सहज सुचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून
-------------------------
'वेदमंत्राहून आम्हा वंद्य..'
गदिमांचे हे गीत काव्य म्हणजे 'वंदे मातरम्' या कवितेचा महिमा गाणारी ललितकृती आहे.गदिमांना वंदे मातरम् या राष्ट्र गीताचाच महिमा कां गावासा वाटला?-वेद मंत्राहूनही वंदे मातरम वंदनीय आहे असे ते कां म्हणतात?- असे प्रश्न स्वत:लाच विचारले तर त्याचं उत्तर भारतीय स्वातंत्र्य समरात मिळतं.बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी ही कविता त्यांच्या 'आनंद मठ' या कादंबरीतील एका प्रसंगाचा परिपोष करण्यासाठी लिहीली.ब्रिटीश अधिकारी आणि धनदांडगे जमिनदार गरीब जनतेचे करीत असलेल्या शोषणा विरोधातल्या या कादंबरीवर नंतर चित्रपटही निघाला.कादंबरीत आणि चित्रपटात हे गीत विद्रोही संन्यासांच्या तोंडी घातले आहे.बंकिंमचंद्रांच्या या कवितेने इतिहास घडवला.ब्रिटिशांच्या विरोधात तरुण क्रांतीकारक अगोदरच पेटून उठले होते.या गीताने स्वातंत्र्य समराच्या यज्ञातील ज्वाला आकाशाला भिडू लागल्या.ब्रिटीश शासन हादरून गेले.वंदे मातरम् या कवितेवर बंदी घालण्यात आली पण त्याचा परिणाम उलटाच झाला.अबालवृद्धांच्या तोंडी त्यावेळी अपौरुषेय वेदातील मंत्रांपेक्षा,ईश्वर स्मरणापेक्षा 'वंदे मातरम्' चाच उद्घोष होत होता.जहाल मवाळ सर्व गटातील क्रांतिकारक ब्रिटिशां विरोधातील प्रत्येक चळवळीची सुरुवात 'वंदे मातरम्' दोन शब्दांच्या उद्घोषानेच करत असत.म्हणूनच गदिमा म्हणतात-
' माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती..त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती..'
गदिमांच्या या ओळी म्हणजे नुसती कविकल्पना नसून  राष्ट्रभक्तांचा,स्वातंत्र्यवीरांचा ज्वलंत अनुभव आहे.इतकेच नाही तर 'वंदे मातरम्' मुखी असणे म्हणजे भारतीयत्वाची ती ओळख होती.'वंदे मातरम्' या दोन शब्दात इतकी प्रचंड‌ ताकद होती की ' याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले.. शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले ' असा चमत्कार घडू शकला.म.गांधींच्या शांती व अहिंसेच्या मार्गावरील सैनिकांना 'वंदे मातरम्' नेच उर्जा दिली. वंदे मातरम् हेच त्यांचे शस्त्र बनले.या गीतामुळेच त्यांचे आत्मबल वाढले..
'वंदे मातरम्' या कवितेनंतर अक्षरश: लाखो राष्ट्रभक्तीपर गीते झाली,समरगीते,लिहीली गेली‌.गायिलीही गेली पण अगदी सहज जनसामान्यांच्या आचरणात आलेली ही पहिली आणि शेवटची कविता म्हणता येईल.विशेष म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ति पर्यंत बंकिमचंद्रांचे हे गीत अधिकृत रित्या राष्ट्रगीत होण्यापूर्वीच राष्ट्रगीत म्हणून जनसामान्यांनी कंठमण्यासारखे धारण केले होते.
गदिमांच्या या कवितेचे एक वैशिष्ट्य असे की ही कविता भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा संपूर्ण इतिहास फक्त तीन कडव्यात जिवंत करुन आपल्यापुढे ठेवते.प्रख्यात समीक्षक द.भि.कुलकर्णी यांनी एका व्याख्यानात हेच सांगितलं होतं.कवी जीवनाचा शिकारी असतो.जीवनानुभवांची शिकार करुन तो एकेक जिवंत तुकडा आपल्यापुढे ठेवत असतो.गदिमांनी हेच केलंय.त्यामुळे 'वंदे मातरम्' इतकीच गदिमांची ही कविता महत्वपूर्ण ठरते.
*
सांगोवांगी
--------------
थोर साहित्यिक बंकिमचंद्रांना 'आनंद मठ' या कादंबरीचे लेखन करत असताना त्यांच्या कन्येने विचारले,' तुम्ही कथा,कादंबऱ्या लिहीता पण अजून तुम्ही कविता कशी लिहीली नाही?'- यावर बंकिमचंद्र म्हणाले,' लिहीणार आहे बेटा..' या नंतर त्यांनी जी कविता लिहीली तीच 'वंदे मातरम्..! आपले राष्ट्रगीत.आपण भारतीय असल्याची ओळख..! असे म्हणतात की या एकमेवाद्वितीय कविते नंतर त्यांनी कधीच कविता लिहीली नाही..!!!🙏🌹
- रमेश यशवंत 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७