व्याख्यानाचे मुद्दे

वाचाल तर वाचाल 
------------------------- 
आज वाचन प्रेरणा दिन आहे.भारताचे सायंटिफिक अडव्हायझर राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस साजरा करतो.हा काही एखादा सण नाही की या दसऱ्याला घराच्या दारावर बांधलेलं झेंडूच्या फुलमाळांचं तोरण पुढल्या दसऱ्याला काढलं तर चालतंय.मला वाटतं वाचन प्रेरणा दिन म्हणजे जन्मभर अंगिकारायचं व्रत आहे.म्हणूनच 
वाचाल तर वाचाल असा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे.या शीर्षकात दोन प्रश्न दडलेले आहेत.काय वाचाल तर वाचाल? हा पहिला प्रश्न.आणी कशातून वाचाल ? हा दुसरा प्रश्न.आता असं काही नाही की पुस्तक वाचलं नाही तर आपण लगेच मरणार आहोत.जगणारच आहोत.पण नुसतंच पोटार्थी,घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखं फिरत राहणं आपल्याला अर्थपूर्ण वाटत नाही म्हणून आनंददायी देखील वाटत नाही..
"हे जीवन वेड्या अर्थशून्य जर नसते शब्दात कवींनी काय मांडले असते?
एकाच दिशेने ओढीत गाडा गेलो 
ना भिंती; वाडा चौसोपी बांधित बसलो" 
मित्रांनो,प्रत्येक माणसाच्या अंतर्मनातलं हे स्वप्नं आहे.मग तो अशिक्षित असो,गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला असंच वाटत असतं की कोणत्याही प्रकारच्या भिंती नसलेला चौसोपी वाडा बांधावा.हे खरं म्हणजे अप्राप्य आहे पण आम्हा माणसांना अशा अप्राप्य प्राप्य वाटणाऱ्या आनंदाचीच ओढ असते.कवीवर्य रेंदाळकरांच्या ओळी आठवतात- 
"अजून चालतोचि वाट 
माळ हा सरे ना..
विश्रांतीस्थळ केंव्हा 
यायचे कळे ना.." 
कुणीतरी आतून सांगत असतं तुला हवं असलेलं आनंदाचं निधान,तुझं विश्रांतीस्थळ नक्की आहे पुढे.तू चालत रहा..आणि आपण चालत राहतो..आपल्याला सतत साद घालणारं ते विश्रांतीस्थळ आपल्याला चालण्यासाठी उर्जा देत राहतं..आणि चालण्याचे कष्ट हे कष्ट वाटेनासे होतात.मला वाटतं दर्जेदार पुस्तकं तुम्हाला असाच अक्षय आनंद देतात.रविंद्रनाथ टागोरांनी एका निबंधात आठवण सांगितलीय की लहानपणी मला आई-वडीलांनी खेळणी आणून दिली नाही म्हणूनच मला समजलं की जीवनाचा खरा आनंद बाह्य वस्तूत नाही तर आपल्या अंतरात्म्यात आहे.अशा  अंतरात्म्यातल्या आनंदाचं दर्शन पुस्तकं घडवत असतात.तेंव्हा वाचन प्रेरणा दिनाला आपण सर्वांनी आपल्या मुलां-नातवंडांना खेळण्यां ऐवजी पुस्तकं देऊ.दिसामाजी काही वाचित जावे हे व्रत अंगिकारल्या शिवाय मुलांना काय वाचायला द्यायचं हे आपल्याला कळणार नाही..सुधा मूर्तींचं थैलीभर गोष्टी,संजय उपाध्यायांच्या "वास्तव'' या पुस्तकातल्या कविता तर आबालवृद्धांचा विवेक जागा करणाऱ्या आहेत.हीच कविता पहा- 
"काही माणसं मैत्रीनं आपल्या खांद्यावर हात टाकतात नि आपल्या बेसावध क्षणी आपल्याला स्लत:चा खांदाच देऊन जातात..! 
काही माणसं वरनं हापूसच्या आंब्यासारखी दिसतात.. चवीनं त्यांचा स्वाद घ्यावा तर ..नेमकी बाठी लागलेली दिसतात..! 
