प्रवास:सौदी अरेबियाचा भारतीय मनाचा
प्रवास:सौदी अरेबियाचा,भारतीय मनाचा
---------------------------------------
३
सौदी अरेबिया या देशातील यानबु शहरात आलो तेंव्हापासून मला आभुटली सहज बिलगते तशी बिलगली ती म्हणजे इथली प्रसन्न करणारी शांतता आणि स्वच्छता.या देशाची झालेली ही पहिली भेट,पहिली ओळख.मैलोमैल पसरलेल्या प्रशस्त रुंद रस्त्यांवरुन कितीही दूर रपेट मारा.कुठेही,कुठल्याही चौकात फूटपाथवर वडापाव, आईस्क्रीम,पावभाजी,चायनीजच्या गाड्या,त्याभोवती उभे राहून सतत खाणाऱ्या मुलामाणसांची गर्दी दिसणार नाही.सिगारेट ओढणारी माणसं दिसतात पण जागोजागी पानतबाखूच्या टपऱ्या कुठेच दिसत नाहीत.राजकिय नेत्यांचे,स्वयंघोषित भाई-दादांचे चोकाचौकात झळकणारे आणि शहर विद्रूप करणारे फ्लेक्स, सार्वजनिक, धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने रस्त्यातच टाकलेले मांडव दिसणार नाहीत.डीजे वरची कानठाळ्या बसवणारी गाणी ऐकायला मिळणार नाहीत.इथे कानावर पडते ती मशिदींमधून येणारी कर्णमधुर अजान.ती संपली की पुन्हा सगळं शात.इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळ जवळ नाहीच.टॅक्सी दिसतात.पण रिक्षा,टेंपो,सिक्ससीटर,प्रचंड संख्येने धावणाऱ्या टू व्हीलर्स काही म्हणजे काही दिसत नाही.इथे राहणारा सामान्य नोकरदार असला तरी त्यांच्याकडे स्वत:ची कार असते.अत्यावश्यक गरजांसाठी माॅल आहेत.खवय्यांसाठी हाॅटेल्स आहेत.भाजी बरोबर रोट्या पाहिजे तेवढ्या खा फ्री..! मात्र बॅचलर्स किंवा सिंगल्ससाठी वेगळा विभाग असतो.कुटुंबासह असाल तर फॅमिली रुम्स असतात.आपल्या इकडे कुणीही कुणाही समोर किंवा शेजारी बसू शकतो असला प्रकार नाही.स्त्रियांना घराबाहेर पडायचं तर आबाया घातल्याशिवाय पर्याय नाही.बुरख्याचं आबाया हे नाव ऐकून गंमत वाटली.बायांना "आत" डांबून ठेवून मुक्त जीवनाचा आनंद घेऊ देणारा पोषाख म्हणजे आबाया.बायकां प्रमाणे अरबी पुरुष पांढरा स्वच्छ गाऊन आणी डोक्याला लाल चौकटीचा रुमाल बांधतात.तो गळून पडू नये म्हणून त्यावर रींग असते.पुरुषांच्या गाऊनला 'थोब' म्हणतात.डोक्यावरच्या रुमालाला 'घुत्रा' रींगला अकल म्हणतात.घुत्र्याच्या आत गोल टोपी असतेच.नमाजाच्यावेळी असावी म्हणून.डोक्यावरुन पदर घेण्याची पद्धत ग्रामीणजीवनात आपल्याकडेही आहेच.पुरुष वर्ग टोपी फेटा वापरताना आजही दिसतातच.वास्तविक पोषाखाच्या विविध पद्धतींचा धर्माशी काही स़बंध नाही.गल्फ कंट्रीज मधली ही प्रथा अती उष्ण हवामानामुळे आली.ज्या ठिकाणचे तापमान ५५ च्या पुढे जाते तिथल्या उन्हाचा चटका किती दाहक असेल? माणसाला कळतं पण वळत नाही म्हणून धर्माची जोड द्यावी लागते इतकाच त्याचा अर्थ.
आम्ही मुलाकडेहजिथे राहतोय त्या भागाला अल सिन्नाह म्हणतात.यानबु अल बहार या मुख्य शहरातली ही औद्योगिक कर्मचाऱ्यांची वसाहत आहे.हे संपूर्ण क्षेत्र राॅयल कमिशनच्या अखत्यारीत येते.राॅयल कमिशन म्हणजे आपल्या इकडची महापालिकेसारखी संस्था.अर्थात आपल्या इकडच्यासारखा गलथानपणा,वेळकाढूपणा,लाचखोरी इथे नाही.अनियमित पाणीपुरवठा,बेभरवशी विद्युतपुरवठा ओसंडून वाहणाऱ्या कचरापेट्या अशा समस्यांना इथल्या कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत नाही.समस्या निर्माणच होऊ नाहीत अशी दक्षता इथे घेतली जाते.या वसाहतीचे एकूण सात भाग आहेत.सातही भागात कमालीची स्वच्छता आणि शांतता.घराबाहेर तासन् तास उभ्या राहून गप्पा मारणाऱ्या बायका,कट्ट्यावर उगाचच चकाट्या पिटणारी पोरं दिसणार नाहीत."कांदे आले बटाटे आले,टेंपो आला भरून पिशवी आना घरून'लिबू घ्या लिंबू' 'बोला,परकर बोला' भंगारवाले. असले आवाज कधीही कानावर पडणार नाहीत.सारं कसं शांत शांत गेल्या कित्येक वर्षात अशी शांतता आम्ही अनुभवलेली नाही ती अनुभवतोय एकूण मजा येतीय..! ं
Comments
Post a Comment