रमणीय प्रतिमांच्या विश्वातील प्रतिभावंत कवी : रमेश यशवंत वाकनीस

रमणीय प्रतिमांच्या विश्वातील प्रतिभावंत कवी : रमेश यशवंत वाकनीस 
(दै.केसरीच्या 'काव्यलेणे' सदरातील लेख.मुलाखत व शब्दांकन :प्रदीप कुलकर्णी

एकाच कवितेचा काही भाग मुक्तछंदात आणि काही भाग छंदोबद्धही असू शकतो? कुणीही म्हणेल नाही.परंतू कवी रमेश यशवंत वाकनीस यांनी ही किमया करुन दाखवली आहे. त्यांच्या 'आकाशा ' या दीर्घ कवितेत त्यांनी हा प्रयोग केला आहे.खरे तर प्रयोग केला असे म्हणता येणार नाही.ही कविता लिहीताना जो आकृतीबंध सुचत गेला तसे लिहीत गेलो आणि एक वेगळीच कविता जन्माला आली.ज्येष्ठ कवी व संपादक पुरुषोत्तम पाटील यांना ही कविता खूपच आवडली आणि ती त्यांनी त्यांच्या ' कविता-रती ' अंकात प्रकाशितही केली.
वाकनीस यांना खरे तर नाट्यक्षेत्रात नांव काढायचे होते.तेथे संधी मिळाली नाही म्हणून मग 'नाट्य स्यमंतक' या हौशी संस्थेची स्थापना करुन 'भस्मासूर' हे स्वत:चेच बालनाट्य रंगमंचावर आणले.त्याचे दहावीस प्रयोगही केले.याच दरम्यान 'अॅक्टीव्ह थिएटर' च्या स्थापनेतही त्यांचा सहभाग झाला.अभिनयाची हौस भागू लागली.कलावंतांच्या सहवासात वाकनीसांमधील कवी/लेखकाला प्रोत्साहन मिळत गेले.तो काळ १९६९-७० चा.त्या काळात 'कॅब्रे डान्सचे' लोण सर्वत्र पसरलेले होते.वाकनीस यांची पहिली कविता याच विषयावरची.क्लबमधे तोकड्या कपड्यात नाचणारी नर्तिका आणि त्याच क्लब बाहेर लक्तरे पांघरुन आपली लाज राखण्याची शर्थ करणारी भिकारीण असे दोन संस्कृतीमधील विदारक दर्शन घडवण्याचा प्रयत्न वाकनीसांनी केला होता.
वाकनीस सांगतात,आपण सातत्याने काहीतरी लिहायलाच पाहिजे असे फार वाटायचे.मनातील उर्मी शांत बसू देत नव्हती म्हणून मग रोजच्या रोज डायरी लिहायला लागलो.मनातील तरल भावभावना,विचार त्यात नोंदवत राहिलो आणि एक दिवस स्फोट झाल्यासारख्या लयबद्ध ओळी सूचू लागल्या.शब्दांची पूजा आणि भक्ती यामुळेच हा चमत्कार घडून आला.
'गाय गळ्यातिल घुंगुर बोले नदी किनारा सुटला वारा..निघू वासरा..असे काहीसे पहिल्या लयबद्ध कवितेचे शब्द होते.मात्र आजतागायत वृत्तांचा शास्त्रशुद्ध अभ्यास मी केला नाही कारण त्याची गरज वाटली नाही असेही वाकनीस सांगतात.ते म्हणतात, 'बा.सी.मर्कढेकर,ग्रेस,आरतीप्रभू,जी.ए.कुलकर्णी,अरविंद गोखले,सदानंद रेगे,यांचं साहित्य मी मनापासून वाचलं त्यातूनच उपजत प्रतिभेला बळ मिळत होतं.या दीपस्तंभांसारख्या साहित्यिकांच्या साहित्यावरच माझा पिंड पोसला जात होता.कवितां मागून कविता सुचत होत्या.लिहीत राहणं ही प्रोसेसच एकूण आनंददायी असते.' या प्रवासात माझा मित्र कवी सुरेश कोकीळ याच्या सहवासाने माझ्या वाचनाला आणि एकूण आयुष्यालाच दिशा मिळाली.
वाकनीस यांचा १९८६ साली ' पूर ' हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला.त्यात बहूतेक सर्व प्रकारच्या कविता आहेत.१९७६ ते १९८६ या काळातल्या या कवितांवर तत्कालीन किंवा पूर्वसूरींच्या कवितेचा प्रभाव जरी जाणवला तरी देखील त्यातले 'आत्मटीका,आत्मसन्मान आणि आत्मशोध हे सूत्र' लक्ष्यवेधी ठरले आणि ती सर्वात वेगळी उठून दिसली.' पूर ' कविता संग्रहामध्ये याची साक्ष पटते.
'आकाशा' 'चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..! हा रुबायांचा आणि 'पिवळा चाफा हिरवे पान असे तीन संग्रह वाकनीस यांना प्रकाशित करायची इच्छा आहे.वाकनीस यांच्या कवितांमधील प्रतिमा आणि प्रतीके खूपच वेगळी आहेत.त्यांची शैलीही निराळी आणि इतर कवींमधे उठून दिसणारी आहे.असे असले तरी आपल्या सर्वच कविता आपल्याला आवडतात असे नाही असेही ते परखड आत्मपरिक्षण करतात.'आकाशा' ही कविता मात्र त्यांना खूप आवडते.
