प्रवास सौदी अरेबियाचा

प्रवास सौदी अरेबियाचा 
----------------------------- 
परदेश गमन करणं आता काही नवीन राहिलं नाही.पण भारतासारख्या लोकशाही देशातून सौदी सारखा राजेशाही देश पाहणं आमच्यासाठी नवीन होतं.७ डिसेंबर १९१८ या दिवशी मी आणी अरुणा छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचलो.तिकिट,बोर्डिग पास घेतले मग इमिग्रेशन होऊन एकदाचे विमानात बसलो.अवतीभवती कमरेला पांढरे पंचे अंगावर पांढरी वस्त्र पांघरलेली मंडळी दिसत होती.ते पाहून हळूच अरुणा म्हणाली-
" निघताना देवाच्या पाया पडलात कां हो?" 
म्हटलं," हो..स्वामींना म्हटलो देखील,चला स्वामी सौदीला..!" 
"ही एवढी सगळी पांढरे कपडेवाली माणसं कुठे चालली असतील?" 
" हो ना..हा काहीरमजानचा महिना नाही.. हिंदूंचा असतो तसा यांचाही कुठे सत्संग असेल..! 
माझ्या उजव्या बाजूच्या रांगेतल्या सीटवर बसलेला एक माझ्याच वयाचा गृहस्थ माझ्याकडे हसू की नको असं पहात होता.एकदोनदा नजरभेट झाल्यावर मी त्याच्याकडे पाहून हसलो.वाटलं आता संवाद सुरु होईल पण त्यानं हसल्यासारखं केलं आणि शेजारच्या माणसाशी बोलू लागला.काय गंमत असते नाही? दोन अनोळखी माणसं समोरासमोर आली की आधी हसायचं कुणी?-असं वाटून एक स्मित शेअर करायला पण संकोचतात.संकोच सोडून एकजण हसला की पुन्हा बोलायचं कुणी? असं वाटून पुन्हा संकोच.इतक्यात जणू माझं कुतुहल शमवायलाच जणू एक माणूस शेजारी येऊन बसला.मी हसलो.म्हटलं- 
" मक्का जा रहे है क्या सब लोग? " 
" नही मदिना जा रहे है.आप? "
" हम यानबू जा रहे है..बेटेके पास.."
इतक्यात त्याला मागच्या सीटवरुन कुणी हाक मारली.त्यानं मागे वळून बघितलं.ही संधी साधून अरुणा लागेच कानाशी लागून म्हणाली-
" उगाच जास्त बोलू नका त्याच्याशी आणि काही सांगू नका.."
" अगं तेवढाच टाइमपास.."
तो माणूस पुन्हा माझ्याकडे बघून हसला.म्हटलं- 
" आपका कोई त्यौहार है क्या? " 
" हम लोग उमरा करने जा रहे है.."
" उमरा? वो क्या होता है? " 
मग त्यानं सांगितलं हज शक्य नसेल त्यांनी उमरा तरी करावाच.आम्ही इंदूरहून आलोय.आमच्यात बरेचसे नवीन साधक आहेत.शिकतायत अजून.तो असं म्हणतो ना म्हणतो तोच आमच्या पुढच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या मौलवीने मोठ्या आवाजात सुरु केले- 
लब्ब ई कला हुम्मा लब्ब ई 
लब्ब ई कला शरीक लब्ब ई 
इन्नल हमदा वन्या मत्ता 
दकवाल मुल्क 
दा शरीक लब्ब ई 
तो सांगत होता तसे सर्व साधक एका सूरात म्हणूलागले.जेद्दाह येई पर्यंत हे चालूच होतं.जेद्दाहला उतरलो तेंव्हा रात्रीचे १०.३० वाजून गेले होते.पुन्हा चेक आऊट काऊंटरवर पासपोर्ट तिकिट दाखवणे,बोटाचे ठसे वगैरे सगळे उपचार पार पडले.बेल्ट वरून आलेल्या बॅगा घेतल्या आणि बाहेर पडताना मनात धाकधूक सुरु झाली.
आमच्या एका बॅगेत होमिओपॅथीची औषधे होती.या औषधात अल्कोहोल असतं.तसं कुठल्याही पॅथीच्या औषधात ते असतंच पण सौदीसारख्या देशात होमिओपॅथीला औषध म्हणून मान्यता नाही.त्यामुळे स्कॅनिंग मधे आमचं हे बिंग फुटलं तर सगळंच मुसळ केरात जाणार होतं. एवढं पॅकिंग करुन साड्यांच्या घड्यात लपवून आणलेली औषध फेकून तर द्यावी लागलीच असती पण औषधाविना तीन महिने काढावे लागले असते.कधी कधी कायदा विचित्र असतो.चोरून,लपवून काही कराव असं मनात नसताना तसं करावं लागतं.एअर पोर्टच्या बाहेर पडलो तेंव्हा एकदम दोघंतिघं टॅक्सी टॅक्सी करत पुढे आले.त्यातला एक जण सिगारेट ओढत होता.खाली जमिनीवर असंख्य थोटकं पडली होती.दुष्यंतला ते दाखवलं तर म्हणाला इथे हुक्का,सिगारेट जोरात चालते.दारू अफू गांजा यावर मात्र संपूर्ण बंदी आहे.कुणाकडे यातलं काही सापडलं तर शिक्षा जबरदस्त आहेत.स्त्रियांना आबाया म्हणजे बुरखा सक्तीचा आहे.आपल्या इकडे 
तोकडे कपडे घालून देवळात जाऊ,मासिकपाळीच्या काळात देवळात गेलो तर तर तुमचा देव काय भ्रष्ट होतो का? -असले प्रश्न विचारण्याचे लाड इथे पुरवले जात नाहीत.बायकांना मशिदीत प्रवेश नाही म्हणजे नाही.कायदा आहे तो पाळायचा म्हणजे पाळायचाच.बस्स खल्लास.
दुष्यंत स्नेहा आणि आभुटली वाटच बघत होते.आभा पळतपळत येऊन आजीला बिलगली.चहा घेऊन आम्ही कारमधे बसलो.इथून पुढे साडेतीनतासाचा प्रवास होता.पण मुलांसोबत तो हा हा म्हणता संपला.राॅयल कमिशन ५८१२ नंबरच्या आमच्या मुलाच्या घरात प्रवेश केला तेंव्हा साडेतीन वाजून गेले होते.पण शीण कसा तो नव्हता.मनातला आनंद शब्द शोधत ,वेचत बागडू लागला होता..! 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७