निरुपण १
निरुपण १
यमक वग्ग /अप्पमाद वग्ग
---------------------------------
मित्र हो..
यमक वग्ग आणि अप्पमाद वग्ग हे दोन्ही अध्याय वाचले की एक गोष्ट सहज लक्षात येते ती म्हणजे तथागत आपले ध्यान मनाकडे वळवतात.मनाकडे तटस्थवृत्तीने पाहिले की समजते आपले मन नेहमी दोन विरुद्ध दिशांनी धावत असते.हे मन कसे दिसते?
कल्पना करा की आपण एखाद्या उंच इमारतीवरील आपल्या घराच्या बाल्कनीत उभे आहो
त.खाली दोन्ही बाजूने कार,बाईक,रीक्षा टेम्पो ट्रक्स,बसेस धावताहेत.कुठे ट्राफिक जाम आहे.कुठे गाड्या एकमेकांना धडकतायत.कुणी भांडतायत,कुणी गप्पा मारतायत,कुठल्यातरी चौकात कर्णकर्कश्श डी जे वरची गाणी चालू आहेत.असंख्य प्रकारचे आवाज कानावर आदळतायत..
शरीरानी बाल्कनीत उभे असलेल्या आपल्या मनाचे खाली चाललेल्या कोलाहलाशी काय नाते असते? काहीही नाही.अगदीच एखादा मोठा अपघात झाला तर..ओह..! अरेरे..! असे मनाचे उद्गार बस्स.इतकेच.भावनिक नाते? जवळजवळ नाहीच.बुद्धाचे सांगणे हेच आहे.बाल्कनीत उभे राहून जसे खालच्या गर्दीकडे बघता तसे मनातल्या बऱ्या-वाईट विचारांकडे,भावनांकडे अलिप्ततेने पहा.अयोग्य विचार,अयोग्य भावनांची वाळवी एकदा लागली की आपली कृती,आपले आचरण स्वत:बरोबरच दुसऱ्याचेही नुकसान करते,दु:खात लोटते.म्हणूनच समाजात,कुटुंबात वावरताना आपण नेहमी आपले आचरण शुद्ध ठेवायचे.दुसऱ्या कुणाला त्रास होईल असे वागायचे नाही.तुम्ही म्हणाल,आपण भलाईने वागलो तरी सगळे भलाईनेच वागतील याची काय गॅरंटी?-बरोबर आहे.पण 'अरे ला..का रे' असे आपण वागायचेच नाही.एखाद्याने शिवी दिली तरी त्याची ओवी करुन प्रसन्नतेने हसता आले पाहिजे.वैराला वैर हे उत्तर नाही.मैत्री हे उत्तर आहे.कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातून प्रमाद,अपराध घडू द्यायचा नाही.म्हणजे पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही व चित्त नेहमी प्रसन्न राहील.भावनांच्या,विचारांच्या प्रवाहात वहात जाणाऱ्या माणसांकडून हरघडी चुका होतात प्रमाद घडतात.अशा माणसांना मन:शांती कधीच मिळत नाही.ते भौतिक आणि आत्मिक जीवनात रडत-कुढत जगतात आणि मरतात.
या दोन्ही अध्यायांचा मथितार्थ इतकाच की जीवनातील सुख-दु:खाला दुसरा कुणी नाही तर आपण स्वत:च जबाबदार असतो.म्हणून प्रत्येक पाऊल जबाबदारीने सावध चित्ताने,जागरूकतेने टाकावे यातच स्वकल्याण आहे.स्वकल्याणातच परकल्याणही अनुस्यूत आहे.
*
©रमेश यशवंत वाकनीस
भटकबोल्या : ९०९६८००६५३
Comments
Post a Comment