आपल्या अवतीभवतीच्या जगात आपण जे पाहतो,ऐकतो,अनुभवतो ते सहाजिकच आपल्या मनात खोलवर कुठेतरी मुरत जाते.वास्तवात पाहिलेले,अनुभवलेले अनेकदा कल्पितात जाऊन बसतात तर कधी कल्पितातले काही अचानक वास्तवात दर्शन देते.हा साराच खेळ मोठा विलोभनीय असतो.असाच एक विलक्षण अनुभव घेऊन 'आकाशा' ही शीर्षकापासूनच आगळीवेगळी कविता उमलू लागली.या कवितेच्या ओळी मनात चालू असतानाच एकीकडे कवीश्रेष्ठ केशवसुत यांच्या 'क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास' या कवितेचे वाचन चालू होते,म्हणजे कवितेचा प्रत्यच येत असतानाच 'आकाशा' मुक्तछंदाचा घाट घेऊन अवतरत गेली.कविता पूर्ण झाली असं वाटत असतानाच नवीन छंदोबद्ध ओळी ओठावर येऊ लागल्या त्या लिहीत गेलो.हा प्रयोग वगैरे काही नव्हता. ती त्या क्षणाची गरज होती असे वाकनीस स्वच्छपणे कबूल करतात.
स्त्रीची वेगवेगळी रूपे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वाकनीसांनी मोठ्या सामर्थ्याने या कवितेत रेखाटली  आहेत.स्त्रीला आयुष्यात आई,मुलगी,बहिण,सखी,प्रेयसी,पत्नी अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून जावे लागते.त्या साऱ्याच भूमिकांचा विलोभनीय साक्षात्कार या कवितेतून होतो असे म्हणता येईल.पण 'आकाशा' ही कविता म्हणजे फक्त इतकेच नाही तर त्याही पलिकडे ती रसिकाला घेऊन जाते.'कविता-रती' मधे प्रकाशित झालेली कविता प्रत्येक कवींनी,रसिकांनी आवर्जुन वाचावी अशीच आहे.
वाकनीस हे केंद्रिय कर्मचारी आहेत.काव्य वाचनाचे अनेक कार्यक्रम ते वेगवेळ्या शीर्षकांतर्गत ते करत असतात.'गाणे मनभोर चांदण्याचे' 'चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की..!' 'गहिवर स्वरगंधाचा' हे सर्व कार्यक्रम शब्दगंध साहित्य कला सहयोग या संस्थेचेवतीने पिंपरीचिंचवड व पुणे परिसरात विशेष गाजले.वाकनीस आणि त्यांचे कवी मित्र मनोहर लोंढे यांनी शब्दगंधची स्थापना केली व साहित्य क्षेत्रात योगदान ते सातत्याने देत आहेत.
मुक्तछंद जितक्या प्रभावीपणे ते लिहीतात तितक्याच सहजतेने ते लयबद्ध कविताही लिहीतात.प्रत्येक गोष्टीच्या खोल मूळाशी जाऊन वेगळ्या पद्धतीने विचार करणे हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल.याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत अटळपणे पडलेले दिसते.'चाफा' हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय.त्यांच्या अनेक कवितांमधून तो डोकावतो,रसिक मनात दर्वळतो.एका कवितेत ते म्हणतात- 
' चाफ्याच्या झाडाखाली 
  दोघांच्या भेटी घडल्या 
  कां कुणी सांगण्याआधी 
  शब्दांना कळले तुटल्या..
' बोलले कोण? हा मागे 
  चाफा ही सायंकाळ 
  अंगावर पडली माझ्या 
  ही नि:शब्दाची शाल..' 
अशा ओळी वाचल्या की त्यांच्या शब्दसामर्थ्याचा प्रत्यय येतो.नेमकी भावना शब्दांमध्ये अचूकपणे ते पकडतात.त्यांच्या अंगावर नि:शब्दाची शाल असली तरी अंतरीक प्रेमाची उब त्यांच्या शब्दातून मिळते.वाकनीस यांची कविता रूढ वाटेने जाणारी नाही.
वेगळ्या वाटेवर रमणाऱ्या या कवीच्या शब्दांना एक वेगळेच विश्व खुणावत आहे असे त्यांच्या कवितेतून जाणवते.हे विश्व ते अतिशय ताकदीने उभे करतात.त्यांचे आगामी कविता संग्रह याची साक्ष देतीलच.
' प्रेमाने केली कविता 
  कवितेने केले प्रेम 
  मरणाच्या उदरी ऐसा 
  दोघांचा झाला जन्म..' 
प्रेमाने कविता केली की कविताही आपल्यावर प्रेम करते आणि त्या कवितांवर रसिकही भरभरुन प्रेम करतात.हृदयापासून दाद देतात.कवितेकडे एक गंभीर साहित्य प्रकार म्हणून पाहणाऱ्या कवी रमेश वाकनीसांकडून अलौकिक प्रतिमा,प्रतिकांचे रमणीय विश्व अधिकाधिक सामर्थ्याने उलगडले जाईल यात शंका नाही.पुढील काव्य प्रवासासाठी त्यांना अनेकानेक शुभेच्छा..! 
कवीचा पत्ता : कामायनी सह.गृह‌ संस्था सेक्टर २५ घरांक ५०/२ सिंधुनगर,निगडी,पुणे४४ 
७६५३१४०(हा नंबर जुना २००१ सालचा असून अस्तित्वात नाही.) 
*दै.केसरीत प्रकाशित झालेल्या वरील लेखाच्या झेरॉक्स प्रतीवरुन मी समाज माध्यमावर प्रकाशित करण्यासाठी स्वत: पुनर्मुद्रित केला आहे.
रमेश यशवंत वाकनीस 
भटकबोल्या ९०९६८००६५३ 




Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७