प्रवास : सौदी अरेबियाचा भारतीय मनाचा
प्रवास:सौदी अरेबियाचा,भारतीय मनाचा
---------------------------------------
२
"फ्लाॅवर्स डझंट हॅव देअर व्हाॅइस अॅन्ड चाॅइस" काल की परवा आठवत नाही पण हे वाक्य कानाशी येऊन बोललं कुणीतरी.डोळे उघडले आणि थबकलो त्या वाक्यापाशी.फुलाना त्यांचा स्वत:चा आवाज किंवा निवड नसते.माणसाच्या बाबतीतही हे खरं नाही का? निसर्गाच्या मर्जीनी आपण कुठे तरी जन्म घेतो,कुणीतरी आपल्याला वाढवतो आणी निसर्गाच्याच कृपेनी एक दिवस ही जीवनयात्रा संपवतो पुन्हा जन्म घेण्यासाठी.निसर्गाचे आपण अविभाज्य भाग आहोत.निसर्गाप्रमाणेच आपणही नित्य नवे आहोत.देश नाही,परदेश नाही.उपदेश नाही.फक्त नित्य नवे होत राहण्याचा आनंद..!
दोन दिवसांपूर्वी दूषला फोन करुन तीन भारतीय गृहस्थ आले.त्यातला एकच दुष्यंतच्या ओळखीचा होता.यानबुमधे पोटापाण्यासाठी आलेल्या २५० भारतीयांनी मिळून तलत नाझाच्या वाळवंटात दिवाळी साजरी केली.मुस्लीम धर्माच्या प्रभावक्षेत्रात ही घटना प्रथमच घडली होती.त्या आठवणी हृदयात ताज्या होत्या.त्याची पुन्हा एकदा उजळणी सुरु झाली.दरम्यान स्नेहानं बालुशाही चिवडा टीपाॅयवर आणून ठेवले होते.पण हात कुणाचाच पुढे जात नव्हता.दुष्यंतने ते लक्षात आणून देताच त्यातला एक जण म्हणाला-
" आम्ही हे काही घेत नाही.कारण आम्ही यासाठी आलेलो नाही.." हे ऐकताच माझ्या लक्षात आले की हे स्वाध्याय परिवाराचे साधक आहेत.आपली भारतीय संस्कृती, सणवार उत्सव साजरे करायला मिळालेच नसते तर काय झाले असते.आजच्या फास्ट लाईफमधे आपण तेच विसरु लागलो तर मुलांवर संस्कार काय होणार? आपल्याला तहानभूकेची,सकाळ झाल्याची जाणीव करून देणारा जो ईश्वर आहे त्याचे धन्यवाद आपण मानायला हवेत..
हे असं सगळं बोलण चालू असताना आमच्या चार वर्षाच्या नातीने ड्राॅइंगबुक आणि कलरबाॅक्स काढून चित्र काढायला सुरुवात केली होती.स्नेहा त्यांना सांगत होती-
" कराग्रे वसते लक्ष्मी म्हणते ना आमची आभा..आभा म्हणून दाखव.."
पण आभा कुठली चित्रातनं डोकं वर काढायला? - सगळी मोठी माणसं एकत्र आलीयत म्हणजे आपणच आपला आनंद शोधला पाहिजे.निर्माण केला पाहिजे.आपण स्वत:आनंदी तर आपल्या भोवतालचं जग आनंदी हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी आभा त्या क्षणी मला जगातल्या कोणत्याही धर्मगुरुपेक्षा ग्रेट वाटली.संस्काराचं एका मर्यादेपर्यंत निश्चितच महत्व आहे हे मान्य केले तरी संस्कारवर्गाच्या साचात घालून देवमाणूस घडवता येत नाही कारण देव झाले तरी तीही माणसंच होती हेच आपण विसरतो.
हे लक्षात यावे इतकेच.
Comments
Post a Comment