काही माणसं वरनं सुकलेल्या चिखलासारखी असतात..जमीन कडक म्हणून पाय टाकावा तर 
आपल्याला आणखीनच आत खेचतात..! 
नि काही माणसं पिंपळाच्या पानासारखी असतात 
त्यांची जाळी झाली तरी 
मनाच्या पुस्तकात जपाविशी वाटतात; आयुष्यभर..! 
मित्रांनो,ही कविता खूप काही सांगून जाते आणि तरीही काहीतरी वाचकाच्या मनात ठेवून जाते, घर करुन राहते.एक पुस्तक,एक कविता, लिहीण्यासाठी असंख्य माणसं वाचावी लागतात आणि एक माणूस समजून घेण्यासाठी असंख्य पुस्तकं वाचावी लागतात.शिक्षण घेऊन माणूस पदव्यांवर पदव्या घेईल, पण शाहणा होईल याची खात्री देता येत नाही.हे शाहाणपण फक्त आणि फक्त वाचनानेच मिळू शकते.अर्थात काय वाचता त्यावरही हे अवलंबून आहे.दुसरं असं की काय वाचायचं हे आपलं आपल्याला कळण्यासाठी आधी मिळेल ते पुस्तक वाचायला सुरुवात केली पाहिजे.जसजसा व्यासंग वाढत जाईल तसतशी साहित्या विषयी जाण वाढत जाईल.मग एक दिवस लक्षात येतं की कोणतं पुस्तक चाळून संपतं.कोणतं एकदा वाचून संपतं आणी कोणतं पुस्तक कितीही वेळा वाचलं तरी संपत नाही.या वर्षीचा वाचन प्रेरणा दिन विशेष अशासाठी आहे की नुकताच आपल्या मायमराठी भाषेला अधिकृत रीत्या अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय.हा दर्जा मिळाल्यामुळे भाषेच्या संशोधन,विकास व संवर्धनाला निश्चित अशी दिशा मिळणार आहे.हा लाभ पदरात पाडून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल हा विषय वेगळा आहे. त्याचा व्याख्यानाच्या विषयाशी थेट संबंध नाहीय.वाचन प्रेरणा दिना दिवशी अभिजात साहित्य म्हणजे काय व ते कां वाचायचे हे समजणं आवश्यक आहे.अभिजात या शब्दाचा शब्दकोषातला अर्थ उच्च कुलीन,श्रीमंत,शिष्टाचार सभ्यता असा आहे.जगातल्या सगळ्या भाषा माणसानेच निर्माण केल्यात.म्हणजे माणूस अभिजात झाला, उच्च कुलीन,झाला म्हणून त्याची भाषाही अभिजात झाली.त्या भाषेत जो ग्रंथ रुपाने ज्ञान व्यवहार वृद्धींगत झाला आणि होतो आहे ते ग्रंथ म्हणजे अभिजात साहित्य म्हणता येईल.मराठी भाषा साहित्याची ही परंपरा अडीच हजार वर्षापासून चालत आली आहे.आद्य कवी मुकुंदराज, ज्ञानेश्वर, तुकारामादी संतांची सर्व काव्य संपदा ही अभिजात आहे.आजचे जे आधुनिक मराठी साहित्य आहे तेही याच धार्मिक,अध्यात्मिक  परंपरेवर उभे आहे.'स्व' शोध व उच्चकोटीची काव्यात्मता सर्व प्रकारच्या साहित्याच्या केंद्रस्थानी आहे.कवी लेखक बहिर्मुखी असो किंवा अंतर्मुखी तो स्वत:च्या शोधातून समग्र अस्तित्वाचाच,जीवनाचाच शोध घेत असतो.मित्रांनो,कदाचित हे विवेचन जरा क्लीष्ट कंटाळवाणे वाटू शकेल पण काय वाचायचे व कां वाचायचे या प्रश्नाच्या उत्तरासाठी हे सगळे सांगणे आवशयक होते.आता आपण काही साहित्यकृतींमधील अंश अभिवाचनाद्वारे पाहू म्हणजे विषयाची रंगत वाढेल.. 










Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७