक असता.जो खराच प्रज्ञावंत असतो तो फक्त आपल्या प्रत्येक कर्माचा, आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा साक्षी असतो.द्रष्टा असतो.निदान तसा तो प्रयत्न करतो.कारण प्रयत्नानेच सर्वकाही साध्य होईल असा त्याचा विश्वास असतो.
संपूर्ण चित्त वर्गात साधकाच्या चित्ताचा द्रष्टा होण्याच्या प्रवासातल्या विविध अवस्थांचे भावदर्शन आहे.कधी ते जळाविना मासोळी तडफडते तसे तडफडते.कधी माराच्या म्हणजे रागलोभादी  विकारांच्या आवर्तातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असते.कधी तरी या प्रवासात साधकाच्या असेही लक्षात येते की विकार दाबून टाकले की ते पुन्हा पुन्हा उफाळून वर येतात आणी छळू लागतात.मग तो कामक्रोधादी विकारांना प्रतिसाद देणे बंद करतो फक्त पहात बसतो.अशा पाहण्याने निरिक्षणाने चित्त स्थिर होते.साधकाच्या ताब्यात येते.अशा स्थिर झालेल्या चित्ताचे साधकाला क्षणोक्षणी रक्षण करावे लागते.धुतला तांदुळही धुवत बसावे लागते.बुद्धत्व प्राप्त करायचे तर चित्तशुद्धीचा हा व्यापार शेवटच्या श्वासापर्यंत साधकाला सोडता येत नाही.त्यासाठी साधक विजनवासही आनंदाने पत्करतो.जनात असूनही तो विजनात रमतो.कारण त्याला दिसत असते की हा देह मरणधर्मा आहे.हा देह जन्मापासून रोज थोडा थोडा मरतच आला आहे.कधी तरी तो लाकडाच्या ओंडक्यासारखा निश्चेष्ट होऊन पडेल.असे घडायच्या आत बुद्धत्व प्राप्त करुन घेणे हेच त्याचे अंतिम उद्दीष्ट असते,असायला पाहिजे.म्हणूनच सन्मार्गावर चालणाऱ्या आपल्या चित्ताचे संरक्षण खरा साधक प्राणपणाने करतो.या पुढच्या 'पुप्फवग्ग' या अध्यायात धम्मपदातील बुद्धाने केलेला उपदेश किती महत्वाचा आहे,तो आचरणात नाही आणले तर साधकाची कशी अधोगती होऊ शकते हे सांगितले आहे.  ते आता आपण पाहू..

पुप्फ वग्ग (पुष्प वर्ग)
----------------------
को इमं पठविं विजेस्सति यमलोकंच इमं सदेवकं |
को धम्मपदं सुदेसितं कुसलो पुप्फमिव पचेस्सति |
-
सेखो पठविं विजेस्सति यमलोकंच इमं सदेवकं |
सेखो धम्मपदं सुदेसितं कुसलो पुप्फमिव पचेस्सति |
-
धम्मपदातील उपदेश आचरणात आणून सुखाचा अनुभव आलेले तथागतांचे भिक्खू ही पदे स्वानंदाने गात गात भिक्षा मागत विहार करत आहेत असं दृश्य पुप्फ वग्गो हा अध्याय वाचायला लागलात की दिसते.जणू ते एकमेकांना,नगर बांधवांना विचारतायत-
'पृथा देव नि यमलोकांना कोण पुरुष हो जिंकेल?
फुला प्रमाणे धम्मपदे ही कोण पुरुष हो वेचेल? '
आणी उत्तरही आपणच देतायत-
' पृथा देव नि यम लोकांना ज्ञानवंत तो वेचेल..
फुला प्रमाणे धम्मपदे ही ज्ञान-पिपासू वेचेल..!!
