लिहायलाच पाहिजे म्हणून

लिहायलाच पाहिजे म्हणून..
----------------------------- 
आज जागतिक पुस्तक दिन.आजच्या मुहूर्तावर शेकडो नाही हजारो पुस्तक प्रकाशित होतील.पुस्तकांमध्ये खपाऊ आणि बिनखपाऊ असे दोन प्रकार असतात.ही सगळी पुस्तके थोड्याच कालावधीत महाराष्ट्रातील शासकिय, निमशासकीय,खाजगी,सार्वजनिक संस्थांच्या ग्रंथालयांमधून आपापल्या शोकेसमध्ये आपापल्या जागेवर आतुरतेने वाचकांची वाट पहात बसतील.वाचकांच्याही अनेक परी असतात.काही वाचक असे असतात की त्यांना कुठलेही पुस्तक चालते.त्यामुळे अशा वाचकांना ग्रंथालयातल्या टेबलवर पडलेलं कुठलंही पुस्तक चालते.काही वाचक फक्त धार्मिक पुस्तकच वाचतात.धार्मिक पुस्तकांचा खपही प्रचंड असतो. यातही पहिला नंबर स्वप्न व त्याचे शुभाशुभ संकेत,ज्योतिष,हस्तरेषा,वगैरेंचा लागतो.त्यामुळे अशी पुस्तके प्रकाशित करण्याकडे प्रकाशकांचा कल अधिक असतो.काही वाचकांना रहस्यकथा,गूढकथा,भयकथा यात जास्त रस असतो.यातही नारायण धारपच पाहिजे असा हट्ट नाही.लेखक कुणीही चालतो त्यांना.नवोदित असो नाहीतर दिग्गज त्यांना काही फरक पडत नाही.काही वाचक मात्र चोखंदळ असतात त्यांचे मराठी साहित्यातील ग्रंथ विषयक घडामोडींकडे विशेष लक्ष असते.यातही पुन्हा हलकेफुलकेवाल्यांची,किंवा विनोदीवाल्यांची संख्या भरमसाठ.अशा वाचकांना डोक्याला ताप अजिबात नको असतो.काही वाचक चोखंदळांमधले विशेष चोखंदळ असतात.असे वाचक जी.ए.,ग्रेस,रुमी,सार्त्र,काफ्का,आरती प्रभू,श्री.ना.वा.रा.कांत,ही यादीही बरीच मोठी आहे, कुसुमाग्रज,विंदा,विलास सारंग,ही यादीही बरीच लांबलचक आहे.पण यांच्या पुस्तकांच्या नवव्या दहाव्या आवृत्याही ग्रंथालयांच्या कुठल्यातरी कपाटात वाचकाची वाट बघत असतात.ग्रंथालयातले बहूतेक सर्व कर्मचाऱ्यांच्या ग्रंथविश्वातील घडामोडींचे ज्ञान अगाध असते.कुठल्याही ग्रंथालयात जा आणि विचारा, 'नामदेव ढसाळांचं सर्वकाही समष्टीसाठी आहे कां हो?'-तो कर्मचारी 'कोण नामदेव ढसाळ?'-असं तरी विचारेल किंवा बघा बुवा असेल कुठल्यातरी शेल्फमधे.बहूतेक ठिकाणी लेखकांच्या सूची प्रमाणे विभागणी करुन शेल्फमध्ये ठेवलेली असतात.पण जयवंत दळवी नाव असलेल्या भागात दळवी नसतातच.भलतेच लेखक किंवा लेखिका असतात.याला वाचकही जबाबदार असतातच म्हणा.कारण पुस्तक जिथून घेतलं,चाळलं,तिथे ठेवतच नाही.एकूण काय ग्रंथालय कर्मचारी,आणि वाचकांचं या बाबतीत प्रबोधन होणं आवश्यक आहे.पण ते करायला कुणाला वेळ नाही.कवी साहित्यिक मंडळी आपापलं पुस्तक पदरमोड करुन कां होईना पण प्रकाशित करण्याच्यामागे असतात.मोठ्ठा प्रकाशन समारंभ झाला,प्रसार माध्यामातून नांव,फोटो प्रकाशित झाले की ते खूष असतात.ते तरी काय करणार?- त्यांनी लेखनकामाठी सोडून हाच उद्योग करत बसायचं कां?-पण जी मंडळी मराठी भाषेची सतत चिंता करत असतात, मराठी भाषा संवर्धन समित्यांवर बसलेले असतात त्यांनी तरी हे काम हाती घ्यावे पण तिथेही आनंदच आहे.अपवाद असतील पण अपवादांची संख्या वाढायला नको कां?- आज जागतिक पुस्तक दिन.तो मराठी माणूस आनंदाने साजरा करेल.आपल्याकडील ग्रंथ संपदेत भरही घालेल.परिणामी पुस्तके खपतील.पण अमुक इतकी पुस्तकं खपली किंवा ग्रंथालयांच्या संख्येत भर पडली म्हणजे सुजाण वाचकांची संख्याही वाढली असे म्हणता येईल कां?-तर नाही.नुसतंच 'वाचाल तर वाचाल' असे म्हणून काहीही साध्य होणार नाही.काय वाचलं पाहिजे?- कां वाचलं पाहिजे हेही सांगायला पाहिजे.आपली पुढची वाचनानं समृद्ध व्हावी असंं वाटत असेल तर हे काम केलं पाहिजे.'रुद्रंग' हा आमचा अभिवाचनाचा समूह या कार्यात आपला खारीचा वाटा उचलतो आहे.अशा खारींची संख्या वाढली पाहिजे इतकीच अपेक्षा  पुस्तक दिना निमित्त व्यक्त करतो.
©रमेश यशवंत वाकनीस 
२३ एप्रिल २०२४ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७