प्रवास : सौदी अरेबियाचा भारतीय मनाचा
प्रवास: सौदी अरेबियाचा भारतीय मनाचा
-----------------------------------------
आम्ही जेद्दाहच्या पुढे दूर डोगराळ भागात अल लीथ या तालुक्यासाख्या छोट्या गावात मुक्कामी पिकनिक गेलो होतो त्याला आता दोन आठवडे उलटून गेले.पण आठवणी अजून ताज्या आहेत.सकाळी ७.३० ला आम्ही कारमधे बसलो.आमच्या बरोबर निकेत बोराडे,ओसामा,सतीश जावळी,पटेल,राकेशकुमार,असे तीनचार परिवार होते.अअल लीथच्या डोंगराळ भागातून गाड्या काढत आम्ही मुक्काम करणार होतै त्या ठिकाणी पोहोचलो.चारही बाजूने भव्य डोंगर आणी मधे डेझर्ट.विशेष म्हणजे बाजूने वाहणारी गरम पाण्याच्या झऱ्याची रुणझुण नदी..! डोगराच्या पायथ्याशी,डोगरावर शांत निश्चल उभी असलेली हिरवाई ..! संध्याकाळचे ६ वाजून गेले होते.सर्व आसमंत सावळ्या उदी रंगाने माखलेला.गहन गंभीर शांततेचे हजारो अदृश्य हात धीम्या पावलांनी येणाऱ्या चांदरातीला बाहूत घ्यायला आसुसलेले..!! पाचसहा तासांचा प्रवास करुन आलेलो आम्ही हे सर्व अद्भुत वातावरण अनुभवत पाय मोकळे करीत खूप फिरलो.मला तर कुणाशी बोलू नये फक्त डैळे मिटून या शांततेचा आवाज ऐकत बसावं असंच वाटत होतं.सगळ्या सोबत्यांना सोडून मी एकटाच खूप लांबवर फेरफटका मारला.वाटलं,हीच ती शांतता जी कवी कलावंत कलानिर्मितीत शोधतो.हीच ती शांतता जी निर्मितीनंतर सापडलीच तर छळत राहते कलावंताला नवनिर्मितीसाठी..!! परत आलो तेंव्हा मुलमुली गरम पाण्यात हुंदडू लागली होती.त्यांच्या भारतीय माता सुद्धा सकाळपासून अंगावर चढवलेला आबाया उतरवून त्यांच्यात सामील झाल्या होत्या.अपवाद फक्त ओसामाच्या मुलींचा आणि बायकोचा.अंधार पडू लागला तशी पुरूष माणसं आपापले तंबू उभे करु लागले.सौ.सतीश यांनी गॅसची शेगडी पेटवली.सर्वांसाठी चहा बनलला.गाडीत बसून बसून आंबून गेलेलं अंग,आलेला थकवा,कढतकढत चहाच्पया घोटासरशी कुठल्याकुठे पळाला.निकेत,सतीश यांशी जाऊन झाडाचे वाळलेलं खोड,काटक्याकुटक्या,पाचोळा आणला.ओसामानं लायटरने अग्नी प्रज्वलीत केला.ज्वाला नृत्य करत आकाशाकडे झेपावू लागल्या.त्यांच्या सावल्या सभोवती बसलेल्या आमच्या चेहऱ्यांवर नक्षी काढू लागल्या.मी मॅटिंगवर पाठ टेकली.छातीवर हात ठेवून विस्तीर्ण आकाशवितान डोळ्यात साठवूवून घेत राहिलो.मला फार आवडतं असं चांदण्या रात्री आकाशाकडे पहात राहायला.मनात येणारे सगळे भलेबुरे विचार,भावना,आठवणी दबक्या पावलांनी मनाला सोडून जातात.कुठे? माहित नाही.हळूहळू आपल मनही कुठेतरी दूर निघून जातं.कदाचित आकाशात किंवा मन,मन म्हणतो आपण ते हे आकाशच असं जाणवतं.ही जाणीव इतकी खोल खोल विराट होऊ लागते की या विराटाचीच भीती वाटायला लागते.की विराटच जीवनामधे भयाला जन्म देतं?- भय इथले संपत नाही अशी अवस्था होते.भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते..!!
मनात हे अस सगळ चालू असतानाच गरमागरम मूगाची खिचडी,मेथिचे पराठे,शिरा, असं ताटच पुढे आलं तेव्हा भूक लागलीय याची जाणीव झाली.पाच परिवारांच्या गोलाकार तंबूंमधे जळणाऱ्या शेकोटीच्या ज्वालांच्या उजेडात भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातून एकत्र आलेली मुलेमाणसे सहभोजनाचा आनंद लुटत होती.आकाशात पूर्ण चंद्र अगदी माथ्यावर आला होता.त्याच्या भोवती चांदण्याही लुकलूकू लागल्या होत्या.जेवण झाल्यानंतर काहीजणांनी पत्त्याचा डाव मांडला.आमची आभा आणि तिच्या संवगड्यांनी वाळूत घरे बांधायला,खेळायला सुरुवात केली होती.हे सगळं पाहणारं आमच्याशिवाय कुणीही नव्हतं.होते फक्त ध्यानस्थ ऋषींसारखे तटस्थ, अलिप्त डोंगर.जगाशी सर्वार्थाने संबंध तुटला होता.अजून अख्खी रात्र जायची होती.अशा निर्जन एकाकी ठिकाणी आमच्यातला एक तरी माणूस एकटाच येऊन राहिला असता का? समजा एखाद्यावर तशी वेळ आलीच असती तर त्यानं भयाच्या जाणीवेच्या सहवासात कशी काढली असती? रात्री एकट्यानेच मुक्काम करायचे धाडस मला तरी नसते झाले.सापडलोच असतो अशा ठिकाणी तर तिथून चालत,पळत,ठेचकाळत,बाहेर पडायचा प्रयत्न केला असता.आता ११ वाजत आले होते आणि सर्वांचेच डोळे मिटायला लागले होते.मनुष्य वस्तीपासून शेकडो मैल दूर असलेल्या त्या वाळवंटावर उभारलेल्या आपापल्या तंबूत सन्नाटा पांघरून झोपण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
दुसऱ्या दिवशी आम्ही चौघं आणि राकेश पतीपत्नी जेद्दाहला डाॅल्फीन शो आणि अॅक्वेरियम पाहायला जायचा कार्यक्रम ठरवला.बाकीचची मंडळींचा इजिप्तला जायचा प्लान होता.
