लिहायलाच पाहिजे म्हणून

लिहायलाच पाहिजे म्हणून..
--------------------------
'अगम्य'
या कविते विषयी जरा सविस्तर लिहा अशी पाटीलसरांची प्रेमळ आज्ञा झाली म्हणून लिहायला बसलोय.सरांची कविता या निमित्ताने पुन्हा वाचली.पहिल्या वाचनात मला जे वाटलं,जो प्रश्न मनात उभा राहिला तोच पुन्हा मी स्वत:लाच विचारला,' या कवितेत कवी जे म्हणतोय त्यात अगम्य असं काहीच नाही,मग शीर्षक 'अगम्य' देण्याचं कारण काय?-कवीला  माणसाचं सामाजिक वर्तन कोड्यात पाडणारं वाटतंय आणि म्हणून त्यानं तसं शीर्षक दिलं असं म्हणता येईल.असो.कवितेकडे वळू.. 
'नयनरम्य,अद्भूत जगात कां होतात भावनिक आंदोलन..
सगळंच अगम्य.
स्वत: प्रश्न उभा करायचा आणि स्वत: च त्याचं उत्तर द्यायचं असा या कवितेचा प्रवास आहे.जग कितीही नयनरम्य आणि अद्भूत भुरळ पाडणारं असलं तरी त्यात भावनिक आंदोलनं होतात, माणूस त्यात सद्सद्विवेक बुद्धी हरवून बसतो म्हणून समस्या निर्माण होतात.असं कवी स्वत:च उत्तर देतोय..
'मालक असूनही निर्वासित होण्याचं कुणाला काहीच कसं वाटत नाही..
खरं असूनही पटत नाही.सगळच अगम्य..' 
माणूस स्वत:च स्वत:चा मालक आहे.पण विवेक बुद्धीची कांस त्यानं सोडलीय त्यामुळे तो निर्वासिता सारखा दुसऱ्याकडे आसरा मिळेल,आधार मिळेल या आशेवर जगतोय.माणूस अनेक प्रकारच्या लोभापायी आपला आत्मविश्वास गमावून बसतो हे कळतंय पण वळत नाही.यात अगम्य काहीच नाही तरीही अगम्य वाटतंय  कवीला..! 
' गोटा नर्मदेतला शहाण्या पाण्यात थिजलेला उपदेशाचा धनी होतो 
जगालाच मौलिक सल्ला देतो- 
असं घडतंच कसं?
सगळंच अगम्य. 
प्रेमानं समजावून, कानीकपाळी ओरडून,प्रसंगी मारुन सांगितलं तरी ज्याला समजत नाही अशाला नर्मदेतला गोटा म्हणतात.शाहणं पाणी म्हणजे 'ज्ञान' त्याच्या डोक्यावरुन वाहून जातो.जरासं पाणी लागून तो भिजतो आणि थिजून  'महाज्ञानी' झाल्याच्या थाटात सगळ्या जगाला शिकवत बसतो.मौलिक सल्ले देऊन शेखी मिरवतो.असं घडतच कसं?- सगळंच अगम्य आहे..(?)! 
'व्यास, वाल्मिकी,चार्वाक पचवणारेही आहेतच की आपल्याच उभे मजबूत पायावर..
उतावळे मानतात स्वत:ला धरणीधर..
पट्टीचे ठगडे बनतात कसे?-
सगळेच अगम्य आहे.
-व्यास,वाल्मिकी,अगदी चार्वाकही पचवणारे आहेतच म्हणजे जे खरोखरच 'ज्ञानी' आहेत असं वाटतं तिथेही त्यांचं वर्तन'अज्ञान' प्रकट करणारेच दिसते आहे.तत्वज्ञान सांगणं खूप सोपं आहे ते आचरणात आणणं महाकठीण आहे.ते ज्यांना जमत नाही ते आपल्या जगण्याचंच तत्वज्ञान बनवून आपल्यापेक्षा अज्ञानी मंडळींवर थापण्याचं धाडस करतात.,'पट्टीचे ठगडे' होतात.याचं कवीला कुतुहलपूर्ण आश्चर्य वाटतं आणि तो पुन्हा म्हणतो- 
'सगळेच अगम्य आहे'.
पुढच्या कडव्यात त्याला वाटणारे 'अगम्य' अगम्य कसे नाही हेच सांगतो आहे.काय म्हणतो कवी?पहा- 
निरर्थक घडवतात सौदे,निसर्ग खरीदल्याचे..
या तथाकथित 'ज्ञानी' मंडळींना कळत असते की आदर्श आणि व्यवहार यांची हरघडी फारकत होतच राहणार आहे.तरीही ते लोकांच्या डोळ्यात अंजन घालतात.प्रबोधन करण्यात धन्यता मानतात- 
'शिकतात कुठून हे आंधळे कौशल्य?'-
कवीने 'आंधळे कौशल्य' असं म्हटलंय.दिव्याला आपल्या बुडाखालचा अंधार दिसत नाही.हेही अगम्यच नाही कां? 
-तरी पण, चंद्र,सूर्य,ताऱ्यांना पायाखाली दडपून विश्वभरात साम्राज्य गाजवायला,
आपल्याच तालावर झुलायला,झुलवायला कां बनतात हे श्रीयाळशेठ?
सगळंच अगम्य आहे.
-माणसाला आपला 'अहं' सुखावलेला,पोसलेला पाहायचा असतो.अगदी कौटुंबिक जीवनातही सत्ता गाजवण्याची,मान हवा असण्याची इच्छा माणसाला असतेच.माणसाची ही नैसर्गिक भूक आहे.जगात सर्वत्र संघर्ष,युद्ध चाललंय ते सत्ता,संपत्ती आणि स्त्री साठी.हे थांबावं असं वाटलं तरी ते थांबणार नाही हे सत्य आहे.पण तरी देखील- 
'दृष्टी पलिकडचं जग त्यांनी पाहिल्याचा त्यांचा जनमनावर बिंबवलेला दावा आपण मान्यच करायला हवा..नाही तर ते कोपतील,शापतील..
-दृष्टी पलिकडचं जग,किंवा सत्य खरं म्हणजे कुणीच पाहिलेलं नसतं.ज्यांनी 'सत्य' पाहिलं त्यांना ते दाखवता आलं नाही.वर्णन खूप केलं तरी सत्य दाखवल्याचं समाधान मिळालं नाही.शेवटी 'शाश्वत सत्या' चा साक्षात्कार हा ज्याचा त्यानंच अनुभवायचा असतो आणि अनुभवाशिवाय 'अगम्य' काय आहे हे कळत नाही आणि ज्याला अनुभव आहे तो एवढंच म्हणतो- 
' ज्ञानात केवढे अज्ञान झाकले आहे..! 
अज्ञानापुढती 'ज्ञान' वाकले आहे..! 
मी ज्ञान नव्हे अज्ञान नव्हे मी कोणी- 
छाटल्या जिभेचा शब्द अजन्मा मोनी..! 
©रमेश वाकनीस 
१५/४/२०२४

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७