नगरजनांकडून भिक्षा स्विकारत उपदेशपर पदे गातगात हा अध्याय तालासुरात पुढे जातो.काय सांगतात बुद्धत्वाकडे प्रवास करणारे गौतमाचे शिष्य? -शरीर हे पाण्यावरच्या फेसासारखं आहे..मोत्यासारख्या चमकणाऱ्या त्या फेसाच्या मोहात पडू नका.ही सगळी माराची म्हणजे रागलोभादी विकारांची फुले आहेत ती प्रज्ञेच्या तलवारीने छेदून टाक आणी जीवनाचे खरे सार कशात आहे हे जाणून घे.कारण माराची म्हणजे विकारांची रानफुले लांबून दिसायला जरी मोहक असली तरी त्यांना सुगंध नाही,सद्धम्माचं पावित्र्य त्यात नाही.अशी फुले वेचण्यातच आयुष्य घालवलंस तर गाढ झोपेत असलेले गाव महापूरात जसे वाहून जाते तशी तुझी गत होईल.माराची फुले वेचणाऱ्या माणसाच्या सगळ्या कामना अतृप्त राहतात आणी पुन्हा तो जन्म-मरणाच्या चक्रात सापडतो.मित्रांनो,बुद्धचरित्रात तो तपाला बसलेला असताना मार नांवाचा राक्षस(कामदेव) येतो आपल्या तीन कन्यांना तृष्णा,रती व माया यांना पाठवून त्याचा तपोभंग करायला सांगतो.षड्रीपूंची अस्त्रे सोडतो.घनघोर युद्ध होते.शेवटी माराचा पराभव होतो.असा प्रसंग आहे.बुद्ध चरित्रातील हा प्रसंग काल्पनिक आहे.बुद्धाच्याच काय सर्वच पुराणपुरुषांच्या अवतार कथा काल्पनिक असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे.त्यात सत्य असते पण ते काव्यात्मक सत्य असते. माणसाच्या आयुष्यात संकटांची रास मांडणारी,प्रसंगी त्याचा सर्वनाश करु शकणारी शक्ती म्हणजे विकार.या विकारांनाच भगवद्गीतेतअसूरी संपत्ती- असे म्हटले आहे.असूरी संपत्तीवर मात करायची असेल तर दैवी संपत्तीची कास धरावी लागते.तिचे जतन संरक्षण करावे लागते.तरच माणसाला असूरी शक्तींवर विजय मिळवता येतो.पणम्हणजे काय करायचे?-तर आपल्या आदीम प्रेरणांचा व्यवहारात जागरुकतेने उपयोग करायचा.एखाद्यावर रागवण्यापूर्वी आपण कां रागावतो आहोत याचा बोध आपल्याला असायला हवा.भौतिक जीवनात जो सातत्याने संघर्ष सुरु आहे.रोज सत्ता,संपत्ती,स्त्रीसाठी,खून,मारामाऱ्या,अत्याचार,युद्धे,शोषण,इत्यादी दिसते आहे ते केवळ आणी केवळ मनुष्यसमूह विकारांच्या अधीन होऊन जगत असल्यामुळे.असे विकारांच्या अधीन होऊन वर्तन करणे बुद्धाला मान्य नाही.बाहेरचं जग माणूस बदलू शकत नाही.सुधारु शकत नाही.पण स्वकल्याण मात्र प्रयत्नाने साधू शकतो.हेच बुद्धाने,जगातील सर्व संतानी सांगितले आहे.त्यामुळेच  विकारांना आपल्या कह्यात ठेवून ते विधायक कार्याकडे वळवायला हवेत.हे फक्त जागरुकतेनेच शक्य होते.आत्मविकास साधला जातो.असा आत्मविकास साधला तर आपण तर सुखी होतोच पण आपल्या सहवासात येणारा प्रत्येक माणूस आनंदाचा,धनी होतो.थोडक्यात बुद्धाने तू तुझ्या पावला पुरता प्रकाश मिळव.त्या इवल्याशा प्रकाशात तुझ्या सग्यासोबत्यांचे जीवनही उजळून निघेल असा विश्वास आपल्या शिष्यांमधे निर्माण केला. संपूर्ण पुप्फ वग्गाचा सारांश हाच आहे.आता पुढच्या रविवारी बालवग्गो व पंडित वग्गो या अध्यायांचा आस्वाद आपण घेऊ.इथेच थांबू आणी बाहे धावणारे मन आत वळवण्याचा प्रयत्न करु..
*

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७