रेड सी या दिडदोन किलोमीटर लांबीच्या माॅलमधे पोटपूजा करुन फ्रेश होऊन आम्ही संध्याकाळी अॅक्वेरियम आणि डाॅल्फीन शोच्या ठिकाणी पोहोचलो.इथलं अॅक्वेरियम पाहणं म्हणजे अद्भूत अनुभव होता.माझ्यासारख्या संभाजी पार्कमधलं मत्स्यालय पाहिलेल्या माणसाला तर अक्षरश:समुद्राच्या पोटातून सफर केल्यासारखंच वाटलं.दोन्ही बाजूला निळाभोर समुद्र आयुष्यात कधीही पाहायला मिळणार नाहीत असे विविध प्रजातीचे मासे.शार्क,सीगल,स्टार,आक्टोपस,स्ट्रीग,व्हेल किती नावे सांगावीत? प्रत्येकाला निसर्गाने बहाल केलेले रूप वेगळं,रंग वेगळा,स्वसंरक्षणासाठी दिलेली शक्ती वेगळी.सर्व जलचर प्राण्यांचं वर्णन करणं परमेश्वरालाही अशक्यप्राय वाटेल.असे रंग,अशी नक्षी निसर्गान बहाल केली होती.पाण्यातून भक्ष्याच्या मागे धावण्याची चपळता,तो रुबाब ती ऐट प्रत्येकाची वेगळीच.आश्चर्यमुग्ध होऊन पाहात राहाव बस्स.किती पाहू किती नको असं होत असतानाच डाॅल्फीन शोची वेळ झाली आम्ही घाईघाईत निघून थिएटरमधे प्रवेश केला.टॅकपासून दोन फूटावर असलेले आसन पकडून आम्ही बसलो.पाचच मिनिटात थिएटरचे दोन्ही दरवाजे बंद झाले.एक तगडा अरबी युवक माईक हातात घेऊन आला.पाठोपाठ दोन सीगल घेऊन दुसरा तरुण आला.दोन्ही सीगल पाण्यात उभ्या केलेल्या स्टूलवर येऊन बसले.प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्यावर दोघांनीही पुढचे दोन्ही पंखासारखे हात एकमेकांवर आपटून टाळ्या वाजवून दाखवल्या.त्यांना स्वत:तालावर खेळवणाऱ्या युवकाकडे एका भांड्यात सीगलचे आवडते खाद्य होते बोलता बोलता तो युवक त्या भांड्यातले छोटे मासे हवेत उडवत होता आणी सीगल ते शिताफीने पाण्यात पडू न देता मटकावत होते.माइकवरुन दिल्या जाणाऱ्या आॅरृडर्स ते पाळत होते.लाज वाटत नाही का? असं विचारलं की दोन्ही पंखात तोंड लपवून छान लाजून दाखवत होते.पाण्यात टाकलेल्या रींग सूर मारुन गळ्यात हारासारखे मिरवत वर येत होते.डाॅल्फीन्सचे पाण्यात सूर मारुन उंच उंच उड्या मारणे,चेंडू डोक्याने ढूशी देऊन उडवणे मोठ्या रींगमधून लिलया पार होऊन हवेत अर्ध वर्तुळ काढणे खरोखर डोळे दीपवणारे होते.त्यांना दमदार आवाजात आज्ञा देऊन प्रेक्षकांसाठी रंजक अॅकरीग करणारे अरेबियन युवकही कतुकास पात्र होते.आधी हे खेळ करुन घेणारे फ्रेंच तरुण होते.आता अरेबियन तरुण करतात.पाळीव प्राण्यांचे प्रशिक्षण,टूरीस्ट गाईड,ही क्षेत्रे आपल्या इकडे अजूनही दुर्लक्षित आहेत.भारतीय तरुणांनी अशा क्षेत्राकडे वळावे म्हणून सरकारने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.पारंपारीक कौशल्यांना व्यावसायिक प्रतिष्ठा मिळेल असे प्रयत्नही होणे आवश्यक आहे.असे प्रयत्न सुरुही असतील पण आपल्या इथे प्रत्येक नवीन गोष्टीला वेळ फार लागतो.कब्बडीलाच अंतरराष्ट्रीय मान्यता मिळायला किती वर्षे लागली हे वेगळे सांगायला नको.
एकंदरीत सौदी अरेबिया हा देश पाहण्यासारखा.राजेशाही व्यवस्थेतले जे उत्तम आहे ते स्विकारले पाहिजे.लोकशाहीतले जे टाकाऊ आहे ते ताबडतोब टाकले पाहिजे आणी एका निर्दोष व्यवस्थेकडे भारताचा प्रवास व्हायला पाहिजे.लाओत्सेने एका ठिकाणी म्हटलंय,आपण जितका लांबचा प्रवास करतो तितके आपल्याला कमी कमी कळत जाते.मथितार्थ इतकाच की अजून काहीच कळलं नाही असं वाटू लागलं की बॅग भरावी आणी निघावं खुशाल प्रवासाला.
Comments
Post a Comment